कळी उमलताना

कुठल्याही गोष्टीची निर्मिती ही आनंद देते. एखादे चित्र काढायला सुरुवात केली की ते काढून, रंग देऊन पूर्ण करेपर्यंत आपण त्या प्रक्रियेत गुंततो, रमतो. मनासारखं जमलेलं चित्र निर्मितीचा सुखद आनंद देतं. निर्मिती मग ती कशाचीही असो एखादा पदार्थ, पाककला, शिल्पकला ... मनासारखी झाली की समाधान लाभतं.

तसाच अनुभव प्रत्येक माता-पित्याला मुलांच्या जन्मापासून त्यांना सुजाण नागरिक बनविताना येतो. पण पालकत्व या सगळ्या इतर कलांपेक्षा कठीण असतं कारण यात हाडामासाचं मूल वाढवायचं असतं. कोवळं निरागस मन यात सामिल असतं. मुलांचं संगोपन हे प्रत्येक आई-वडिलांना "कधी बहर तर कधी शिशिर" या ओळीची प्रचिती देत असतं. मुलांच्या निर्मितीत निसर्गाने आईला जास्त सहभागी केलं आहे त्यामुळे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आईवर काकणभर जास्त असते. आईबरोबर नाळेशी जोडलेली मुलं पुढेही तिच्याबरोबर हळवं नातं जोडून असतात. वडिलांशी त्यामुळे मुलं कमी जोडली जातात असं मात्र अजिबात नाही, त्या नात्याचे वेगळे रंग आहेत.

दिवसेंदिवस पालकत्व आव्हानात्मक व्हायला लागलं आहे का? कदाचित हो .... मला आठवतंय माझी आई आम्हां भावंडाना वैतागून म्हणायची "आमच्या वेळी असं नव्हतं." परवा मी माझ्या मुलीवर वैतागून ओरडले "आमच्या वेळी असं नव्हतं". माझ्या वाक्याने मी नकळत माझ्या आईची जागा घेतल्याची जाणीव झाली आणि ही जाणीव मला हल्ली सारखी होते. पालकत्व काळाबरोबर बदललं नक्की आहे. कठीण झालं की नाही हे हळूहळू मला कळेल. "हिस्टरी रीपीट्स इटसेल्फ" या युक्तीची जाणीव करून देणारे, माझ्या बालपणाशी साधर्म्य सांगणारे प्रसंग वारंवार येतील आणि येत आहेत. माझी आजी आम्हाला रोज रात्री झोपताना खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगायची, न कंटाळता. रोज गोष्टी सांगायचा तिने कधी कंटाळा केला नाही आणि आजसारखी करमणुकीची साधने उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पण त्या गोष्टी मन लावून ऐकल्या. पण आज वेगवेगळी मनोरंजनाची साधनं उपलब्ध असूनही माझ्या मुलीला मी सांगितलेल्या गोष्टी काल - परवापर्यंत तरी आवडत होत्या. खरं सांगायचं तर मला पण कधीकधी वेळ होत नाही आणि तिच्याही कक्षा रुंदावत आहेत आणि मी पण विविध इतर करमणुकीच्या साधनांकडे वळते आहे. पण आजही तिला माझ्या गोष्टी आवडतात आणि हा ठेवा नक्कीच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवेल असं मला वाटतं.

माझ्या माहेरी सर्वांना खेळांची आवड आहे, माझे वडील उत्तम बॅडमिंटन खेळायचे, टेनिसच्या आणि क्रिकेटच्या मॅचेस बघायचे त्यामुळे आम्हाला पण खेळांची आवड निर्माण झाली आणि शिवाय लहानपणी आम्ही खूप मैदानी खेळ खेळलो. माझे सासरे, नवरा आज जेंव्हा टीव्हीवर मॅचेस बघतात तेंव्हा माझी लेक काय स्कोअर झाला विचारते, त्यांच्याबराेबर मॅचेस पण बघते आणि शाळेतही विविध खेळांमध्ये भाग घेते. मुलांवर घरातील वातावरणाचा नक्कीच प्रभाव होत असतो हे मला विविध प्रसंगांतून मुलीला वाढवतांना जाणवलं आणि मी ते स्वतःही अनुभवलं आहे.

मुलांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. त्यांना कळेल अश्या भाषेतून त्यांना समजावून सांगणं, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या समजावून घेणं खूप गरजेचं आहे. ती घरी येऊन बरोबर सांगतात, बरेचदा आपणच व्यस्त असतो किंवा नेहेमीचीच बडबड म्हणून दुर्लक्ष करतो. आजूबाजूचे जग वेगाने बदलत आहे, त्याचा त्यांच्यावर पण परिणाम होतो आहे. ज्या गोष्टी आपल्याला थोड्या कळत्या वयात कळल्या त्या मुलांना खूप आधी माहित आहेत किंवा त्यांच्यासमोर मीडिया सहज आणून ठेवतो आहे. माझी मुलगी अजून "टीनएज" मध्ये पोचली नाही पण हळूहळू " टिन टिन " वाजायला सुरवात झाली आहे. संवाद, शिस्त, कौतुक यांचा वापर करून पालकत्वाची कसोटीची वर्ष पेलण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे. समाजात वाढणारी असुरक्षिततेची जाणीव मुलांना काळजीपूर्वक करून देऊन त्यांना हवेसे वाटू लागलेले व्यक्तीस्वातंत्र्य देताना मनाचा थरकाप होतो आहे. त्यांना याची माहिती वेगवेगळ्या उपलब्ध मीडियाकडून असते, पण त्यातली भीषणता त्यांना कितपत माहित आहे हे आपण त्यांना विश्वासात घेऊन सोप्या भाषेत सांगणं ही काळाची गरज आहे. खो -खो च्या मॅचेस खेळून मला घरी यायला उशीर झाला तर माझ्या आईला अशी माझ्यासारखी भीती वाटत नसे. माझी भिती अनाठाई नाही पण मी त्यामुळे माझ्या मुलीला घरी डांबून तर ठेऊ शकत नाही. मला तिच्या नकळत तिला जपायचं आहे. आज न उद्या कुंपणापलीकडे मुलांना पाठवावं लागणार, पाखरू गगन-भरारीसाठी मोकळं करावं लागणार. त्याच्या पंखात बळ येईपर्यंत त्यांना सांभाळायचं आहे. उमलत्या कळीला जपायचं आहे.

- हेमांगी वेलणकर


1 टिप्पणी:

  1. इतकी सजग आई असल्यावर कुंपणापलीकडे उडताना पाखराच्या पंखात बळ असणारच आणि त्याची गगनभरारी उत्तूंग होणारच!

    उत्तर द्याहटवा