ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
भारतीय सिनेसृष्टीत १९५० ते १९६० आणि त्यापुढील काही वर्षे संगीताचा सुवर्णकाळ मानली जातात. अतिशय अप्रतिम संगीत या काळामध्ये निर्माण झालं; अत्यंत प्रतिभावान संगीतकार या दशकांनी आपल्याला दिले. फक्त या बहुतांशी चित्रपटांचा साचा थोड्या-अधिक प्रमाणात एकसारखा होता. बलराज साहनी, विमल रॉय यांसारखे काही अपवाद वगळता सिनेमा राज-दिलीप-देव यांनी व्यापून टाकला होता. तिघांची स्वतंत्र अशी शैली होती. त्यांच्या यशात संगीताचा अर्थातच खूप मोठा वाटा होता; पण त्यांनी त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल अशा पद्धतीचं काम फारसं केलं नाही. थोडक्यात, रिस्क घेतली नाही. त्या काळी एक प्रकारचा आदर्शवाद सिनेमांतून मांडला जाई; म्हणजे त्याग, समर्पण, विशुद्ध प्रेम यांनी हे सिनेमे ओतप्रोत भरलेले असत. खलनायकही फार त्रास देणारे नसायचे; नायिका कमालीची सोशिक आणि नायक सर्वगुणसंपन्न असे सर्वसाधारण चित्रपटाचे स्वरूप असायचे. अपवाद होते; पण मोजकेच. काही संवेदनशील दिग्दर्शक काही वेगळं देऊ पहायचे; परंतु या त्रयीचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्यांचे प्रयोग तितकेसे यशस्वी ठरले नाहीत.
सत्तरचे दशक सर्वात खळबळजनक मानले जाते. समाजजीवन ढवळून टाकणारं हे दशक जगातल्या अनेक देशांतला मूळ सामाजिक ढाचा बदलून टाकणारे ठरले. व्हिएतनाम युद्धाने अमेरिकेतील तरुण पूर्णपणे कोलमडून गेला; त्या युद्धातून काहीच साध्य झालं नाही; पण एक अस्वस्थ पिढी जन्माला आली. प्रस्थापितांविरुद्ध लढा, मुक्त जीवनशैली, बंडखोर वृत्ती, या पिढीने अंगिकारली. त्याच वेळी चीन या देशात सांस्कृतिक क्रांती घडवून आणली जात होती. माओने घडवून आणल्या या क्रांतीत लाल सैनिकांना चार जुनाट वृत्तींचा नायनाट करायचा होता. त्या होत्या परंपरा, संस्कृती, सवयी आणि विचार. प्राचीन ग्रंथ, प्रार्थनास्थळे यांसारख्या सांस्कृतिक वारश्याची अपरिमित हानी करण्यात आली. इतर देशांतूनही पडसाद उमटत होते. भारतात नुकतीच तीन युद्धे लढली गेली होती. अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. स्वातंत्र्य मिळवून दोन दशकं उलटली होती; परंतु हाती फक्त भ्रमनिरास आला होता. गरिबी, भूक, महागाई हे प्रश्न अक्राळविक्राळ आ वासून उभे होते. यातच दोन वर्ग उदयास येत होते. ते म्हणजे "आहे रे" आणि "नाही रे" वर्ग.
या दोन वर्गांचे प्रतिबिंब चित्रपटात पडले नसते तर नवलच. या नाही रे वर्गाचा प्रतिनिधी होता अमिताभ बच्चन. प्रस्थापित समाजाला जाब विचारणारा; प्रसंगी कायदा हातात घेणारा; येन केन प्रकारेण पैसे कमवून मोठा माणूस होणारा; हिंसेचा आधार घेऊन अपल्यावरचा अन्याय दूर करणारा; पण सहृदय असणारा; गरिबांचा कैवारी असलेला अँग्री यंग मॅन. त्याच्या विरोधात 'आहे रे' वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा शोषण करणारा खलनायक. अमिताभचा हा नायक सर्वसामान्यांना आपला तारणहार वाटला. त्याच्यातल्या त्या आत्मविश्वासाचा हेवा वाटू लागला. वास्तव आयुष्यात सर्वप्रकारचे अपमान सहन करताना, काळोखात पडद्यावर तो स्वतःला हिरो समजू लागला. त्यातूनच अनेक अविश्वसनीय घटना पडद्यावर घडू लागल्या. तीन मुलांनी एकाच वेळी आई ला रक्त देणे; सोन्याची बिस्किटं मिळाल्यावर माणसाचं नशीब बदलणे; लहानपणी बूट पोलिश करणारा मोठेपणी एक बडा आदमी बनणे; यासारख्या अनंत गोष्टी प्रेक्षक मोठ्या आनंदाने पाहू लागले. त्यात कुठेतरी स्वतःला शोधू लागले.
हे चित्रपट यशस्वी होत होते; परंतु त्याच वेळी एक नवा वर्ग उदयास येत होता. मध्यमवर्ग. प्रामुख्याने मोठ्या शहरात चाळीत राहणारा, छोट्या शहरात वसाहतीत राहणारा, पदवीधारक, बँका, खाजगी कंपनीत काम करणारा कारकून. त्याच एक छोटंसं विश्व होतं; त्याचे प्रश्न वेगळे होते; त्याची दोन वेळचा वरण भात (प्रसंगी घरचे साजूक तूप) खाण्याइतपत ऐपत होती; त्याची मुलं शाळेत जात होती; महिना अखेरची ओढाताण वगळता बाकी आयुष्य बरे म्हणावे अशा पद्धतीने चालू असायचे. शक्यतो वाद टाळणे, आपण बरे आपलं काम बरे ही वृत्ती; छोटी स्वप्न बघणे आणि आपण अदृश्य असल्यासारखे वावरणे ही काही वैशिष्ट्ये. आज यातला बराचसा वर्ग हा मुंबई उपनगरात तसेच मुंबई बाहेरच्या उपनगरात स्थायिक झाला आहे आणि 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्ग अजूनही मूळ मुंबईत तग धरून आहेत. यालाच irony म्हणत असावेत.
तर, काही सिनेमेकर्सना हा वर्ग खुणावू लागला. याच काळात समांतर चित्रपटही मूळ धरू पाहत होता; परंतु समांतर सिनेमा व्यावसायिक नसल्यामुळे तो अतिवास्तवतेकडे झुकत होता. जे वास्तव मध्यमवर्गाला पचनी पडण्यासारखे नव्हते. शोषित वर्गाची दुःखं त्यांना आपली वाटत नव्हती. त्यांची दुःखं/स्वप्नं होती स्वतःचं घर, एक अनुरूप पत्नी, हुशार मुलं, खिशात खुळखुळणारे पैसे, प्रसंगी टॅक्सी करायची, सहल करायची ऐपत. हाच USP पकडून अनेक मध्यमार्गीय चित्रपटांची निर्मिती झाली.
त्याकाळी यश चोप्रा, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरांसारखे दिग्गज व्यावसायिक चित्रपटाची धुरा वाहत होते. तसेच श्याम बेनेगल, गोविंद निहलानी समांतर चित्रपटांची एक वेगळी वाट चोखाळत होते. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधण्याचे श्रेय जाते हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, गुलजार या प्रभृतींना.
नर्मविनोद, साधं सरळ कथानक, साधे सरळ संवाद, हिंसेचा शून्य वापर, सोप्या शब्दातले तत्वज्ञान, मध्यमवर्गीय नायक नायिका असणे व गोल जिने असलेले मोठे प्रासाद किंवा दारिद्र्याची परिसीमा असलेली झोपडी यासारख्या नेपथ्याला पूर्णपणे चाट देऊन छोटी सुटसुटीत घरं, फ्लॅट्स, ऑफिसेस, अशी मोजकीच सुबक मांडणी; काश्मीर किंवा तत्सम श्रीमंत सौंदर्यस्थळं न दाखवता समुद्र, गर्दी, लोकल ट्रेन, चाळ अशी वास्तवातील रसरशीत स्थळं. अगदीच रम्य म्हणता येतील अशी महाबळेश्वर, पाचगणी माथेरान ची मध्यमवर्गीय फिरण्याची ठिकाणे, असा एकंदर बजेट मधला जामानिमा करून फुलवलेला वरून साधा वाटणारा; पण आतून आशयघन असणारा चित्रपट.
हृषिकेश मुखर्जी हे या मध्यमार्गीय चित्रपटांचे अध्वर्यु म्हणता येतील. त्यांच्या चित्रपटाची कथानकं वरवर पाहता साधी वाटायची पण आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान सहज सांगून जायची. आनंदमधला दुर्धर रोगाने आजारी नायक म्हणतो "जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नहीं!"; बावर्ची चा नायक म्हणतो "It is so simple to be happy, but it is difficult to be simple"; खूबसुरत मधली नायिका निर्मळ आनंदाचं महत्व पटवून देते, तर मिलीमधली नायिका म्हणते "दोस्ती अच्छी या बुरी नहीं होती, दोस्त अच्छे या बुरे होते है". किती सोपी वाक्यं पण किती अर्थ दडलाय यात! शिवाय हे सर्व सांगताना कुठलाही अभिनिवेश नाही; अगदी स्वाभाविक अभिनय. व्यावसायिक चित्रपटात इंटेन्सिटी दाखवणारा अमिताभ इकडे सौम्य, मध्यमवर्गाचा प्रतिनिधी बनून येतो तेव्हा त्याचं हे रूपांतर किती लोभस भासतं. हेच इतर कलाकारांच्या बाबतीत म्हणता येईल. राजेश खन्ना, धर्मेंद्र, यासारख्यांचा कृत्रिमपणा गळून पडतो अशा चित्रपटात. कथानकं ही काही अपवाद सोडता आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणारी आणि म्हणूनच आपल्याला खूप आपली वाटणारी.
हे झाले प्रथितयश अभिनेते; परंतु या सर्व प्रभावळीत खास मध्यमवर्गीयांच प्रतिनिधित्व करणाऱ्या एका ताऱ्याने याच काळात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. तो तारा म्हणजे अमोल पालेकर. आज मध्यमार्गीय सिनेमाचा विचार आपण त्याच्याशिवाय करूच शकत नाही. अमोल पालेकर यांनी हिंदी सिनेमाला एक वेगळा नायक दिला. हा नायक दिसायला सामान्य होता; पण त्याच्या चेहऱ्यावर एक निरागसता आणि चांगुलपणाचा उत्तम मिलाफ होता. तो गर्दीतला एक चेहरा होता. सामान्य माणूस स्वतःला त्याच्यात पाहू शकत होता. तो इतर सिनेस्टार्स सारखा परका वाटत नव्हता. त्याच्या बरोबरच्या नायिकाही चारचौघीत उठून दिसणाऱ्या; पण आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक मुलींसारख्या होत्या. थोडक्यात मधल्या सिनेमाला फिट बसेल अश्या व्यक्तिमत्वाने सत्तरचं दशक अक्षरशः गाजवलं. चितचोर, रजनीगंधा, छोटीसी बात, गोलमाल, घरोंदा, बातो बातो में, नरम गरम या सारख्या असंख्य चित्रपटातून एक वेगळाच नायक उभा केला.
रजनीगंधा चा बेफिकीर, लेट लतीफ; पण नायिकेवर मनापासून प्रेम करणारा नायक. यातली निशिगंधाची फुलं त्यांच्या प्रेमाचा सुगंध दरवळणारी; माफक प्रेमाचा त्रिकोण, मनातले तरंग, दोन व्यक्तीतली तुलना, शेवट अर्थातच गोड. छोटी सी बात मधला आत्मविश्वासाचा अभाव असणारा नायक अरुण; नायिकेचा पाठलाग करणारा; पण तिला पाहताच अवसान गळून जाणारा. त्याला मदत करणारा गुरू, त्याचा ओव्हर स्मार्ट मित्र. गोलमाल मधला राम आणि श्याम आशा दुहेरी भूमिकेत विक्षिप्त बॉस ला फसवणारा नायक; आणि घरोंदा चा व्यवहारासाठी प्रेमाचा बळी देणारा नायक अशा अनेक रूपांमध्ये अमोल पालेकरांनी मधमवर्गीय नायक जिवंत उभा केला. पापभीरू, सरळमार्गी, निरागस, काहीसा आत्मकेंद्री अशी अनेक वैशिट्य असणारा हाडामासाचा माणूस त्यांनी साकार केला. सामान्य माणूस त्यांच्या नायकात स्वतःला पाहू शके; रिलेट करू शके. हृषिकेश मुखर्जींप्रमाणे बासू चटर्जीनी ही सामान्य माणसाची नाळ पक्की जोखली होती. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न त्यांची स्वप्ने त्यांच्या समस्या या कितीही नगण्य वाटल्या तरी त्या त्या व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या असतात हे त्यांनी त्यांच्या चित्रपटातून दाखवले. भले मध्यमवर्गीय माणसाला उद्याच्या जेवणाची तरतूद करावी लागत नसेल; पण त्याच्या मनात त्याचं स्वतःचं घर असावं, छोटा संसार असावा, चांगलं काम करून चार पैसे गाठीशी जमवावे ही स्वप्न आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष आहेच ना! याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी केलेला एक असफल प्रयत्न "घरोंदा" या अप्रतिम चित्रपटात मांडला आहे. हा चित्रपट सर्व मध्यमार्गीय चित्रपटांचं प्रतिनिधित्व करतो. भीमसेन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दोन वेडे प्रेमी आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी एक अतिशय विचित्र प्लॅन आखतात. त्यात स्वतःची सदसद्विवेकबुद्धी आड आल्यामुळे नायिका त्यात अडकते आणि नायक एकटा राहतो. हा चित्रपट त्या काळचं सगळं चित्रच उभं करतो. माणसाची जीवघेणी धडपड केवळ आपलं स्वतःच घरकुल असावं म्हणून आणि त्यातून येणाऱ्या अपयशातून नैराश्यकडे वाटचाल हे सर्व काळीज पिळवटून टाकणारं.
याच काळात सई परांजपे यांचे कथा, स्पर्श, चष्मेबद्दूरसारखे निखळ आनंद देणारे चित्रपट याच सिनेमाचं प्रतिनिधित्व करतात. फारुख शेख, दीप्ती नवल यांसारखे गुणी कलाकार याच काळातले. खट्टा मीठा, अंगुर, कोशीश, गुडडी, परिचय, हे याच लाटेतले काही उल्लेखनीय चित्रपट. गुलजार यांनीसुद्धा या दशकात काही वेगळे आशयघन चित्रपट लिहिले; तसेच या मध्यमार्गीय चित्रपटातील बहुतांश चित्रपटाची गीते त्यांनीच लिहिली आहेत. या चित्रपटांनी एक काळ नक्कीच गाजवला आणि बऱ्यापैकी व्यावसायिक यशही मिळवलं. मात्र ९० च्या दशकात हा चित्रपट पुन्हा लुप्त झाला, तो सध्याच्या काही वर्षात डोकं वर काढू लागलाय.
आज जेव्हा आपण शुभमंगल सावधान, बरेली की बर्फी किंवा लव पर स्क्वेअर फूट बघतो तेव्हा मध्यमार्गीय चित्रपटांमध्ये अजूनही धुगधुगी आहे हे पाहून समाधान वाटतं आणि आपण निर्धास्तपणे स्वप्नं पाहायला मोकळे होतो.
Mast,apratim ilihila ahes Juilee,great
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाSimply Excellent..
उत्तर द्याहटवाEkdam nostalgic. Bawaechi, Milli,Uphaar, Silsila, Teishuo,Mukadhar ka Sikander, Guddi, Chitchor, Gharonda, Rajnigandha,Choti Si Baat,Ghar Ghar Ki Kahani, Deewar, Khushboo, Dard, Dream girl, all family pictures. Sagle athawle ekdam. Halli Cha ekpan picture badhal I am not much aware.
उत्तर द्याहटवासर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
उत्तर द्याहटवाVery well written, Juilee!
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवालेख उत्तम जमला आहे. अभिनंदन!
उत्तर द्याहटवासर्वांचे मनःपूर्वक आभार
उत्तर द्याहटवाखूप छान।
उत्तर द्याहटवा