डाएटची साग्रसंगीत वाट

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
कारणा शिवाय 
ठरवून कधीतरी, 
मित्रांना बोलावून 
आपल्या घरी, 
पंगतीचा उडवावा 
असा थाट, 
डाएटची लावावी 
पुरती वाट ! 

पंगतीला असावे 
चांदीचे ताट, 
जमला तर ठेवावा 
चंदनी पाट, 
ताटात असाव्या 
वाट्या आठ, 
भोवती असावा 
रांगोळीचा थाट ! 

वरण भातावर 
धरावी तुपाची धार,
मसाले भातावर
पेरावा ओला नारळ, 
पापडा शेजारी 
वाढावी कोशिंबीर, 
लिंबा सवे असावा 
लोणच्याचा खार ! 

फुगल्या पुरीवर 
वाढावे श्रीखंड, 
वाटीत शेजारी 
बासुंदी थंड, 
बाजुला ठेवावी 
जिलेबी केशरी, 
दुधी हलव्या शेजारी
गुलाबजाम भारी ! 

एका वाटीत 
ठेवावी रस्सा भाजी, 
सोबत त्याच्या 
गरमा गरम भजी, 
वालाची उसळ 
आणेल बहार, 
चटणी चाखून 
काढावा चित्कार !

मग तृप्त मनाने
देवून ढेकर,
हात फिरवून 
भरल्या तुंदीलावर, 
खावा वरती
गोविंद विडा, 
जो आणेल 
मग बहार !




*झुरळ*

उडते पाहताच याला 
बायकांची बघा गाळण, 
असेल थोडे जरी मोठे 
बसते पाचावर धारण !

लांब टोकदार मिशा
पाहून घाबरती सबला, 
काय करणार ते बिचारे 
घाबरून पळते जीवाला !

असेल चुकून जर ते 
पंखवाले व उडणारे, 
मारण्या त्यास मग 
उडवती औषधी फवारे !

पण नेमका अशा वेळी 
झाडू मिळत नाही घरात, 
मग निघे त्याच्या मागून 
घरातल्यांची पण वरात !

जन्मा पासून वसुंधरेच्या 
आहे म्हणे त्याचे अस्तित्व, 
चिनी 'सुपातूनच' जाणोत 
त्याच्या अंगीचे खरे सत्व !
- प्रमोद वर्तक

1 टिप्पणी:

  1. पहिली बहारदार कविता वाचूनच तोंडाला सुटले पाणी
    कविराज होऊन जाऊ द्या , घ्या सत्वर पाटपाणी I

    यकष्चित् झुरळच देते आम्हाला नैतिक बळ
    ऊभ्या ठाकण्या महाकाय अबले जवळ I

    उत्तर द्याहटवा