वैविध्यपूर्ण अनवट मैत्री

असं म्हणतात की देवाने विचार करूनच प्रत्येक नाते आपल्या ओंजळीत दिलेले असते. पण एक नाते मात्र असे असते जे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक मनुष्याला असते, ते आहे "मैत्री"चे नाते. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो बुद्धी आणि मन ह्यांची सांगड घालू शकतो. कदाचित त्यामुळेच त्याच्याभोवती वेगवेगळ्या गरजांची वलये सतत फिरत असतात. ह्या गरजा कधी भावनिक, व्यावहारिक किंवा इतरही असू शकतात. कदाचित म्हणूनही आपले मित्रमंडळही वेगवेगळ्या स्वभावाचे, वयोगटाचे किंबहुना विचारांचे असते. म्हणजे बघा हं! एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा खूप भिन्न पण तरीही आपली घनिष्ट मित्र किंवा मैत्रीण असू शकते. पण कधी आपण त्याही पुढे जाऊन विचार केला तर आपणास लक्षात येईल की अश्याही असंख्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात ज्यांची ओळख आपण मित्र वा मैत्रीण म्हणून करून देत नाही, पण त्या व्यक्ती त्याच गटात मोडतात. जसं भाजीमंडईतला भाजीवाला किंवा मासे मार्केट मधली कोळीण. आपण मंडईत शिरलो की आपली पावले आपोआपच त्यांच्या दिशेने चालायला लागतात. शब्दांची देवाण-घेवाण झाली की आपल्याला हवी असलेली भाजी किंवा मासे न सांगताच आपल्या पिशवीत येतात. कसे बरे कळते त्यांना आपल्याला काय हवे आहे ते? कारण सोपे आहे, त्यांच्यात आणि आपल्यात असलेल्या मैत्रीमुळे.

अशी ही मैत्री आपल्या अनेक वास्तूंबरोबर पण असते. जसे आपले "घर". ज्याने आपले बालपण, तरुणपण, आपला आनंद-एकाकीपण, आपल्या आयुष्यातले सर्व क्षण आपल्याबरोबर आपल्याइतकेच शेअर केलेले असतात. मला वाटते आपल्या सुखदुःखात हा एकमेव मित्र. अशी ही मैत्री आपल्या शाळेबरोबर, आपल्या जन्मस्थानाबरोबरही असते. खरंच प्रत्येकाने हा अनुभव घेऊन बघायलाच हवा. ह्या वास्तूंबरोबरची आपली मैत्री वर्षानुवर्षे टिकते, कारण आपल्या वेगवेगळ्या गरजा असल्या तरी, आपले घर शांतपणे, स्थितप्रज्ञ राहून प्रत्येक परिस्थितीत आपल्याला साथ देते. माझी अशीच घनिष्ठ मैत्री माझ्या घराच्या बाजूला असलेल्या "बसस्टॉप" बरोबर पण होती, किंबहुना अजूनही आहे. आजही मुंबईला गेले की मी त्या बसस्टॉपवर जरूर जाते, एखादा ओळखीचा चेहरा दिसतोय का ते पाहायला. माणसांचे निरीक्षण करण्याची त्यांना समजून घेण्याची सवय कदाचित मला ह्या मित्रामुळेच लागली. हातात चहाचा कप आणि माणसांचे निरीक्षण हा छंदच होता माझा त्यावेळचा. 

अशीच अजून एक जुनी मैत्रीण मला सिंगापूरला चार वर्षांपूर्वी भेटली. मी जेव्हा चार वर्षांपूर्वी सिंगापूरला सर्वप्रथम आले, तेव्हा मला भेटले "लाजाळूचे झाड". माझी सर्वात जवळची मैत्रीण, माझी आई, मला पाच वर्षांपूर्वी सोडून गेली. मी सिंगापूरला एका वेगळ्याच मनःस्थितीत आले होते आणि एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावर माझ्या स्वागतासाठी ही लाजाळू बाहेर उभी होती. माझी आणि हिची ओळख माझ्या आईने करून दिलेली. तेव्हापासून ही माझी लाडकी. लहानपणी आजोळी गेले की मी हमखास हिला सतवायचे, आणि मग तीही माझी एकदम जवळची मैत्रीण झाली. ह्याची जाणीव मला त्यावेळेस झाली जेव्हा मी ह्या मैत्रिणीला एअरपोर्टच्या बाहेर पाहिले, आणि एकदम सिंगापूर मला माझे वाटायला लागले. 

मग काय असते हि मैत्री? मला वाटतं, मैत्री हि अशी एक भावना, जी आपल्याला हवी-हवीशी वाटते. आपण दुसऱ्यांसाठी काही करण्यापेक्षा त्या व्यक्तीकडून हक्काने आपल्यासाठी करून घेण्यात जो आनंद मिळतो, तो म्हणजे "मैत्री". दुःखात आपल्याला समजून घेणारी आणि सुखात तिला विसरलो तरी प्रत्येक वेळेला आपल्यासाठी शांतपणे, खंबीरपणे आपल्यासाठी जी उभी असते ती "मैत्री". मग कोणाची अशी मैत्री देवाबरोबर, व्यक्तींबरोबर असते, प्राण्यांबरोबर असते, झाडांबरोबर किंवा वास्तूंबरोबर! असे असंख्य मित्रमैत्रिणी आपल्या नजरेसमोर असतात, आपण त्यांना ओळखणे महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या अंतर्मनात डोकावून पहा, असे असंख्य मित्रमैत्रिणी तुम्हालाही सापडतील! :-)

- नीलम पाटील 


३ टिप्पण्या:

  1. पुष्कळ काही माझ्या मनातलेच वाटले ,वाचताना☺👍मैत्री,बद्दल बरोबर लिहिलेय,काय नेमकं "क्लिक" करेल प्रथम भेटल्यावर अंन ती व्यक्ति जवळ ची वाटेल, ते सांगणे कठिन आहे कधी कधी परस्पर विरोधी अश्या ही काही जणी मैत्रिणीं वाटतात तर कधी खूप प्रयत्न केलेत तरी,पली कडून प्रतिसाद तितका येतच नाही, मोकळे पणे मनातले बोलता यावे असे नाते क्वचितच एखाद्याला गवसते,मी तर म्हणेन की एखादी च मैत्रीण पुरे होईल जर काही ही बोलण्या पूर्वी फारसे विचार न करता जर बोलता आले तर☺,मी निसर्गा सोबत च्या माझ्या मैत्रीत म्हणूनच कदाचित जास्ती रमते..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ""मग कोणाची अशी मैत्री देवाबरोबर, व्यक्तींबरोबर असते, प्राण्यांबरोबर असते, झाडांबरोबर किंवा वास्तूंबरोबर! असे असंख्य मित्रमैत्रिणी आपल्या नजरेसमोर असतात, आपण त्यांना ओळखणे महत्त्वाचे असते. ""👌👌👍

      हटवा