यालाच मैत्री म्हणायचे !!!

मैत्री मैत्री म्हणजे नक्की कशास म्हणायचे ?
मनी भाव वेगळे आणि सत्यात वेगळे असे असते का वागायचे?
संगती आणि सोबती मध्ये गल्लत नसते करायचे,
संगतीच्या घोळक्यातून खरे सोबती समजून घ्यायचे, 
यालाच मैत्री म्हणायचे।।१।।


माझे असे आणि तुझे तसे, कशाला मोठे दावे करायचे ?
चढाओढीतली स्पर्धा, कोणाला काय तुला दावायचे?
जरा बोचरे शब्द येताच कानी अस्वस्थ मन हे का व्हायचे?
क्षणात सल विसरून जाऊन मनमोकळे बोलायचे,
यालाच मैत्री म्हणायचे।।२।।


मैत्री म्हणले की रूसवे फुगवे हे चालायचे,
एकमेकांपासून दुरावलो तरी नाते कधीच न तुटायचे,
सोशल मिडीयावरून अपडेट कश्यास द्यायचे ?
त्यापरीस काही क्षण एकत्र जगून पाहायचे,
यालाच मैत्री म्हणायचे।।३।।


आहे त्या स्वभावासकट मित्राला एकदा ठरवले जर स्वीकारायचे,
मग डोळ्यात फक्त दोषच का बरं खुपायचे ?
रोज भेटणे, न बोलणे, नाही गरज संवाद रोज साधायचे,
तुझं नी माझं जमलं नाही तरी तुझ्यावाचून कसे करमायचे? 
यालाच मैत्री म्हणायचे।।४।।


दोघांमधील विश्वासाला तडा पडू न द्यायचे,
निखळ स्वच्छ पाण्यासारखे पारदर्शी राहायचे,
शेअरींग शेअरींग म्हणूनी देताना मात्र हात का आखडायचे?
जमेल तितके दोन्ही हातांनी भरभरून द्यायचे,
यालाच मैत्री म्हणायचे।।५।।


मैत्री हे नाते नसते जरी रक्ताचे,
तरी अनोळखी नाते जोडायचे आणि आयुष्य भर जपायचे,
विचार करा एकदा ह्या नात्याशिवाय कसे सुनं सुनं जगायचे,
ज्याला मैत्रीचा खरा अर्थ कळला त्याचे जीवन बहरून फुलायचे,
यालाच मैत्री म्हणायचे ।।६।।


- अमृता महेश कुलकर्णी


1 टिप्पणी:

  1. अप्रतिम. अगदी अचूक शब्दात खूपच सुंदर प्रकारे मैत्री बद्दल लिहीले आहे.

    उत्तर द्याहटवा