वेचलेला पाऊस

ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३

जुलै महिन्यातील टेक्सासचा कडकडीत उन्हाळा. पारा फाहरेनहॅटची शंभरी म्हणजेच सेल्सिअसची चाळीशी ओलांडून चाललाय. निळ्याशार आकाशात एकही काळा ठिपका म्हणून दिसत नाही. जवळच्या तलावाच्या कडेकडेने अधिकाधिक चुनखडीचा दगड उघडा पडायला लागलाय. अशातच एक मैत्रीण आपल्या केरळमधील घरी जाऊन आली. आल्या आल्या म्हणाली, “I miss that monsoon”. तिच्या चेहऱ्यावर मान्सून च्या पावसात चिंब भिजल्याचा ओला आनंद आणि त्याला तिथेच सोडून आल्याची रुखरुख एकाच वेळी ओसंडलेली आणि इथे माझ्या मनात ,

पाऊस सोहळा झाला 
कोसळत्या आठवणींचा 
कधी उधाणता अन 
केंव्हा थेंबांच्या संथ लयीचा 

आतापर्यंत तसे अनेक (? बहुदा, आता असे म्हणायला हरकत नाही) पावसाळे, नव्हे खरंतर पाऊसवेळा बघितल्या. इथे टेक्सास मध्ये मात्र तशी पावसाची काळवेळ नाही. ऋतुबदलाचं निमित्त साधून हजेरी लावून जातो पण लहरीपणा हा त्याचा लाडका गुणधर्म. एक दिवस संध्याकाळी, घरी माझ्या ऑफिस मधली निवृत्त झालेली माझी मेंटॉर आणि तिचा नवरा जेवायला आले होते. वसंतातल्या प्रसन्न संध्याकाळी मागच्या परसात बसून आम्ही मनोसोक्त गप्पा मारल्या, अळूवड्यांचा फडश्या पडला, स्वच्छ निळ्या आकाशाचं कौतुक केले आणि थोड्यावेळानी डासांची पाळी सुरु होण्याआधी घरात जेवायला गेलो. जेवणं संपतच आले होते आणि एकदम “धप्प” असा मोठा आवाज झाला. म्हणुन पळत जाऊन परसदारी पाहिलं तर, जोराचा वारा सुटला होता आणि काही वेळापूर्वी आम्ही ज्या झोपाळ्यावर बसलो होतो, त्याचा खरोखर “झोका गेला आकाशाला” झाला होता. कसाबसा तो धरतो तोच जोरदार गारांचा पाऊस! मोठ्या लिंबाइतक्या मोठ्या मोठ्या गारा. काही क्षणात संपूर्ण अंगणात गारांचा खच पडला. वारा , पाऊस , गारा, विजा यांचा आवाज थरकापून टाकत होता. सगळेजण हे वादळ काय काय विध्वंस करणार या विचारांनी अस्वस्थ होऊन वेदर चॅनेल बघू लागलो. थोड्यावेळानी भर ओसरल्यावर आमचे पाहुणे लगबगीने घरी गेले. त्यांना त्यांच्या घराची काळजी. घराच्या पुढच्या अंगणातील बास्केटबाँल हूप आडवा झाला होता. नशिबाने त्याने त्याच्यासमोरच उभा असलेल्या पाहुण्यांचा गाडीचा नेम धरला नव्हता. दुसऱ्या दिवशी तपासणी करताना लक्ष्यात आले की आमच्या तीन महिन्यांच्या नव्या कोऱ्या घराचे छत बदलावे लागणार. आमच्याच नाही सगळ्या शेजाऱ्यांवर हीच पाळी होती. पावसाच्या या रुद्रावताराच्या खुणा अजूनही आमच्या घराच्या पन्हाळ्यांना पडलेल्या पोच्यांच्या रूपांनी शाबूत आहे. अगदी चंद्रमौळी नसले तरी अश्यावेळी इंदिरा संत आठवतात. 

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली ।।

त्या आधी पाऊस भेटला तो सिंगापूर मध्ये. तसा तो तिथे रोजच येतो. त्यामुळे तसं फार त्याचं अप्रूप नाही. पण सिंगापूरशी माझ्या मुलाच्या बालपणाचं घट्ट नातं जोडलं असल्याने तो मला भेटला बालगीताचे बोट धरून. एका विकांताला तो आलाच नेहमी प्रमाणे दुपारच्या चहाची वेळ गाठून. एकीकडे चहाला उकळी फुटताना, पिल्लूनी विचारले, “आई, पावसात भिजायला जायचं?” आणि मीही लगेच म्हंटल,” चल की”. पावसात भिजण्यासारखे सनातन पाप करायला आई इतक्या लगेच तयार झाल्याने, त्याच्या अंगात वारंच भरले. आम्ही दोघे पळत खाली प्ले ग्राउंडवर गेलो आणि वाहत्या पाण्याबरोबर मनोसोक्त घसरगुंडीवरून घसरू लागलो. अजूनही तो पाऊस आमच्या दोघांच्या मनात घर करून राहिला आहे. आता जसे पिल्लूचे पंख बळकट होऊन, घरटं सोडायच्या वाटेवर आहेत, तेंव्हा तो पाऊस हलकेच कधीतरी ओघळतो. सुंदर आठवणींचा हसरा पाऊस. 

हसली झाडे, हसली पाने 
फुल-पाखरे गाणी गाती 
ओल्या ओल्या मातीचाही 
श्वास सुगंधी झाला 
आला आला पाऊस आला 

त्या आधीचा भेटलेला पाऊस म्हणजे “नेमेचि येतो मग पावसाळा” …. आपला तो “आषाढस्य प्रथमदिने” येणारा, मौसमी पाऊस. बहुदा सगळ्या भारतीयांचा लाडका ऋतू, तसा माझा ही. असाच एका श्रावणातला पाऊस, लपाछपी खेळणारा, इंजिनीरिंग च्या चौथ्या वर्षीचा. कॅम्पस इंटरव्ह्यूचे नगाडे वाजायला लागले होते. पाहिल्याचं दिवशी दोन नावाजलेल्या कंपन्या येणार होत्या. तसा पुढचा फारसा विचारच न केल्याने, येईल त्या सगळ्या इंटरव्ह्यू ला जायचे इतकाच काय तो विचार. तेंव्हा हा विचारही मनाला शिवला नव्हता की आज पहिल्याच दिवशी घरी जाताना माझ्या हातात घसघशीत ऑफर लेटर असेल. थुईथुई नाचणारं मन घेऊन मी कलत्या उन्हात स्कूटरला किक मारली आणि थंड ओला वारा झेलत घराकडे धावू लागले. तेंव्हा ना मोबाईल हातात, त्यामुळे घरी बातमी सांगायची घाई आणि अशातच तो आला परत. डोळ्यातून वाहणारा आनंद जणू आज आभाळाला भेटला होता. 

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे झाले
माझ्या भाळावरती थेंबांचे फुलपाखरू झाले 
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा 
श्रावणात घननीळा बरसला, रिमझीम रेशीम धारा 

तसा हा पावसाळा कधी हसवतो आणि कधी खूप रडवतो. कधी खूप वाट बघायला लावतो. पेरणीची काम संपवून शेतकरी, पुढचे काम त्याच्यावर सोपवून पंढरीची वाट धरतात. वारीच्या आधी पावसानी जरा जास्तच ओढ दिली की माझी आजी नेहमी म्हणायची, “माऊलींच्या पालखीचे पाय पुण्यात लागले की पाऊस नक्की पडणार.” मग मी तिचं बोट धरून पालखी पाहायला लाकडीपुलावर जायचे आणि परत येताना अंतर्बाह्य चिंब भिजून यायचे. पालखीच्या वाटेवर सडे घालायला तो आलेलाच असायचा. तो भक्तीचा अवीट सोहळा पाहून मन विभोर होऊन जायचे. आताशा यु-ट्यूब वर ई-पालखी बघतानाही, तो घळाघळा गालावरून वाहतो, सगळे बांध ओलांडून.

नभ नको नको म्हणताना 
पाऊस कश्याने आला 
गात्रातून स्वछंदी अन 
अंतरात घुसमटलेला 

पाऊस आणि त्याच्या अनेक छोट्या मोठ्या आठवणी वेचून, माझ्या लाडक्या कवितांच्या ओळींच्या खुणा घालून आठवणींच्या पुस्तकात मिटून ठेवल्यात. मला तर वाटतं पाऊस आणि आठवणी याच गहिरं नातं असावं. दोघांचं वागणं अगदी सारखं. तो त्याला पाहिजे तेंव्हा येतो, कसाही कधीही. कधी सुखावतो, कधी दुखावतो, तर कधी जीवघेणी हुरहूर लावून जातो. तो बरसत राहतो आणि अशीच एखादी नाजूक ओली आठवण चुकारपणे त्याचे बोट धरून पाझरू लागते… अगदी नि:शब्द…. 

तो बरसतच असतो अधूनमधून 
मग माझेही डोळे पाणावतात ती संधी साधून

-प्राजक्ता मराठे-नरवणे


1 टिप्पणी:

  1. Tee hasate pratibimbakade paahun tee waat pahate tyachi daatun tee raat pasrate Roop wisroon tee rusate smruteegandh nirop devun :- Kailas Mahananda RavindraNath Kale

    उत्तर द्याहटवा