स्वयमेव मृगेन्द्रता

मी अगदी लहान असल्यापासून मला भेटणाऱ्या, माझ्या ओळखीच्या, अशा सगळ्या लोकांना मनातल्या मनात वेगवेगळ्या गटात टाकायचे. काही लोकं 'अन्न हे पूर्णब्रह्म' या विचाराला प्रचंड महत्त्व देणारी, तर काही 'वाचाल तर वाचाल' हा विचार नव्या स्तरावर नेणारी. काही सरस्वतीला पूजणारी तर काही लक्ष्मीला मानणारी. काही राजकारणात, काही संगीतात, तर काही खेळात आपली माणसं शोधणारी. यातली सगळीच माणसं माझ्या मनातल्या गटात उत्तमपणे बसायची. कधी क्वचित आपला गट बदलायची, दुसऱ्या गटात फेरफटका मारून यायची. पण एका माणसाने मात्र सगळ्याच गटांचं सभासदपद घेतल्यासारखं मला वाटायचं आणि तो माणूस म्हणजे माझा बाबा.

माझ्या संपूर्ण आयुष्यात मी केलेल्या सगळ्यात विचित्र, अर्थहीन, आणि निरुपयोगी चर्चा नेहमी बाबाशीच असायच्या. पण त्याचबरोबर मी केलेल्या सगळ्यात अविस्मरणीय, उल्लेखनीय आणि फायदेशीर गप्पाही त्याच्याबरोबरच्याच होत्या. (अरे देवा! ओळीने तीन मोठे शब्द) मी आणि बाबा जवळजवळ कोणत्याही विषयावर बोलू शकतो. अगदी पाणी घालायच्या पाईपच्या टिकाऊपणापासून ते कबड्डीच्या मॅचपर्यंत आणि बुद्धाच्या शिकवणुकीपासून ते स्विस चॉकलेटपर्यंत. आमच्या चर्चांच्या अशा बदलत्या विषयांमुळे अनेक जणांचे मानसिक संतुलन बिघडल्याचंही आमच्या ऐकिवात आलं आहे.

माझा बाबा म्हणजे महेश देवकर, खरं तर डॉ. महेश देवकर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागाचा प्रमुख. गेली दहा वर्षं तो हे पद अतिशय उत्तमरीत्या सांभाळतो आहे. एकाच प्रोफेसरनी एवढी वर्षं विभागप्रमुख असणं ही खरं तर अगदी क्वचितच घडणारी घटना. त्याहीपेक्षा दुर्मिळ म्हणजे वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी प्रोफेसर पदावर नेमणूक होणे. पण बाबाने मात्र त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ही जवळजवळ कधीच न घडणारी गोष्ट प्रत्यक्षात आणली. एक संपूर्ण नवा विभाग तयार करणं, त्याचं प्रमुखपद जबाबदारीनं सांभाळणं, तो वाढवणं - गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीनं - आणि तो मानव्यविद्या विद्याशाखेतील सर्वात मोठा विभाग बनवणं हा प्रवास खरंच खूप अविस्मरणीय आहे.

मी अगदी लहान असल्यापासूनच मला आठवतं की बाबाला शिकवायला खूप आवडतं, मग ते एम. ए. च्या विद्यार्थ्यांना शिकवणं असो की त्याच्या लहानश्या मुलीला पेटीवर सारेगम शिकवणं असो. शिकवणं हा त्याचा व्यवसाय नाही तर छंदच आहे. विभागाची कंटाळवाणी आणि थकवणारी कामं दिवसभर केल्यावरही संध्याकाळी घेतलेला एखादा मस्त वर्ग त्याचा मूड टवटवीत करून टाकतो. असं म्हणतात की ज्ञान ही अशी एकमेव गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्यावर कमी न होता उलट वाढतेच. माझ्या बाबाच्या बाबतीत हे वाक्य अगदी बरोबर लागू पडतं.

आमच्या अभ्यासक्रमात एक गोष्ट होती. त्यात काही जात्यंध हत्ती बघायला जातात आणि हत्तीच्या ज्या भागाला स्पर्श करतात त्यांना हत्ती त्या भागासारखाच वाटतो. तात्पर्य असं की आपल्याला एखाद्या माणसाची किंवा गोष्टीची जी बाजू दिसते तीच एकमेव बाजू असते असं आपल्याला वाटायला लागतं. तसंच काहीसं माझ्या बाबाच्या स्वभावाबद्दल झालंय. त्याच्या विद्यार्थ्यांना, त्याच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना त्याची शिस्तप्रिय, hard working, जिद्दी बाजू दिसते. पण त्या गोष्टीतल्या काण्या माणसाप्रमाणे मला त्याच्या जवळजवळ सगळ्या बाजू दिसतात. त्याची जिद्द दिसते, त्याची काम करण्याची इच्छा दिसते, त्याच्या मनातली आमच्याबद्दलची काळजी दिसते, त्याचे प्रचंड कष्ट दिसतात आणि ह्या सगळ्या बरोबरच त्याची खेळकर वृत्ती, सगळं perfect असण्यासाठीचा हट्ट आणि कुठेतरी माझ्या धाकट्या भावासारखा एक लहानगा मुलगाही दिसतो.

माझा बाबा आज जिथे कुठे आहे त्यात त्याचे अतोनात कष्ट तर आहेतच, पण त्याच्या आयुष्यातल्या अनेक प्रेमळ लोकांचे आशीर्वादही आहेत. माझ्या आजोबा-आज्जी आणि काकाने आपली आयुष्य सांभाळता सांभाळताच बाबासाठी खूप काही केलं, त्याच्या शिक्षकांनी, शाळा-कॉलेजमधल्या मित्रांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईने त्याला आत्तापर्यंतच्या त्याच्या सर्व वाटचालीत केलेली मदत आणि प्रेम यांच्या जोरावरच बाबा आज एवढा पुढे येऊ शकला आहे.

वयाच्या आठव्या वर्षी झालेल्या एका अपघातात माझ्या बाबाला अंधत्व आलं. (दृष्टी गेली असं मी म्हणणार नाही, कारण दृष्टीचा डोळ्याशी फारसा संबंध आहे असं मला तरी वाटत नाही.) बाबाची सर्व माहिती द्यायची म्हणून हा मुद्दा इथे घ्यावा लागला. नाहीतर या गोष्टीचा उल्लेख करायला मला फारसं आवडत नाही. कारण आपण कितीही प्रयत्न केला तरी काही वेळा मात्र लोकांना लेबलं लावल्याशिवाय आपल्याला राहवतच नाही. तर सांगायचा मुद्दा असा की माझ्या बाबाला जरी दिसत नसलं तरी तो रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टी एखाद्या डोळस माणसापेक्षाही उत्तम करतो.

बाबाच्या अपघाताची गोष्ट जरी प्रचंड फिल्मी असली तरी हा माणूस मात्र अगदी वेगळाच आहे. 'आपल्या अंधत्वावर मात करून' किंवा 'नियतीच्या या अघोरी खेळालाही तोंड देऊन' अशी cliche वाक्य मला लिहायची नव्हती. पण गंमत म्हणजे बाबाच्या बाबतीत ही सर्वच वाक्य खरी ठरतील.

माझा बाबा अष्टपैलू नव्हे शतपैलू आहे असं मला वाटायला लागलंय. त्याच्या अंगी असलेल्या विविध (छुप्या) गुणांमुळे तो सर्वच लोकांचा आवडता होतो. या गुणांमध्ये गळका नळ दुरुस्त करण्यापासून ते एकाच वेळी दहा मोदक खाण्यापैकी काहीही येऊ शकतं. त्यामुळे जर एखादवेळी तुम्ही पाली व्याकरणातील एखादी जटील समस्या घेऊन त्याच्याकडे आलात आणि तो तुम्हाला भरतनाट्यम च्या गाण्यावर नाचताना दिसला तर भांबावून जाऊ नका.

बाबानं आजवर खूप काम केलं, स्वतःसाठी, त्याच्या आईबाबांसाठी, भावंडांसाठी, मित्रांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, बायको-मुलांसाठी. प्रत्येकच वेळी ते आम्हाला जाणवलं का ते आठवत नाही. पण सगळं त्याने काहीही तक्रार न करता प्रेमानं केलं हे मात्र नक्की आठवतं. 'माझा बाबा' असा निबंध संपवताना एखादं लहान मूल जसं 'मला माझा बाबा खूप आवडतो' असं  म्हणेल, तसं मला अजिबातच करायचं नव्हतं. पण काय करू? खूप खंर आहे ते!

सायुरी देवकर


 






















६ टिप्पण्या:

  1. सायुरी, फारच सुरेख लिहिलयस गं !
    मनात येईल ते सुंदर रीतीने लिहिणे ही एक कला आहे आणि ती तुला, तुझ्या आई व बाबांकडून वारश्याने मिळालेली दिसते आहे...असेच लिहीत रहा.
    तसे खरेतर, प्रत्येकाला आपले बाबा खूपच आवडतात आणि सर्वांपेक्षा भारी वाटतात.
    पण तुझे बाबा सर्वांनाच भारी वाटतील अशी माझी खात्री आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा!
    खूपच छान. संवादाचा अभाव ही किती मोठी समस्या आहे आजच्या कुटुंब व्यवस्थेतील. अशा काळात इतका छान सुसंवाद असणे भाग्याचे! यामुळे अनेक चुकांची पुनरावृत्ती टळते!

    उत्तर द्याहटवा
  3. सायुरी,
    बाबाची काय छान ओळख करून दिलीस!
    फार मस्त लिहिलं आहेस!

    उत्तर द्याहटवा