पालकत्वाच्या कसोटीची - एका जिद्दीची कहाणी

कल्पने पलीकडचे दृढ नाते
जिने वाहिले हे नऊ मास ओझे
जिने चिंतिले नित्य कल्याण माझे.

वरील श्लोक पंक्तींचा विचार करताना आता वाटते 'जिने वाहिले हे नऊ मास ओझे ऐवजी जिने स्वीकारले हे नऊ मास लेणे ' असे म्हटले पाहिजे, कारण बालपण, तरुणपण, म्हातारपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य 'पण' असतात परंतु 'बाळंतपण' हा आई होण्याचा पण त्या मातेने स्वेच्छेने स्वीकारलेला असतो. हा पालकत्वाचा निर्णय हा होणाऱ्या बाळाच्या आई आणि वडील दोघांचाही असतो आणि आई-वडील-मूल यांच्यातले नाते येथूनच सुरु होते.

प्रत्येक मूल ही परमेश्वराची सुंदर निर्मिती असते, मग ते मूल सर्वाधिक गुणवत्ता आणि क्षमता असणारे मूल असू दे अथवा ते विशेष मूल (special child) असू दे. ते मूल प्रत्येक पालकाने जसे आहे तसे स्वीकारून, एक उत्तम माणूस म्हणून घडविले पाहिजे, त्याला समाजाच्या स्रोतात आणले पाहिजे. इथे आईपणाची आणि पालकत्वाची खरी कसोटी सुरु होते.

'पालक' हा तीन फक्त अक्षरी शब्द,पण त्याचा प्रवास अनंत काळाचा असतो.
पा - नात्यात पारदर्शकता असलेला
ल - लांबचा आणि मुलाच्या भविष्याचा विचार करणारा
क - कर्तव्यनिष्ठा असलेला
वरील त्रिसूत्रींची पूर्तता करणारे पालक व त्यांची मुले ही यशाच्या मार्गावर पोहोचतातच. त्यांना कधीही समुपदेशकाची गरज भासत नाही. पाल्याला घडविताना पिढ्यान-पिढ्या चालत आलेली संस्कारांची शिदोरी नक्कीच कामी येते. तुमच्यावर झालेले चांगले, सात्विक संस्कार नेहमीच तुम्हाला ताठ मानेने उभे करीत असतात. विशेष मुलांच्या बाबतीत त्यांना समाजाकडून मिळालेल्या नकाराचे तुम्हाला होकारात रूपांतर करायचे असते. त्यासाठी तुमचे पाल्याशी असलेले नाते घट्ट असले पाहिजे तरच ते मूलही तुम्हाला नेहेमी उत्तम प्रतिसाद देते ... अगदी माझ्या मुलीसारखे - मनाली सारखे !

माझं पहिलं वहिलं अपत्य, एक 'विशेष' मूल ... Spina Bifida या मणक्याच्या दुर्धर आजाराने व्यस्त, कायमस्वरूपी व्हीलचेअर मध्ये बंदिस्त, एक किडनी निकामी, दुसरी किडनी १४ वर्षे पोटावर स्टोमा बॅग्स वापरून कार्यरत असलेली, दर १५ दिवसांनी तिला येणाऱ्या फीट्स, वयाच्या १४ वर्षात १२ शस्त्रक्रियांना सामोरी गेलेली एक कायमस्वरूपी पेशंट. पण हीच मनाली व्हीलचेअर वरून संपूर्ण भारत दर्शन करून आता १४ वर्षांची युवती म्हणून प्रिंट व डिजिटल मीडियाद्वारे प्रत्येकाच्या मनात आणि घरात मानाचे स्थान मिळवीत आहे. तिची ऑपरेशनची साखळी थोडी स्थिरावल्यावर तिची ५३ पुरस्कारांची साखळी सुरु झाली आहे. त्यामधील मानाचा पुरस्कार म्हणजे 'राष्ट्रपती' पुरस्कार ज्यामुळे तिचे आयुष्य व तिच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन सकारात्मक झालेला आहे. उषा मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांपासून ते प्रकाश आणि मंदा आमटे यांच्यापर्यंत अनेकांनी तिला गौरवले आहे. यापुढची तिची मनीषा खूप लांबचा विमान प्रवास करून बाहेरील आंतरराष्ट्रीय जगापर्यंत पोहोचण्याची आहे. पालक म्हणून आम्ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोच आहोत.

अर्थातच हे सगळे एका दिवसात शक्य झालेले नाही. या सगळ्याच्या पाठीमागे आम्हा उभयतांची आणि कुटुंबाची २ तपांची, २४ वर्षांची तपःश्चर्या आहे जी अजूनही सुरूच आहे. आम्ही आमच्या बच्चूला ती जशी होती त्या स्थितीमध्ये संपूर्ण सकारात्मकपणे स्वीकारले नसते तर आज तिच्या व आमच्या डोळ्यात फक्त आसू राहिले असते आणि आत्ताचे हे हसू विरलेच असते. सुरुवातीची ५ वर्षे सलग मी व माझे कुटुंबीय फक्त हॉस्पिटलच्या वाऱ्याच करीत होतो. त्या वेळेपासूनच मनाशी खूणगाठ बांधली होती कि मनूची शारीरिक स्थिती कशीही असू दे, मानसिकरित्या मी तिला खंबीर बनवून तिला कधीच खचू देणार नाही. तिच्यात काहीही कमी नाही हा आत्मविश्वास तिच्यात ठासून भरलेला आहे त्यामुळेच तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला नाही. हॉस्पिटल असू दे, तिची नंतरची 'जिद्द' शाळा असू दे किंवा आत्ताचे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर असू दे ... कुठेही समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागली तरी आपण गोड बोलून, त्या व्यक्तीला न दुखावता आपल्या १०० % प्रयत्नांनी जाणवून द्यायचे की 'हम भी कुछ कम नही' ... अशीच आपण यशाची एक एक पायरी चढलीच म्हणून समजा !

मनालीच्या शारीरिक मर्यादांबरोबरच जेंव्हा अजून एका कटू सत्याची जाणीव झाली की तिची बौद्धिक क्षमताही मर्यादित आहे तेंव्हा हे सत्यदेखील सकारात्मकपणे स्वीकारून तिच्यामध्ये असलेल्या क्षमतांचा अभ्यास करून तिला समाजाच्या स्रोतात कसे आणता येईल जेणेकरून ती एकटी पडणार नाही, हा महत्त्वाचा टप्पा सुरु झाला. त्यावेळीच माझ्यातली शिक्षिका जागृत झाली होती. तिला परावलंबी न करता जास्तीत जास्त गोष्टी स्वतःच्या स्वतः करण्यावर भर दिला. काही अपवादात्मक परिस्थिती सोडता ती आजही तिच्या दोन्ही हातांचा आणि लाभलेल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करीत आहे. बाहेरील प्रलोभनांना, जंक फूडला बळी न पडता आपले वजन तिने नियंत्रणात ठेवले आहे. शारीरिक वय २४ असले तरी वजनाने व मनाने १२-१५ वर्षांच्या मुलीसारखी आहे.

मनालीला घडवताना आई, शिक्षिका, गृहिणी आणि आता लेखिका व प्रकाशिका तसेच समुपदेशिका या भूमिकांची मी सर-मिसळ होऊ न देण्याचा प्रयत्न नेहेमीच केला. तिच्या शाळेत मी फक्त पालक होते, माझ्या शाळेत शिक्षिका, घरी गृहिणी. तरी या सगळ्यात 'आई' ही भूमिका जास्त महत्त्वाची असते म्हणून ती निभावताना सगळ्याच गोष्टींचे भान आपल्याला ठेवावे लागते. आपली मुले आपलेच अनुकरण करत पुढे जात असतात. आपला आवाज संयमित असेल तर मुलेदेखील घरातील व बाहेरील ज्येष्ठांशी बोलताना मृदू आवाजात बोलतात. माझ्या आईने हे संस्कार माझ्यावर केले व ते मी मनाली व धाकटी सन्मिता यांच्यावर करत आहे. असे करता करताच आमच्या नात्याची वीण सर्वार्थाने दृढ होत गेली. माझी माझ्या आईवर व माझ्या मुलींची माझ्यावर सढळ श्रद्धा आहे जिच्या जोरावरच हा प्रवास चालू आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे २०१६ चा 'प्रेरणा' पुरस्कार सोहळा 'लेकीच्या हस्ते आईचा सत्कार' या कल्पनेवर आधारित होता. त्यावेळी मनाली म्हणाली की मी आईला आज दुसऱ्यांदा पुरस्कार देत आहे, पहिला पुरस्कार मी आई म्हणून तिला आधीच दिलेला आहे, माझ्यातर्फे! आजवरचे संस्कार, कष्ट, जिद्द, सगळे मान-अवमानाचे क्षण कसोटीला उतरले होते, माझ्यातल्या आईपणाची सरशी झाली होती. पुरस्काराची बाहुली हातात घेतली तेंव्हा मनालीची दुपट्यात गुंडाळलेली छबी डोळ्यासमोर आली. त्याबरोबर अनेक अविस्मरणीय क्षण डोळ्यासमोर तरळले - कलिंग युनिव्हर्सिटी, ओरिसा येथे ग्रुप लीडर म्हणून सायन्स प्रोजेक्टचे प्रेझेन्टेशन करून गोल्ड मेडल गळ्यात घातलेली १४ वर्षाची मनू आठवली, १५ वर्षीय मनू दिल्ली येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 'बेस्ट क्रिएटिव्ह चाईल्ड' हा किताब स्वीकारताना दिसली. प्रेरणा पुरस्काराच्या निमित्ताने सोनेरी आठवणींना उजाळा मिळाला होता.



बऱ्याच वेळेला आज काल समुपदेशन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा आणि त्या मुलांकडून पूर्ण होऊ शकल्या नाहीत तर दोघांनाही येणारे वैफल्य! यासाठी मी समस्त पालक वर्गाला सांगू इच्छिते की आज ना उद्या तुमच्या पाल्याला पुढे येण्याची योग्य संधी योग्य वेळी नक्की मिळेल., फक्त तुम्ही मुलांवर थोडा विश्वास ठेवा. मुलं त्या संधीचं नक्की सोनं करतील... अगदी माझ्या मनालीसारखंच. मनालीची विस्तृत गोष्ट तुम्ही 'तिची कहाणीच वेगळी' या पुस्तकात किंवा 'Wheel Power' या इंग्रजी आवृत्तीत वाचू शकता. तिची प्रेरणादायी कहाणी घराघरात पोहोचावी अशी पालक म्हणून आमची इच्छा आहे. मला आपल्यासारख्या सुजाण, सजग, रसिक वाचकांसमोर व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद !

- सौ स्मिता लेले कुलकर्णी



(अधिक माहितीसाठी किंवा स्वेच्छा मदतीसाठी तुम्ही spk200412@gmail वर किंवा 9820428212, 9324563614 यावर संपर्क साधू शकता. )

३ टिप्पण्या:

  1. स्मिता, आपल्या धैर्याला आणि जिद्दीला त्रिवार वंदन! एक सकारात्मक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण करत असलेली तपश्चर्या सहजसाध्य नाहीच.

    उत्तर द्याहटवा