स्वीट आणि बीटर, असे असावे आपले मैतर

आगंतुक टपकून एका साठ एमएल चहाचं दोन कटिंग मध्ये परिवर्तन करायचे सामर्थ्य ज्यामध्ये असते तोचि खरा मैतर समजावा. असं रामदास वगैरे म्हणाले नसले तरी रोज संध्याकाळी कट्ट्यावर भेटणारे, याच्याशी दुमत नसतील. खरा मित्र कोणाला म्हणावं यावर दहा एक दिवस तरी आरामात चर्चा चालेल एवढं साहित्य, गूगलच्या पहिल्याच सर्च पेज वर मिळेल. पण यापेक्षा आपल्या आयुष्यात आलेल्या खास मित्रांची अनन्य रूपं सादर करण्यात जास्त मजा. अश्या अनन्य रूपांपैकी चार विशिष्ट रूपं डोळ्या समोर उभी राहतात. त्यांचा आस्वाद घ्या... 

रूप एक : कुंभार 

अश्या व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असणं गरजेचं, कारण हा मित्र आपल्या आयुष्याला सुंदर सुडौल आकार देतो. दर रोज जरी भेटत नसला तरी भेटेल तेव्हा आपल्याला काहीतरी छान शिकवून जातो. आपण आपल्या ध्येयापासून कसे विचलित होतो आहे हे या मित्राला चांगले अवगत असते. विशेष म्हणजे तो आपल्याला न दुखावता आपल्या ध्येयाच्या दिशेने जायला प्रेरित करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर - इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात जेव्हा आपले हार्ट तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या मुलीवर धकधक करते तेव्हा हाच आपल्या बापापर्यंत, हा सर्व निरोप इथंभूतरीत्या पोचवतो आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण परत अभ्यासू होतो. आले ना आयुष्य रुळावर :)

रूप दोन : धाडसी 

हा मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातला 'खतरों के खिलाडी' मधला होस्ट अक्षय कुमार समजावा. हा आपल्याला असे काही करायला तयार करतो जे आपण बापजन्मात स्वतःहून करणार नाही. सगळ्यात क्लिष्ट विषयात दहा पैकी चार चॅप्टर्स ऑप्शनला टाकायला लावतो आणि आपल्याला चांगले मार्क मिळाल्यानंतर आपली कॉलर टाईट करून सगळे क्रेडिट स्वतः घेतो. तिसऱ्या वर्षातील जिच्यामुळे आपले हार्ट धकधक करते ते यांच्याच कृपेने. उगाच आपल्या नावानी तिला रोज-डे ला गुलाब पाठवून रोज क्वीन बनवतो आणि सर्व खापर आपल्यावर फोडतो. पण यामुळे एक गोष्ट छान घडते. आपण पुढल्या आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरत नाही. बनलो कि नाही धाडसी :) 

रूप तीन : आरसा 

हा मित्र नसून आपल्या आयुष्यातला आरसा समजावा. जेव्हा जेव्हा आपले पाय जमिनीवरून सुटून आपण हवेत जातो तेव्हा हे महाशय आपल्या समोर हजर. ते लगेच आपल्याला जमिनीवर आणणार. आपल्या आयुष्याच्या काळ्या दगडावरची ही पांढरी रेषच - असे समजायला हरकत नाही. आपली पात्रता दाखवण्या करताच जणू यांनी जन्म घेतला म्हणा ना. तिसऱ्या वर्षातील ती रोज क्वीन आपल्या मुळे नाही तर आपल्या धाडसी मित्रा मुळे भाळली हे त्याच रात्री तो हमखास सांगणार आणि हे सर्व आपल्या कुंभार मित्रा समोर. घ्या! आणखीन काय बाकी राहिलं? पण काही असो आपली खरी लायकी त्याच्याच मुळे आपल्याला कळते हे नक्की. 

रूप चार : उशी  

हे पात्र म्हणजे नावा प्रमाणे एकदम मऊ स्वभावाचे. बरं, फक्त मऊ स्वभावाचे नाही तर प्रकृतीही तशीच. आपण या उशीवर डोकं ठेवून स्वतःचे सगळे दुखडे बिंधास्त गाऊ शकतो. हा नेहमी आपलीच बाजू घेणार. आपण कसे बरोबर, हे तो आपल्याला तब्येतीत पटवून देणार. "बाकीच्यांचे मनावर घेऊ नको रे फाटक - उगाच कशाला लोड घेतो", असे म्हणत आपली समजूत काढणारा. आरशाने कुंभारासमोर चहाडी केल्यावर मग हीच उशी आपल्याला त्या दिवशी रात्री बीयर पाजते. आपले दुःख विसरायला लावून दुसऱ्या दिवशी आपल्याला कॉलेजमध्ये नेते. ही ऊशी लग्न झाल्यावर फार कामी येते हे बहुतेक पुरुषांना माहीत असेलच. 

अशी चार स्वरूपं आपल्या आयुष्यात असल्यास म्हणायला काहीच हरकत नाही - स्वीट आणि बीटर असे असावे आपले मैतर !!!

- अमित फाटक


1 टिप्पणी: