पहिल्या लग्नाची गोष्ट

खरं तर लोक आधीच इतके पकलेले आहेत! आणि त्यात लग्नाची गोष्ट कशाला पुन्हा? असा प्रश्न तुम्ही विचारणे स्वाभाविकच आहे. लग्न हा असा लाडू आहे, जो खाल्ला तरी पश्चात्ताप आणि न खाल्ला तरी पश्चात्ताप! आम्हाला अनुभवातून माहित आहेत लग्नाचे सगळे ताप. शिवाय “एका लग्नाची गोष्ट” पासून “ते एका लग्नाची दुसरी गोष्ट”, “एका लग्नाची तिसरी गोष्ट”, “आणखी एका लग्नाची गोष्ट”, अशा कितीतरी मालिकांनी डोके खाल्ले आहे. पुन्हा कशाला त्यावरच चर्वितचर्वण असे तुम्ही म्हणाल! 

पण कसं आहे नं, ऋतुगंधने आपापल्या पहिल्या अनुभवांची गोष्ट सांगायचे आवाहन केले आहे. खरंच, आपण पहिल्या घटना आयुष्यभर विसरत नसतो. मग ते पहिले प्रेम असो, वा झालेला पहिला विश्वासघात. पहिली नोकरी असो व पहिली बेकारी! ऋतुगंधची ईमेल पाहिली आणि सगळे घटनाक्रम पतंगाच्या रिळासारखे भराभर उलगडत गेले. आणि माझ्या पहिल्या लग्नाचा पतंग मनाच्या आकाशात सरसरून वरवर चढला!

झाले काय, की अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर “eligible batchelor” ची शेपटी लावून मी आपले स्वत:चे आकाश शोधायला घराबाहेर पडलो. राजस्थानातल्या कोटा इथे इंजिनियरची नोकरी होती. होस्टेलवर बिनधास्त ब्रह्मचारी जीवनात उंडारलो होतो. स्वैर उडणारा माझा पतंग काबीज करायला इतर पतंग आसपास घुटमळू लागले. आजूबाजूला पतंग असण्यात माझी काहीच हरकत नव्हती. पण दुरून ते पतंग उडविणारे हात माझा पतंगच काटण्याच्या प्रयत्नात आहेत हे लक्षात येवून धोक्याची घंटा वाजली.... नाही, माझ्या मनात नाही. तर दूर नागपूरला राहून माझा पतंग वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्या पालकांच्या मनात धोक्याची घंटा वाजली. अन त्यांचे मला अडकविण्याचे प्रयत्न सुरु झाले.

अर्थात सुरवातीला मी दाद लागू दिली नाही. त्यांनी दोरी खेचली, मी हुलकावण्या दिल्या. पण नेमका त्याच काळात माझ्या नोकरीच्या आकाशात वारा देखील असा वाहू लागला, की मीच माझी दिशा बदलायचे ठरवले. झाली असे की, १९७४ मध्ये कंपनीच्या प्रोजेक्टवर मलेशियातील पोर्ट डिक्सन इथे दोन वर्षासाठी जाण्याची संधी चालून आली. मी विचार केला, की एकटाच गेलो तर दोन वर्षे वापस येता येणार नाही. परत आल्यावर पुन्हा कोण मला बाहेर देशात पाठवणार आहे? लग्न करून गेलो तर सरकारी खर्चात बायकोसह परदेशात मजेत राहायचा मौका मिळेल. मग मीच लग्न करून जाण्याचा निर्णय घेतला. आता हे सगळे जमवून आणायला माझ्याकडे फक्त सहा महिने होते.

कोटा-नागपूर आगगाडीच्या प्रवासाला तेव्हा साधारण २० तास लागत. मध्ये बिना येथे गाडी बदलावी लागत असे. शनिवार-रविवारला जोडून एखाद-दोन सुट्टया घेतल्या कि नागपूरची छोटीशी ट्रीप शक्य होती. मी अशीच एक ट्रीप ठरवून नागपूरला गेलो. घरी सगळ्यांना माझ्या मलेशिया पोस्टींगची बातमी ऐकून खूप आनंद झाला. मी अंदाज केल्याप्रमाणे आईने व बहिणीनी लगेच माझ्यामागे लग्न करून जाण्याचा लकडा लावला. मी बरेचदा नाही-नाही म्हटल्यासारखे केले, तशा बहिणी आणखीनच मागे लागल्या. छोट्या बहिणी त्यांच्या मैत्रिणींची नांवे सुचवू लागल्या. नुकतेच लग्न झालेली माझ्यापेक्षा छोटी, पण बहिणींत मोठ्या बहिणीने तिच्या सासरी सांगितले. तेव्हा तिच्या सासूने त्यांच्या एका चुलत पुतणीचे नांव सुचविले. म्हणजे ज्या घरात मुलगी दिली, तिथलीच मुलगी आणायची! मला काहीच फरक पडत नव्हता. मला काय, चांगली मुलगी बघून लवकरात लवकर लग्न करायचे एवढीच अपेक्षा होती! समोरूनच प्रपोजल आल्यामुळे इथे नक्की जमेल असा मला विश्वास वाटत होता. शिवाय अनोळखी लोकांमध्ये लगेच पाच-सहा महिन्यात दोन्हीकडून पसंती येऊन लग्न पार पडणे मला कठीणच वाटत होते. बहिण तिच्या या नणंदेची शिफारस करू लागली. इतर बहिणी देखील तिचे कौतुक करू लागल्या. मग मी बहिणीना मला या मुलीत विशेष स्वारस्य नाही असे मुद्दामच भासवले.

खरे तर मी आणि ही मुलगी एकाच शाळेत शिकलो होतो. पण शाळेत असताना मी अगदी नाकासमोर चालणारा अभ्यासू मुलगा होतो. त्यामुळे, मी कोणत्याच मुलीकडे पहात नव्हतो. चित्राला देखील मी पहिले नव्हते. छोटी बहिण म्हणाली “अरे छान उंच आणि देखणी आहे ही चित्रा.” तेव्हा मी “त्यात काय मोठे? उंच आणि सुंदर खूप मुली असतात.” असा आव आणला. “मला सांग, हेमा मालिनी किंवा एखाद्या नटीसारखी सुंदर आहे का तुझी ही मैत्रीण?” असे मी विचारताच मधली बहिण अगदी काकुळतीला येऊन म्हणाली “भाऊ, अरे अशा नटीसारख्या सुंदर मुली कुठे मिळतात कां? पण अरे, ही खरच छान आहे.” मी “का नाही मिळणार? शोधल्या कि मिळतील.” वगैरे! तेव्हा बहिणीचा चेहरा पडलेला आणि आमच्या पिताश्रींनी, याचा फायदा घेऊन “लग्नाची एवढी घाई करायचीच कशाला” असा पवित्रा घेतला. त्यांचे म्हणणे पडले, की मीनाच्या सासरहून आलेले हे स्थळ उपचार म्हणून पाहावेच लागेल. पण आपण घाई करायला नको. सावकाश आणखी काही मुली बघूनच मग निर्णय घ्यावा.

येत्या सहा महिन्यात मला पुन्हा पुन्हा मुली बघायला सुट्टी मिळणे अशक्य होते. आता नाही, तर बघणार केव्हा, लग्न होणार केव्हा! आता आपल्याला एकटेच परदेशात राहावे लागेल! There goes your dream holiday in Malaysia! मी निराश झालो. काही झाले तरी ही चालून आलेली मुलगी सोडायची नाही. मनोमन माझा निर्णय झाला होता. 

वडिलांनी उपचार म्हणून का होईना निदान ही मुलगी पहायला तरी होकार दिला होता. हे ही नसे थोडके! पडत्या फळाची आज्ञा घेऊन मीनाच्या सासूने सुचवलेली मुलगी पाहण्याचा कार्यक्रम एकदाचा ठरला. चित्राच्या घरी निरोप गेला की मुलाकडून बघण्याच्या कार्यक्रमाला होकार आला आहे. लगेच लवकरची तारीख ठरली.

(नंतर चित्राकडून कळले होते कि तिच्याकडेही जरा ड्रामाच झाला होता. चित्राने आत्ताच एवढ्या घाईने बघण्यास ठाम नकार दिला होता. मला इतक्यात लग्नच करायचे नाही असे म्हणत होती. तेव्हा तिच्या आईने असे सूचविले कि बाबांनी निदान बघण्याच्या कार्यक्रमाआधी मुलगा त्याच्या घरी जाऊन बघून घ्यावा!)

कार्यक्रमाआधीच आमच्याकडे मुलीचे वडील येऊन मुलगा बघणार आहेत असे कळले. काही महिला मंडळीनी नाके मुरडली. “हे कसले आक्रित! तुमच्या बाजूनेच प्रस्ताव आलेला असता ही आणखी कसली वर परीक्षा?” माझ्या वडिलांनीच त्याना समजावले “अरे असे कसे? मुलगा एकदा स्वत: पाहून घेणे ही त्यांची मागणी बरोबरच आहे!” मग मनात उकळ्या फुटत असताना मी वरवर अगदी निरिच्छपणे “बघा काय बघायचे ते! मला काही फरक पडत नाही” असा आव आणला.

“तुला बघायला आज भावी सासरे येणार. जरा नीट स्वच्छ होऊन तयार हो. नेहमीसारखा कळकट बसू नकोस” बहिणी कसल्या सोडताहेत मौका मला छळण्याचा! मग मी देखील हट्टाने “मी जसा आहे तसाच त्यांना दिसू दे. उगाच मला कोणाची फसवणूक करायची नाही” त्यावर बहिणी gasवर. खरच हा कळकट लुंगी आणि भोकाचे बनियन घालून सामोरा गेला तर काय!

सासरे येणार बरोब्बर त्या वेळी मी मुद्दाम (स्वच्छ) लुंगी आणि (शुभ्र कोरा) बनियन घालून माझ्या शर्टला इस्त्री करायला काढली. त्यांची वाट बघेस्तोवर एकाच शर्टला किती वेळ इस्त्री करणार? याचा फायदा घेऊन बहिणीनी त्यांच्या ड्रेसेसना देखील माझ्याकडून इस्त्री करून घेतली. मीही म्हटले, जाऊ दे! घोटतो मुलींच्या इस्त्र्या! सासरे बघतील तर म्हणतील, “आज बहिणींचे कपडे इस्त्री करतो आहे, उद्या बायकोचे पण नक्कीच करेल! माझी मुलगी सुखात राहील!” आणि खरेच! भावी सासरे घरी आले, त्यानी डोळा भरून भावी जावई मुलींचे कपडे इस्त्री करताना पाहिला.

घरी गेल्यावर चित्राच्या वडीलांनी (म्हणे) ठाम सांगितले होते, की मुलगा खूप चांगला आहे. छान नोकरी आहे, परदेशी पोस्टींग होणार! आणि मुख्य म्हणजे स्वत:ची कामे स्वत: करणारा आहे. हा मुलगा जर तुम्ही हातचा घालवला तर मी दुसरे स्थळ काही शोधणार नाही!

त्यांच्याकडून बघण्याच्या कार्यक्रमाला लगेच होकार आला. कार्यक्रम साहजिकच बहिणीच्या सासरीच झाला. कारण ते लोक मध्यस्थ होते. मी तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलो होतो. तरी पण पहिल्या पहाण्यात चित्रा एकदम आवडूनच गेली. नाही, म्हणजे अशी छान मुलगी नाकारायचे कारणच नव्हते ना! पण ती मात्र धडपणे माझ्याकडे बघतही नव्हती. ही काय लाजरीबुजरी वगैरे आहे की काय! आता परदेशात रहायचे म्हटल्यावर बुरसट लाजरी कशी काय चालणार? तुम्ही काय विचारायचे ते विचारा असे म्हटल्यावर मी फक्त “तुम्हाला हिंदी बोलता येते कां” एवढाच (माझ्या मते) मार्मिक प्रश्न विचारला. त्यावर चित्राने हो अगदी चांगले हिंदी येते, आणि तिच्या मैत्रिणी हिंदी, बंगाली वगैरे अमराठी भाषिकच आहेत असे सांगितले.

महाराष्ट्रातल्या मुलीला जर इतर भाषिक मैत्रिणी असतील तर ती मुलगी नक्कीच मिसळणारी, outgoing असणार असा माझा बाळबोध तर्क होता. घरी आल्यावर मी लगेच मुलगी पसंत असल्याचे जाहीर करून टाकले. माझ्यासाठी विषय संपला होता. सहकुटुंब परदेशवारी समोर दिसू लागली! तर काय! पिताश्रीनी मोडता घातला! इतकी घाई काय आहे? पहिलीच तर मुलगी पाहिलीय, आणखी मुली आरामात बघ. ही छानच आहे, यापेक्षा जास्त चांगल्या देखील मिळतील वगैरे! मी स्पष्टच सांगून टाकले. ‘पहिली जर आवडली नसती तर दुसरी बघितली असती. पहिलीच मुलगी आवडल्यामुळे दुसरी बघण्याचा प्रश्नच येत नाही.’

माझा कोटाला जायचा दिवस उद्यावर आला तरी माझ्या वडिलांकडून संमती येईना. शेवटचा प्रयत्न म्हणून मी माझ्या आत्याला माझी बाजू समजावून सांगितली. म्हटले, ‘हा एकच चान्स आहे मला सहकुटुंब परदेशवारी मिळवण्याचा. तू कसेही करून माझ्या वडिलांना पटव.’ तिने मनावर घेतले आणि पिताश्रींची मंजुरी मिळवली. तेव्हा कुठे माझ्या पहिल्यावहिल्या लग्नाची गाडी मार्गस्थ झाली.

गाडी मार्गस्थ झाली असे वाटले. पण लग्नाच्या गाड्याचा मार्ग नाट्यमंचावरून जायलाच हवा! माझ्या सख्य्ख्या बालमित्राने अचानक माझ्या आईची फिरकी घेतली. माझ्या आईला कोणीही काहीही सांगावे, ती अगदी आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवणार! इथे तर तिला आईसारखे मानणारा मुलगाच सांगत होता! 

“काकू, तुम्ही असा कसा या लग्नाला होकार दिला?” त्याने आईला विचारले.
“काय झाले?”
“तुम्ही मुलीची नीट चौकशी केली का?”
“म्हणजे काय? अरे नात्यातलीच आहे ना!”
“असेल. पण तिला तुम्ही जवळून पाहिली का?”
“हो पाहण्याचा कार्यक्रम झाला की!”
“या भैताडाने काय विचारले तिला?”
“काही विशेष नाही. हिंदी येते का विचारले.”
“तेव्हा तिने चालून दाखविले की नाही?”
“म्हणजे?”
“अहो काकू, मी तिला शाळेपासून ओळखतो. आमच्या खोखो टीम मध्ये होती ती. खोखोच्या practice नंतर मीच तिला घरी सोडायला जायचो.”
“मग?”
“अहो, एकदा ती खेळतांना खूप वाकडीतिकडी पडली, तेव्हापासून ती चालताना लंगडते. म्हणजे खूप नाही. पण लक्ष देऊन पाहिले तर कळते.”

झाले! आई अस्वस्थ! असे कसे बाई मीनाच्या सासूने स्थळ सुचविले वगैरे! तिची तगमग सुरु होती अन इकडे हा दुष्ट तोंड दाबून हसत सुटला! तिने जेव्हा त्याचे हसणे पाहिले, तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. 

लग्नाच्या मार्गात कंपनीनेही एक बॉम्ब टाकला. काय तर म्हणे मलेशियात पॉवर स्टेशनचे काम खूप आहे. दिवसरात्र कामात बिझी असणार आहे. त्यामुळे पहिले सहा महिने बायकोला तिथे येऊ देणार नाहीत. त्यानंतर जर कंपनीने परवानगी दिली तरच बायकोचे तिकीट आणि तिच्यासह तिथे राहण्यासाठी बंगला पण मिळेल. त्याआधी एका मोठ्या बंगल्यात bachelor रुम मिळणार होती.

हे घरी सांगितल्यावर पुन्हा उहापोह. कोणी म्हणे फक्त साखरपुडा करून ठेवा, मग मुलगा मलेशियातून परत आल्यावर लग्न करा. (याच साठी केला होता कां अट्टाहास?) तेव्हा देखील आत्याने पुन्हा मदत केली. 

लग्न छान पार पडले आणि चित्राचा पासपोर्ट करायला दिला. लग्नानंतर काही महिने आम्ही कोटाला राहिलो आणि मग मी लगेच पोर्ट डिक्सनला रवाना झालो. तिथे येण्याची परवानगी कंपनीकडून मिळेपर्यंत चित्रा नागपूरला आमच्या घरी रहाणार होती. मलेशियात मी कामाला जुंपलो. त्यामुळे ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे’ हे विरहनाट्य निदान मला तरी सुसह्य झाले. आणि कंपनीशी विशेष पंगा न घेता, आज्ञाधारकपणे मी तो विरह सहन देखील केला. माझ्या बरोबर तिकडे आलेला एक नवविवाहित इंजिनियर सहकारी मात्र बंडखोर होता. तो देखील त्याच अटींवर तिथे आला होता. तिथे गेल्या गेल्या तो उचकला. म्हणे ‘कंपनी कोण लागून गेली माझ्या बायकोला इथे येण्याची मनाई करणारी? मला नको बायकोसाठी कंपनीकडून तिकीट. She is a free citizen, and can move to any place she wants. I shall buy her air ticket. She shall stay in my one room given to me here. I don’t want independent accommodation from company. She will share my room. How can company stop her from coming?’

आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. ‘बाबारे असे करू नकोस. सहा महिन्यानी तुला मस्त बंगला मिळेल. नंतर दीड वर्षे तुम्ही रहा ना मजेत.’ पण तो हट्टालाच पेटला. बघतो म्हणे ‘कंपनी कशी माझ्या बायकोला अडवते ते. आणि माझे काम करू शकेल असे दुसरे कोणीच कंपनीत नाही. त्यामुळे त्याना काहीच करता येणार नाहीये.’ त्याने खरच तिकीट काढून बायकोला बोलावून देखील घेतले. ती आली. त्याने अगदी विजयोत्सव साजरा केला. मोजून एक दिवस ती त्याच्या खोलीत राहिली. दुसऱ्या दिवशी त्याला कोटाला परत बोलवल्याची order मिळाली. तडकाफडकी त्याला जावे लागेल. तिथे गेल्यावर बिनपाण्याने काय हजामत व्हायची ती झालीच.

यामुळे माझे काम मात्र एकदम दुपटीने वाढले. त्याच्या जागी येऊ शकेल असे कोणी नव्हतेच. त्यामुळे तेही काम माझ्यावरच टाकले गेले. ते सगळे मी नेटाने पुढील चार महिन्यातच पार पाडले. आता चित्राला परवानगी मिळायला फक्त दोन महिनेच राहिले होते. तेव्हाच कंपनीचे MD तिथले काम बघायला आले. ते ब्रिगेडियर पदावर होते. त्यांच्या भेटीची संधी साधून मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो. म्हटले, ‘मुळात बायको बरोबर इथे आम्ही राहिलो तर कंपनीचे काम कमी करू हे premiseच चुकीचे आहे. आपली कंपनी काही मिलिटरी कंपनी नाही, जिथे असे कडक नियम असावेत. कामाचे म्हणाल तर जो काम करणारा असतो तो कुठेही काम करतोच आणि न करणाऱ्याला तुम्ही त्याला काहीही सुख सोयी द्या, तो काम करणार नाहीच. आम्ही कामे करणारे आहोत हे माहित असल्यानेच तुम्ही आम्हाला इथे पाठवले होते. तेव्हा तुम्ही त्या कलीगचे म्हणणे समजाऊन घेऊन त्याला परवानगी द्यायला हवी होती. ते न करता तुम्ही त्याला परत बोलावून घेतले आणि इथे स्थिती खूप कठीण झाली.’

ब्रिगेडियरनी सगळे नीट ऐकून घेतले. ते हसले. म्हणाले, ‘तु जसे व्यवस्थित बोललास तसे तो कधी बोललाच नाही. त्याने नुसता एक-दोन ओळींचा औपचारिक अर्ज टाकला की माझ्या बायकोला माझ्या खर्चाने येउ द्या. नियमानुसार ते शक्य नव्हते म्हणून अर्ज reject झाला, तर याने सरळ बायकोला बोलावून घेतले. अशी बेशिस्त वागणूक चालत नसते. पण ते जाऊ दे, तुला काय पाहिजे ते तु सांग.’ मी म्हटले, ‘सहा पैकी चार महिने झालेच आहेत. काम देखील आता आटोक्यात आले आहे. मला आत्ताच बायकोला आणण्याची परवानगी कृपया द्या.’ ते म्हणाले, ‘अर्ज टाक. मी बघतो काय करता येईल ते.’ 

ते परत गेल्या गेल्या मला परवानगी मिळाली, मग खऱ्या अर्थाने चित्राचा पोर्टडिक्सनला गृहप्रवेश झाला, आणि माझे पहिले लग्न सफल झाले.

आता कोणी विचारेल, ते सगळे ठीक आहे. पण पहिले लग्न असे म्हणता आहात, म्हणजे दुसऱ्या वा तिसऱ्या वगैरे लग्नाची देखील काही गोष्ट आहे कां? आता नोस्टाल्जिया म्हणून कबूलच करायचे, तर हो, दुसरी, तिसरी वगैरे बायका देखील सहजीवनात येऊन गेल्यात. पण त्यांची गोष्ट इथे सांगण्याचा माझा मुळीच विचार नाही. कारण ऋतुगंधने मोठ्या उदार मनाने पहिल्यांदा शब्दमर्यादा न ठेवता लेख मागितले आहेत, त्याचा गैरफायदा मला घ्यायचा नाही. तेव्हा इथेच थांबवतो.

काय म्हणता, निदान कोण ती दुसरी तिसरी वगैरे ते तर सांगून जा?

सोप्पे आहे. सगळ्याच बायकांना नवऱ्याची कार आणि नोकरी या दोन सवतींबरोबर नांदण्याची सवय करून घ्यावी लागतेच. तेच चित्राने केले. दुसरे काय! 

काय म्हणता? ते सगळे पुराण ऐकायला तुम्हाला वेळ नाही? नका ऐकू, मी तरी कुठे आग्रह करतो आहे?

-अरुण मनोहर


1 टिप्पणी: