आव्हाने

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

प्रत्येकाच्या मनाला भावणारा असा हा विषय आहे. म्हणजे आपल्या अडचणी जशा दु:ख, कष्ट घेऊन येतात, तशा त्या आपल्याला त्या सोसताना आणि नंतर एखादी उत्तम शिकवणही देऊन जातात. आणि हे अगदी पहिल्या श्वासापासून पुढे आयुष्यभर चालते. नवीन टप्पा, नवीन अडचण आणि त्याबरोबर आलेले नवीन शहाणपण! मग तुम्ही तो टप्पा सुखरूप पार केला असेल अथवा तो पार पाडता आला नसेल. दोन्ही बाजू तुम्हाला काहीतरी शिकवून जातात आणि आपण अश्या नव्या अचानक आलेल्या टप्प्याला अडचण म्हणतो. म्हणून हा विषय भावुक.

माझ्या आयुष्यातही असे टप्पे, अडचणी आल्या. फार छोटे आणि खूपच साधे अनुभव आहेत पण एकट्याने त्यांना सामोरे जाताना ते बरंच काही शिकवून गेले असे आता मागे वळून पाहताना वाटते. आयुष्यातील अनेक टप्पे नवीन काहीतरी शिकवत गेले. प्रत्येक वेळा तो प्रसंग कठीण वाटायचा, मन डगमगू न देता तो पार झाला की अनुभव गाठीशी यायचा, आणि असे टप्पे पार होत गेले.

मला पहिल्यांदा या विषयावर विचार केलेला आठवतो तो म्हणजे मी तेव्हा बहुदा पदवीचे शिक्षण घेत होते. Enduro नावाची एक साहसी स्पर्धा पुण्यामध्ये भरवली जाते, त्या स्पर्धेत सहभागी झाले असताना हा विचार मनात आला होता. स्पर्धा चालू असताना एका कठीण प्रसंगी मनात विचार आला की, “आपण हे का करतो आहोत? रविवारची सकाळ आहे, निवांत घरी पोहे खात बसलो असतो..” आणि याचे उत्तर मला स्पर्धा संपल्यावर मिळाले. अडचणींवर मात करता आली अथवा नाही, हे महत्त्वाचे नाही तर त्यात डगमगू न देता चालत राहणे महत्त्वाचे. स्पर्धेतला दुसरा क्रमांक हे सांगून गेला की आपण जिंकलो अथवा हरलो हे सुद्धा त्या वास्तवापुढे निरर्थक आहे.

आई होतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या वेळी मन हळवे होते. जराशा प्रसंगाने, गोष्टीने रडवेले होते. मलाही हे अनुभवायला मिळाले. या वेळी मात्र अडचण खूप मोठी वाटत होती. बातमी मिळाली तेव्हा आनंद व्यक्त करायच्या आतच त्यामुळे होणारे त्रास डोके वर काढू लागले. तेव्हा मी नवरोबाबरोबर साऊथ कोरियाला राहात होते. मग माझी देखभाल सासूबाईंच्या देखरेखीत व्हावी यासाठी पुण्याला शिफ्ट झाले. सुरुवातीचे काही दिवस पुण्यात राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात मी माझे पती स्थित असलेल्या देशी परत जाण्याचा निर्णय घेतला. 

परत आले तेव्हा सुरुवातीचे दिवस काम होत होते पण आठवा महिना सुरु झाला आणि कामाचा उरक होईना. त्यात मला बाहेर फिरण्याची भारी हौस! त्यामुळे शक्ती पुरत नसे. यातच काही कारणास्तव आई (माझ्या सासूबाई) येऊ शकणार नव्हत्या हे समजले. मग वाटले कसे होणार हे सगळे? आपल्या हाताशी अनुभव नाही, बाळ रडले तर काय? त्याआधी बाळंतपण कसे होणार? नवीन देश, भाषेचा प्रश्न. कारण तिथे डॉक्टर सोडता इतरांना इंग्रजी भाषा येत नसे. पण आता मागे फिरणे नव्हते. निर्णय पक्का होता. बाळाचा जन्म होताना मी बाळाच्या बाबाबरोबर असणे गरजेचे होते.

मग आता अडचणीवर मात करण्याची जय्यत तयारी सुरु झाली होती. अगदी काही दिवस आपल्या बजेट मधली एखादी नर्स शोधणे, आणखी काही सुविधा आहेत का हे पाहणे. जवळची मित्रमंडळी देखील कामाला लागली. या दिवसांमध्ये मला माझे सखे-सोयरे मिळाले असे म्हणायला हरकत नाही. आपल्या रक्ताच्या नात्याबरोबरच ही नातीदेखील तितकीच महत्वाची. मला एकटे वाटणार नाही, कोणतीही वाईट घटना अथवा बातमी माझ्यापर्यंत येणार नाही याची पूर्ण काळजी या वर्गाने घेतली. मैत्रिणींचा उत्साह इतका होता की डोहाळेजेवण देखील दोन वेळा झाले. कुठलीच उणीव जाणवू दिली नाही.

थोडेसे हायसे नक्की वाटले होते; पण खरी परीक्षा बाळाच्या जन्मानंतर सुरु होणार होती. मग ज्या मुलींनी कोरियात राहून आपले बाळंतपण केले त्यांना विचारणा सुरु झाली. कसे केले? काय अडचणी आल्या? जेवणाचे कसे केले? कारण कोरियामध्ये शाकाहारी माणसाला बाहेर जेवणे फार अवघड. मी शाकाहारी आणि त्यात नवी बाळंत असणार होते. यावेळी कोरिअन मैत्रिणीनी एका संस्थेमार्फत एक नर्स शोधून दिली. बजेट नुसार पंधरा दिवस तिला येऊ द्यायचे ठरले.

सगळा गृहपाठ करून झाला होता आणि तो दिवस जवळ आला, तेव्हा प्रसूतीकळा म्हणजे काय इथूनच सुरुवात झाली आणि अडचणींची जणू रांगच लागली. दवाखान्यात दाखल होण्यापासून ते घरी परत येईपर्यंत अनेक अवघड प्रसंग आले. अगदी मन हलवणारा प्रसंग आला जेव्हा जाणवले की मुलाचा जीव पोटात गुदमरतो आहे. मग मात्र पायांखालची जमीन सरकली, काहीही करा आणि मूल हातात द्या या निर्णयाला येऊन ठेपले. पण माझ्या डॉक्टर हे मानायला तयार नव्हत्या म्हणून आणखी बारा तास थांबून मग सीझर करायचे ठरले.

सर्व अडचणी पार करत घरी आलो आणि पिल्लू ने जो टाहो फोडला तो रात्रभर थांबला नाही. रात्रभर त्याला ओल्या टाक्यात घेऊन बसून होते. अहो माझ्या शेजारी, कारण दोघानाही काही कळतच नव्हते काय होते आहे. आणि मग सकाळी साहेब शांत झाले. एक एक दिवस नवीन अडचण घेऊन येत होता. जणू आईपणाची परीक्षा घेत होता. बाळाची अंघोळ, माझी काळजी, हे करता करता हे ही दिवस आनंदात जाऊ लागले. पिल्लूने बाळसे धरले आणि जणू पावतीच मिळाली की आपण या नव्या प्रसंगाला दोघांनी मिळून तोंड दिले आहे आणि हा अडचणींचा रस्ता पार करत समर्थपणे पुढे आलो आहोत.

हा प्रसंग मला पुन्हा शिकवून गेला की, “आयुष्यातले टप्पे हे नवीन अनुभव घेऊन येणार आहेत. सुरुवातीला ती न समजणारी आव्हाने वाटतील, पण डोके शांत ठेवले आणि वाटचाल करत राहिलो तर यश नक्की हेच सत्य!”


- सुवर्णा माळी पायगुडे


1 टिप्पणी: