चित्रकथा

फेसबुकवर पक्ष्यांचे सुंदर फोटो पाहून वाटायचं, इतक्या दूर झाडावर बसलेला हा पक्षी कसा बरं टिपला असेल ? वगैरे. अचानक एका मैत्रिणीकडे दूरवरचे फोटो काढता येतील असा कॅमेरा पाहिला आणि तसा घेऊनही टाकला. पण आता पक्षी कुठे शोधायचे? सिंगापुरात आहेत तरी का एवढे पक्षी?

मग रोज निरीक्षण करता करता हळू हळू घराजवळच्या बागेत अनेक पक्षी दिसायला लागले. नेहमी न दिसणारा एखादा देखणा पक्षी दिसला आणि त्याला कॅमेरात बंदिस्त केलं की कोण आनंद व्हायचा. सुरवातीला त्यांची नावं माहीत नसतं. पण आपल्या झुक्याच्या फेसबुकचा काय उपयोग मग. फोटो पोस्ट करताच त्याची माहिती कोणी ना कोणी देत असे.

जे सर्वत्र दिसते त्याचे नाविन्य आपल्याला कधी वाटत नाही. सिंगापुरात मैना हा पक्षी शेकड्यांनी आढळणारा. त्यामुळे त्यांचा फोटो कोण काढणार. कधी काढलाच तर "आज बाकी पक्षी सुट्टीवर गेले का?" अशी फेसुबकवर विचारणा होत असे.

पक्षी जगताबद्दल कुतूहल आणखीच जागृत झालं होतं. सिंगापूर नॅशनल पार्क च्या पक्षी गणतीसाठी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवलं. त्यांनी रीतसर माहितीसत्र घेतलं. त्यात ह्या मैना पक्ष्याबद्दल नवीच माहिती मिळाली. ह्या फोटोत जी मैना आहे तिला कॉमन मैना असं नाव आहे. हा पक्षी मूळ सिंगापुरातला.

भरपूर संख्येने त्या दिसत, परंतु १९२० साली पाळीव पक्षी म्हणून इंडोनेशियातील जावा प्रांतातून जावन मैना सिंगापुरात आल्या आणि त्यांनी सिंगापुरातल्या पक्षी जगतावर सत्ताच स्थापन केली म्हणा ना. २०१५ साली केलेल्या पक्षी गणनेनुसार सिंगापुरात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी जवळ जवळ ५०% पक्षी ह्या जावन मैना आहेत.

ही माहिती मिळेपर्यंत अशा दोन प्रकारच्या मैना सिंगापुरात आहेत हे देखील माहीत नव्हतं. तोवर सर्व मैना एकसारख्याच दिसत. पण आता दोन्ही वेगळ्या ओळखता यायला लागल्या. जावन मैना चा फोटो सुद्धा बरोबर जोडते आहे. पहा तुम्हाला सुद्धा दिसताहेत का अशा दोन प्रकारच्या मैना.

-राजश्री लेले



1 टिप्पणी: