ब्रेकफास्ट

ब्रेकफास्टच्या एका आमंत्रणासाठी कोण किती दूर जाईल? मी, माझी बायको सई आणि मुलगा निषाद सुमारे अडीच तासाचा विमानप्रवास करून इंडोनेशियातल्या बालीकपापान नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो होतो ते केवळ एका उपाहारगृहाच्या मालकिणीकडून आलेल्या आमंत्रणावरून.

उपाहारगृहात शिरताच त्या मालकिणीने आणि तिच्या कुटुंबाने आमचं यथोचित स्वागत केलं. एक खास टेबल आमच्यासाठी राखून ठेवलेलं होतं. स्थिरस्थावर झाल्यावर मेनू कार्ड आमच्या हाती देत ती मालकीण हसत म्हणाली, “तुम्ही हे बघा.” तिथल्या स्थानिक पदार्थांच्या जोडीला महाराष्ट्रीयन वडापाव, भजी असेही पदार्थ होते. मी आणि सईने एकमेकांच्याकडे कौतुकानी बघितलं. हे पदार्थ तिला सईने शिकवले होते.

ह्या मालकिणीचं नाव त्रिती! तिने आमच्या घरी सुमारे आठ वर्षं डोमेस्टिक हेल्पर म्हणून काम केलं होतं. निषाद बाळ असताना त्याला सांभाळायला आणि सईला घरकामात मदत म्हणून ती सिंगापोरला आमच्या घरी राहिली होती. तिचा नवरा सोडून गेला होता आणि पदरात एक पोर होतं. पैसे मिळवून मुलाला चांगलं भविष्य देण्याच्या हेतूने ती सिंगापोरला कामासाठी आली होती. सिंगापोर हा तिचा पहिला परदेश दौरा सोडा, गावाबाहेरचा पहिला प्रवास असावा. तिचं खरं वय चोरून ती आली असावी असा आमचा दाट संशय होता. ती आमच्या घरी आली तेंव्हा तिच्याकडे फक्त एक छोटीशी पिशवी होती. नवीन देश, वातावरणाला खूपशी बुजलेली होती, इंग्लीश तर फारच तोडकं मोडकं बोलायची. सईचं आणि तिचं संभाषण हे सुरवातीला हातवारे आणि हावभाव ह्यावर चालत असे.

लहानग्या निषादचा तिने जणू ताबाच घेतला. त्याची सगळी कामं मनापासून करायची, त्याला हळूवार हाताळायची. आल्यापासून आठवड्याभरातच तिने घर स्वच्छ आणि टापटीप ठेवायला सुरवात केली. काम करताना आपण काहीतरी हलकं काम करतोय, असा विचार सुद्धा तिला शिवत नसावा. तिच्यात संधी न मिळालेली हुशारी आहे, हे सईच्या लक्षात आलं. मग सईने तिला बोली इंग्लीश शिकवलं, हिशेब शिकवला, निषाद बरोबरचे आमचे मराठी संवाद ऐकत मराठी बोलायला शिकली. सईकडून महाराष्ट्रीयन पदार्थ - जेवण बनवायला शिकली. एखादी गोष्ट पटकन कशी शिकावी, हे तिच्याकडून कदाचित शिकण्यासारखं होतं.

त्रिती महिन्यातून एक सुट्टी घ्यायची आणि त्या दिवशी बराचसा वेळ ती लायब्ररीमध्ये घालवते असं एकदा तिने सईला सांगितलं. महिन्यातून एकदा घरी पैसे पाठवण्यासाठी थोडा वेळ बाहेर जाऊन यायची. बाकी वेळ काम करायची; कधी कधी तर कामं शोधून काढायची. अगदीच कधीतरी बहासा भाषेतली पुस्तकं वाचताना दिसायची. योगायोगाने तिच्या मुलाचा आणि निषादचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्या दिवशी मुलाच्या आठवणीने रडत बसायची पण निषादला छोटी भेटवस्तू आणायला विसरायची नाही. असं करत तिने आमच्या घरी आठ वर्षं काम केलं. आमच्या कुटुंबाचा एक घटक झाली होती ती.

परत जायच्या आधी सईने तिला सहज विचारलं, “परत जाऊन काय करणार?” “माझं उपाहारगृह चालवणार” असं सांगितल्यावर आम्ही उडालोच. पहिल्या चार वर्षांचा पगार साठवून तिने जमीन विकत घेतली आणि त्यावर घर बांधून तिच्या कुटुंबाला हक्काचं छप्पर दिलं होतं. नंतरच्या चार वर्षांचा पगार साठवून अजून एक जमीन घेऊन त्यावर उपाहारगृह बांधून घेतलं होतं आणि आता परत जाऊन तिचं स्वत:चं उपाहारगृह परिवाराबरोबर चालवणार होती. त्रितीची कहाणी थक्क करणारी होती. वय चोरून सिंगापोरला कामाला येणं हा केवळ सामान्य विचार नव्हता; तो एका मोठ्या दृष्टीचा भाग होता.

त्रिती आणि तिच्या कुटुंबाबरोबर इंडोनेशियन - महाराष्ट्रीयन अश्या संमिश्र ब्रेकफास्टवर आम्ही ताव मारला. ब्रेकफास्ट करताना तिने तिचं उपाहारगृह जोरात चाललं असल्याचं सांगितलं. वडापाव हा हिट आयटम आहे असं म्हणाली. दुसरीकडे कुठेच वडापाव मिळत नसल्यामुळे ती वडापाव थोडा महाग विकू शकते. बोलता बोलता म्हणाली, "आता शेत घेऊन उपाहारगृहात लागणारा भाजीपाला स्वत:च पिकवायचा आहे; त्यासाठी पैसे साठवत आहे." तिच्या विचारांची भरारी बघत, ऐकत आम्ही स्वत:ची चूक मान्य करत होतो. एका व्यक्तीला ओळखण्यात केलेली सपशेल चूक! एक पिशवी घेऊन आलेली बुजरी त्रिती पुढे जाऊन इतकी उंच भरारी घेईल असं जर कोणी सांगितलं असतं तर तेंव्हा आम्ही त्याला वेड्यात काढलं असतं. त्रितीला शुभेच्छा देऊन, तिच्या कुटुंबाचा निरोप घेऊन आम्ही परत फिरलो.

ही एक अशी यशोगाथा आहे जी एरव्ही कदाचित कधीच ऐकायला मिळाली नसती पण मी आणि सईने ती जवळून अनुभवली होती. एक ध्येय ठेवून त्यावर वाटचाल करणारी त्रिती; फारशी न शिकलेली, मॅनेजमेंटचं कुठलंही शिक्षण न घेता स्वत:चा भाजीपाला स्वत: पिकवायचा उद्देश ठेवणारी त्रिती; मुलापासून आठ वर्षं दूर राहून संपूर्ण कुटुंबाला घर आणि काम मिळवून देणारी त्रिती!

लोक स्वत:च्या कर्तृत्वावर मोठे होतात पण हे फक्त यशस्वी लोक मान्य करतात. बाकीचे फक्त परिस्थितीला दोष देत, आहेत तिथेच राहतात.

विश्वास वैद्य

ही कथा मी ऋतुगंधचे मावळते संपादक नीतीन मोरे ह्यांना समर्पित करतो.

1 टिप्पणी: