ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २
चिंतेला जेंव्हा येतो पूर
निद्रेचा गाव वाहून जातो
काळ्या खोल विवरामध्ये
कोण दिवा लावून जातो?
उन्हाला जेंव्हा येतो पूर
हिरवा बहर करपून जातो
उघडावागडा गुलमोहर
तेंव्हाच कसा फुलून येतो?
हसण्याला जेंव्हा येतो पूर
दुःखाचा सल बुडून जातो
हसता हसता मात्र हळूच
नेत्रकडा ओलावून जातो....
युगांती जेंव्हा प्रलय पूर
शहाणं जग धुवून घेतो
श्रध्देचं एक वेडं तारू
मात्र तोच तारून नेतो....
- निरंजन भाटे
Sundar
उत्तर द्याहटवा