वेगळ्या वाटा : एक व्यावसायिक सिंदबाद !

वेगळे व्यवसाय करणाऱ्यांबद्दलच्या ऋतुगंधमधील सदरासाठी लिहिशील का असे संपादिका जुई चितळेने विचारले. त्या निमित्ताने माझ्या सध्याच्या व्यवसायाबद्दल, त्याआधीच्या वेगवेगळ्या उचापतींबद्दल आणि पर्यायाने काहीतरी वेगळे करत राहण्याच्या माझ्या गरजेबद्दल हा लेख.

सुरुवातीला माझ्या सध्याच्या - म्हणजे एर्गोनॉमिक्स सल्लागार (Ergonomics Consulting) - व्यवसायाबद्दल सांगतो. एर्गोनॉमिक्सचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर आपले काम आणि आरोग्य यांच्यात संतुलन साधण्याचे शास्त्र. आजच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे हे संतुलन बिघडत आहे. सिंगापूर जनरल हॉस्पिटलने हल्लीच केलेल्या सर्वेक्षणानुसार १० पैकी ७ office workers ना म्हणजे कार्यालयीन काम करणाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा Musculoskeletal त्रास आहे. म्हणजे मानदुखी, पाठदुखी, मनगटदुखी, इत्यादी. रोज उशीरापर्यंत काम, सतत संगणक किंवा फोनच्या स्क्रीनला चिकटून असणे, दिवसभरात प्रामुख्याने बसलेल्या अवस्थेत वेळ घालवणे (Sedentary Lifestyle), मानसिक ताण अशा कारणांमुळे हा त्रास सुरु होतो. वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे वाढत जाऊन त्याचे रूपांतर Repetitive Strain Injuries (RSI) मध्ये होऊ शकते. यांतून वारंवार गैरहजर राहायला लागणे, एकाग्रता आणि कामाचा दर्जा कमी होणे, वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करायला लागणे, अपघात होणे इत्यादी दुष्परिणाम संभवतात. सिंगापूरमधल्या निरनिराळ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या दुष्परिणामांची दरवर्षी चुकवत असलेली एकंदर किंमत आहे ३.५ बिलियन डॉलर्स! (Source: Workplace Safety and Health Council, Ministry of Manpower, Singapore, 2015).

या परिस्थितीत माझ्यासारखा एक Ergonomist काय मदत करतो? तर प्रत्येकाच्या व्यवसायाप्रमाणे आणि शरीराच्या धाटणीप्रमाणे त्यांच्या कार्यपद्धतीची विशिष्ट रचना करुन आणि ठराविक प्रकारचे एर्गोनॉमिक फर्निचर किंवा accessories वापरुन आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यास व कंपन्यांची उत्पादकता वाढवण्यास हातभार लावतो. (उदा. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर लॅपटॉपवर काम करताना मान खाली वाकवून कामकरतात त्याऐवजी लॅपटॉप स्टॅन्ड वापरुन त्यांच्या स्क्रीनची उंची डोळ्यांच्या पातळीपर्यंत वाढवली तर cervical spondylosis सारखे मानेचे आजार होत नाहीत). मी आणि माझी पत्नी अस्मिताने सुरु केलेल्या Synergo Consulting नावाच्या व्यवसायाचे स्वरूप थोडक्यात असे आहे. ऑफिस क्षेत्राखेरीज फॅक्टरीज, कॉल सेन्टर्स, अॅनिमेशन स्टुडियोज, लॅबोरेटरीज, ऑइल आणि गॅस, इत्यादी निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांना आशिया पॅसिफिक भागात आम्ही आज ही सेवा पुरवतो. केलेल्या कामाचा उपयोग अनेकांचे आरोग्य सुधारण्यासाठी होत असल्याने उदर्निर्वाहाबरोबरच एक आंतरिक समाधानही हा व्यवसाय आम्हाला देत राहतो.

आता हा वेगळा व्यवसाय का निवडला याचे मुलाखतीत देण्याचे उत्तर काहीही असले तरी खरे उत्तर आहे लहानपणापासून काहीतरी वेगळे करुन बघण्याची खोड. सध्या मी एर्गोनॉमिस्ट आहे पण सिंगापूरला आलो तेव्हा होतो User Experience Designer म्हणून (निरनिराळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर User-friendly, अधिक सोयीचे बनवणे). त्याआधी CA पासून advertising पर्यंत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम केलेले असल्यामुळे दर वर्षाआड आई सिंगापूरला आली की विचारते, "आता काय नवीन?" मी जे असेल ते तिला खरेखरे सांगतो. सवय झाल्यामुळे तिला धक्का वगैरे बसत नाही. या एकंदर प्रकाराला "धरसोड वृत्ती" असा छान शब्दप्रयोग मराठीत आहे.

मी सहावीत असताना इंग्रजीच्या तासाला बाईंनी "Rolling stone gathers no moss" ही म्हण शिकवली ते अजून आठवते. बाई म्हणाल्या की आयुष्यात उच्च यश मिळवायचे असेल तर चंचलता आणि धरसोड वृत्ती उपयोगाची नाही. "एक ना धड भाराभर चिंध्या" असे मराठीतपण म्हटले आहे असे सांगून बाईंनी इंग्रजी म्हण ताबडतोब सिद्धही करुन दाखवली. तरीही या Stone बद्दलचे माझ्या मनातले विचार काही जाईनात. शेवाळे जमवणे??? खरे तर एकाच जागी वर्षानुवर्षे ठोंब्यासारखे उभे राहण्यापेक्षा डोंगर उतारावरून मस्त घरंगळत सुटावे, अधे-मध्ये चरत असणाऱ्या गाईंना दचकवून असुरी आनंद मिळवावा, नुकत्याच उगवलेल्या रोपाला नाजूक बगल देऊन भणाण हवा कापत लांबवर नदीच्या काठापर्यंत पोचावे आणि मग एक उंच सूर मारुन नदीच्या खळाळत्या, ऊबदार पात्रात सामील व्हावे असे केले तर Stone ला नक्कीच जास्त मजा येईल असे वाटले. पण "Jack of all trades, master of none" अशी अजून एक सडेतोड म्हण हेच सांगते हे बाईंनी दाखवल्यावर मला माझे विचार चुकीचे आहेत हे पुरेपूर पटले.

त्यानंतर काही वर्षे सगळे नीट चालले होते. पण अचानक वडिलांच्या पुस्तकाच्या कपाटातील विनोबा भावेंनी घोळ केला. विनोबा म्हणाले, "आपला जन्म कशासाठी झाला, आपली मूळ वृत्ती काय, आपला 'स्वधर्म' काय ते शोधत राहा आणि स्वधर्माप्रमाणे आयुष्य जगा. खऱ्या आनंदाचे हेच गमक आहे." हे प्रकरण थोडे कळले आणि बरेचसे डोक्यावरुन गेले. त्यावेळेस मी शाळेच्या नाटकांमध्ये आणि सुधा करमरकरांच्या Little Theatre मध्ये व्यावसायिक बालरंगभूमीवर नियमित नट म्हणून काम करायचो, महाराष्ट्रभर दौरे करायचो. खूप मजा यायची. पण आनंद मिळतो आहे म्हणून अभिनय हाच स्वधर्म मानायचा की अजून शोधत राहायचे हे समजेना. शेवटी इंग्रजांनी आपल्यावर खूप अन्याय केलेला असल्यामुळे आणि विनोबा हे गीताईचे थोर लेखक असल्यामुळे इंग्रजी म्हणींपेक्षा विनोबांचेच ऐकायचे ठरवले.

मग त्यापुढील कॉलेजच्या वर्षात नेहेमी आवडणाऱ्या गोष्टी चालू ठेवल्या, आणखी काही आवडेल असे वाटले तर ते करुन पाहिले. चेतन दातार, सत्यदेव दुबे, श्रीराम लागू यांच्याबरोबर नाटके करत असताना रशियन भाषेत डिप्लोमा, चार्टर्ड अकौंटन्सी वगैरे केले. CA चे काम आवडले नाही तेव्हा जाहिरात विश्वात तीन वर्षे copywriting (वृत्तपत्र, मासिके, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमातील जाहिरातीच्या संकल्पना तयार करणे) केले. डॉट कॉम फर्ममध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर झालो (स्टार्ट-अप कंपन्यांच्या उद्योग संकल्पनांना ऑनलाईन वेबसाईट किंवा applications मध्ये रुपांतरीत करणे). मग स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा software usability कोर्स करुन सिंगापूरला user experience designer म्हणून आलो. त्यानंतर Human Factors Engineering मध्ये मास्टर्स डिग्री घेऊन एर्गोनॉमिस्ट झालो. पुढे काय राम जाने...

हे सगळे करत असताना अर्थातच कुटुंबियांना बऱ्यापैकी मनस्ताप झाला. मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्याकडून उपदेशवजा विरोध होत राहिला. पण तरीही कोणाला दुखवावे किंवा खूष करावे म्हणून नाही तर माझ्या स्वतःसाठी मी वेगवेगळ्या गोष्टी करत राहिलो. आवर्जून सांगावेसे वाटते ते या सगळ्यात मला समजून घेणाऱ्या आणि हवे ते करताना नुसती साथच नाही तर अखंड प्रेम आणि ऊर्जा देणाऱ्या एका व्यक्तीबद्दल. ती म्हणजे माझी पत्नी अस्मिता. स्वतः एक उच्चशिक्षित, मेरिट लिस्टर असूनही तिने माझ्या सगळ्या उचापतींना केवळ अवसरच नव्हे तर प्राधान्य दिले. कुटुंब आणि मुलांना सांभाळले. त्यामुळेच हे सगळे प्रयोग करणे शक्य झाले. २० डिग्र्या असलेले डॉ. श्रीकांत जिचकार व्हायचा सल्ला मी देत नाहीए. फक्त दहावी किंवा बारावीच्या अपरिपक्व वयात आपण जो व्यवसाय करायचा ठरवतो तो व्यवसाय आपल्याला खरेच आनंद देईल का याचा विचार आपण करत नाही, सामाजिक दबावामुळे करु शकत नाही हे मला म्हणायचे आहे. मग वर्षे निघून जातात आणि आता कौटुंबिक, आर्थिक जबाबदाऱ्या सोडून तिसरेच काहीतरी केवळ स्वतःच्या आनंदासाठी कसे करावे ह्या संभ्रमात आपण आधीचेच पुन्हा करत राहतो.

विविध अनुभवांच्या आणि व्यवसायांच्या मुशाफिरीतून मला स्वतःची ओळख होत गेली, खूप चांगली माणसे भेटली आणि अनेक सुंदर आठवणी गाठीला लागल्या. झालेल्या आर्थिक मिळकतीपेक्षा मला हा खजिना कितीतरी पटींनी लाखमोलाचा वाटतो. आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या मुलांनाच नव्हे तर कितीही वय झाले तरी स्वतःलाही काही वेगळे करुन पहाण्याचे आणि आनंद शोधण्याचे स्वातंत्र्य द्यावे असे मला मनापासून वाटते. थोडक्यात या लेखाचा गोषवारा करायचा तर एवढेच म्हणेन की वाट्टेल ते करु नका पण ‘आतून’ वाटेल ते जरुर करुन बघा; कारण कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकीएवढीच प्रत्येकाची स्वतःशी असलेली बांधिलकीही तितकीच महत्त्वाची आहे. एखादा व्यवसाय करताना तुम्ही खरोखर आनंदी असाल तर उच्च यश मिळतेच आणि खरे तर आनंद हेच सर्वोच्च यश नव्हे काय?

- योगेश तडवळकर


१३ टिप्पण्या:

 1. वेळ काढून वाचल्याबद्दल धन्यवाद!

  उत्तर द्याहटवा
 2. सही हो आप!! इतकी मस्त लेखनशैली आहे की पुढे काय चे उत्तर लेखन असेच हवे!! Stone तर एकदम झकास! त्याच्याबरोबर वाचक पण सगळीकडे जाउन,परत तुझ्या लेखात वाहत गेला!!"शेवटी इंग्रजांनी आपल्यावर खूप अन्याय केलेला असल्यामुळे आणि विनोबा हे गीताईचे थोर लेखक असल्यामुळे इंग्रजी म्हणींपेक्षा विनोबांचेच ऐकायचे ठरवले.--- हे पण मस्तच! इतका हरहुन्नरी मुलगा असलेल्या पालकांचे पालकत्व अवघड असणार! आणि हे सगळे बदल संसारी झाल्यावरही चालू ठेवता आले ...खरोखरीच अस्मिता महान आहे! पुढच्या सगळ्या उद्योगांसाठी शुभेच्छा!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद वृंदाताई. वेळोवेळी असेच instigate करणारे दिग्गज भेटले तुमच्यासारखे. आता पुढच्या परिणामांची जबाबदारी तुमची.

   हटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

   हटवा
 3. I have seen you as a good actor in Diwali drama, know you as my friend Asmita's better half but aaj nawyane olak zali tumha doghanchi ha lekh wachlyawar. You can be a a good speaker for inspirational talks too! All the best to both of you for future plans.

  उत्तर द्याहटवा