मनाच्या कोपऱ्यात

आज बऱ्याच दिवसांनी माहेरी जायचं ठरवलं. माहेरी जायचं म्हटलं तरी माहेर म्हणजे फक्त आपलं कुटुंब नसतं. माहेर म्हणजे आपलं घर, आपला परिसर, शेजारी-पाजारी आणि आपला मित्र-मैत्रिणींचा ग्रुप. 'मैत्री' म्हणजे काय हे कळतसुद्धा नसतं, अशा वयापासून आपल्या बरोबर असलेले बालपणीचे मित्र आणि मैत्रिणी. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर त्यांचा खूप मोठा प्रभाव असतो. हे मित्र-मैत्रिणी आपल्या आणि आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग असतो. माहेरी येण्याचं ठरवलं आणि लगेचच या मैत्रिणींना मेसेज करून कळवलं, त्यांचे पण 'नक्की भेटू' असे उत्तर आले. खरं तर सगळेच आपापल्या व्यापात बिझी आहेत पण आम्ही "नक्की भेटूया एकदातरी" असं ठरवलं. 

घरी आल्यावर आईला सांगून एक फेरफटका मारायला बाहेर पडले आणि जाणवलं ते म्हणजे - प्रचंड बदललेला परिसर, बंगले पाडून उभ्या केलेल्या मोठमोठ्या इमारती, बदललेली दुकानं, त्याचे दुकानदार. रस्त्यावर नेहमी दिसणारे चेहरे, तिथली झाडं काहीच पूर्वीसारखं नव्हतं. सगळंच नवीन होतं माझ्यासाठी आणि कदाचीत मी त्यांच्यासाठीसुध्दा. कुठल्याच गोष्टींना जुना चेहरा, वास, स्पर्श, ओळख काहीच नव्हतं. क्षणभर हादरले, किंचित रागच आला, अवघ्या सहा वर्षात एवढा बदल झाला आणि माझ्या हे आज लक्षात येतंय?

थोड्या नाराजीनेच घरी यायला सुरुवात केली. वाटेत आमच्या खेळायच्या जागा दिसल्या, त्याही काही अंशी बदलल्या होत्या. लपण्याच्या सिक्रेट जागा आता गाडयांनी भरल्या होत्या किंवा वरचे मजले बांधून बंद झाल्या होत्या. पण माझ्या डोळ्यासमोर सगळं जसंच्या तसं उभं राहिलं. सायलीच्या घरी भरपूर खेळायची मुभा होती. आमच्या घरी एक अख्खी खोली होती खेळायला. माझ्या आणि प्रियाच्या घरामध्ये एक कॉमन कंपाउंड होतं, तेही झाडांचं, सहज एका अंगणातून दुसऱ्या अंगणात जाता यायचं. आम्ही सगळ्या एकमेकींना हाक मारून बोलावायचो. सजल तिसऱ्या मजल्यावर रहायची, तिला बोलावण्यासाठी आम्ही खालून सगळ्या मिळून हाका मारायचो जोरजोरात, की खालच्या दोन्ही मजल्यावरची माणसं रागानी खाली डोकावायची. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एकमेकींकडे झोपायला जाण्याचा कार्यक्रम असायचा (सध्या त्याला night out किंवा pajama party असं म्हणतात). आम्ही मस्त जेवून गप्पा मारायचो, पत्ते खेळायचो. त्या काळात प्रत्येकीकडे आपापली आत्ये-मामे भावंडं महिना-महिना राहायला असायची त्यामुळे तीसुद्धा या ग्रुपचा एक भाग होती. सुट्ट्यांमध्ये पर्वती ते तळजाई फिरणे असा एक मोठा कार्यक्रम असायचा. जेवण्याआधी क्रिकेट आणि जेवण झाल्यावर पत्ते, घरघर, सिनेमा सिनेमा, नाव गाव फळं फुलं, असे खेळ असायचे. संध्याकाळी लपाछूपी, डब्बा ऐसपैस (तरी हे नाव असं का, हे अजूनही कोडंच आहे) झब्बू, लोखंड-पाणी, आंधळी कोशिंबीर आणि नंतर घरून बोलावणं येत नाही तोपर्यंत गप्पा! पुढे पुढे मोठे होत गेलो तशी खेळाची जागा गप्पांनी जास्त व्यापली.  

आम्हाला सगळ्यांना सिनेमाच्या गाण्यांवर नाचायला फार आवडायचं. माझ्या आठवणीप्रमाणे त्याची सुरुवात "रंगीला" पासून झाली. सायलीकडे सगळ्या कॅसेट्स असायच्या. ३-४ वर्ष आम्ही gathering सुद्धा केलं होतं. सगळी सुट्टी आमची डान्स प्रॅक्टिस चालायची आणि शाळा सुरु होण्याच्या एक आठवडा आधी gathering. त्याची तयारी आम्ही सगळ्या मिळून करायचो. डान्स बसवणं, नाटक बसवणं, अगदी बेडशीटचा पडदा तयार करणं, गच्ची साफ करणं, सगळ्यांना आमंत्रणं, सगळं सगळं आम्ही करायचो. यात आमची सगळ्यांची भावंडं आणि सोसायटीमधली इतर लहान मोठी मित्र मंडळी पण सहभागी होत असे. खरंच खूप निरागस होतं आमचं बालपण आणि "मैत्री" सुद्धा. 

पण मग आता काय झालंय? मी या माझ्या मैत्रिणींना डायरेक्ट हाक मारण्याऐवजी मेसेज करून त्यांची availability चेक करतीये. दिवसाचे १६-१६ तास एकत्र असणाऱ्या आम्ही निदान रात्री १० मिनिटं तरी भेटूया असं एकमेकींना सांगतोय. सजलला दिवसाच्या कुठल्याही वेळेला फोन करू शकणारी मी 'ती आत्ता बिझी असेल' असं गृहीत धरतीये. जसं वय वाढतं तसे आपण फार विचार करतो का? या 'so called formalities' च्या नादात हक्काची भावना विसरतोय का? जरा मोठं झाल्यावर झालेले वाद, समज-गैरसमज, यातून नकळत एक अंतर निर्माण झालय का? प्रत्येकाकडे असतात तशा एकमेकींच्या कडू-गोड आठवणी आमच्याकडेही आहेत, पण मग या बोटांवर मोजण्याइतक्या कडवट आठवणी चांगल्या आठवणींना विसरायला भाग पडतात का? "नाही, असं नाही होऊ द्यायचं! बराच काळ सहवास नसल्यानी discharge झालीये हि मैत्री. तिला परत charge करायलाच हवं"...असा विचार करत घरी येतच होते इतक्यात काही लहान मुलं एकमेकांना हाका मारत क्रिकेटची टीम तयार करत होती आणि batting, balling वरून भांडत होते. दुसरीकडे थोडा तरुण मित्र-मैत्रिणींचा ग्रुप गाड्यांवर गप्पा मारत, हसत खिदळत होता आणि एक आजी मुलांना "इकडे आरडा ओरडा करत खेळू नका रे" असं सांगत होत्या. 

म्हणजे बदललं काहीच नव्हतं खरंतर, माणसांची replacement झाली होती. खेळाचे प्रकार किंवा काळानुसार गप्पांचे विषय जरा बदलले असतील पण बालपण आणि ती "मैत्री" तशीच होती. "मनाच्या कोपऱ्यात" कुठेतरी कायम जपता येईल अशी.... 


- अनुजा बोकील


९ टिप्पण्या:

  1. बालपणीच्या आठवणींनी मन कसं ताजंतवानं होतं...

    उत्तर द्याहटवा
  2. Masta lekh Anuja.. Oghavati ani pratyaksha bolalyasarkhi bhasha waparli ahes.. Chhan.

    उत्तर द्याहटवा