आई - मुलगी - आई ... सुंदर नात्याची साखळी

"मम्मी, आज माझ्यासाठी जेवायला नवीन काय बनवणार? काहीतरी छान छान तयार ठेव. शाळेतून आल्यावर मस्त जेवेन मी." माझ्या लेकीने -सईने शाळेत जाण्याआधी मला फर्मान सोडले. "आधी डब्यात दिलेले व्यवस्थित संपवा. टाकलेले परत डब्यात आलेले दिसता कामा नये." मीही तिला दटावले.

काय ह्या हल्लीच्या मुलांच्या खाण्याच्या अजब आवडी निवडी. रोज नवीन नवीन पदार्थ हवेत. पुन्हा कामाला लागताना मी विचार करू लागले. आम्ही असे कधी आईकडे हट्ट नव्हते केले लहानपणी. तरी बरे माझ्या लहानपणी माझी आई चोवीस तास आमच्या दिमतीला उभी असायची. हा लहानपणीचा विषय दुपारी फोनवर बोलताना काढला तर अवघे पाऊणशे वयोमान असलेली माझी आई मलाच दटावत म्हणाली, "तेव्हा डब्यात दिलेले मुकाट्याने खायचीस तू. पण बाकी नखरे काही कमी नव्हते तुझे." हे ऐकून मी काय बोलणार? मला आठवले, डब्यात दिलेले खावेच लागायचे कारण दुसरा पर्याय समोर नसायचा. कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये राजरोस जाऊन खाणे फारसे प्रचलित नव्हते त्यावेळी. तसा पर्याय असता त्यावेळी तर आपण काय केले असते हा विचार मनात डोक्यावल्याशिवाय राहिला नाही.

माझे विचार पुढे-मागे धावू लागले. मी नोकरी करत होते तेव्हा सईचे लाड करायला वेळ मिळत नव्हता. मुळात तिच्याशी धड बोलायलाच वेळ नव्हता. तिच्या बालपणात रमायला जमलेच नाही. करिअर का घर हा प्रश्नच तेव्हा चक्रव्यूहासारखा वाटला. कसा भेदावा कळेना. त्यातच खूप वेळ गेला. त्यानंतर तिला समजून घ्यावे, तिच्या बालपणातून कौमार्यावस्थेत जाणाऱ्या दिवसांना न्याय द्यावा म्हणून पार्ट टाइम नोकरी करूलागले. किती समाधान वाटले होते तेव्हा. माझी आई सगळ्यात सुखावली त्यावेळी. आई म्हणाली, " हे फार चांगले केलेस. मुलीला तुझ्यातील आईच्या सहवासाची गरज आहे. हे दिवस पुन्हा येणार नाहीत. कदाचित पैसे आणि पोझिशन पुन्हा मिळवता येईल पण मुलीची हरवलेली आई आणि तिचे बालपण पुन्हा मिळणार नाही." आईचे पटलेच मला. महत्त्वाचे म्हणजे माझ्यातील आईचे विचार माझ्याच आईच्या तोंडून बाहेर पडले. मन शांत झाले.

पण कधी कधी मात्र असे वाटे, सई जरा जास्तच फायदा घेतेय या सगळ्याचा. ती मला गृहीत धरतेय प्रत्येक गोष्टीत. पुन्हा विचार आला मनात, माझी आई आम्ही भावंडे लहान असताना आमच्याबद्दल असा काही विचार करत असेल का? तेव्हा तिला किती कष्ट करावे लागायचे. एकत्र कुटुंब. इतकी माणसे. तसेच माझ्या आजीने आईविषयी, "या कार्ट्या, अगदी वाया जात चालल्या आहेत " , असे कधी काही म्हटले असेल का? अशी कल्पना मी करू लागले. परंतु असे प्रसंग कमीच घडत असावेत. कारण पूर्वीच्या बायका मुळातच सोशिक, सहनशील . शिवाय बहुतेक घरातले बाबा, आजोबा जमदग्नीचे अवतार. कडक, संतापी. त्यांच्यापुढे आई, आजी मूग गिळून बसायच्या. कुटुंबातील शांतता राखली जायची. हळूहळू काळ बदलला. आम्हा बायकांचे शिक्षण, अधिकार, हक्क ह्याची जाणीव धारदार होत गेली. त्याबरोबर आईकडून मुलीला मिळालेल्या आणि मुलीकडून तिच्या मुलीला मिळालेल्या सूचनांचे स्वरूप बदलले पण सूचनांचा स्रोत मात्र तसाच अव्याहत चालू आहे.

"मम्मी, किती सूचना करशील मला? मला स्वयंपाक एकटीने करू दे. तू जा बघू आधी बाहेर." हल्ली सई मला सांगते आणि मी माझ्याशीच हसते. "खुळी पोर." माझे मन मागे मागे जाते. अगदी अशीच मीही वाद घालायची माझ्या आईशी. "आई, अमुक अमुक भाजी अगदी कमी तेलात करत जा. नको गं एव्हढे तेल घालून मला जाडी करु." मी आईला बजावायची. आता तेच वाक्य थोड्याफार फरकाने मला माझ्या सईकडून ऐकायला मिळतेय. यावरून आता एक कळतेय की तारुण्य नेहमीच, "आम्हाला कळतंय सगळे" असे म्हणते, तर मागची पिढी, "जरा जपून, आम्हीही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेत." असा आपुलकीचा, काळजीचा सल्ला देत असते. मुलगी आईला, "आई मला माहितेय गं सगळे. किती वेळा सांगशील तेच तेच?" असे म्हणत राहते. पिढी बदलते. काळ बदलतो. थोडीफार भाषाही बदलते. बदलत नाही तो काळजीचा सूर, जास्त अनुभव घेतलेल्या आईच्या प्रेमभरल्या उरातून निघालेला मायेचा सल्ला.

"चल तुला शिकवते" असं प्रत्यक्ष न म्हणताही आई सतत काहीतरी शिकवत असते, संस्कार-संस्कृतीचे बाळकडू कसलेही स्तोम न माजवता आई पाजत असते. आपल्याही नकळत आपण कधी तिन्हीसांजेला दिवा लावायला लागतो कळत नाही. मग आपल्याकडे अंगण नसले तरी मनाच्या कोपऱ्यात पवित्र, सुंदर, छोटेसे तुळशी वृंदावन लावलेले असते. त्यात तुळशीचे झाड डुलत असते. आपल्या आईनेच ते रोपटे आपल्या मनात लहानपणी रुजवलेले असते. आपल्या आईला फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, असे मोठे शब्द माहित नसतीलही कदाचित पण तिच्या घराच्या सुखासाठी कोणते तत्त्वज्ञान तिने आणि तिच्या लेकीने वापरावे हे तिला पक्के ठाऊक असते. आपल्या समाधानी जगण्याचे आणि सुखी संसाराचे रहस्य ती आपल्या मुलीला शिकवत असते. कधी उपदेश करून, कधी स्वतः तसे वागून. लेकीलाही तेच करायचे असते, स्वतः आई झाल्यावर. बहिणाबाईंनी किती सुंदर म्हटले आहे ते बघा." लेकीच्या माहेरासाठी माय सासरी जाते." तिच्या या जगण्यातूनच अनेक लेकी सुखी होत असतात आणि एकूणच आपला समाज सुदृढ बनत असतो.


- मोहना कारखानीस


४ टिप्पण्या:

  1. पिढी बदलते. काळ बदलतो. थोडीफार भाषाही बदलते. बदलत नाही तो काळजीचा सूर, जास्त अनुभव घेतलेल्या आईच्या प्रेमभरल्या उरातून निघालेला मायेचा सल्ला.---मस्त!

    उत्तर द्याहटवा