आई झाल्यावर कळेल

एक झणझणीत, नाकात जाऊन गुदगुल्या करणारा जळका वास आला. हा वास खूपच ओळखीचा होता, म्हणजे अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत हा वास मी अनेक घरात अनुभवला आहे. 'दृष्ट' काढणे हा प्रकार सगळ्यांना माहिती असेलच. कोणी मीठ-मोहोरी ओवाळून, कोणी मीठ-मिरची ओवाळून, कोणी भाकरीचा तुकडा ओवाळून, कोणी काळा टीका लावून, कोणी काळा दोरा बांधून तर कोणी नुसतीच कानशीलामागे बोटं कट्कट मोडून दृष्ट काढतं. प्रत्येकाची आपापली पद्धत असते. खूप फोल वाटणारी ही कल्पना आणि त्याच्या कितीतरी असणाऱ्या पद्धती! खरं सांगायचं तर पटत काहीच नाही पण वय आणि त्या वयाबरोबर जोडली जाणारी नाती यांनी त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला...नकळतच.

लहानपणी माझी आजी सारखी आमच्या सगळ्यांची दृष्ट काढायची. अगदी माझे बाबा, आई, दादा, मी आणि आमच्याकडे येणाऱ्या माझ्या सगळ्या भावंडांचीसुध्दा. तेव्हा मी आजीशी खूप वाद घालायचे ..."आजी काहीही काय करतेस? असं काही नसतं गं." तेव्हा शाळेत नुकतीच 'शहाणपणा' (आजीच्या लेखी) शिकून आले होते त्यामुळे आजी नुसताच "तुला काय कळतंय यातलं? तू आई झालीस ना की कळेल काय ते" असं म्हणायची. मी पण तेवढच ऐकायचे आणि सोडून द्यायचे. थोडी मोठी झाले आणि आईला प्रश्न विचारायला लागले कारण तिला पण मी माझ्या भावंडांची दृष्ट काढताना बघायचे. तेव्हा खूप आश्चर्य वाटायचं खरंतर, आई श्रद्धाळू वगैरे नव्हती, मग ही असं का करतीये? मी आईला म्हणायचे की "अगं आई पटतंय का तुला हे?". तेव्हा ती मला म्हणाली होती की "पटण्या-न पटण्याचा प्रश्नच नाहीये. आपली एखाद्या नात्यातली भूमिका किंवा त्या नात्यात असणारा ओलावा आपल्याकडून ते करून घेतो....तुला आई झाल्याशिवाय नाही कळायचं ते". मला कायम हा प्रश्न पडायचा की आई झाल्यावर कळेल म्हणजे नक्की काय कळेल? मी तर आहे तीच राहणार आहे ना, मग असं का म्हणतात हे सगळे?

मला मुलगा झाला तेव्हा माझी आई आणि माझ्या सासूबाई सारखी त्याची दृष्ट काढायच्या, अगदी पहिल्या दिवसापासून! बाळंतपणाला आईकडे गेले तेंव्हा अंगाला तेल लावणारी बाई पण रोज दृष्ट काढायची. यात मला माझ्या मुलाचं कौतुक चाललं आहे असंच वाटायचं. हळूहळू माझा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. मला नकळत या दृष्ट काढण्याने बरं वाटायचं. श्रद्धा, विश्वास या सगळ्याच्या पलीकडे कुठेतरी खूप हळवेपणा आला होता. जसा माझा मुलगा, विहान, मोठा होऊ लागला तसा वारंवार अनुभव यायचा की लोक विहानला बघून पटकन "किती गोड मुलगा आहे" म्हणायचे, पटकन त्याच्या गुबऱ्या गुबऱ्या गालांना हात लावायचे, कितीतरी लोक "याला खाऊन टाकावसं वाटतं" असं प्रेमात, लाडात म्हणायचे. होताही तो तसा गुटगुटीत. मला कधीकधी असाही अनुभव आलाय की प्रेग्नन्ट बाई जात असेल तर ती नवऱ्याला कोपऱ्यानी खुणावत "आपल्याला असं बाळ व्हायला हवं" असं म्हणायची. त्याचं पुढे चालणं, बोलणं सुरू झालं, गोड बोबडा आवाज आणि डुलत डुलत चालणं, अर्थातच खूप लोक कौतुकाने बघायचे, तब्येतीचं कौतुक करायचे... मला पण आई म्हणून खूप अभिमान वाटायचा. विहान जसा मोठा होत गेला तसं धडपडणं, लागणं सुरू झालं, एकदा तर त्याला खूप मोठी खोक पडली, टाके घालावे लागले, सायकल घेतल्या घेतल्या पडला. खरं तर मी पण लहानपणी कितीतरी पडले आहे, लागलं आहे पण विहानच्या बाबतीत एक वेगळीच काळजी वाटते. लहानपणापासून ऐकत आलीये ती "दृष्ट" तर नाही ना लागायची असं वाटतं.

फार काळजी करावी, सावध असावं असा माझा स्वभाव नाही, जरा जास्तच बिनधास्त, धीट स्वभाव आहे. पण 'आई' झाल्यावर माझ्यात हा एक फरक पडला. माझा मुलगा ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्याला कुठलाही त्रास होऊ नये किंवा कुठलीही वेदना त्याच्या वाट्याला येऊ नये यासाठी मी अनेक मार्ग अवलंबीन, त्यातलाच एक मार्ग 'दृष्ट काढणे' हा असू शकतो. 'आई आणि मूल' या नात्यातला हळवेपणा, ओलावा, हुरहूर, काळजी, आपल्या मुलाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून केली जाणारी धडपड, या मागची ती भावना एकच असते आणि ती खरंच 'आई झाल्यावरच कळते.'

हा विचार करत असतानाच माझ्या मुलाचा आईशी बोलताना आवाज आला "आजी हे तू काय करते आहेस?", ती म्हणाली "मी तुझी दृष्ट काढते आहे ". मग त्याने विचारले, "असं का करतात? यानी काय होतं?" तिने गॅस बंद केला, माझ्याकडे बोट दाखवून ती त्याला म्हणाली "तुझ्या आईलाच विचार" आणि ती माझ्याकडे बघून अर्थपूर्ण हसली.

-अनुजा बोकील


१० टिप्पण्या:

 1. मस्त! मानवी मन खूप अतर्क्य असतंच त्यात आईचं मन तर विशेष गुंतागुंतीचं असतं . आई होणं हे एकाच वेळी सर्वात मोठा वर आणि सर्वात मोठा शाप असतो असं का म्हणतात ते आई झाल्यावर कळतं!---संपदा पुरंदरे

  उत्तर द्याहटवा
 2. खूपच सुन्दर अनुजा

  उत्तर द्याहटवा
 3. Madhura Joshi. Kharach aai zalyavar ekhadya goshtikade baghanyacha drushtikon khup badalato. Chan lihila aahes Anuja.

  उत्तर द्याहटवा
 4. माझा मुलगा ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्याला कुठलाही त्रास होऊ नये किंवा कुठलीही वेदना त्याच्या वाट्याला येऊ नये यासाठी मी अनेक मार्ग अवलंबीन, त्यातलाच एक मार्ग 'दृष्ट काढणे' हा असू शकतो. 'आई आणि मूल' या नात्यातला हळवेपणा, ओलावा, हुरहूर, काळजी, आपल्या मुलाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून केली जाणारी धडपड, या मागची ती भावना एकच असते आणि ती खरंच 'आई झाल्यावरच कळते.'...खरंय

  उत्तर द्याहटवा