SG50 - सिंगापूरमधील सध्याच्या तरुण पिढीसमोरील आव्हाने

मागच्या संपूर्ण वर्षात आमच्या एका मित्राच्या कुटुंबाने एकाही कार्यक्रमात भाग घेतला नाही – एकही सिनेमा नाही, अगदी आपल्या नाटकालाही आले नाहीत! छे छे, वादविवाद काही नव्हते आमच्यात; श्रीमान क्वचित काहीवेळा आले पण सौ आणि छोटी अंजू तर अजिबातच नाहीत! इतकंच काय, अहो, अंजूचा वाढदिवसही घरच्याघरीच साधेपणाने झाला! ह्या सगळ्याचं कारण, कुमारी अंजूची PSLEची परीक्षा होती! परीक्षेपूर्वी शुभेच्छा देण्यासाठी जेव्हा आम्ही तिला भेटलो तेव्हा बारा वर्षांच्या छोट्या अंजूच्या चेहेऱ्यावर चष्मा तर आला होताच पण ती एखाद्या आजारातून उठावी तशी निस्तेज आणि कमालीची गंभीर दिसत होती. तिच्याशी गप्पा करताना तिला गेल्या वर्षीच्या मोठ्या घटना, मित्रमैत्रिणींचे वाढदिवस, सिनेमा याबद्दल खास माहिती नसल्याचे तर जाणवलेच परंतु येत्या लेखी परीक्षेबद्दल जबरदस्त भीती असल्याचेही दिसले. आणि भीती पास होण्याची अजिबातच नव्हती, तर स्कोअर हवा तसा येईल का आणि पुढची अॅडमिशन आईने ठरवलेल्या शाळेत मिळेल का, ह्याची होती! 

ही परीक्षा स्थानिक शिक्षणात निश्चितच एक महत्वाचा टप्पा आहे आणि ह्या मुलांना अशा अजून बऱ्याच स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जायचे आहे, हे खरेच! शिवाय स्पर्धा म्हटली की एक उच्च ध्येय हे हवेच, आणि त्यासाठी कणखर तपश्चर्याही हवीच. परंतु बऱ्याच उदाहरणांवरून असे लक्षात येते की पालकांच्या हट्टामुळे ही पिढी केवळ ध्येयाच्या दबावाखाली भरडली जातेय पण त्यातील वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी झालेली नसते. अनेक कारणांमुळे सगळ्यांनाच काही ठरवलेले ध्येय मिळवता येत नाही पण असे झाले तर दुसरे काय, ह्याचा त्यांनी कधी विचारही केलेला नसतो. मग जरी उत्तुंग यश मिळाले असले तरी ते त्यांच्या अपेक्षेनुसार नसल्याने आई-बाबांचे दु:खी चेहेरे पाहून मुलांनाही मिळालेल्या यशाचा आनंद उपभोगता येत नाही. खरे तर आजची पिढी यापेक्षा वेगळा विचार करायला तयार असतेही पण बऱ्याचदा पालक खोट्या सामाजिक दबावाला बळी पडून असे वागतात आणि त्यात बिचाऱ्या मुलांच्या आनंदाचा बळी जातो. अनेकदा मुलांना एकाहून अधिक क्षेत्रांत उतरवले जाते. शालेय शिक्षणात तर यश हवेच पण त्याबरोबर "तन्वीची मुलगी गाणे शिकतेय आणि राजनचा मुलगा व्हायोलीन शिकतोय म्हणून आपल्या यशनेसुद्धा हे दोन्ही शिकले पाहिजे, त्यातच येत्या रविवारी महाराष्ट्र मंडळाच्या चित्रकला स्पर्धेतही भाग घेतला पाहिजे," अशा एकाहून एक जड अपेक्षांचे ओझे बिचाऱ्या पिल्लाच्या माथी मारले जाते. मला वाटते ह्या सर्वांतून पहिला बळी जात असेल तर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या स्वतःबद्दल असलेल्या खात्रीचा, त्यांच्या स्वतःच्या आवडीचा आणि त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करण्याच्या शक्तीचा! आजच्या पिढीपुढे हे निश्चितच मोठे आव्हान आहे आणि त्यातून मार्ग काढणे हे बऱ्याच अंशी पालकांच्याच हाती आहे. 

हे झाले एक आव्हान. ह्याशिवाय, सिंगापूरसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात स्थानिकांसोबत जुळवून घेताना जिथे मोठ्यांची त्रेधा उडते तिथे तरुण मुला-मुलींना त्यांच्या वयाच्या स्थानिक मित्रांबरोबर जमवून घेणे हेही एक आव्हानच ठरते. एकवेळ वयाने ज्येष्ठ मंडळी वयोमानानुसार किंवा कामातील गरजेमुळे परदेशी सहकाऱ्यांशी जमवून घेतात, पण भाषेतील किंवा संस्कृतीमधील फरकामुळे किंवा पूर्वीच्या अनुभवांमुळे शाळकरी किंवा कॉलेजमधील स्थानिक युवावर्गात परदेशी मित्र-मैत्रिणींबद्दल पूर्वग्रह असू शकतात. जोपर्यंत असे पूर्वाग्रही विचार नवीन, सुखद अनुभवांतून बदलत नाहीत तोपर्यंत परदेशांतून आलेल्या मुलांना वर्गात 

केवळ एकटेपणच सहन करावे लागते असे नाही, तर अनेकदा संघर्षाच्या प्रसंगांनाही तोंड द्यावे लागते. ह्यातूनच कधीकधी रॅगिंग सारखे प्रकारही घडतात, जे अनेकदा कोणाच्या लक्षातही येणार नाहीत अशा रीतीने केले जातात. दुर्दैवाने शिक्षकही तश्याच विचारांचे असल्यास तेही, ‘त्यात वावगे काही नाही’ असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. ह्याचा दूरगामी परिणाम येणाऱ्या मुलांच्या मनावर होऊ शकतो. अनेकदा स्थानिक विचारांपेक्षा भारतीयांचे विचार थोडे कर्मठ किंवा मवाळ समजले जातात आणि त्यामुळेही स्थानिक लोक भारतीयांना आपल्या मैत्रीच्या वर्तुळाबाहेर ठेवतात. त्यांचे असे वर्तन सुरुवातीला थोडे त्रासदायक वाटू शकते आणि त्यातून मग आपल्या सुसंस्कृत विचारांना, संस्कारांना सोडून त्या वर्तुळात प्रवेश मिळविण्याचे आकर्षण वाटू लागते. अशा वेळी दुसरा धोका उद्भवतो तो भाषावार किंवा प्रांतवार गट तयार होण्याचा. सांस्कृतिकदृष्ट्या असे गट असायला काहीच हरकत नाही पण बहुतांशी अशा गटांतून मैत्रीऐवजी धोकादायक स्पर्धा आणि संघर्षच होतात. 

शिवाय जेव्हा परदेशांत शिकलेली मुले भारतात परत जातात तेव्हा स्थानिक भारतीय त्यांच्याबद्दल एक निराळाच समज करून बसतात. त्यांची बोलण्याची पद्धत, खाण्याच्या किंवा स्वच्छता राखण्याच्या सवयी, बोलताना इंग्लिशचा जास्त वापर ह्यावरून अनेकदा त्यांची चेष्टा केली जाते. ह्यामुळे अशी मुले भारतात परतण्याच्या आपल्या पालकांच्या निर्णयाशी असहमत होऊ लागतात आणि घरातील शांतता बिघडू लागते. शिवाय अशा मुलांमध्ये मी भारतीय की सिंगपुरिअन, अशी द्विधा मन:स्थितीही निर्माण होऊ शकते. 

अर्थात ही सगळी पारंपरिक आव्हाने आहेत आणि त्यावर बरेच मार्गदर्शनही उपलब्ध आहे. पण ह्या इंटरनेट पिढीला अजून एका अपारंपरिक आव्हानाचा सामना करावा लागतोय - माहितीच्या त्सुनामीचा! इंटरनेटच्या अगणित फायद्यांबरोबरच यात अनेक अदृश्य आव्हानेही आहेत, ज्यांचे परिणाम अनुभवल्यानंतरच त्यातील धोके जाणवतात. फेसबुक आणि तत्सम मैत्रीजाल हा त्यातीलच एक धोका. अशी मैत्रीजाले आपल्या दूरच्या मित्र-मैत्रिणींना जोडून देतात आणि नवीन मित्रही मिळवून देतात. पण समोर आलेला नव्या मैत्रीचा हात कुणाचा आहे ह्याची खात्री देत नाहीत! उदाहरणार्थ, मॅालमध्ये फिरताना आपल्या ड्रेसचे कौतुक करणाऱ्या अनोळखी मुलीला जर आपण लगेच फेसबुक फ्रेंड केले तर तिला आपली सगळी माहिती एका झटक्यात 

अजाणतेपणी उघड होते, जी आपण कदाचित प्रत्यक्ष भेटलेल्या मित्रालाही लगेच सांगत नाही. तुम्ही घरी पोहोचेपर्यंत त्या नवीन मैत्रिणीला तुमची शाळा, मित्र-मैत्रिणी, आजोबा-आजी, आई-बाबा आणि त्यांची काम करण्याची ठिकाणे, अशी कितीतरी माहिती मिळते, जी एखादा गुन्हा करण्यासाठीही उपयोगी ठरू शकते. नवीन ओळखी करत राहाव्यात हे जेवढे खरे, तेवढेच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खबरदार राहणे हेही अनिवार्य, हे ह्या नवीन पिढीने लक्षात ठेवले पाहिजे. 

इंटरनेटवरून, फेसबुक किंवा व्हॉट्स अॅप मधून मिळालेली माहिती नेहमीच अधिकृत, सुयोग्य, आणि बरोबर असतेच असे नाही. किंबहुना त्यातून अनेकदा केवळ अफवाच पसरवल्या जातात ही वस्तुस्थिती आता आपल्याला माहित झालेली आहे. तरीही अशी माहिती वाचून / ऐकून आपल्या पालकांशी वाद घालणे, किंवा त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे असे प्रसंग तरुण मुलांच्या घरात घडत असलेले आपण वरचेवर पहातो. माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींना मी इतकेच सांगेन की बऱ्याचदा तुमचे पालक त्यांचे विचार तुम्हाला गूगलप्रमाणे दाखवून देऊ शकत नसतील, त्यांचे प्रमाण देऊ शकत नसतील; पण ते त्यांचे अनुभवांचे बोल आहेत, तुमच्या सुरक्षिततेसाठी ते थोडे काळजीपूर्वक विचार करत आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यातून कदाचित तुमचा दोस्तांसोबत एखादा कन्सर्ट मिस होईल पण तुम्ही सुरक्षित राहाल! जसे डोळ्याला दिसत नाही म्हणून हवेत ऑक्सिजन नाही असे नाही, तसेच त्यांच्या सांगण्याला इंटरनेटवर सपोर्ट नाही, म्हणून ते चूकही नाही ! 


शुभेन फणसे1 टिप्पणी: