Singapore memories - टीन-एजच्या उंबरठ्यावरून मागे वळून बघताना

वय वर्ष १२! आता लवकरच टीन एजर (teenager) म्हणून मिरवायला मिळणार म्हणून आनंदाने लकाकणारे डोळे, थोडसे मिश्किल हसू, ओठाच्यावर थोडीशी ठळक होत जाणारी काळी रेघ, किंचितसा घोगरा होत जाणारा आवाज, टेनिस कॅम्पला जायची तयारी, अशा अवतारात धडधडत जिन्यावरून खाली येत, माझं वासरू जेंव्हा आर्जवी ऑर्डर देतं, "आई, मला स्नॅक्सला "काया - टोस्ट" दे", तेंव्हा "ओके ला...रेडी ओललेड्डी" म्हणायची उर्मी उफाळून येते आणि मन थेट सिंगापूरच्या फूडकोर्टमध्ये जाऊन पोहोचते. ३ वर्षे होत आली सिंगापूर सोडून तरी काही आठवणी, काही चवी अगदी कालच्या इतक्या ताज्या आहेत.

नव्या लग्नाची नवलाई घेऊन आम्ही दोघे सिंगापूरमध्ये आलो. तेंव्हाचे ते हातात हात घेऊन मनमुराद भटकणे, जोडून सुटी आली की कुठेतरी पटकन एखादी ट्रिप करून येणे, काडीकाडी जोडत पहिलं घरटं बांधणे अशा मंतरलेल्या दिवसात, एका छोट्याश्या पिलाचा, अनिकेतचा, चिवचिवाट सुरू झाला आणि नव्या आनंदाला जबाबदारीची जोड मिळाली. नशिबाने मला एक वर्षाची सुटी मिळाली. पहिल्या वर्षीच्या सगळ्या "पहिल्या" गोष्टींची धमाल अनूभवताना, "office सुरु झाल्यावर काय?"...ही चिंता मनात डोकावयाला लागली. पूर्ण वेळ गृहसेविका का डे-केअर या चर्चा सुरु झाल्या. शेवटी आम्ही डे-केअरचा निर्णय घेतला. आणि पुढे तो पूर्णपणे सार्थ ठरला. जरी आम्हा दोघांना थोडे जास्त कष्ट पडले तरी अनिकेतच्या सगळ्यांच्यात मिसळणार्‍या, परिस्थितीला जुळवून घेण्याच्या स्वभावाला डे-केअर हे मोठे कारण आहे. त्याचा त्याला आमच्या पाठीवरच्या बिर्‍हाडाबरोबर जिथे जाऊ तिथे रुळायला खुपच फ़ायदा झाला.

दहा बारा डे-केअर ला भेटी देउन, शेवटी "Tender Kids" नक्की झाले. तेथे जाताच आम्हा दोघांना अगदी घरच्यासारखे प्रेमळ वाटले. तर "Tender Kids" ही अनिकेतची पहीली शाळा! अगदी सिंगापूर सुटेपर्यन्त "after school care" च्या माध्यमातून त्याची नाळ तिथे जुळलेली राहीली. मधे एक वर्ष मी आणि आनिकेत पेनांगला माझ्या कामासाठी असतानाही, business trip ला सिंगापूरला आले तरी अनिकेतला कुठे ठेवायचे हा प्रश्नच नसायचा! सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर ... "Tender Kids". ते त्याचे दुसरे घरच झाले होते. ते मुख्य म्हनजे तेथील अंकल टोनी आणि मिस. सोह मुळे! प्रेमाबरोबरच मिळणारे शिस्तीचे धडे, व्यावहारीक शिक्षण हे सगळं अगदी हसत खेळत. तिथे अनिकेत स्थानिक जेवण जेवायला शिकला. "Tender Kids" च्या कुटंबासोबत ट्रीप म्हणजे तर पर्वणी! अंकल टोनींचा योगा क्लास अनिकेतचा सगळ्यात लाडका. योगा शिकताना मस्ती पण करायला मिळायची. त्या निरागस वयात "Tender Kids" मध्ये त्याला जे संस्कार मिळाले, त्याचे आम्ही जन्मभर ऋणी राहू.

Yoga on the beach with Uncle Tony

जसा तो मोठा होत गेला, तसा तो सिंगापूरच्या शाळेत जायला लागला. "Saint Stephen school" ही पुढची पायरी. तोपर्यंत त्याला वाचनाची गोडी लागत होती. पण तो वाचायचा फक्त non-fiction! मी खूप प्रयत्न केले की त्याने fiction पण वाचावे. त्याचा उपयोग भाषा सुधारण्यासाठी होतो. पण तिसरीमध्ये जाईपर्यंत त्याने अजिबात मला दाद दिली नाही. पण तिसरी आणि चौथीला त्याला इंग्रजीच्या शिक्षिका म्हणून मिस. फर्नांडिस मिळाल्या. सुरवातीला त्या भयंकर कडक म्हणून प्रसिद्ध होत्या. हा तर जाम घाबरयचा कारण वर्गात बडबड करणे हा जन्मसिद्ध हक्क आणि तो बजावयची मिस. फर्नांडिस समोर पंचाईत. पण त्या हाडाच्या शिक्षिकेने, हळूहळू काय जादू केली देव जाणे, पण इंग्रजी हा सर्वात लाडका विषय झाला आणि वाचनाची गाडी सुसाट सुटली. "वाचाल तर वाचाल", या म्हणीला धरून आम्ही दोघांनी "वाचलो" म्हणून सुटकेचा निश्वास सोडला.

खरे तर फक्त शाळेत जाऊनच शिक्षण मिळते असे नाही. उघडं जग हे जगणं शिकवायची मोठी शाळा. त्यामुळे शाळेच्या बाहेरही अनिकेतचे व्यक्तिमत्व घडत गेले ते शब्दगंध, महाराष्ट्र मंडळाचे विविध कार्यक्रम, वार्षिक नाटक यासारख्या उपक्रमातून. फक्त आई-बाबा सोडून अजून लोकांशी मराठी बोलून, त्याचे मराठी सुधारत गेले. इतके की इथे ऒस्टिनला आल्यावर त्याने येथील मराठी मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी मराठीमधून प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम उत्तमरित्या सांभाळला. समूहात काम करणे, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांशी संवाद साधता येणे हे तो शब्दगंध, नाटकाच्या तालमी याला आमच्या बरोबर येऊन शिकत गेला. Temple of Fine arts मध्ये नवाझ सरांचा तबला ऐकून लागलेली तबल्याची गोडी अजूनही शाबूत आहे आणि मनापासून पुढे शिकत आहे. तसेच सिंगापूरसारखे अद्दयावत, अनेक संस्कृतीची मिसळ असलेले वातावरण अनुभवल्यामुळे इथे अमेरिकेत आल्यावर लागलेला "Nerdy" हा शिक्का, अमेरिकेबाहेरचे जग माहीत नसलेल्या त्याच्या शाळेतल्या मित्रांना सिंगापूरच्या गंमती सांगत त्याने सहजपणे पुसून टाकला आणि त्यांच्यात मस्त मिसळून गेला.

आता तो टीन-एजर होणार म्हणजे आमचे पालकत्वही टीन-एजर होणार. या महत्त्वाच्या टप्प्यावरून मागे वळून बघताना, सिंगापूरमधले त्याचे बालपण हा आमच्या पालकत्वाचा एक मोठा कालावधी ठरतो. त्या कालावधीमध्ये पाया पक्का होत गेला. आता फुलपाखरू होण्याच्या मार्गावर बालपणीच्या कोषात सिंगापूरमध्ये मिळालेले जीवनसत्त्व नक्कीच उपयोगी पडेल. सगळ्याच आई-वडीलांना आपला बाळाची गाडी योग्य रूळावर चाललेली पाहताना खूप काही मिळाल्याचा आनंद होतो. आमच्या पालकत्वाच्या जबाबदारीला हातभार लावणार्‍या आणि पालकत्वाच्या सुरुवातीच्या दिवसांचा आनंद भरभरून देणार्‍या त्या सिंगापूरच्या दिवसांना, अगदी मनापासून धन्यवाद!!

- प्राजक्ता नरवणे1 टिप्पणी:

  1. पाळणाघर ... पालकत्वाची जबाबदारी निभावताना लागणारा एक अत्यावश्यक आधार. छान लिहिले आहेस. समाजात मिसळण्याची सवय एक सर्वांगानी समृध्द असणारे व्यक्तिमत्व घडवायला मदत करते हे पण नेमके मांडले आहेस!

    उत्तर द्याहटवा