वर्तमानाचे महत्त्व

Whatsapp वर काही दिवसांपूर्वी एक संदेश माझ्या वाचनात आला. एका माणसाचा उजवा पाय डाव्या पायाला सांगत असतो, "भाऊ, ह्या क्षणी तू पुढे आहेस, मी मागे आहे. पुढील क्षणी मी पुढे असेन, तू मागे असशील. त्यामुळे कधीही तुझ्या पुढे असण्याचा तू गर्व करू नकोस किंवा तुझ्या मागे राहण्याचे तू दुःख करू नकोस. प्रत्येक क्षण आनंदात घालव. ह्यातच आपल्या दोघांचे हित आहे."

मला हा संदेश अतिशय आवडला. आपल्या "शिशिर ऋतुगंध"च्या विषयाला हा संदेश किती तंतोतंत लागू पडत आहे, असे मला वाटले.

गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणा: ।।

ह्याचं स्वैर भाषांतर असं

गेले त्याचे दु:ख नको, ना येईल त्याची चिंता
ज्ञानियांचे वागणे असे आजच्याप्रमाणे 

ज्ञानी व्यक्ती निघून गेलेल्या वेळेचे, व्यक्तीचे आणि पैशाचे अवास्तव अवडंबर माजवत नाही. गेलेला क्षण आपला नसतोच. घरंगळणारे रेतीचे कण आणि तुटलेल्या मोत्याच्या माळेतून निसटणारे मोती कधी धरून ठेवता येत नाहीत. त्यामुळे तसा प्रयत्न करणे व्यर्थ आहे.

आयुष्य हे एक पुस्तक आहे असे गृहीत धरले तर उलटलेल्या पानाबद्दल आपण कधी विचार करत बसतो का? आणि तसे करत बसलो तर ते चुकीचे आहे. कारण आपण हातात धरलेल्या पानाचा मजकूर आपल्याला कळणारच नाही. चांगला वाचक वाचत असलेली ओळ न ओळ समरसून वाचतो. तसे केल्याने वाचनाची गोडी वाढते. तसेच पुढे काय घडणार ह्याची थोडीफार उत्सुकता जरूर असावी. पण पुढे काय घडणार हाच विचार वाचक सतत करत राहिला तर वाचत असलेल्या मजकुराचा संदर्भ अर्थहीन ठरेल. दूरवर क्षितिजाला टेकलेले आख्खे आभाळ पकडण्याच्या मागे न लागता पायाखाली असलेल्या जमिनीचा तुकडा सवडीने नीट न्याहाळावा. कदाचित त्यातच आपल्याला लकाकणाऱ्या मूठभर चांदण्या आढळतील आणि आपल्या मनाला लख्ख प्रकाश देतील. 

सध्याच्या परिस्थितीत समाजात आजूबाजूला नजर टाकली तर राग, द्वेष, असूया, सूड ह्या भावना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत हे लक्षात येते. जवळून विचार केला तर असे आढळून येते की भूतकाळात दुसऱ्यांनी केलेल्या चुकांना लोक सहसा विसरत नाहीत. घडून गेलेल्या वाईट गोष्टींना मनात घट्ट पकडून ठेवतात आणि मग यातूनच सूडाची भावना मूळ धरू लागते. आज समाजात वाढलेला हिंसाचार पाहता असे म्हणावेसे वाटते की लोकांच्या आपापसात असलेल्या गैरसमजुतीचे कारण कुठे तरी त्यांनी भूतकाळात केलेल्या चुकांमध्ये रुजलेले आढळते आणि तो भूतकाळ पुन्हा पुन्हा उकरून काढल्यामुळे जगणे कठीण होऊन बसते.


भूतकाळातील अमृतसदृश चांगल्या गोष्टी आठवून भविष्यात पाऊल टाकणे केव्हाही चांगले पण भूतकाळातील विषवृक्षाची बीजे खतपाणी घालून सांभाळली तर त्याचे फोफावणारे वृक्ष कधीतरी आपल्या विषारी फांद्यांनी आपलाच घात करतील, हे पक्के लक्षात ठेवावे.

वृद्ध लोकांचे उदाहरण घेतले तर 'आमच्या वेळी असे होते' असे म्हणून स्वतःचा भूतकाळ वारंवार चवीने मिटक्या मारत सांगणारी माणसे सहसा तरुण लोकांना आवडत नाहीत. काल काय घडले ते आजच्या लोकांना पुन्हा पुन्हा सांगत बसण्यात काय हशील? आताचे आयुष्य कसे गोड बनवता येईल ह्याचा विचार करा. तसेच भविष्याचा नकारात्मक विचार करून आपले सगळे आचार विचार नकारात्मक करणे व्यर्थ आहे. आजची तरुणपिढी वृद्धांचा आदर करते. त्यांच्या वाटा थोड्या निराळ्या आहेत पण त्यांना हवे ते लक्ष्य साध्य करून देणाऱ्या आहेत. तरुणांचे नवे विचार जाणून घेऊन त्यांच्या बरोबर जाण्याचा विचार वृद्धांनी जरूर करावा, निदान तसा प्रयत्न करावा. ह्यामुळे जुन्या - नव्या पिढीतील अंतर कमी व्हायला नक्कीच मदत होईल.

कुटुंबात पती - पत्नी एकमेकांच्या भूतकाळात रेंगाळत राहिले तरीही असे वागणे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवू शकते. मागील आठवणी दुःखद असतील तर दोघांनाही मानसिक त्रासातून जावे लागते. मुलांनाही त्याची झळ लागू शकते. त्यामुळे जे झाले ते झाले - रात गयी, बात गयी - हा दृष्टीकोन योग्य ठरतो. त्याच बरोबर भविष्याची अति काळजी मनुष्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकते. आरोग्याची, पैशाची अति काळजी माणसाचा वर्तमानकाळ पूर्णतः बिघडवू शकतात.

मुलांनी, तरुणांनी सुद्धा भविष्य काळात अति महत्त्वाकांक्षेच्या मागे धावून आपला वर्तमान बिघडवू नये. घरातील प्रत्येक व्यक्तीनी एकमेकांसाठी थोडा वेळ द्यावा. अधून मधून सहवासाचे सुगंधी अत्तर एकमेकांवर शिंपडावे; त्यामुळे अख्खे घर सुगंधित होईल. आपल्या आयुष्यावर भरभरून प्रेम करायला शिकायचे असेल तर वर्तमानात राहणे हितकारक आहे. म्हणून तर आपल्या महान ऋषीमुनींनी आपल्या प्रत्येक श्वासाला महत्त्व द्यायला सांगितले आहे. आत घेत असलेला प्रत्येक श्वास हा सकारात्मक विचारांनी पुरेपूर भरलेला असावा आणि बाहेर जाणारा श्वास नकारात्मक विचारांना हद्दपार करणारा असावा असे मला वाटते.


मोहना कारखानीस1 टिप्पणी:

  1. जीवनाकडे पाहण्यासाठी द्रुष्टीकोन कसा असावा हे केवळ व्रुद्धांना न सांगता तरुण पिढीला त्याच्या जबाबदारी ची जाणीव करून देऊन समतोल साधला आहे. फारच छान.

    उत्तर द्याहटवा