आजोबांची ओसरी भाग ४

आजोबांच्या ओसरीवरील गोष्ट ऑडिओ स्वरूपात ऐका येथे: 



मुलांनो, या महिन्याच्या सुरवातीला गणपती बाप्पा येऊन गेले. मग भरपूर मोदक खाल्ले कि नाही? आणि महाराष्ट्र मंडळाच्या गणपती उत्सवात तुमच्या पैकी कोणी कोणी नाच केलेत? खूप मजा केली असेल! बाप्पापुढे हात जोडून आपण नमस्कार करतो, तेव्हा किती शांत वाटते नां! बाप्पाला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. म्हणजेच आपल्यावर येणाऱ्या कुठल्याही संकटांना बाप्पा दूर पळवून लावतो. आपल्याला पूर्ण खात्री असते की गणपती बाप्पा आपले रक्षण करेल. टाळ झांजांच्या गजरात वाजत गाजत आरती होते. आपण सगळे नमस्कार केल्यानंतर प्रसाद खातो. मोदक तर असतोच, शिवाय पेढे, लाडू, अन मिठाया! अशी सगळी मजा संपते, आणि गणपती त्यांच्या गावाला परत जातात. आपण म्हणतो “बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” बाप्पा जरी परत गेले तरी त्यांनी दिलेले संकटरक्षक कवच आपल्या भोवती आहेच असा विश्वास देऊनच ते जातात. त्याच विश्वासाच्या जोरावर कोणत्याही अडचणीला आपण तोंड देतो. खरे की नाही?
विश्वास! केवढी प्रचंड ताकद असते या तीन अक्षरात! थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपण सगळीच कामे विश्वासावर करीत असतो. अनेक गोष्टी आपण काहीतरी, थोडीशीतरी खात्री असते म्हणून करत असतो. तुम्हाला नक्की माहीत असते की अभ्यास केला की चांगले मार्क्स मिळतील. आईने सांगितलेली कामे केली की आई कौतुक करेल. आपला चांगला मित्र आपली चुगली करणार नाही. हाच विश्वास. असे म्हटले तर वावगे नाही, की विश्वास आणि आशा या दोन शक्तींवर सारे जग चालत असते.

किंवा असेही म्हणता येईल की विश्वास आपल्या अंगात बळ आणतो. म्हणजे आपले इंजीन चालू राहावे यासाठी विश्वास हे इंधन असते. आशा म्हणजे दूर समोर दिसणारा हिरवा दिवा. तो हिरवा दिसत असतो म्हणून त्या दिशेने आपली गाडी सुरू राहते. कधी कधी मधले दिवे लाल देखील दिसतात. आपली गाडी आपोआपच हळू चालू लागते. आपण थांबायची तयारी करू लागतो. अशा वेळीस विश्वास सांगतो, मधले सिग्नल कधी लाल तर कधी हिरवे असे होतच रहाणार आहे. धोका असेल तर तू नक्कीच सावधपणे, सावकाश पुढे जा. योग्य वाटेल तेव्हा वेग घे. पण पुढे पुढे जात रहा. मी आहे. माझ्या बळावर तू तुझ्या लक्ष्यावर पोहोचणारच. तो शेवटच्या मुक्कामाचा हिरवा दिवा तुला बोलावतो आहे हे विसरू नकोस. विश्वास आपल्याला सांगतो “मी नेतो तुला लक्ष्यावर.” असे हे दोन मित्र ‘विश्वास’ आणि ‘आशा’ आपल्याला जे हवे ते साध्य करून देतात.

विश्वास हा आपल्याला ताकद देणारी शक्ती असते, त्यामुळे त्यामुळे योग्य व्यक्तीवरच नेहमी विश्वास ठेवावा. आधी आपण जे ऐकले असते, जे पाहिले असते त्यावरून आपल्याला कळते की हा मित्र नक्की आपल्याला हवी तेव्हा मदत करणार! काही मित्रांच्या बाबतीत असे आपल्याला वाटत नसते. कारण तसे अनुभव आलेले नसतात. आपले आईवडील काहीही झाले तरी आपल्या पाठीशी उभे रहाणार असा विश्वास आपल्याला असतो. कुठलेही संकट आले तरी बाप्पा ते दूर पळवून लावील हा विश्वास असतो. 

मित्रानो, यावरून एक छान गोष्ट आठवली. विश्वास कोणावर ठेवावा? जो आपल्याला नक्की मदत करू शकेल, संकटातून वाचवेल अशी मनात खात्री असते. एकदा एक मुलगी आणि तिचे बाबा एका अरुंद पुलाच्या तोंडाशी पोहचले. एकावेळी फक्त एकच माणूस उभा राहू शकेल एवढाच तो पूल रुंद होता. खाली नदी खूप वेगाने वाहत होती. मुलीचे बाबा पुढे होते आणि मुलगी त्यांच्या मागे अगदी त्यांना चिकटून उभी होती. 

बाबा मुलीला म्हणाले “बेटी मागून चालताना तू माझा हात पकडून ठेव म्हणजे तुला भिती वाटणार नाही.” 

मुलगी म्हणाली “नाही बाबा, तू माझा हात पकडून चाल.”

बाबा म्हणाले, “दोन्ही मध्ये काय फरक आहे? सारखेच तर आहे!”

मुलगी म्हणाली “मी जर तुझा हात पकडून चालले तर मधेच अचानक काही झाले, तर तुझा हात सोडून देउ शकते. पण तू जर माझा हात पकडून चालला तर काहीही झाले तरी तो सोडणार नाही याची खात्री आहे.”

त्या मुलीचा तिच्या बाबावर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास होता. नेहमी अशाच खात्रीच्या शक्तींवर विश्वास ठेवावा! 

ही झाली विश्वासाची कथा. कधी कधी असेही होते, की विश्वास असतो, पण काहीतरी होते अन विश्वास तुटला असे वाटते. अशा वेळी नीट व्यवस्थित विचारपूस केल्याशिवाय कोणी आपला विश्वासघात केला असे घाईघाईत मुळीच म्हणू नका. तुम्हाला ती लहान बाळाची गोष्ट माहीत असेल. बाळाची आई त्याला पाळण्यात झोपवून दूध आणायला बाहेर गेली होती. घरात कोणीच नव्हते, फक्त त्यांचा कुत्रा होता. आईने कुत्र्याला सांगितले, मी लगेच येते, तोपर्यंत तू बाळाचे रक्षण कर. अर्ध्या तासाने आई परत आली तेव्हा तिला कुत्रा दाराबाहेर बसलेला दिसला. त्याचे तोंड रक्ताने माखले होते. आईला भीती वाटली की बहुतेक कुत्रा तिच्या बाळाला चावला तर नाही नां! तिने काही विचार न करता एकदम कुत्र्याच्या पाठीत जवळ पडलेला दंडुका मारला आणि बाळाला बघायला आता धावली. तिला काय दिसले? बाळ पाळण्यात स्वस्थ झोपले होते आणि जमिनीवर एक साप मारून पडला होता. काय झाले ते तिच्या लगेच लक्षात आले. एक साप घरात शिरला असावा आणि त्याला कुत्र्याने मारून टाकले असावे. म्हणून कुत्र्याचे तोंड रक्ताने भरले होते. त्या आईला खूप वाईट वाटले की आपल्या कुत्र्यावर आपण विश्वास ठेवला होता. पण वेळ आली तेव्हा काहीही विचार न करता केवळ पहिले जे दिसले ते पाहून चुकीचा विचार केला. 

मित्रांनो विश्वास ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. विश्वास नेहमी चांगल्याच व्यक्तीवर ठेवावा. आणि महत्वाचे म्हणजे कधीही अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. 

चला, निरोप घ्यायची वेळ झाली. तुम्हाला आजच्या गोष्टी आवडल्या असतील असा विश्वास आहे! 


अरुण मनोहर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा