रुजवा

ठिकाण होते काझीरंगाचे जंगल. ब्रम्हपुत्रेच्या सान्निध्याची जाणीव करून देणारे तळी, ओहळ आणि जलप्रवाह, हिरवीगार झाडे, उंच उंच.. अगदी दहा बारा फूट उंच वाढलेले हत्ती गवत, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, पाण्यावरून, झाडांवरून वाहत आपल्यापर्यंत येणारा सुखद वारा, हे चित्र पूर्ण करण्यासाठीच जणू असावा तसा लवकर उगवलेला चंद्र. ते वातावरण कधीच विसरता न येणारे. आणि ह्या सगळ्या विलोभनीय दृश्यावर चरचरीत विद्रुप ओरखडा उमटवणारे माणसांचे जोरजोरात बोलण्या, ओरडण्या, हसण्याचे आवाज.

आसामातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे संरक्षित वनक्षेत्र जागतिक वारसा स्थानांपैकी एक. प्रवास आता सोपा

झाल्याने पर्यटकांनी गजबजलेले. जंगल सफारीला जाणाऱ्या लोकांना मॉलमध्ये फिरणे आणि जंगलात फिरणे ह्यातला

फरक माहिती नसला कि जे होते तेच इथेही आढळले.

आपण जंगलात आहोत. हे जंगल हत्ती, एकशिंगी गेंडे, हरणे, पाणम्हशी आणि विविध पक्ष्यांचे घर आहे. माणसांइतके ते सारे वायफळ वाचाळ नाही आहेत आणि त्यांना आवाजाची सवय नाही आहे. त्यांच्या घरी आपण आलो आहोत तर शांतपणे जंगल न्याहाळावे, जमले तर ती नीरवता मनात मुरवावी, हिरवाई मनात रुजवावी आणि निघून जावे. आपल्या येण्याने जंगलाला कमीतकमी उपद्रव होईल अशी काळजी घेत, आपली कोणत्याही प्रकारची खूण मागे न सोडता निघून जावे.

शिक्षणाने माणसे साक्षर बनतात पण सुसंस्कृत बनण्यासाठी मात्र एका सुजाण मनाची आवश्यकता असते. आमच्या जीप पाठोपाठ होत्या अनेक तरुण मुलामुलींच्या जीप्स. तारुण्यसुलभ उत्साह, त्या उत्साहाला काबूत न ठेवता येणारे अनिर्बंध मन आणि प्रचंड गुर्मी ह्यांनी भरलेल्या जीप्स. काही प्रौढ पर्यटक, वयाने वाढलेले पण समजूत न आलेले, त्यांचेही वागणे तसेच.

लाल,पिवळे भडक रंगाचे कपडे अंगावर आणि सतत आरडा ओरडा करत सेल्फीज चालू. आपल्या आवाजाने आजूबाजूचे प्राणी आणखीच बुजणार ह्याचे यत्किंचितही भान नाही.

वाटले कि जंगल साक्षरतेचे धडे गिरवल्याखेरीज पर्यटकांना जंगलात येऊ देता काम नये. प्राण्यांच्या डोळ्यांत खुपणार नाहीत असेच गडद काळपट हिरवे किंवा कोणत्याही मातकट रंगाचे कपडे असावेत. आपली हालचाल देखील आवश्यक तेवढीच असावी. आवाज तर शक्यतो करूच नाही. अंगावर कृत्रिम तीव्र सुगंध मारलेला नसावा. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जंगल निरीक्षणाला आलो आहोत ह्याचे भान असावे.

ह्यात समजायला काही कठीण आहे का? पण समजून घ्यायचेच नसेल तर त्याला कोण समजावणार? वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून तमीज नावाची गोष्ट फार दुर्मिळ होते आहे हे परत एकदा जाणवले.

त्या सगळ्या आरड्याओरड्याने फार अस्वस्थता आणि राग आला होता. तेवढ्यात दिसले हे झाड. तळ्यात बघत बसलेले. आजूबाजूच्या जगाकडे त्याचे लक्षच नव्हते. नसतातच सगळ्या गोष्टी लक्ष देण्याएवढ्या योग्यतेच्या. आपण आपले मन ढवळून टाकायची परवानगी का बरे त्यांना द्यावी? असेच ते सांगत होते.

मग वाटले, खरंच .. आपल्यालाही ह्या अप्रिय गोष्टी गाळून, नुसते हे जंगल, हे सुंदर वातावरण मनात भरून घेणे जमायला हवे. इथे आपण वारंवार येऊ शकणार नाही आहोत. मग आपली हि दुर्मिळ जंगलभेट काही लोकांच्या गैरवर्तणुकीमुळे वाया का घालवायची? त्या गोंगाट करणाऱ्या लोकांना जंगलात असेपर्यंत शांतता राखा असे एकदा आपण सांगितले आहेच. ह्यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही.हा विचार मनात आला आणि राग निवळत गेला. मन शांत होत गेले. त्या विलोभनीय वातावरणात विरघळत, रुजत गेले. 

काझीरंगा प्रसिद्ध आहे ते एकशिंगी गेंड्यांची सर्वात जास्त संख्या असलेले अभयारण्य म्हणून. जंगलात जीपने फिरताना खूप एकशिंगी गेंडे दिसले.


पण एक काळ असा होता कि एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या जंगलातील प्राण्यांची संख्या अगदी कमी झाली होती. ते वर्ष होते एकोणिसशे चार.भारताचे तत्कालीन व्हॉईसराय कर्झन आपल्या पत्नीसह काझीरंगाला आले होते. तिने काझीरंगाविषयी खूप ऐकले होते पण प्रत्यक्षात त्यांना एकही गेंडा दिसला नाही. तेव्हा तिने आपल्या पतीकडे गेंड्याच्या संरक्षणासाठी तात्काळ काही उपाययोजना करण्याची मागणी केली. परिणामस्वरूप एकोणीसशे पाच मध्ये काझीरंगा हे प्रस्तावित संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तरीपण शिकारीवर बंदी यायला मात्र एकोणीसशे छत्तीस उजाडले.

काझीरंगा नावाविषयी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात त्यातील एक म्हणजे रंगा नावाची मुलगी शेजारच्या गावातील काझी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली.घरच्यांना हा विवाह पसंत नव्हता. दोघे जंगलात पळून गेले आणि मग परत कधीच कोणाला दिसले नाहीत. म्हणून म्हणे हे काझीरंगा!

ह्या लेखमालिकेतील पहिल्या लेखात अशीच गोष्ट होती कोरियामधील संगमबुरीतील हंगम आणि मलजातची. एका अतर्क्य योगायोगाने आज हि लेखमालिका संपवताना परत आपण रंगा आणि काझीच्या गोष्टीपाशी आहोत.

ह्या शिशिर ऋतुसोबत संपेल हे ऋतुचक्र, चैत्रापासून येणाऱ्या वसंतात नवे ऋतुचक्र सुरु होईल. सोबतच संपेल हि लेखमालिका ‘स्वगत’ नावाची.आपण हि लेखमालिका आवर्जून वाचली, उदारपणे कौतुक केलेत त्याबद्दल मनःपूर्वक आभार. नव्या वर्षात प्रवेश करताना सोबतीला देते आहे कविता,

नात्यांमधून रुजताना” - अरुणा ढेरे

उन्हापावसाच्या हातांनी वाढतात
अंगणातली रोपटी चहूकडून
तसे आपण रुजत जातो नात्यांमधून. 

आयुष्य वाट देते कि अडवते
असा प्रश्न नसतो सहसा आपल्यासाठी
ते असते आपल्यापुरते - जशी माती.

माणसाने माणसाला दिलेला विश्वास,
तसे झऱ्याचे उगम भेटतात अंधारात
आणि मुळे ओलावतात.

सापटीत दडलेला नाग निसटावा
तशी कोरडी रखरखही कधी येते
हृदयाच्या आसपास सारे उजाड होते.
पण नव्या उमेदीची पानफुट आठवू नये

अशा वैराण काळातही
आत हलत असते एक धमनी हिरवीशी
नात्यांमधून रुजताना आपण दाखवलेल्या मनःपूर्वकतेची.
वृंदा टिळक २ टिप्पण्या: