मराठी भाषेतला राग - मोहना कारखानीस

मराठी भाषा!

किती गमतीशीर आहे बघा. ‘राग’ म्हटले की दोन अर्थ होतात. एक म्हणजे माणसाच्या नाकावर बसलेला राग आणि दुसरा म्हणजे गाण्यातील गायकीचा राग. दोन्ही रागांत मला एक साम्य आढळले. ते म्हणजे दोन्ही रागांच्या प्रकट होण्याच्या अनेक तऱ्हा आहेत. त्या त्या रागांना त्यांच्या स्वरूपानुसार आपण विशिष्ट नावे दिली आहेत. 

गायकीच्या रागांच्या प्रकारांकडे आपण याक्षणी वळण्याचे कारण नाही पण आपला मुख्य विषय ‘माणसाच्या मनात राहणाऱ्या रागाचा’असल्यामुळे आपण त्याच्याकडेच आपला मोर्चा वळवूया.

नाकाच्या शेंड्यावर बसलेला हलकाफुलका ‘रुसवा‘ राग,प्रियकर किंवा प्रेयसीला मनधरणी करायला लावणारा ‘प्रेमी’राग,रुसलेल्या बालकाचा ‘लडिवाळ’राग, तळपायाची आग मस्तकाला नेणारा ‘फुणफुणता’ राग, भयंकर संहार करणारा ‘विध्वंसक’ राग असे टप्प्याटप्प्याने वरची पायरी चढणारे रागाचे अनेक प्रकार सांगता येतील. 

रागाला आपण अगदी जन्मल्याबरोबर ‘बरोबर’ घेऊन येतो.

‘मी आलो’आता लक्ष द्या माझ्याकडे असे ठणकावून सांगत बाळ रागाने लाल लाल होत किंचाळायला लागते. नवजात शिशुला त्याच्या आईपासून दूर नेले आणि भुकेच्या वेळेला त्याचे प्रिय दुग्धपान मिळाले नाही की कसा राग येतो त्या बाळाला? त्याचे ते टाहो फोडून रडणे म्हणजे त्याचा जन्मसिद्ध हक्क त्याला वेळेवर बजावून न दिल्यामुळे ‘आलेल्या रागाचे’ते जीव तोडून केलेले प्रदर्शन असते.

नवजात शिशूपासून माणसाची राग आळवायला सुरुवात होते ती अगदी ‘म्हातारा इतुका नि अवघे पाऊणशे वयोमान’च नाही तर जोपर्यंत माणसातील ‘मी’जिवंत आहे तोपर्यंत ती राग आळवण्याची चढाओढ सुरु राहते. त्यामानाने शिशूचा राग हा खरेच शिशु असतो. पण ...जसे हे शिशु वयाची पायरी चढायला लागते तसे ह्या रागाचे रंग,रूप बदलायला लागते कधी ते सौम्य राहते तर कधी भयंकर होत जाते. 

माणसाच्या मनातील राग हा लिंग,वय,जात,धर्म,देश यात कसलाही भेद करीत नाही. आपल्या पवित्र भारतभूमीत याने ऋषी मुनींना आणि देवांनाही सोडले नाही. त्यांनी रागावून दिलेल्या भयंकर शापवाणीने किती अनर्थ घडू शकतो हे आपल्याला माहीत आहे. 

व्यक्तीच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की त्या व्यक्तीच्या मनात या ‘रागाचा’शिरकाव होतो.आपल्या कुटुंबात वेगवेगळ्या वयाच्या,नात्याच्या लोकांमध्ये हा राग ‘त्याच्या’मर्जीनुसार हक्क गाजवून मुक्काम ठोकून बसतो. फार लहरी आहे हा राग. जेव्हा तेव्हा याच्या लहरीनुसार येतो किंवा जातो. बहुतेक येतोच. जसे याचे येणे तसेच त्याचे जाणे अनप्रेडिक्टेबल.भारतातील हवामानखात्याचा अंदाजही त्या मानाने खूप बरा! 

माणसाचा ‘राग’कोणतेही मोजमाप लावून मोजता येत नाही.

“तू माझे ऐकले नाहीस तर मला मोठ्ठा राग येईल हा !”असे एखाद्या दादाने त्याच्या चिमुरड्या बहिणीला सांगणे आणि समाजातील गुंड ‘दादाने’एखाद्या सामान्य नागरिकाला सांगणे यातील ‘मोठ्ठा’ चा अर्थ खरा किती मोठठा आणि त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना मनातच केलेली बरी. या रागाचे परत जाणे जितके लांबते ना तितके ‘सगळे कठीण कठीण कठीण किती’म्हणणे भाग पडायला लागते. 

अनेकदा हा ज्या व्यक्तीकडे मुक्काम ठोकून बसलेला असतो त्या व्यक्तीला याची खबरबात सुद्धा नसते. त्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांना मात्र हा राग अगदी ‘सळो की पळो’ करून सोडतो.जरासुद्धा थांगपत्ता लागून न देता हा स्वतः लपून राहतोच आणि स्वतः बरोबर मद,मोह,लोभ,असूया,ईर्षा,द्वेष,सूड अशी अनेक ब्लॅक लिस्ट मधली मंडळी भाड्याने घेऊन घेतो आणि ही मंडळी तात्पुरती भाडेकरू न राहता हळूहळू कायमचा मालकी हक्क गाजवू लागली की मात्र खऱ्या अर्थाने घोर कलियुगातील महाभारत ज्याच्या त्याच्या आयुष्यात सुरु होते.

महाभारतातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. महाभारतातील गीता आपल्याला शिकवते,

‘कर्म करीत राहा’ परिणामांची चिंता करू नका. हे सगळे आपल्याला माहीत असते पण म्हणतात ना,

‘कळते पण वळत नाही’. आपल्या इच्छा,अपेक्षा सफल झाल्या नाहीत तर मात्र लगेच आपली चिडचिड वाढते. विशेषतः आपल्या जवळच्या माणसाकडून, पालकांच्या अपत्याकडून ,नवऱ्याच्या पत्नीकडून किंवा कधी पत्नी कडून पतीबद्दलच्या अपेक्षा कधी जन्म घेतात आणि वाढत जातात हे कोणालाच कळत नाही आणि या वाढत्या इच्छांची ,अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर काठावर निशाणा लावून बसलेला राग बरोब्बर आपले कार्य साधून धुमाकूळ घालायला सुरुवात करतो.

साधे उदाहरण घ्यायचे झाले तर सासूने (किंवा आईने) सुनेला(किंवा मुलीला) व्रत वैकल्ये करायला सांगितली, उपास तापास करायला सांगितले आणि बदलत्या काळाप्रमाणे नोकरी,करिअर करणाऱ्या सुनेने नकार दिला की .... झाले! 

सासूबाईंचा (किंवा आईचा) पारा सरसर वरती चढायला लागतो. सासूबाईंना भरपूर तेल तूप घालून स्वयंपाक करायची आवड असेल आणि सूनबाई भलत्याच डायट कॉन्शस असतील तर ‘रागोबा’ह्या घरात स्वतः खुदुखुदू हसत त्या घरातील व्यक्तींना मात्र रडवतील. याउलट सूनबाईचा स्वभाव असेल तरी रागाचे येणे ठरलेले. हे झाले कुटुंबातील आपल्या ताई,अक्का,मावशी यांचे उदाहरण. आपले भाऊ,दादा,मामा,काका यांच्या बाबतीत काही वेगळी कथा नसते. कामाच्या ठिकाणी,दुकानात , बाजारात, बस स्टॉपवर ,ट्रेन मध्ये (MRT ),रस्त्यावर,गर्दीत मनासारखे घडले नाही की या रागाचे अनेक प्रकार धुमाकूळ घालायला सुरुवात करतात.याचे परिणाम काय ? तर हमरीतुमरी,वादावादी, कलह, भांडणे आणि त्याची पुढली पायरी म्हणजे मारामारी आणि नंतर चक्क एकमेकांचे जीव घेणे. होय. या सगळ्या भयंकर परिणामांचे मूळ कारण माणसाला येणाऱ्या रागात आहे. लहान मुलांवरील ,स्त्रियांवरील अत्याचार,शारीरिक किंवा मानसिक बलात्कार या सगळ्याला कारणीभूत आहे माणसाला येणार टोकाचा राग. 

समाजात चाललेल्या भयंकर घटनांकडे एक नजर टाकली तर मनातील रागाला,भावनांना वेळीच बाहेर यायला संधी न मिळाल्यामुळे लहानपणापासून न्यूनगंड, डिप्रेशनला बळी पडून किडक्या मनोवृत्तीची विकृत तरुण पिढी तयार होते. 

अशी व्यक्ती समाजाला तर घातक असतेच पण ती स्वतःही अनेक रोगांची शिकार बनते. राग माणसाचे मन ,शरीर पोखरत जातो. डायबेटीस,ब्लडप्रेशर,हृदयाची दुखणी ही सततच्या मानसिक दबावाने निर्माण झालेली विकतची दुखणी आहेत. 

हे सगळे वाचून राग नावाच्या ह्या अजब रसायनाचा भयंकर राग यायला लागतो नाही? म्हणूनच मंडळी, या रागाला आवरणे फार म्हणजे फारच गरजेचे आहे. त्यासाठी स्वस्थ बसा,दीर्घ श्वास घ्या .आत्मविश्वास वाढवा.

पहिले आपल्या मनात डोकावून बघा. समोरच्या व्यक्तीच्या दोषांकडे बोट दाखवताना,तीन बोटे आपल्याकडे वळलेली असतात हे वेळीच लक्षात येणे गरजेचे आणि महत्वाचे आहे. नाही का?

INSECURITY आत्मविश्वासाची कमतरता, कमकुवत मन ,रागाला आमंत्रण देतात. बारीक सारीक गोष्टीत मी,माझे जरा सोडून देऊया. सोशल साईटवर माझ्या संदेशाला लाईक दिले नाही म्हणून , प्रतिक्रिया दिली नाही अशा क्षुल्लक कारणासाठी एखाद्यावर किंवा एखादीवर रागावणे किती योग्य आहे ?आपल्याला दुसऱ्याच्या जागी ठेवून पाहीले तरी रागाचा रंग पालटतो . तेव्हा... देणे वाढवू या आणि घेणे कमी करूया . या प्रेमाच्या देवाणघेवाणीसाठी रागाला कायमचा ‘थांब जरासा’म्हणूया. आपल्या आयुष्यात बाराही महिने संक्रांत साजरी करीत गोड बोलाचे तिळगुळ सर्वाना वाटुया. 


मोहना कारखानीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा