साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट. एका भारतीय संगीताच्या कार्यक्रमाला गेले होते. मी स्वत: लुटूपुटूची हिंदी गाणी गाते; आणि हा मासिक कार्यक्रम अश्या हौशी, नवशी आणि गवशी कलाकारांसाठीच एक छोटसं व्यासपीठ म्हणा. तेथे एक असेच स्वतः:ला वय वाढलं म्हणून बुद्धिमान आणि कुणाचाही पाणउतारा करायचा हक्क समजणारे गृहस्थ चुकून मला भिडले. त्या ठिकाणी अर्थातच मला संताप आला, आणि मी तो संताप लपवण्याची तसदी घेतली नाही. बहुतेक मंडळी या गृहस्थाच्या वागण्याने दुखावून वगैरे एकतर कार्यक्रमाला येणं सोडतात किंवा मग उगा हसरा चेहरा करून काय घडलं याचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न, वा लांगुलचालन करतात। मी यातलं एकही न करता तेथे एका थंड रागात उभी राहिले. आत बाहेर एकच भावना, त्या मूर्ख माणसाबद्दल आणि घडलेल्या घटनेबद्दल माझा स्वतः:चा जो काही प्रतिसाद होता तो लपवण्याची कोणतीही तसदी न घेता मी ठाम उभी राहिले. अर्थातच त्याला कुठे तोंड लपवू असं झालं आणि बरीच सारवा सारवी करण्याचा प्रयत्न तेथे झाला. त्या ठिकाणी माझी शक्ती होती मला आलेला राग ! हो रागच !
एक निळसर शेंदरी पारदर्शक लवलवती जिवंत आगीची ज्वाळा असते ना? तसा वाटतो मला "राग". सगळ्यात जास्त भावतं मला ते त्या ज्वाळेचं पारदर्शित्व ! अगदी आरपार स्वछ !
या पृथ्वी तलावरच्या जिवंत प्राणिमात्रांना असणाऱ्या काही मूळ, आदिम भावनांपैकी राग ही एक भावना. हे नशीब की प्रेम, वात्सल्य, कणव, या भावनांचे जसे उदात्तीकरण झालेय ते या भावनेच्या नशिबी नाही. उलट जो तो उठतो आणि रागावर ताबा कसा ठेवावा, राग कसा वाईट, रागाने तुमचे स्वतःचे कसे नुकसान होते याबद्दल हे भलं लंबचौड भाषण ठोकायला तयार असतो. खरं सांगायचं तर ज्या कुणी "राग" ही भावना "काम, मत्सर, लोभ" ( आता या लोभाबद्दल पण असाच एक लेख होऊ शकतो पण ते पुन्हा कधी) अश्या कमी प्रतीच्या भावनांमध्ये नेऊन ठेवली त्याचाच मला राग येतो.
मला खरंच एक प्रश्न पडतो आपण सगळेच या भाव भावनांनी बनलेले असताना त्यातल्या काहीच गोष्टी आपण वाईट कश्या काय ठरवतो?
आता जसे अति प्रेम, अति वात्सल्य, घातक; तसाच बापडा अति राग सुद्धा घातक, पण नाही, जो तो उठतो आणि या अतिशय आदिम भावनेला नाव ठेवायला सरसावतो. या रागाने कसं नुकसान होतं, तो कसा हानिकारक याची हे S S लंबीचौडी यादी तुमच्या तोंडावर फेकली जाते.
मला विचाराल तर राग हे सर्व शक्तीचं बलस्थान मानेन मी. जेव्हां कधी तुम्ही प्रस्थापित रचनेला "का?" हा प्रश्न विचारता तेंव्हा तो प्रश्न विचारायचं बळ तुम्हाला या रागानेच मिळतं . कोणत्याही अत्याचाराच्या विरुद्ध उभे ठाकायचा कणा या रागानेच ताठरतो. कोणताही दुर्बळ स्वतःचं रक्षण करायला असमर्थ ठरतो तो रागा ऐवजी भीतीने त्याचा ताबा घेतल्यानेच. अगदी साधी मांजर पहा. एव्हढास्सा दीड दोन वीत उंचीचा जीव हा, पण कुणी कुरापत काढावी याची ! अंग फुलवून असा फिसकारेल, असे डोळे फुलून येतील की समोरच्याची भीतीने गाळण उडेल.
आता काही व्यक्ती या विशेषतः: घरामध्ये किंवा छोट्याश्या मर्यादित वर्तुळात फार रागीट वगैरे म्हणून प्रसिद्ध असतात. मला विचाराल तर हे लोक निव्वळ ढोंगी असतात. हे रागीट नसतात; हे रागाचं ढोंग रचून सर्वांना आपल्या तालावर नाचवायचा प्रयत्न करत असतात. स्वतः:च्या मर्जीविरुद्ध काही घडू नये किंवा आपलं वर्चस्व राखण्यासाठी हे रागाचं सोंग आणतात. असल्या लबाड भोंदू समोर जर तेव्हढ्याच ताठरपणे अगदी घरातलं चिमुरडं पोर जरी उभारलं तरी यांची ही ढोंगाची नांगी पडते आणि मग हे उगा कौतुकाने लाडे लाडे बोलायला सुरु करतात. अश्या घरात एखादी स्वाभिमानी सून प्रवेशली की मग हे तेथे सुद्धा हार मानतात. मुळात हे लोक, 'राग' या अस्सल भावनेचा असा स्वतः:च्या फायद्यासाठी अपमान करतात असा माझं ठाम मत आहे.
मला सांगा तुम्ही रस्त्यावरून जात आहात, बरोबर तुमची घरातली कोणतीही स्त्री; आई, बहीण , बायको आहे आणि कुणी हलकट मवाली त्यांच्याशी विचित्र वागायला सुरु करतो. कोणती भावना तुमच्या मनात सर्वात पहिल्यांदा उफाळते? रागच ना? की... अरे रे हा वाया गेलेला माणूस... म्हणून त्याच्या बद्दल दैवी कणव येते तुमच्या मनात? एक तर तुम्हाला राग येतो किंवा जर तुम्ही कमजोर असाल तर तुम्ही खाली मान घालून तेथून त्या स्त्रीसह निघून जायचा प्रयत्न करता, आणि वर त्यावर पांघरुण घालण्यासाठी "मूर्खांच्या कोण नादी लागणार? " असं बिळबिळीत शेवाळ त्यावर ओढणार. अश्या वेळी तुम्ही हे सहन करून त्या मवाल्याला पुढच्या असल्या घृणास्पद वर्तनाला एक प्रकारे खत पाणी घालता. समाजातल्या कोणत्याही घाणीसाठी त्याविरुद्ध येणारा राग हे एकच अस्सल अवजार आहे. पहिला राग आला पाहिजे तरच तुम्ही त्यावर उपाय शोधता. बाकी वाईट वाटणे, घृणा वाटणे हे सारं तुम्हाला त्या परिस्थिती पासून दूर जाण्यासाठी प्रवृत्त करतं. पण राग? रागाने तुम्ही या परिस्थितीवर हल्ला करता, यावर ताबडतोब निषेध व्यक्त करता आणि मग ती जी काही परिस्थिती असते ती बदलण्याची प्रक्रिया तुमच्या मनात सुरु होते.
आता ही परिस्थिती बदलण्यासाठी मनात पहिलं बीज रुजावे लागते ते रागाचं बरं का ! मग त्याला मुळे फुटतात ती विचारांची, कोवळी नाजूक पालवी फुटते ती आचारांची आणि मग बघता बघता त्याचा एक वृक्ष बनून जातो.
उदाहरणच द्यायचं झालं तर घ्या माझ्या शिवबाचं ! मुस्लिम समाजाने पोखरून काढलेल्या सह्याद्रीच्या मातीची घालमेल त्याला बघवेना ! वयाच्या चौदाव्या वर्षी एव्हढा पाचपोच नसतो कोणत्याही पोराला, असतो तो फक्त राग ! आपणच नाही का म्हणत घरातली पोरं मोठी व्हायला लागली म्हणजे उगा राग राग करतात? शिवबा तरी कोणी वेगळा होता का? अहो पोरच होतं ते चौदा पंधरा वर्षाचं. मनात पौगंडावस्थेतलं बंड, आणि भवतालची चीड आणणारी, उद्वेगजनक परिस्थिती. मातीचे, मातांचे आक्रोश ! त्या रागाचं रूपांतर पराक्रमात झालं पुढे, पण पहिली ठिणगी पडली ती रागाच्या भावनेचीच ! हा राग पुढे सुद्धा वेळोवेळी दिसतो आपलयाला शिवचरित्रात। रांझ्याच्या पाटलाचा चौकडा करायचा असू दे , की औरंग्याच्या दरबारात सोबतच्या धाकल्या लेकराची आणि परिणामांची पर्वा न करता असू दे, हा राग आपल्याला ठायी ठायी दिसतो.
असाच राग मग पुढे २००, २५० वर्षांनी स्वातंत्र्य लढ्यात फुलला. कधी गीतातून उमटला , कधी बंदुकीच्या गोळीतून निसटला तर कधी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव होऊन फासावर लटकला. एक निळसर भगवी ज्योत तेवत राहिली या रागाची १८५७ ते १९४७ पर्यंत. आख्खा भारत धुमसत होता या रागात. आज भारत भू स्वतंत्र आहे ती या रागीट व्यक्तींमुळेच ! ढोंगी, मतलबी लोक स्वतः:ला झळ न लागू देता जेव्हां स्वत्व गहाण टाकून गुलामीतच धन्यता मानत होते तेंव्हा "कदम कदम बढाए जा " म्हणून लोकात आवेश, त्वेष जागवणारा एक रागस्वरूप अश्याच ढोंगी लोकांचा बळी ठरला. स्वच्छ, पारदर्शी राग झंझावात उठवून गेला, दिवसेंदिवस तुरुंगात सडला, तुरंगाच्या भिंतींवर काव्य रुपी उमटला आणि ढोंग मात्र कावेबाजपणे सारं श्रेय लाटून गेलं !
अशीच रागाची धगधगती ज्वाला पाठीशी दत्तक पुत्र बांधून एकटी लढली. वीस सैनिकांच्या घेऱ्यात धगधगत खाक झाली।
मान्य आहे मला; राग तुम्हाला स्वतः:ला जाळतो पण अश्या निस्सीम रागापाठी असते एक प्रचंड वेदना ! राग कधी द्वेषातून असूयेतून लोभातून नाही उद्भवत. राग जन्मतो तो वेदनेतून, काळजीतून विनाकारण अपमानातून.
Fight or flight मधली कोणती भावना उच्च वाटते तुम्हाला? पळपुटेपणा? हां, जीव नक्की वाचेल तुमचा, तुम्हाला घाबरलेले पाहून तुमचा बलात्कार सुद्धा होईल आणि तुम्ही रात्र रात्र जागून स्वतः:ला आरशात पाहताना शरमेने काळे ठिक्कर पडून जाल, पण तुम्ही जर fight निवडाल तर मेलात तरी तुमचा आत्मा शुभ्र रंगात धगधगत राहील, ज्या कुणाविरुद्ध तुम्ही उभे ठाकाल तो त्यापुढे असलं कृत्य करताना दहादा विचार करेल.
तर असा हा भावनांच्या साम्राज्याचा अनभिषिक्त पण गैरसमजुतीने घेरलेला राजा, "राग" ! मला अतिशय भावणारा, शिवशम्भोच रूप ल्यायलेला , वेळोवेळी विषाचा प्याला प्यायलेला आणि तरीही या पृथीतलावरच्या बलदंड प्राणीमात्रात वास करणारा, नागाचा फणा बनून उंचावलेला राग !
अपर्णा कांगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा