समर्थ

ऋतुगंधचे लेख लिहिण्याबद्दलचे आवाहन बहिणाबाईंनी मला पाठवले आणि लिही असा आदेश दिला. वेळ नाही ही सबब सांगून पाहिली पण परत आज स्मरणपोस्ट पाहिली, आणि म्हटलं लिहून बघू या जमलं तर जमलं. खूप धावाधाव सुरू असताना जितके जमेल तेवढे लिहावे. 

तर या अंकाची केंद्रकल्पना राग ही भावना आहे, त्यामुळे त्यादिशेने विचार सुरू झाले. आधी कदाचित बाकी रिपूंबिषयी लिहिले गेले असावे. खरेतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या भावनांपैकी राग ही भावना वेगळी आहे असे मला वाटते. तुम्ही म्हणाल हे हे.. हे काय विधान झालं? वेगळीच आहे. पण तसं नाही मला असे म्हणायचे आहे की राग ही एकच भावना अशी आहे की जी बाकीच्या कुठल्या तरी भावनेशी निगडीत असते. किंवा त्यातून जन्म घेते. म्हणजे बघा हं काही कारण नाही पण मी चिडले असे होते का? तर नाही. मग राग का येतो? तर माझ्या अहं ला कोणीतरी धक्का लावला तर येतो. मद हा जो रिपु आहे त्याला कोणी आव्हान दिले की मला राग येतो. त्यावेळी राग मद ह्या भावनेशी निगडीत असतो. मला एखाद्याचा मत्सर वाटायला लागतो आणि मग त्यातूनच त्या व्यक्तीविषयी राग निर्माण होतो. मला एखाद्या गोष्टीचा मोह होतो, ती गोष्ट मिळाली नाही की राग येतो. मग आपण एकतर्फी प्रेमातून झालेले हल्ले बघतो. खरेतर मोहातून झालेला हल्ला असे म्हटले पाहिजे. कारण ते प्रेम नसतेच. पण आपल्याला भावनांचे पृथ्थकरण करायला शिकवलेच जात नाही. राग का निर्माण झाला हे शोधले तर त्याच्या मुळाशी बाकी पाच भावनांपैकी कोणती तरी भावना असते. म्हणजेच राग हा बाकी भावनांवर अवलंबून आहे. 

राग पटकन व्यक्त होतो किंबहुना आपल्या समाजात बाकी भावनांपेक्षा राग हा जास्त प्रमाणात व्यक्त केला जातो. याचे कारण आपण लहानपणापासून हीच भावना सहज व्यक्त होताना पाहिलेली असते. प्रेम आदर आनंद हर्ष या भावना खरेतर वारंवार व्यक्त झाल्या पाहिजेत. पण त्या व्यक्त करणे बरेच जणांना जमत नाही पण राग सहज व्यक्त केला जातो. आपल्या सिनेमांनीही angry young man ह्या इमेजला मोठे केले. राग वाईटच असतो असे मुळीच नाही. किंबहुना आपण जरी या भावनांना षड् रिपु म्हणत असलो तरी त्या नसत्या तर आयुष्य निरस, रटाळ झाले असते,नाही का? राग ही काही प्रमाणात आला पाहिजे. त्याचा उपयोग करून तुम्ही योग्य मार्ग निवडू शकता.

पण अती तिथे माती ही उक्ती इथेही लागू आहे. रागावर नियंत्रण न राहणे हे चूकच आहे. राग किंवा क्रोध इतका महत्वाचा का मानला गेला असावा? की ह्यावर नियंत्रण ठेवा असे सांगितले जाते! अगदी महाभारत काळापासून सर्व युध्दांचे मूळ क्रोधच आहे असे लक्षात येते. सगळेच रिपु आपल्या निरनिराळ्या अवयवांवर आपल्या नकळत परिणाम करत असतात. रागाचे तर दृश्य परिणाम ही दिसतात. रागावले की चेहरा लालबुंद होतो, ब्लडप्रेशर वाढते, अंग थरथरायला लागते, विचारांवरचे नियंत्रण हरवते. इत्यादी. राग समोरच्या माणसापेक्षा स्वत:लाच जास्त हानीकारक असतो. क्वांटम फिजिक्सच्या Law of vibrations आणि Law of attraction च्या नियमानुसार तुम्ही जे प्रक्षेपित करता तेच तुमच्या कडे परत येते. यावर मी तासभरही बोलू शकते. किंबहुना शाळांमध्ये संधी मिळाली की बोलतेच. शिव्या देऊ नये असे आपली संस्कृती सांगते. त्यामागचे शास्त्रीय कारण क्वांटम फिजिक्स सांगते. 

असे म्हटले जाते की तुम्ही दुःखी असाल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका, खूप आनंदी असाल त्याभरात कोणालाही शब्द देऊ नका, आणि रागावलेले असाल तेव्हा बोलू नका. राग नंतर ओसरतो पण बोललेले शब्द कायमची इजा करून जातात. राग आला की दहा अंक मोजायला सांगितले जाते ते याचं साठी. मौन हे रागावर नियंत्रण मिळवण्याचे सर्वात उत्तम साधन आहे. ध्यानधारणा यामुळेही रागावर नियंत्रण मिळवतां येते. पण मन शांत असेल तेव्हाच ध्यान होऊ शकते. श्वासावर नियंत्रण हा सर्वात प्रभावी उपाय आहे असे मला वाटते. आपल्या शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत. त्यातल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या श्वसनाशी संबंधित आहेत. त्याचा अभ्यास करून नियंत्रण मिळवतां आले तर केवळ भावनाच नाही तर अनेक रोगांवरही नियंत्रण मिळवतां येते असे प्राचीन शास्त्र सांगते.

तर रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर बाकी भावना आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. मन:शक्तीविषयी खूप लिहिण्यासारखे आहे. पण शब्दमर्यादा लक्षात घेता थांबते. जाताजाता या रिपुंविषयी एक माहिती सांगते जी मला खूप आवडते.

षड् रिपु- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर
या सहांना धारण करणारा- साधारण
या सहांना मान्य करणारा- सामान्य
या सहांना धाकात ठेवणारा- साधक
या सहांना अधू करणारा- साधू
या सहांचा अंत करणारा- संत
आणि
या सहांचा अर्थ समजून आत्मोन्नतीसाठी प्रयत्न करतो तो समर्थ. 

प्रवास मोठा आहे नाही? पण आपल्याला सर्वांनाच तो करायचाय. त्यादिशेने प्रयत्न सुरू ठेऊ या. बाकी गुरूदेव काळजी घेण्यास समर्थ आहेतच. 

शुभंभवतु.


गौरी शिकारपूर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा