कैफीयत

सकाळी सकाळीच मला जाग आली ती एका छानशा आणि सुकोमल स्वप्नामुळे. जगण्याशी दोन हात करताना जीव अगदी मेटाकुटीला येत होता अशा वेळी तर अशी मोहक स्वप्नेच जगण्याचा आधार बनतात. आपले आयुष्य साजरे करायचे ते अशा सप्नांच्या दुनियेतच! अशीही मनाला एक प्रकारची सवयच लागून जाते. त्याला कोण काय करणार मलाही तीच सवय जडलेली! या स्वप्नांपैकी काहीच स्वप्ने साकार होणार आणि बरीचशी अडगळीत जाणार हे तर ठरलेलेच असते ना !त्याचीहीमग सवय होऊन जाते. पण म्हणून स्वप्ने बघूच नयेत असे कोणी सांगितले आहे ?

असेच एकदा स्वप्न पाहिले होते ,आपला जीवनाचा जोडीदार आपणच निवडण्याचे.सांगायची गोष्ट अशी की ते स्वप्न शतश: पूर्ण झाले. आता थोडा नाही खरे तर खूपच विरोध सहन करावा लागला मला त्यासाठी ,ते असो म्हणा पण स्वप्नातला राजकुमार तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला अशा परिस्थितीत होणाऱ्या विरोधाशी दोन हात करण्याची तयारी ठेवावीच लागते ना! आणि असे झाल्यावर तर खरे तर आपण जे काय हासील केलंय त्याची लज्जत दुपटीने वाढल्यासारखेही वाटते .मी याचा तुडुंबअनुभव घेतला आहे बर का.....आज एका अतिशय कर्तुत्ववान जोडीदाराबरोबर माझा संसार अगदी सुखाचा चालला आहे. दिवस किती भराभर उलटून जातात ! दोन तीन वर्षे आनांदात्त गेली . गेली तीन वर्षे या सुखाची लज्जत चाखल्यावर आता आपल्या या सुंदरशा घरकुलात तिसरा कोणी पाहुणा यावा हे आमच्या मनाला वाटणे खूपच स्वाभाविक आहेना ! तसेच हल्ली माझ्या मनालाही वाटू लागले आहे.

म्हणून तर नसेल मला पडले हे स्वप्न !सकाळी सकाळी साखर झोपेत पडलेली स्वप्ने खरी होतात म्हणतात ! माझ्या मनाला वाटलं हे ही स्वप्न खरे होऊ दे....कसले होते हे स्वप्न ! कोणत्याही मातृत्वाची आस लागलेल्या बाईच्या मनाला सुखावणारे ते स्वप्न होते.त्या स्वप्नात तिला त्या लहानग्या जीवाने हाक दिली होती, ” येऊ मी तुझ्या उदरात ? घेऊ जन्म मी तुझ्या पोटी? “ किती माधुर्य होते त्या विचारण्यात! किती निरागसता होती ,मुग्धता होती. एखाद्या कलिकेची नितळता होती ,निर्मळता होती. मी तिला आश्चर्य वाटून विचारले , “ अग ! अशी का विचारते आहेस ? तू हवी आहेस ना ग आम्हाला ! तुझे स्वागतच आहे तू आलीस तर ! “ ती काहीशी हिरमुसली होऊन म्हणाली ,” नाही ग ,काही बाही ऐकलंआहे.आजकाल तुम्हाला मुली जन्माला घालणे जीवावर येतंय म्हणे ! जन्माच्या आधीच विध्वंस चाललाय म्हणे ! म्हणून जीव धास्तावातोय,बाकी काही नाही.” माझे डोळे पाणावले.मी तिला म्हटले ,”नाही ग नाही ,तसे काही नाही, आमच्या घरी तुझे स्वागतच आहे.मनापासून स्वागत आहे. उत्सुक आहोत आम्ही तुझ्या येण्यासाठी. “ ती हसली तिला बरे वाटले.वाटले आश्वस्तही तिला.म्हणाली,” तू म्हणते आहेस तर मी ही यायला उत्स्तुक आहे.येते मी.माझ्या स्वागताची तयारी कर.तुझ्या शब्दावर भरवसा ठेवून येईन मी. फक्त एकच भीती वाटते आहे,माणसांमधील पशुत्वाची .तेवढ्या पासून मला जप म्हणजे झाले. जपशील ना ग मला ?” माझा आवाज कातर झाला . मी तिला म्हटले ,” अग! असे सगळ्यांच्या बाबतीत नाही ग होत .तू निर्धास्त रहा. तू समजतेस इतके क्रूर नाही ग हे जग . इथेही चांगली माणसे आहेतच ना ? नको काळजी करू.ये तू. निर्धास्त मनाने ये. मी उत्सुक आहे तुझ्या स्वागतासाठी. “ती पुढे काही बोलणार इतक्यात कसलातरी खळकन आवाज झाला आणि ते सुंदर स्वप्न भंग पावले. मनाला चुटपूट लागली माझ्या.मी जागी झाले. तिची येण्याची चाहूल मनात अलवार उठतंच होती.मनाला एकाच चाळा होता,त्या सुंदर कल्पना विश्वात रमण्याचा. नादच लागला होता मनाला ,ते स्वप्न आठवत राहण्याचा. किती सुंदर स्वप्न ! होईल खरे ? उतरेल प्रत्यक्षात?

आणि काय आश्चर्य काही दिवसातच ती येण्याची चाहूललागली. तीच असेल ना? कोवळी,सुकुमार,निरागस,मुग्ध कालिका ? की कोणी दुसरे असेल ? मन सांगत होते,तीच असणार .कलिका.शब्द दिलाय तिने मला ,मी तुझ्या उदरी जन्म घेईन म्हणून .ती तिच्या शब्दाला जागेल.नक्की जागेल. नऊ महिने नऊ दिवस कसे सरले,कळलेच नाही. तिने कबूल केल्याप्रमाणे तीनेच माझ्या उदरी जन्म घेतला.गर्भारपणात,जन्मताना कसलाच त्रास नाही दिलान तिने. तिचा जन्म म्हणजे एक केवळ आनंद सोहळा होता.कशी वाढली भराभर,आनंददेतघेत,सुखाची लयलूट करत ,माझ्या जवळ शब्दच नाहीत सांगायला.रूपाने,गुणाने,बुद्धीने सगळ्यांतच उजवी. स्वभावाने मृदू ,शांत,अलवार,मुग्ध.नावच ठेवले होते ना तिचे कालिका ! तश्शीच. सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी.........कलिका !

तिच्या जन्मानी घराला घरपण आले.तिच्या भोवती आमचा पिंगा सुरू झाला .तिच्या कुरळ्या कुरळ्या केसातून हात फिरवताना किती मृदू वाटायचे. तिची केतकी सारखी अंगकांती पाहून असे वाटायचे “पहिली बेटी धनाची पेटी” म्हणतात ना! ते काही खोटे नाही .तिच्या हसण्यानी सारे घर न्हाउन निघायचं.इवालीशीच नाजूक लाल लाल चुटूक जिवणी.तिच्या हसण्याबरोबर सारे घर हसायचं रडायला लागली की मात्र जीव कासावीस व्हायचा . तिच्यासाठी काय करावे काही सुचेनासे व्हायचे. वाढता वाढता कालिका दिसामाजी मोठी होत होती.तिच्या तिसऱ्या वाढदिवसाला तिला एक छानसे हिरवेगार परकर पोलके शिवले होते आम्ही .हिरव्या बांगड्या आणि गळ्यात हिरवी दूड घातलेली कालिका अत्यंत मोहक दिसायची. पायातले पैंजण असे रुणझुणायाचे की ऐकतच राहावेत.मग थोडे दिवसांनी तिच्या बोबड्या बोलांनी घर गुंजत राहिले. माझ्या चंद्रमौळी घरात जणू नंदनवनच अवतरले.” इथे इथे बैस रे मोरा !बाळ घाली चारा ,दाणा खा, पाणी पी आणि भुर्रकनउडून जा ! “ कलिका तिच्या लहानशा तळव्यावर एक बोट ठेवून लयदार शब्द टाकायची. तिचे ते बोबडे बोबडे बोल अजूनही कानात रुंजी घालत आहेत. कलिका मोठी झाली .शाळेत जाऊ लागली. अभ्यासात,खेळात,वकतृत्वात, गायनात बक्षिसेमिळवायला लागली . दिसायची तर इतकी मोहक की कोणालाही भुरळ पडावी .आजूबाजूच्या बायका म्हणायाच्याही मला “जपा हो,तुमच्या कलिकेला ! कोणीही पळवून नेईल नाहीतर.”आणि काय सांगू ! त्यांचीच बत्तीशी खरी ठरली .....

तिच्या अंगच्या देवदत्त गुणांनीच तिचा घात केला. माती केली तिची.तिचा काहीही दोष नसताना तिला कुस्करून टाकली त्या नराधमांनी .हे कसे घडले ,का घडले ,कधी घडले,त्याची चविष्ट वर्णने अनेक ठिकाणी छापूनआली.सार्यांनीत्या बातम्या चघळ चघळ चघळल्या.पण आमच्या मनांचे काय ? आम्ही तिच्यावर जे प्रेम उधळले होते त्याचे काय ? तिच्या यातनांचे काय ? आणि वरती विचारतात मला ,” यावर तुमची प्रतिक्रिया काय ? म्हणून.....काय सांगायचे त्यांना ? सांगू का ? की फार आनंद झाला,फारच आनंद वाटला म्हणून ! नऊ दिवस नऊ महिने तिचा गर्भ उदरात वाढवला ती चूक झाली माझी म्हणून! माझ्या या कोवळ्या कलिकेला वाढवताना आम्ही सपशेल हरलो हो ! माहीत नव्हते की या जगात आपल्या भोवती माणसे नाहीत तर नराधम जमले आहेत. माणसे नाहीत तर जनावरांचे पांजरपोळ आहेत. असेच घडत राहिले तर उद्या चांगल्या नीतिमान, सदवर्तनी माणसाचे दर्शन घ्यायला एखादे म्यूझियमच गाठावे लागेल तुम्हाला. या साऱ्यात एक मात्र झाले तिचा काहीही दोष नसताना माझी कलिका उमलण्याआधीच कुस्करली गेली .अत्यंतक्रूरपणाने तिचा अंत करण्यात आला.माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट करून ते नराधम वेगळे झाले..........कसे सहन केले असतील तिने तिच्यावरचे हे घणाघाती घाव .......लहानपणी बागुलबोवा आलां म्हणत मला घट्ट बिलगणारी कालिका.... या खऱ्या बागुल्बोवाला बघून तिची शुद्ध हरपली असेल का ? कालिके! किती आक्रोश केला असशील ग तू ? पण तो माझ्या कानांपर्यंत नाही पोहोचला आणि हे सारे दु:ख झेलायला मी जिवंत कशी उरले ? ......शेवटी तुझीचशंका खरी ठरली .तुला स्वप्नात दिलेल्या वाचनाला मी जागले नाही .......कोणत्या मुहूर्तावर तुला मी माझ्या संसारात ये अशी हाक घातली होती ? विचार करकरून माझी मती आता मात्र बधीर झाली आहे......

आता त्यांच्यावर खटला उभारलाय म्हणे.उभारू देत. त्यांच्या फाशीच्या शिक्षेची मागणी जोर धरू लागली आहे म्हणे,नाही म्हणजे हे कबूल आहे की त्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे. खरे तर इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की कोणत्याही मुलीकडे डोळे वर करून बघण्याची हिंमतच होता कामा नये अशा नराधमांना. पण आपल्या राजकारण्यांच्या मनगटात इतके बळ आहे असे वाटत नाही.त्यांना त्यांच्या मतपेट्याच फक्त प्यार आहेत. त्यापुढे काहीच महत्वाचे नाही त्यांना .या दोषी व्यक्तींची धिंड गाढवावरून काढायला पाहिजे,आणित्यांना पाठीशी घालणाऱ्यांचेर्ही हात पाय कलम केले पाहिजेत. ज्यांनी एका मातेपासून तिच्या लहानग्या मुलीची अत्यंत क्रूर रीतीने ताटातूट केली आहे. तिला सुंदर जगायचे होते म्हणून ती या जगात आली आणि अतिशय ओंगळपणाने तिला या जगाचा निरोप घेणे भाग पाडले गेले. ........

कालिके एक हताश माता तुझ्याकडे क्षमा याचना करते आहे. मला क्षमा कर ! करशील? या नराधमांना शिक्षा होईलही कदाचित पण आपण रंगवलेली स्वप्ने ? ..तुला दिलेले वचन? तुझ्या सुरक्षेचे वचन मी एक अभागी माता नाही पूर्ण करू शकले. त्यांना शिक्षा झाल्यावर काहींना तो आपला विजय देखील वाटेल पण मी जर त्यांना असे म्हटले की ” काही झाले तरी मला माझी कालिका परत आणून द्या...” तर त्यांच्याकडे काय उत्तर आहे मला देण्यासाठी ? माझे तर फार मोठे नुकसान झाले आहे ना ? कधीही भरून न येणारे.... A loss for ever…..


माधवी वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा