नको रे मना क्रोध हा खेदकारी |

बा मना आज का एवढा रागावला आहेस?

मग काय करु? जो उठतो तो मलाच दोष देतो, मलाच उपदेश देतो.

खरं आहे रे ! पण तूच ह्या जीवाच सर्वस्व आहेस ना? तूच तर त्याच्या आयुष्याचा सूत्रधार आहेस. जीवाच्या रथाचा सारथी बुद्धी आणि तिच्या हातात असलेला लगाम तू आहेस अस नाही का कठोपनिषद म्हणत. त्यामुळे तुलाच हे सर्व सांगायला पाहिजे. बर ते जाऊ दे ! सुख आणि दु:ख यांचा अनुभव घेणारा तूच ना ! मग तुलाच हा सगळा खटाटोप करायला नको का?

निसर्गत: तुला आनंदाच्या डोहात मनसोक्त डुंबायची इच्छा आहे. म्हणून तुझ्या इच्छेचा (कामना) आपण विचार केला, आनंद संपण्याचा भय कसं नाहीसं करता येईल त्याचा विचार केला. आता तुला त्रास देणाऱ्या आणखी एका गोष्टीचा विचार करु !

आपल्याला त्रास देणारे शत्रू जसे बाहेर असतात तसे समाजात, कुटुंबात देखील असतात. आपल्या दु:खाला कारणीभूत होणारे सहा शत्रू आपल्याच अंत:करणात घर करून राहिले आहेत हे माहीत आहेत ना? त्यांची नावे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ! कितीही उपाय केले तरी हे भाडेकरु घर खाली करायला तयार नसतात हे तर तू जाणतोसच. आपल्या आतला आनंदाचा डोह विषारी करणारा हा सहा तोंडे असलेला जहरीला कालिया नाग आहे. हा विषारी डोह स्वच्छ करायचा असेल तर कालिया मर्दन श्रीकृष्णाचा धावा केला पाहिजे. खर तर तो आपल्याच आत आहे, फक्त त्याची ओळख आपण विसरलो आहोत. त्याला साद घालत नाही तो पर्यंत तो गंमत बघत राहतो. या कालियाला बाहेर घालवून देऊन ज्यांनी आपला हा डोह आनंदाचा केला अशा अगदी आपल्या काळातल्या आपल्या सारख्याच व्यक्तीला म्हणजे तुकाराम महाराजांना आपण त्याबद्दल विचारु. त्यांचा स्वत:चा अनुभव काय आहे? ते म्हणतात,

पिकलिये सेंदे कडुपण गेले । तैसे आम्हा केले पांडुरंगे ॥१॥

काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टी जाली ॥२॥

आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥

तुका ह्मणे भाग्य या नांवे म्हणीजे । संसारीं जन्मीजे याचि लागीं ॥४॥ (तु. गा. ४२८०)

शेवटचे चार चरण कळायला जरा कठीण आहेत, पण आपले काम पहिल्या दोन ओळी समजल्या तरी होऊन जाईल. सेंद नावाचे फळ आधी कडू लागत, पण तेच पिकल्यावर मधुर होत.तसे पांडुरंगाने तुकारामांना अंतर्बाह्य मधुर केले. त्यांच्या आत आनंद इतका उसळू लागला की आजूबाजूच्या संर्वांना ते वाटू लागले. हे केवळ तुकाराम महाराजांच्या बाबतीत नाही, असे अनेक संत आपल्यात वेळोवेळी झाले आणि होत असतात.

या सर्व संतांच्या बाबतीत एक समान गोष्ट म्हणजे स्वत: रामाची, पांडुरंगाची कास धरली आणि आपल्याला तेच करायला सांगितले. आपल्या जीवन प्रवासात कितीही गणगोत, मित्र आले, तरी आपण खरे तर एकटे असतो, आपली दु:ख आपल्याच भोगावी लागतात. पण आपण ‘जेथे जातो तेथे’ एक ‘सांगाती’ आपल्याबरोबर नेहमी असतो असे संत अनुभवाने आणि ठामपणे सांगतात. आपण त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला त्या सांगातीचा शोध घेतला, ताच्याशी नाते प्रस्थापित केले, तर त्यांच्यासारखा आपल्यालाही सुखाचा अनुभव यायला काहीच हरकत नाही. आपल्या डोहात ठाण मांडून बसलेल्या कालियाला बाहेर कसे घालवायचे काम आपण एकट्याला जमणे कठीण आहे. त्यामध्ये आपल्याला कोणाची मदत होणार असेल तर त्या सांगातीची. हेच तर सर्व संत सांगतात.

‘नको रे मना क्रोध हा खेदकारी ।‘ (म. श्लो.६) असे एका सांगणारे समर्थ त्याकरिता करावयाचा उपाय पुढे अप्रत्यक्षपणे सांगतात. ‘तया अंतरी क्रोध संताप कैंचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।‘ (म. श्लो. ५६) जो सर्वोत्तमाचा दास असतो त्याच्या ठिकाणी क्रोध नसतो. हे उलट करून घेतले म्हणजे कळते की क्रोध आवरायचा असेल तर सर्वोत्तमाचा दास व्हावे असेच त्यांचेही सांगणे आहे. पण हा क्रोध जिंकणे ही गोष्ट सोपी नाही हे संतही मान्य करतात. हे विकार ताब्यात यायला उपासनेचे बळ लागते असे अगदी आताचे संत गोंदवलेकर महाराज सांगतात. ते आपल्याला रामाचे नाम घ्यायला सांगतात. सर्व संतांचे सांगणे तेच आहे ना? ‘साधु दिसती वेगळाले | परि ते अंतरी मिळाले’ हे समर्थांचे म्हणजे किती खरे आहे !

दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे देह भरला विठ्ठले | काम क्रोधे केले घर रिते ||’ म्हणून तर ते आधीच सांगतात, ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव ||’ हा अभंग किती वेळा ऐकला आहेस? पण शेवटचा निष्कर्ष लक्षात येत नाही.

बर संत आपल्या पदरचे सांगत नाहीत. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या योगांमध्ये १३ श्लोकात क्रोधाचा विचार केला आहे. भगवंतांचा आदर्श पुरुष कोण आहे ? जो दु:खाने जो उद्विग्न होत नाही, सुखाविषयी निस्पृह आहे, राग-द्वेष, भय, क्रोध ज्याच्यात उरलेले नाहीत असा स्थिर बुद्धी पुरुष. त्याला ते ‘मुनी’ म्हणतात. (गी. २.५६). सर्व सृष्टी सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणांची असल्याने निसर्गत: आपल्यामध्ये कमी जास्त प्रमाणात हे त्रिगुण आहेत. त्यातल्या रजोगुणाचा परिणाम असणारे हे दोन शत्रू अत्यंत खादाड आणि महापापी आहेत असे भगवंत सांगतात. (गी. ३.३७). आसुरी संपत्तीमध्ये गणले जाणारे (गी. १६.४) हे गुण खरोखर नरकाची दारेच आहेत (गी.१६.२१). नरकावास टाळायची इच्छा असेल तर यांचा त्याग करायला हवा. ज्यांनी आसक्ती, भीती व क्रोध सोडून माझ्याशी समरस होउन, माझ्याच अनुसंधानात राहणारे ज्ञानरूप तपाने पावन होऊन माझ्या स्वरुपाशी, म्हणजे आनंदरूपाशी ऐक्य पावतात.

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१०॥

तुकारामांचा अनुभव असाच नाही का? ‘आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥ तुका ह्मणे भाग्य या नांवे म्हणीजे । संसारीं जन्मीजे याचि लागीं ॥४॥‘ (तु. गा. ४२८०). असे भाग्य प्राप्त होणे हाच आपल्या जीवनाचा मुख्य हेतू, आपले कर्तव्य जे काही आहे ते हेच आहे. आपली सगळी धडपड यासाठी नव्हे का? फक्त आपली त्या आनंदाला शोधण्याची ‘जागा चुकते’ आहे असे ते म्हणतात. जागा चुकल्याने आशा-निराशेच्या भोवऱ्यात अडकलेल्याची घसरगुंडी कशी होते आणि तो सर्वनाश कसा ओढवून घेतो ते भगवंत दोन श्लोकात सांगतात 

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ २-६२॥

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३॥



चित्तवृत्ती विषयात गुंतली की विषयांची ओढ लागते. ते मिळावेत अशी इच्छा वाढीला लागते. ते मिळण्यात अडचण आली की क्रोध उफाळून येतो. क्रोधामुळे बुद्धी अविवेकी बनते, ते मिळावेत म्हणून आपण काय करतो याचे मग भान राहात नाही. त्यामुळे सर्वनाश अटळ होतो. राग अनावर झाल्याने शरीर स्वास्थ्यावर परिणाम होतो. इतरांशी असलेले संबंध बिघडतात, व्यवहार सुरळीत होत नाही. राग आतल्या आत दाबून टाकायचा प्रयत्न केला तरी आतल्या आत जळफळाट होतो.



एकीकडे ते अर्जुनाला युद्ध करायला सांगतात, आणि दुसरीकडे क्रोध आवरण्याच्या गोष्टी सांगतात. गंमत आहे ना? युद्धा करिता क्रोध हवा, पण आपण त्याचे गुलाम झालो की त्रास होतो. गीतेचा हा उपदेश सर्वंकष आणि मूलभूत आहे, प्रासंगिक नाही. आपण ब्रह्मा-विष्णु-शंकर ही त्रयी मानतो. हे अनुक्रमे रज-सत्व-तम या गुणांचे स्वामी आहेत. उत्पत्ती-स्थिति-लय या क्रिया घडायला ते आवश्यक आहेत. पण हे तिघे सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी नव्हेत तर त्या त्या गुणाचे स्वामी आहेत अशी आपली कल्पना आहे. आपण मात्र या गुणांचे गुलाम असतो. भगवंत अर्जुनाला ‘निस्त्रैगुण्यो’ म्हणजे गुणातीत व्ह्यायला सांगतात. खुद्ध गीतेमध्ये याचा सविस्तर विचार भगवंतांनी पूर्ण एक अध्यायभर केला आहे. त्याला ‘गुणत्रयविभागयोग’ म्हटले आहे. हे गुण जाणने हे ‘ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्’ असे भगवंत म्हणतात. या अध्यायाचा निष्कर्ष ‘मां च यो अव्यभिचारेण भक्तयोगेन सेवते’, जो माझी अव्यभिचारी भक्ती करतो गुणातीत होतो, तो माझ्या धर्माचा, म्हणजेच आनंदरूप होतो.

मथितार्थ काय? आनंदाला बाधा येऊ द्यायची नसेल, सुखाच्या डोहात कायम विहार करायची इच्छा असेल तर पहिला काम शत्रू जिंकायला हवा. म्हणजे इच्छा आशा करायची ती बाह्य विषयांची नाही तर राघवाची. बघ ! आपली गाडी मूळ पदावर म्हणजे ‘मना राघवेवीण आशा नको रे’ याच सूत्रावर येऊन पोहोचली ना? मागच्या वेळी आपण हा निष्कर्ष काढला होता नाही का? एकदा कामावर विजय मिळाला म्हणजे मग पुढचे क्रोध वैगरे आपोआप निष्प्रभ होतात.

‘अवतार पांडुरंग नामं ठेविले ज्ञानी’ स्वत: पांडुरंग माउलींच्या रूपाने हेच तर सांगतो आहे, ‘तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जेणे पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ तू मन हे मीचि करी | माझिया भजानि प्रेम धरी | सर्वत्र नमस्कारी | मज एकाते || ज्ञा. ९.५१६-७ ॥ माझ्या अनुसंधानाने सर्व काम संकल्प जाळून टाक.

या आनंदाच्या दोहाला कालियाच्या विषापासून निर्विष करायचा मार्ग सर्वांनी एकमुखाने सांगितला नाही का? पहा आता काय करायचे ते.


श्रीकांत जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा