रुजवात

आज बरोबर तेरा दिवसांनी घरी परतले. त्रंबकेश्वरलाच त्यांचे सगळे विधी केले. नाहीतरी होतं कोण? घरी सोडताना भावाने विचारलं होतं सोबतीला येऊ का म्हणून, स्पष्ट नकार दिला त्याला.

आल्या आल्या भरभर सगळ्या खिडक्या उघडल्या. घरात शिरलेल्या ताज्या हवेने उर भरून घेतला. तरी पण कसलातरी उग्र दर्प जाणवला. हा दर्प कुठून येतोय हे माहित होतं मला. तिकडेच वळले मी.

खोलीत पाय ठेवताना अजून सुद्धा अंग थरथरत होतं. थंडगार फरशीवर पाय पडताच इंगळ्या डसाव्यात तश्या आठवणी जाग्या झाल्या. नकोच, नकोच ते म्हणत मागे वळले. पडदीत पोहचले तरी आठवणींच्या बिलगलेल्या इंगळ्या काही हटेनात. अंथरुणावर पाठ टेकताना सगळं आठवू लागलं.

त्या दिवशी दादांनी येताना पेढे आणले होते आणि आपल्याला हाक मारून एक चांगला मोठा पेढा आपल्या तोंडात भरवला. त्या दिवशीच काय ते तोंड गोड झालं, ते शेवटचंच. आणि आईला उद्देशून म्हणाले, " त्यांचा होकार आला हो. पहिल्या फटक्यातच सगळं कसं मनासारखं झालं."

खरंच दोन दिवसांपूर्वीच तर ते आपल्याला पहायला येऊन गेले होते. त्यांचा म्हणे शहरात बंगला होता आणि एकुलता एकच मुलगा. पायात व्यंग होतं पण आपण तरी कुठे पूर्ण होतो? मुखदुर्बळ आपण, देवाने तोतरेपण पदरी दिलं होतं. बहुतेक त्याला माहित होतं की आपल्या नशिबात संवादच नाही; पण कलेचं दान मात्र घातलं होतं. हात लावेल त्याचं सोनं करत होतो आपण. आईने तसं संगितलही होतं त्या मंडळींना.

आठ दिवसांतच आपली रवानगी या बंगल्यात झाली. घरात इन मिन तीन माणसं आणि आता चौथ्या आपण. सासूबाईंनी हाताला धरून सगळं घर फिरवलं. त्यांची खोली बघताना कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या आणि उगाचच अंग शहारलं होतं. मान वर न करताच पाहिलेला तो बंगला आपल्याला आवडला पण माहित नव्हतं की हा आपल्यासाठी कैदखाना होणार आहे ते. 

पहिल्याच रात्री पाण्याचा तांब्या घेऊन त्यांच्या खोलीत गेले तर तावातावाने ते पुढे आले आणि काही कळायच्या आतच तो तांब्या डोक्यावर उपडी झाला. सगळ अंग भिजलं आणि ठाणकन डोक्यावर आघात झाला. भीतीने शुद्ध हरपताना पुन्हा मला न विचारता या खोलीत आलीस तर याद राख असे शब्द कानावर आले.

दुसऱ्या दिवसापासून हि पडदी आपल्या नशिबात आली ती कायमचीच. एव्हढं रामायण झालं माझ्याबरोबर पण ना सासूबाईंनी काही विचारलं ना सासरे काही बोलले. थोडयाच दिवसात इकडून तिकडून कानावर आलं की त्यांना आवडणाऱ्या एका मुलीने पांगळा म्हणून हिणवत त्यांना नकार दिलेला. त्याचाच राग ते काढत होते. माझी काय चुक होती यात. पण शरीराची भूक भागवताना तो राग कुठे पळत होता? वेळ नाही काळ नाही. सगळ्यांसमोर खोलीत ओढत न्यायचे आणि ओरबाडून काढायचे. काय तर म्हणे आई वडिलांवर सूड उगवायचाय कारण त्यांनाच संसार बघायचा होता ना. मग बघा. काहीही चूक नसताना मी मात्र भरडली जात होते.

सवयीच झालं आता. हातात कला होती. वेळ जावा आणि जीव रमावा म्हणून पुन्हा भरतकाम आणि विणकाम सुरु केलं. तर तेही कधीतरी शोधून काढलं आणि समोरच सगळं जाळून टाकलं. आपलं जगणंच नाकारत होता तो माणूस. मनातली भीती आणि जन्मजात व्यंग त्यामुळं भांडूही शकले नाही. घुसमट वाढतच होती. 

आला दिवस ढकलायचा असंच चाललं होतं. मध्यंतरी भांडीवाल्या मावशींची नात सुट्टीमुळे त्यांच्या बरोबर यायची. ती चिमुरडी थोडा का होईना पण आनंद घेऊन आली होती. तिला गोष्टी सांगताना, खाऊ भरवताना मन भरून यायचं. कुठेतरी ओल जाणवली आणि शरीरानेही ती धरून ठेवली. नको होतं तरी बिज रुजलं. सासूबाईंना कळल्यावर एव्हढ्या दिवसांत पहिल्यांदाच त्यांनी पाठीवर हात फिरवला. आणि हसून म्हणाल्या आता होईल हो सगळं नीट, काळजी करू नकोस. किती स्वार्थी असतात नाही माणसं. आपल्यामुळे येणाऱ्याची काळजी होती पण आपली किंमत शून्यच. वाटलं होतं आता तरी बदलेल सगळं. 

पण दुसऱ्यादिवशी डॉक्टरांना दाखवायचं म्हणून घेऊन गेले आणि रिकामी होऊन परतले. मला न विचारताच गर्भपात करवला त्यांनी. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्या डोळयांत बघितलं, आसुरी आनंद होता तिथे. त्याचं संक्रमण झालं आणि काळजात उतरला आपल्या. तिथच भडभडून उलटी झाली. पण डोळ्यात पाण्याचा टिपूस सुध्दा आला नाही.

आजही पोटात तुटतय आपल्या. कूस बदलून पण विचार काही थांबवता येईनात. उठून उगाचच कपाटात शोधू लागले. कधीही घडी न मोडलेल्या साडया, विणकाम-भरतकामाचे नमुने बरचसं आहे तिथे. शोधत असलेला तो डबा लगेचच सापडला. उघडायचा प्रयत्न करताना जाणवलं झाकण अगदि घट्ट लागलय. किती वर्ष झाली बरं सासूबाईंना मरुन, पाच सहा तर नक्कीच. मरताना त्यांनी दिला होता आणि हात जोडले होते. तसाच टाकला होता कपाटात. हात लावायची सुद्धा इच्छा नव्हती पण आज एव्हढ्या वर्षांनी त्यात काय असेल ह्याची उत्सुकता स्वस्थ बसू देत नाहीये.

जरा खटपट करून जोर लावून उघडलाच तर आतला ऐवज उसळून खोलीभर पसरला. बिया, बिया होत्या त्या. बकुळीच्या, गुलबक्षीच्या, आंब्याच्या, दोडकी, भेंडी, कारली, तुळशी, प्राजक्त, कोरांटी आणि खूप साऱ्या झाडांच्या. मी ओळखू शकले कारण त्या बागेतल्याच होत्या.

सासऱ्यांना खुप हौस होती. बंगल्याभोवती त्यांनी छान बाग फुलवलेली. त्यांचं मन ते बागेतच रमवीत. हॉस्पिटलमधून आल्यावर खूपच सैरभैर झाले होते. एकदा संध्याकाळी बागेत बसून चिडीने दुर्वा खुडत होते, तेव्हा लक्ष नुकत्याच लावलेल्या आंब्याच्या कलमाकडे गेलं आणि एक विखारी विचार डोक्यात आला. हळूच जाऊन कलम उपटलं. आसुरी आनंद झाला......अगदि त्यांच्यासारखाच.

दुसऱ्या दिवशी सासऱ्यांनी बडबड करत परत ते रोवलं. पण मी परत काढलं. रोज हाच खेळ चालू होता. आता कलमाच्या पानांनी मान टाकलेली पण सासरे हिम्मत हरत नव्हते. त्यांनी ते परत रोवलं आणि त्याच्या बाजूला कुंपण घातलं. दुपारी कोणाचं लक्ष नाही असं बघत उपटताना सासूबाईंनी मागून येऊन हात धरला.

आणि म्हणाल्या होत्या, "कशाला ग? धीर धर. अजूनही वेळ गेली नाहीये. तुझंही बीज तग धरेल." भेसूर हसत उत्तरले, किडक्या वाणाचं फळ हवय कोणाला. कोरडी केलत मला तुम्ही आणि आता मी काहीच रुजु देणार नाही. ना या मातीत ना स्वतःत. 

त्या दिवसापासून सासूबाईंनी अंथरूण धरलं आणि मामंजींनी बाग सोडली. मी मात्र वेड्यासारखी रोज एक रोपटं उपटतच होते. पूर्ण बाग नासवली तरी चैन पडेना. मग मोर्चा मोठ्या झाडांकडे वळवला आणि या ना त्या कारणाने कापून टाकली सगळी. सगळा राग त्या झाडांवर निघाला. 

थोड्याच दिवसात त्या गेल्या आणि मागोमाग सासरे हि. त्या दोघांच्या जाण्याने हे हलले आणि जरा मवाळ झाले. पण यांनी चालू केलेलं क्षोभाचं अग्निहोत्र मी कसोशीनं सांभाळलं.

खरतर इतकं करून सुद्धा मन मात्र शांत नव्हतं. त्यात साध्या तापाचं निमित्त होऊन हे हि गेले. आता घर कस शांत वाटतयं. पण हे सुडाचं अग्निहोत्र शांत का होत नाहीये? एरव्ही हि आपण एकट्याच होतो की आणि त्यांच्यारूपाने भीतीच होती सोबतीला. तरी आज एकदम रिकामं आणि भकास वाटतयं. 

केंव्हाची मी अशीच या बियांकडे बघत बसली आहे. किती वाजले असतील? पक्ष्यांची किलबिल ऐकू येतेय म्हणजे पहाट झाली असणार. एक एक बी उचलून डब्यात टाकताना वाटतयं की आताच यांना धुमारे फुटावे पोपटी, कोवळे, लुसलुशीत. हात लावताच तो मृदू स्पर्श अंतःकरणाला भिडावा आणि त्यात माझे राग, लोभ, द्वेष आणि मी सुद्धा वितळून जावं. पण होणार का आपल्याकडून हे? ज्या हातांनी जीवे मारलं ते जीवदान देऊ शकतील का? कलाकाराचे हात आपले पण मुक्या जीवांची कत्तल केली. का? तर ते आपल्यासारखेच बोलू शकत नाही. नकळत सूडाच्या चक्रात आपणही गुरफटलोच की. 

उठून बागेत आले. वेड्यासारख्या सगळ्या बिया टोकल्या, ओंजळीने पाणी घातलं. 

हुरहुरीत दोन दिवस गेलेत पण झालं काहिच नाही. बिया कोळपल्यात की आपल्यासारखीच त्यांचीही इच्छा मरून गेलीये. 

आणि आज पहिल्यांदाच गालावर पाणी ओघळलं. आपल्यात अजूनहि ओल शिल्लक आहे ह्याच मलाच आश्चर्य वाटतय. डोळे अखंड पाझरू दिले, पुसलेच नाहित. आणि बागेकडची खिडकी घट्ट ओढून घेतली अगदि कायमचीच.

 अंजली कुबल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा