क्रोधात् भवति संमोह:
संमोहात् स्मृतिविभ्रम:
स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो
बुद्धिनाशात् प्रणश्यति
क्रोधामुळे संमोहन होते (बुद्धि मंद होते-तात्पुरतं बुद्धिमांद्य येतं), संमोहनामुळे स्मृतिभ्रंश होतो, त्यातून बुद्धिनाश आणि अखेर माणसाचे प्राण त्याला सोडून जातात. इतका सगळा विनाश केवळ क्रोधामुळे होतो.
राग असं आपल्या व्यवहारातलं, सवयीचं नाव या भावनेचं. काम-क्रोधादि सहा भावनांपासून सामान्य माणसाची सुटका नाही. जे यांच्यावर विजय मिळवतात ते देवत्वाला पोचतात. पण यांना षडरिपू म्हटलं आहे. शत्रू मानलं आहे. कारण या भावना काबूत राहिल्या नाहीत तर माणसाचं जीवन ढवळून निघतं.
एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, सामाजिक चौकटींना छेद देणारी घडली तर जी तीव्र नाराजी मनात निर्माण होते त्या भावनेला राग येणं असं आपण सामान्य व्यवहारात समजतो. राग येणं, त्याचा उद्रेक होणं हे मनुष्यस्वभावाला धरून आहे, पण त्याला वेळेवर आवर घातला नाही तर मात्र तो फार मोठा उत्पात घडवतो. रागाच्या भरात अपशब्द उच्चारणे, हात उचलणे, वस्तूंची फेकाफेक करणे, अंगावर धावून जाणे, स्वत:ला इजा करून घेणे असे अनेक प्रकार माणसं करतात. वारंवार असे प्रकार होऊ लागले तर तो मानसिक आजार आहे हे गृहित धरून तातडीने त्यावर उपचार करणं गरजेचं असतं.
एखादं माणूस विशिष्ट गोष्टींनी रागावतं हे कळल्यानंतर आजुबाजुच्यांनी ती गोष्ट टाळण्याचे प्रयत्न करणं गरजेचं असतं किंवा त्या माणसाला ती गोष्ट स्वीकारणं किंवा तिकडे दुर्लक्ष करणं कसं आवश्यक ते समजावून सांगणं गरजेचं. पण कधीतरी माणसाच्या रागाकडे सतत दुर्लक्ष करणं, सतत त्यालाच शांत राहण्याविषयी सांगणं यानेही त्या माणसाचा तोल जाऊ शकतो. प्रत्येक माणसाच्या मानसिक मर्यादा वेगळ्या असतात. आणि आपल्या मर्यादेच्या बाहेर जाण्याने मनाला घातलेले बांध फुटू शकतात. कधी असंही होतं की सतत राग आवरत राहिल्यामुळे मन हळवं झालेलं असतं आणि चुकीच्या ठिकाणी रागाचा उद्रेक होऊन गोष्टी बिघडतात. रागाला आवर घालण्याइतकंच त्याचं नियोजन करणं गरजेचं आणि त्या कामी जवळच्या माणसांनी त्या माणसाला मदत करायला हवी. समजून घेऊन, काही गोष्टी टाळून, चर्चा करून अशा विविध मार्गांचा अवलंब करायला हवा. रागावलेल्या माणसाच्या मनधरण्या करणं असा एक प्रकार प्रणयाराधनातही आपण पाहतो-वाचतो, पण तिथेही कुठे थांबायचं आणि राग सोडायचा याचं गमक साधलं नाही तर प्रणयाची रंगत कमी होते.
राग येणं हे नेहमीच वाईट असतं का? माझ्या मते नाही. कोणतीही भावना मूलत: वाईट नाही. आपण त्याचं प्रकटीकरण कसं, कधी आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर त्याचं बरं-वाईट असणं ठरतं. वैयक्तिक किंवा सार्वजनिक जीवनात अयोग्य, बेकायदेशीर घटना घडली तर ती सहज स्वीकारली न जाता त्याचा तीव्र निषेध व्हायला हवा आणि पाठोपाठ त्याविरुद्ध कारवाईही व्हायला हवी. यासाठी मनात क्रोधाची भावना जागी व्हायला हवी, पण तिचं प्रकटीकरण मात्र संयत आणि सनदशीर मार्गाने व्हायला हवं.
राग, क्रोध या भावनेचा सकारात्मक-विधायक उपयोग करून घेण्यात चतुराई आहे. तिच्या अस्थानी आणि अतिरेकी प्रकटीकरणाने विध्वंसाशिवाय काही हाती लागणार नाही. मग तो माणसाचा वैयक्तिक असो, सामाजिक संपत्तीचा असो किंवा मानसिक पातळीवर उध्वस्त होणं असो.
राधा मराठे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा