मला ना राग आलाय, प्रचंड म्हणजे प्रचंड म्हणजे अगदी प्रचंडच राग आलाय. आता तुम्ही म्हणाल का ग बाई काय झालं इतकं प्रचंड रागवायला? आता तुम्ही विचारताच आहात तर तुमचा मान ठेवायला म्हणून सांगते. हो, नाहीतर, नाही सांगितलं म्हणून तुम्ही रागवाल!
त्याचं काय झालं, हल्ली ना जो उठतो तो रागाबद्दल बोलतो, जो उठतो तो रागावर नियंत्रण ठेवण्याबद्दल लिहितो. एकूण काय तर राग सोडा, रागावू नका, रागाचा त्याग करा, राग राग राग! नुसतं वाचून सुद्धा इतका राग येतो ना की काही विचारू नका. ते whatsapp चे मेसेजेस तर काय, उपदेश, ज्ञान, तत्वज्ञान ह्यांनी भरभरून वाहत असतात.
ह्या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मी एका बेसावध क्षणी ‘राग सोडायचा’ निश्चय केला. आता असा राग येतोय ना मला त्या माझ्या बावळटपणाचा. त्याच काय झालं की सुरवातीला ना आपल्याला राग येतो, या गोष्टीचाच मला राग यायचा. मग लक्षात आलं की अरेच्च्या, ‘रागाचा’ रागराग केला तरी शेवटी तो ‘रागच’. मग चिंता पडली की ‘रागाचा’ राग नाही करायचा तर मग काय रागावर प्रेम करायचं? पण मग रागावर जर प्रेम केलं तर मग ‘राग’ आवडतो असं नाही का होत? कारण आपण फक्त आपल्या आवडत्या गोष्टींवरच प्रेम करतो की नाही? झालं, मग ‘रागाचा’ रागराग करायचा की रागावर प्रेम करायचं यावर माझ्या मेंदूत जोरदार धुमश्चक्री सुरु झाली. निष्पन्न मात्र काहीही झालं नाही. त्यामुळे परत एकदा ह्या सगळ्या प्रकाराचा राग आला. मग ठरवलं की आता ना कोणताही, कसलाही आणि कशावरही विचार म्हणून करायचा नाही. ह्या विचारांमुळेच मला वाटत राग येतोय. आता विचारही करायचा नाही आणि रागवायचही नाही, एव्हढच ठरवायचं. अहो, पण ठरवलं आणि त्याप्रमाणे केलं, हे एव्हढ का सोपं आहे? दर वेळेला राग आला आणि तो आवरता आला नाही की परत स्वतःचा रागराग करणं सुरूच होतं. म्हणजे ‘ह्या’ नाही पण ‘त्या’ प्रकारचा राग हे प्रकरण मागच्या पानावरून पुढे ह्या थाटात चालूच होतं.
मग जरा दुसऱ्या बाजूने विचार करायला सुरुवात केली. आपल्या पुराणात, रामायण, महाभारतात असे किती दाखले आपल्याला सापडतात की देव म्हणा, ऋषीमुनी म्हणा, कोणीतरी कोणावर तरी संतापलेले, कोपलेले आहेच, कोणीतरी कोणालातरी शाप देतच आहे. कोणी कोणाला दगड करतंय, तर कोणी कोणाचा वध करतंय. एक ना अनेक उदाहरणं आपल्याला माहीतच आहेत. मग त्या युगांमध्ये हे ‘रागावर नियंत्रण’ ही कल्पना अस्तित्वात नव्हती, का अस्तित्वात होती पण त्याची फारशी दखल घेतली गेली नाही, का कोणाला ती दखल घ्यावीशी वाटली नाही? म्हणजे जे ऋषीमुनींना, देवादिकांनाही जमले नाही किंवा त्यांनी त्याबद्दल तसदी घेतली नाही तर मग ते जमवण्याचा आपणच का एव्हढा अट्टाहास धरायचा, का एव्हढा प्रयास करायचा? कमीतकमी मी कुठे जलप्रलय तर घडवून आणत नाहीये किंवा कुणाला दगड तर बनवत नाहीये.
म्हणजे मग गेले काही दिवस मी जो काय जीवापाड प्रयत्न करतेय, जो काय जीवाला त्रास करून घेतेय तो उगीचच कि काय? मनात आलं कि हा सगळा विचार आधीच केला असता तर किती बरं झालं असत. आधीच कळल असतं ना की हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत, रागावर नियंत्रण ठेवण कोणालाच जमलं नाहीये किंवा जमवलं नाहीये आणि जमणारही नाहीये, त्यामुळे त्यासाठी तसदी घेण्याचे काहीही कारण नाही. हा विचार आधीच केला असता तर जीवाचा किती आटापिटा, त्रास वाचला असता. झालं, हा विचार मनात आला आणि मला परत प्रचंड, प्रचंड प्रचंड राग आला! आता बोला.
इतके दिवस आपण राग हा वाईट हेच ऐकत आलो आहोत. पण खरच राग एव्हढा वाईट असतो का? अहो विचार करता करता मला तर रागाचे फायदेच दिसायला लागले. म्हणजे बघा हं, की नवऱ्याला, मुलांना शिस्त, वळण लावायचं असेल, अरे सॉरी हं, मी नवऱ्याला पण लिहिलं का? मला फक्त मुलांना म्हणायचं होत. अर्थात बऱ्याच बायका तो ‘नवरा’ हा शब्द पण राहू देत असंच म्हणतील. तर, मुलांना त्यांच्या मर्यादांची, जबाबदारीची, कर्तव्याची शिकवण द्यायची असेल तर कधी कधी रागवावही लागतंच. समजुतीने सांगून पचनी पडत नसेल तर रागाचे शस्त्र अधूनमधून काढावेच लागते. अहो मुलांचेच कशाला, आपल्याला सुद्धा कोणी त्रास देत असेल आणि समजुतीने काम होत नसेल तर स्वसंरक्षणासाठी का होईना पण उग्र रूप हे धारण करावे लागते. म्हणजे थोडक्यात काय तर बरेचदा, बरेच ठिकाणी राग येणे, तो दाखवणे हे महत्वाचे किंवा आवश्यक सुद्धा असते. ‘राग येणे’ आणि ‘राग दाखवणे’ हे लिहिता लिहिताच मनात आलं की वरती लिहिलेल्या सगळ्या प्रसंगी खरं तर राग ‘दिसणे’ किंवा ‘दाखवणे’ हेच राग ‘येण्या’ पेक्षा महत्वाचे आहे, नाही का? म्हणजे राग दाखवताना राग आला नाही तर उत्तमच किंवा आलेल्या रागावर कमीतकमी नियंत्रण जरी करता आलं तरी चालेल. पहिल्यांदाच रागावर नियंत्रण करण्याचा फायदा लक्षात आला. हं!!! जरा रागच आला मला हे इतकं उशिरा कळतय म्हणून!
अर्थात सगळेच राग काही वाईट नसतात. स्वार्थासाठी, आप्पलपोटेपणामुळे, दुसऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने आलेला राग नक्कीच वाईट. पण काहीतरी सहेतुसाठी आलेला राग नक्कीच कारणी लागतो. मुलांसाठी येतो तो प्रेमापोटी, काळजीपोटी आलेला राग.
समोरच्याचे नुकसान होऊ नये किंवा तो संकटात सापडू नये म्हणून आपण त्याला मदत्तीचा हात देत असताना, आधार देत असताना, जेंव्हा तो कोणत्याही कारणाने का होईना पण अव्हेरला जातो, तेंव्हा जो येतो तो असहायतेपोटी आलेला राग. सर्वतोपरी उपाय करून सुद्धा काहीच लागू पडत नाही तेंव्हा येतो तो उद्विग्नतेचा राग. एखादी गोष्ट हातातून कायमची निसटून जाते तेंव्हा येतो तो विषण्णतेचा राग. समोर अत्याचार घडत असेल, अराजकता माजली असेल तर येतो तो दाहक, प्रक्षोभक राग.
म्हणजे राग हा फक्त राग नसतो तर त्यात प्रेम, काळजी, आपुलकी, दुःख, असहायता, उद्विग्नता, विषण्णता, प्रक्षोभ अशा अनेक भावनांचे कंगोरे असतात. आणि म्हणूनच जेंव्हा राग येतो तेंव्हा तो कशामुळे, कोणामुळे, कशासाठी आला, त्याचा कोणाकोणावर आणि काय परिणाम होईल याचा सर्वांगीण विचार करता आला पाहिजे. तरच रागाचे मुळ आणि त्याचे परिणाम हे दोन्ही आपल्या समोर स्पष्ट दिसेल, समजेल. त्यामुळे हा परिणाम जर दुखावणारा, नुकसान करणारा, किंवा अहितकारक असेल तर कदाचित आपोआपच हा राग कमी किंवा नाहीसा व्हायला मदत होईल.
जसे अश्रू तसाच राग सुद्धा आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देण्याचा मार्ग आहे असे मला वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक राग हा वाईटच असतो असे नाही. रागाचा इतका रागराग करण हा जरा रागावर अन्यायच केल्या सारखा वाटतो. अहो रागाच काय घेऊन बसलात, प्रेमाची सुद्धा तीच गत आहे. अतिप्रेम, आंधळ प्रेम, दुबळ करणारं प्रेम, अडवणारं, बांधून ठेवणारं प्रेम हेही तितकच, रागाइतकंच वाईट.
म्हणजे मग राग काय आणि लोभ काय अकाली, अनाठायी, कुहेतुने असेल, प्रमाणाच्या बाहेर असेल, तर वाईटच पण मग बाकीच्या रागांच काय? प्रेमापोटी, काळजीपोटी वगैरे वगैरे आलेल्या रागांच काय? इथपर्यंतच गाडी येऊन थांबलीय. आणि ती काही म्हणता काही केल्या पुढे जात नाहीये म्हणून आता माझाच मला पुन्हा एकदा प्रचंड राग आलाय . आता बोला!
योगिनी लेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा