देवादिकांचा क्रोध

नच सुंदरी करूं कोपा मजवरी धरी अनुकंपा 
रागाने तव तनु ही पावत कशी कंपा...

या प्रसिद्ध नाट्यगीतात स्वर्गीय छोटा गंधर्व यांनी पतिराज श्रीकृष्ण आपल्या रागवलेल्या सत्यभामेची कशी आळवणी करत असतील हे चित्र आपल्या स्वरविलासातून मूर्तिमंत उभे केले आहे. बऱ्याच दिवसांनी हे गीत ऐकले आणि डोक्यात विचारचक्र चालू झाले.

क्रोध. अनंत काळापासून चालत आलेली एक अनाकलनीय अभिव्यक्ती! कुणालाही न चुकलेली ... अगदी देवदेवता, ऋषीमुनी यांचीसुद्धा याच्यापासून सुटका झालेली नाहीये. 

पतिराज श्रीकृष्णांनी आपल्या लाडक्या पत्नीच्या मिनतवाऱ्या केल्या आणि योगीराज श्रीकृष्णांनी क्रोधामागची कार्यकारण भूमिका सूत्ररूपाने श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात मांडली.

क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृति-विभ्रमः ।

स्मृति-भ्रंशात् बुद्धि-नाशः बुद्धि-नाशात् प्रणश्यति ॥

अध्यात्म शास्त्रात सांगितल्या गेलेल्या षड्रिपूसमूहामध्ये क्रोधाला राजाच मानले आहे. या क्रोधाला वेळेवर समजून घेतले नाही आणि त्यावर नियंत्रण आणले नाही ही तर आपल्या जीवनाचा सर्वनाश होतो असेच भगवंत सांगतात. 

हा क्रोध निर्माण कसा होतो? याची सुरुवात कुठल्यातरी कामवासनेमध्ये असते. कामाचे परिवर्तन मोहामध्ये होते आणि या मोहामुळे आपला स्मृतिभ्रंश होतो. आता स्मृतिभ्रंश म्हणजे नक्की काय बरे? यावर अनेक विद्वानांनी आपापल्या पद्धतीने भाष्ये केलेली आहेत. मला असे वाटते आपण जेव्हा आपली विवेकबुद्धी हरवून बसतो त्या अवस्थेलाच भगवंतांनी स्मृतीभ्रंश असे म्हणले असावे. सद्सद्विवेक आपण विसरतो म्हणजेच आपल्या बुद्धीचा नाश आपणच करतो. अशा वेळी आपण घेतलेले अनेक निर्णय आततायी आणि कदाचित घातकीसुद्धा ठरू शकतात. दुर्दैवाने अनेकांच्या जीवनात याची परिणिती सर्वनाशामध्ये झालेली आपल्याला पहायला आढळते. 

पुढे सोळाव्या अध्यायामध्ये आसुरी संपदेचे वर्णन करताना भगवंतांनी अजून एक धोक्याची सूचना देऊन ठेवलेली आहे. 

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधः तथा लोभ स्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥

काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन दारे आहेत. इथे प्रवेश केला तर आत्म्याची अधोगती निश्चित आहे म्हणूनच त्यांचा त्याग करणे हे सर्वथा हितकारक आहे हेच भगवंतांनी निक्षून सांगितलेले आहे. 

पहायला गेलं तर क्रोध हा आपल्या मनात ठायीठायी भरलेला आहे. राग येणे ही आपली सहजप्रवृत्ती आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या मनासारखं घडलं नाही तर आपलं मन रागाने भरून जातं. दिवसभरात आपण किती वेळा रागावतो याची संख्या मोजली तर धक्का बसेल. बऱ्याच वेळा आपण हा राग आपलेआपण शांत करतो आणि तसे शक्य झाले नाही तर कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊन आपण आपली समजूत घालून घेतो. आणि तेही जर जमलं नाही तर तो आतल्या आत दाबून ठेवतो. 

क्रोधाचा मागोवा घेत आपण अगदी पुराणकाळापर्यंत गेलो तर असे दिसते की देव-देवता, ऋषीमुनी, भलेमोठे तपस्वी हे सर्व लोक या क्रोधाने पछाडलेले होतेच की. त्यांच्या क्रोधाच्या काही छटा आता आपण पाहूयात. 

दक्षयज्ञ कथा

क्रोधावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर सर्वनाश कसा होतो ही दर्शवणारी ही उत्तम कथा आहे. ब्रह्मदेवाचे पुत्र प्रजापती दक्ष त्यांना सर्वजण आदरपूर्वक प्रणाम करायचे. निमिषारण्यात भगवान शंकरांची आणि त्यांची भेट झाली तेव्हा शंकरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. साक्षात जावईच आपल्याकडे लक्ष देत नाही या कारणामुळे दक्ष महाराज भयंकर रागवले आणि शंकरांवरचा त्यांचा क्रोध काही केल्या शमेना. 

या तथाकथित अपमानाचा बदला घेण्यासाठी दक्षाने आयोजित केलेल्या महायज्ञामध्ये त्याने भगवान शंकरांना सोडून ब्रह्मदेव विष्णू यांच्यासोबत सर्व ऋषिगण आणि देवदेवतांना निमंत्रण दिले. 

‘निमंत्रणाशिवाय जाऊ नको’ असे शंकरांनी पुन्हापुन्हा सांगून सुद्धा माता सती ‘आपल्या माहेरचेच कार्य आहे त्याला निमंत्रणाची काय गरज’ असे समजून यज्ञस्थळी पोहोचली. पुढे तिथे सर्वांसमोर आपल्या पित्याने आपल्या पतीचा अपमान केला याचा राग सहन होऊन तिने आपले जीवन तिथेच संपवण्याचा निर्धार केला. 

विरहाग्नी, योगाग्नी, क्रोधाग्नी या अग्निंमध्ये तिचा देह क्षणार्धात भस्म झाला असे म्हणतात. 

माता सतीबरोबर आलेले शिवगण क्रुद्ध झाले आणि त्यांनी दक्षयज्ञाचा विध्वंस सुरू केला. भगवान शंकरांना ही वार्ता नारदमुनींनी सांगितली आणि एरवी शांत असलेल्या शिवाचा उद्वेग झाला. त्यांनी वीरभद्र आणि महाकालीची निर्मिती केली. या दोघांनी यज्ञास आलेल्या सर्व देवदेवतांचा पराभव करून दक्षाचा वध केला आणि त्याचे शीर यज्ञकुंडात टाकून जाळून टाकले. 

क्रोधावर वेळेत नियंत्रण न आणल्यानेच ही शोकांतिका झाली. 

पुरण कथांमधल्या क्रोधमूर्ती 

रामायणात लक्ष्मण हे साक्षात क्रोधाचे प्रतीक आहे. बारीकसारीक गोष्टींमुळे लक्ष्मण रागावतो आणि श्रीराम त्याच्या रागावर हळुवार फुंकर घालून त्याला शांत करतात हे आपल्याला ठिकठिकाणी दिसते. अनेक ऋषीमुनी सुद्धा त्यांच्या क्रोधामुळे पुराणकथांमध्ये प्रसिद्धी पावले आहेत. 

क्रोध म्हणलं की चटकन कुठलं नाव लक्षात येत असेल तर ते म्हणजे भगवान परशुरामाचं! हैहय वंशाचा अधिपती का‌र्त्तवीर्यअर्जुन होता. याला त्याच्या अमोघ शक्तींमुळे सहस्त्रार्जुन सुद्धा म्हणायचे. या सहस्रार्जुनाने लोभबुद्धीने परशुरामाचे पिता जमदग्नीमुनी यांच्या आश्रमातून कपिला कामधेनूला चोरून नेली. या घटनेमुळे चवताळून परशुरामाने सहस्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले आणि त्या युद्धात त्याचे हजारो हात कापून टाकले आणि शिर धडापासून वेगळे केले. प्रतिशोधाच्या अग्नीमध्ये जळत असलेल्या सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी परशुरामाच्या अनुपस्थित ध्यानस्थ जमदग्नी मुनींची हत्या केली आणि हे दुःख सहन न झाल्यामुळे माता रेणुकेने चितेमध्ये उडी टाकली आणि जीवनाची समाप्ती केली. सहाजिकच परशुरामांच्या क्रोधाची पराकाष्ठा झाली आणि त्यांनी पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा घेतली. क्रोधाग्नीमध्ये धुमसणाऱ्या परशुरामांनी क्षत्रियांशी 21 वेळा युद्धे केली तरीही त्यांचा क्षत्रियांवर असलेला राग काही शांत होईना. पुढे रामायणामध्ये प्रभू श्रीरामांनाच तो राग शांत करायला लागला. प्रभू श्रीरामांनी शिवधनुष्य भंग केला ही वार्ता समजल्यानंतर परशुराम तात्काळ आकाशमार्गाने मिथिलानगरीला पोहोचले आणि त्यांनी श्रीरामांना आव्हान दिले. "सुनहु राम जेहि शिवधनु तोरा, सहसबाहु सम सो रिपु मोरा" असे म्हणत त्यांनी श्रीरामांना वैष्णव धनुष्याला प्रत्यंचा चढवण्याचे आव्हान दिलॆ. 

अर्थातच रामप्रभूंनी विनयपूर्वक त्यांचे स्वतःचेच वैष्णवधनुष्य लीलया पेलून त्यावर बाण चढवला आणि परशुरामाला विचारलं कि हा बाण आता कुठं मारू? आता रामबाण तर व्यर्थ जाऊच शकत नव्हता. इथेच परशुरामांना श्रीराम म्हणजे साक्षात श्रीविष्णूच आहेत ही ओळख पटली आणि त्यांनी अतिशय विनम्रतेने सांगितले की, प्रभू हा बाण माझ्या क्रोधावर आणि अहंकारावर मारून त्याला संपवा. या प्रसंगानंतर शांत होऊन परशुराम तपस्येसाठी निघून गेले. 

विश्वामित्रांचा राग सुद्धा जगप्रसिद्ध आहे. फक्त वशिष्ठमुनी सोडून सर्व लोकांनी, अगदी देवदिकांनीसुद्धा, त्यांचे ब्रम्हर्षीपद मान्य केले होते. या कारणास्तव त्यांचा वशिष्ठमुनींवर प्रचंड राग होता. ‘हा वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाही ना, मग यालाच मी संपवून टाकतो’ असे म्हणत हे तलवार घेऊन वशिष्ठांना मारायला निघाले होते. वशिष्ठांच्या आश्रमात पोचल्यावर विश्वामित्रांनी पाहिले की मुनीवर आणि त्यांची पत्नी अरुंधती टिपूर चांदण्यात गप्पा मारत बसले होते. अरुंधती म्हणत होत्या की आज चांदणं किती सुंदर पडले आहे. किती त्याची प्रभा आहे, किती त्याचं तेज आहे, किती त्याची शांती आहे! यावर वशिष्ठमुनी म्हणाले ‘हे चांदणं विश्वामित्रांच्या तपस्येसारखं सर्वत्र पसरलं आहे’. तेव्हा अरुंधती म्हणाल्या की मग तुम्ही विश्वामित्रांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही? वशिष्ठ मुनी म्हणाले की ब्रह्मर्षी व्हायची त्यांची योग्यता आहेच पण क्रोधामुळे त्यांचे सर्व ज्ञान शून्य होते. हे जेव्हा विश्वामित्रांनी ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी तलवार टाकून वरिष्ठांच्या पायावर डोके ठेवून क्षमायाचना केली. तेव्हा वसिष्ठांनी त्यांचा हात धरून उठवले आणि म्हणले ‘विश्वामित्रमुनी, आज तुम्हाला ब्रह्मर्षि पद मिळाले!’

द्रौपदी हे महाभारतातले असेच एक क्रोधग्रस्त व्यक्तित्व आहे. हिचा जन्म अग्निकुंडातून झाला अशी आख्यायिका आहे. जणू यामुळेच ती जन्मभर या ना त्या कारणांमुळे क्रोधामध्ये जळत राहिली. तिचा राग युधिष्ठीरावर सतत काढत असे आणि त्याला घालून पाडून बोलत असे. सारे महाभारत द्रौपदीमुळे घडले असेही म्हणता येऊ शकते. 

आधुनिक युगातले रामायणकार संत तुळशीदास यांचे मूळ नाव होते तुळशीराम. यांचे पत्नीवरअतिशय प्रेम होते. एक दिवशी त्यांना न सांगता ती आपल्या भावाबरोबर माहेरी निघून गेली. विरह, कामातुरता आणि आलेला क्रोध यामुळे भावनाविवश होऊन तुळशीदास तिला परत घरी आणायला निघाले. असे म्हणतात की ती वेळ रात्रीची होती आणि यमुनानदीला तुफान पूर आलेला होता. अंधारात त्यांनी एक ओंडका पकडून नदी पार करायला सुरुवात केली आणि मग कळले की तो ओंडका नसून ते प्रेत आहे. पत्नीच्या घरी पोहोचलयावर थेट माडीवर तिच्या खोलीत जाण्यासाठी ते दोरावर चढले तो कळले कि हा तर साप आहे! अचानक मध्यरात्री पतीला पाहून त्यांची पत्नी रत्नावली चकित झाली आणि क्षणातच नक्की काय भानगड आहे हे तिच्या ध्यानात आले! तिने तात्काळ एक दोहा रचना तो असा आहे - 

अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रीति !
नेकु जो होती राम से, तो काहे भव भीत ?

पत्नीचे हे मार्मिक वचन ऐकताच तुळशीराम यांना उपरती झाली आणि त्यांचे तुळशीदास बनले. पुढे त्यांनी रामचरितमानस या दिव्य ग्रंथाची निर्मिती केली आणि संतपद प्राप्त केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. तुळशीदास त्यांचे सगळ्यात मोठे योगदान कुठले असेल तर मुघलांच्या काळात अनंत अत्याचार होत असताना त्यांनी सर्व हिंदूंना धीर दिला. तुमचे रक्षण करायला प्रभू श्रीराम आहेत तेव्हा आपला धर्म सोडू नका, धर्मावरची निष्ठा घालवू नका हा त्यांचा संदेश होता. 

क्रोध खरंच इतका वाईट आहे का? 

तर अशा या क्रोधाच्या अनेक छटा आपण पाहिल्या. सुरुवातीला म्हणलं तसं क्रोध ही माणसांची सहजप्रवृत्ती आहे. तो देवादिकांना आणि ऋषीमुनींना ही चुकलेला नाही. खरंतर क्रोध केवळ एक ऊर्जा आहे आणि म्हणूनच ती चांगली ही नाही आणि वाईटही नाही. त्याचे रूपांतरण कसे करतो त्यावर त्याची परिणिती कशात होते हे ठरते.

क्रोधाने दक्ष राजाचा नाश केला. शिव आणि सतीची ताटातूट केली. याच क्रोधाने परशुरामाला साक्षात् श्रीविष्णूंचे दर्शन घडवले. क्रोधाचा त्याग केल्यावरच विश्वामित्राला ब्रह्मर्षीपद प्राप्त झाले. आणि अर्वाचीन काळातील उदाहरण पाहिले तर कामक्रोध यांच्या आवेशात पत्नीची भेट झाल्यामुळेच तुळशीदास रामचरितमानस या महान ग्रंथाची निर्मिती करु शकले.

रागीट माणसाचा समाजामध्ये नेहमीच तिरस्कार होतो. त्याची हेटाळणी होते. लोक त्याच्यापासून दूर राहतात. यामुळेच बऱ्याच वेळा आपण आपला राग दाबून ठेवायला शिकतो आणि त्यातून अनेक विकृती निर्माण होतात. मला वाटते याची गरज नाही. मर्यादित प्रमाणात रागाला वाट मोकळी करून देणे अतिशय आवश्यक आहे, अर्थात अंततः क्रोधाचा सामना ज्याला त्याला स्वतःलाच करायला लागतो. कोणीही कितीही सांगितले तरी जोपर्यंत आपण ठरवत नाही नाही तोपर्यंत आपण या ऊर्जेचे विधायक रूपांतरण करू शकत नाही. 

वर उद्धृत केलेल्या सर्व कथा केवळ सूचक आहेत. एकच सांगावेसे वाटते की या क्रोधाची भीती न बाळगता आपण त्याला समजून घेऊया. रागातूनही नक्कीच काहीतरी चांगले घडवता येऊ शकते याचा विश्वास बाळगुयात. 

क्रोधाचे सकारात्मक रूपांतरण ही एक कला आहे आणि त्यातून आपण वैयक्तिक आणि सामाजिक उन्नयन घडवू शकतो याचा मला स्वानुभव आणि विश्वास आहे. 

सौ. मंगलाताई गोडसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा