झाडं वाट बघत असतात
शिशिर येण्याची
पानगळ होण्याची
विरक्त होण्याची
नको ते आपसूक
त्यागून देण्याची
आणि पुन्हा एकदा
वसंतात बहरण्याची
फार हेवा वाटतो झाडांचा
हे शिशिरदान माणसाच्या
आयुष्याला का नाही लाभले?
इथे येतात उन्हाळे, पावसाळे, हिवाळे,
नको त्या गोष्टींची भर होते
त्यांची पानगळ कशी करावी?
त्यांचे निर्माल्य कुठे सोडावे?
कसे विरक्त व्हावे?
परत नव्याने कसे फुलावे?
की झांडाप्रमाणे वरवर फुलत रहावे
आतल्या गाभ्यातले मात्र दडवून ठेवावे?
यशवंत काकड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा