काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, आमच्या इमारतीच्या खाली ५/६ वर्षाची मुलं खेळत होती. खेळता-खेळता काहीतरी बिनसलं, भांडण झालं आणि परिस्थिती जरा जास्तच बिघडली. एक जण दुसऱ्याला म्हणाला," मै तुझे जान से मार ङालुंगा" आणि हातातली बॅट घेऊन त्याच्या मित्राच्या अंगावर धावून गेला. आजूबाजूच्या मंडळींनी हस्तक्षेप करून भांडण मिटवले. त्यांच्या आयांची नंतर “आपलंच मूल कसं बरोबर आहे” यावर बाकी बायकांबरोबर चर्चा सुरु होती, पण माझ्या डोक्यातून "मै तुझे जान से मार ङालुंगा" जात नव्हतं." एखाद्याचा समूळ नाश करून टाकण्याचा विचार इतक्या कोवळ्या वयात कदाचित अजाणता असेल पण घातक नाही का?
राग आला होता कारण कदाचित विचार पटले नाही, वागणं आवडलं नाही किंवा मनासारखा झालं नाही. यावर त्याला मारून टाकण्याचा विचार मनात येणे चुकीचं आहे. या विचारला वेळीच सुधारणे गरजेचं आहे. या विचाराचे मूळ कदाचित काही कार्टून मालिका, हाणामारीचे हिंदी सिनेमे किंवा सहज उपलबध असणाऱ्या वेब सिरीज मधे असेल पण बघितलेल्या प्रसंगाचं अनुकरण करून त्याप्रमाणे कोणी प्रयोग करून बघितला तर……..
आजच्या सिनेमामध्ये दाखविला जाणारा हिंसाचार किंवा त्याचे पडद्यावरचं सादरीकरण हे सूचक नसते त्याऐवजी खूप बटबटीत किंवा कारण नसतांना बारकाईने बऱ्याच गोष्टी दाखवण्याकडे कल वाढला आहे. कोवळी मन हे सगळं पाहतात आणि अनुकरण करतात.
एखादी वस्तू, व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) किंवा अजून काही मिळाली नाही तर प्रचंड राग येऊन ती मिळवण्यासाठी वाटेल ते करणे किंवा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माणुसकीला काळिमा लावणार आहे.
मुलांचा वाढत जाणारा टेक्नॉलॉजीचा वापर चिंताजनक आहे. मन:स्वास्थ्यासाठी लागणारी शांतता, स्वस्थता जवळपास नाहीशी होत चालली आहे. दररोज ७ ते ८ तासांची झोप टेक्नॉंलॉजीने पळवून लावली आहे. बदलत जाणणारी खाद्य संस्कृती मनाच्या आरोग्याला बिघडवायला हातभार लावते आहे. शारीरिक थकवा व अस्वस्थता मनामधे चिडचिड क्षोभ निर्माण करतो.
स्वतःच्या स्वतः कडून असलेल्या अपेक्षां पूर्ण झाल्या नाही तर मन अशांत होते मग राग,चीड-चीड यांची उत्पत्ती होते. तसेच अशाच अपेक्षा जोडीदार, सहकारी, मित्र किंवा अपत्य यांच्याकडून पूर्ण झाल्या नाही की उत्पन्न होणार नैराश्य संतापाला जन्म देतं. समोरची व्यक्ती कितीही जवळची असली तरी तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करण मुलांना शिकवण आणि आपण अंगिकारण गरजेचं आहे. एखादी मुलगी एखाद्या मुलाला नाही म्हणाली तर तिच्या मताचा आदर करणे मुलांना शिकवायला हवे. एखाद्याचा समूळ नाश चिंतण्यापर्यंत जर रागाची मजल गेली असेल तर तो समाजासाठी घातक आहे. राग येणे हे एका स्वाभाविक मानवी भावना आहे. रागाचा भर ओसरल्यावर तुम्ही त्याला तुमच्या मनातून काढून टाकू शकला नाही तर तुमच्या शाररिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा सर्व ठिकाणी त्याचा दुष्परिणाम व्हायला सुरवात होते. एखाद्याची उणीव, दोष किंवा आणखी काही पटलं नाही तर त्याच्यावर उपाय शोधणं हे संताप करण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरतं. काबूत न ठेवता येणारा राग विविध आजारांना आमंत्रण देतो.
"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" असे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे तर रामदास स्वामीं म्हणतात " नको रे मना क्रोध हा खेद कारी" क्रोधाने काही साध्य होत नाही, आपली संस्कृती सांगते योग, ध्यान-धारणा यामुळे मनोबल वाढवतं. ईर्ष्येला, नैराश्याला दूर ठेवणं गरजेचं आहे. मनात उत्पन्न होणाऱ्या नकारात्मक भावनांवर विजय मिळवता आला तर रागावर नियंत्रण ठेवणं कठीण नाही. चला तर मग संस्कृतीशी मैत्री करूया.
नका देऊ थारा भय, नकार, रागाला
कल्पकता, यश देईल आनंद मनाला
मनात अविरत लपंडाव भावनांचा
विश्वास, भरवसा असे पाया प्रसन्न मनाचा
क्षमा, द्या, फुलविल जगाला
निस्वार्थ प्रेम, रंगीत करेल आयुष्याला
हेमांगी वेलणकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा