ममा मला नाही या शाळेत जायच,मला नाही आवडली नवीन टीचर! मला मागच्या वर्षिची टीचर हवी,तीच चांगली आहे.आज आलेली टीचर क्लासमधे आल्यावर इतक्या मोठ्या आवाजात बोलली की घाबरले ना मी एकदम !असे म्हणताना डोळ्यात पाणी. अरे काय झाले माझ्या सोनीला असे म्हणत मी पुढे गेले.माझा हात झिडकारून देत ती दाणकन सोफ्यावर बसली.आता तिला समजावणे कठीण होते.केवढा मोठा राग आला होता नाकावर! मी म्हटले अग आज तर शाळा सुरू झाली आणि ती टीचर खूप चांगली आहे म्हणतात.तुला ओरडली का टीचर? तू बडबड ,गप्पा करीत होती का? तर रागात उत्तर—“तू मला काहीतरी प्रश्न विचारू नको.टीचर मला नाही ओरडली आणि मी बोलत पण नव्हते कोणाशी.टीचर खूपच मोठ्याने बोलली म्हणून क्लासमधे पिनड्राॅप साइलेन्स झाला.सर्व मुले घाबरली होती.” आता मला हसू येत होते ते दिसू नये म्हणून मी तोंडावर हात धरून बसले.मला समजत होते टीचरने क्लास ताब्यात घेतला आणि मुलांना आपल्या कंट्रोलमधे ठेवायचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी मुलांवर जरा वचक बसवला नाही तर ही लहान मुले वर्ग डोक्यावर घेतात.कशीतरी तिची समजूत घालून तिला जेवायला दिले. दुस-या दिवशी ती शाळेतून येण्याची मी वाट पहात होते, आज कसा मूड आहे बाईसाहेबांचा बघायचे होते तर ही अगदी नाचत आली.आज टीचर मला ‘व्हेरी गुड ‘म्हणाली.ती मला नाही रागवत पण बोलले कोणी तर त्यांना ओरडते.मलासुद्धा बरे वाटले.नवीन टीचर हळूहळू आवडू लागली तर! पण हा एवढा राग या लहान मुलांना येतोच कसा याचा विचार मी करू लागले.राग ही अशी एक गोष्ट आहे की ती माणसाकडे उपजतच असते .लहान बाळ सुद्धा दुधात बदलझाला तर बाटली टाकून देते किंवा तोंडातले दूध बाहेर टाकून देते.गडगड आवाज करते पण दूध गिळत नाही.बोलता येत नाही पण राग येत असावा त्याला.
राग येण्याचे मुख्य कारण असते अपेक्षाभंग.अपेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात.पालकांची मुलांकडून,नव-याची बायकोकडून ,आपली बाॅसकडून तर बाॅसची आपल्याकडून.या अपेक्षा एकमेकांकडून पूर्ण झाल्या नाहीत तर त्रास हा होतोच.
परवाच घडलेली एक गंमत सांगते.त्या दिवशी रेवतीला चतुर्थीचा उपास होता.भरभर स्वयंपाक आटोपून मैत्रिणींबरोबर शाॅपिंगला जायचे ठरले होते.तिने नव-याला म्हणजे रमणला आवडणारी भाजी केली. कोशिंबीर व पोळ्या करून झाल्या.आता फक्त आमटी करायची तेव्हड्यात फोन वाजला तो घ्यायला ती पटकन बाहेर गेली.परत येवून आमटी पूर्ण करून तिने सर्व जेवण टेबलावर आणून ठेवले .बरोबर चटणीची बाटली ठेवायला ती विसरली नाही.”तुझ्यासाठी फ्रूटसॅलॅड करून ठेवले आहे ते घ्यायला विसरू नको आणि जेवून घे”असे रमणला सांगून ती बाहेर पडली.मैत्रिणिंशी मनसोक्त गप्पा आणि मनपसंत खरेदी करून ती घरी आली.आल्यावर रमण तिच्याशी बोलणे टाळत होता,तो रागावलेला वाटला.”काय झाले,जेवलास का “ विचारताच रमणच्या रागाचा स्फोट झाला जणूं.”अग फ्रूटसॅलॅड केले म्हणालीस म्हणून मी शेजारच्या नंदूला माझ्याबरोबर जेवायला बोलावले.किचनमधे जावून बघतो तर फ्रूटसॅलॅड तू शिजवलेस?गॅसवरचे गरम फ्रूटसॅलॅड बघून लाज वाटली मला.पूर्ण अपेक्षाभंग झाला माझा.आमटी खारटआणि भाजी अळणी.तुझे लक्षच नव्हते स्वयंपाक करण्यात.फ्रूटसॅलॅड कसे करायचे एव्हडेसुद्धा माहित नाही तुला तर केलेस कशाला? शेवटी नंदूला घेवून मी बाहेर जेवून आलो.एका दमात एव्हडे बोलणे ऐकून रेवती भांबावली.गॅसवरचे फ्रूटसॅलॅड पाहून तिला रडू आवरेना.तिने रमणकडे परत परत दिलगिरी व्यक्त केली आणि थोड्या वेळाने रमण शांत झाला.म्हणाला ‘अग असू दे,होते कधीतरी असे.आज उपास आहे न तुझा ,टोपल्यात थोडी फळे आहेत ती तरी खावून घे बरे वाटेल तुला’ - ही गोष्ट झाली अपेक्षाभंगाची आणि म्हणून आलेल्या रागाची.
आता विचार येतो अपेक्षा ठेवायच्याच कशाला?अपेक्षा ठेवल्याच नाहीत तर अपेक्षाभंगाचे दु:ख वाट्यास येणारच नाही.यावेळी लक्षात ठेवायला पाहीजे की एकमेकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळेच तर आपल्यातील नाती,संबंध हळूवारपणे गुंफले जातात नाही का?
कधीकधी आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळण्याची खात्री असते ,खूप प्रयत्न केलेले असतात पण अनपेक्षितपणे अपयश आल्यास होणारे दु:ख मोठेअसते आणि राग येण्यास कारण ठरते .
राग येण्याचे अजून एक कारण असते सामाजिक चीड.यामधे आपण helpless आहोत असे वाटत राहते. आपण बघतो हल्ली प्रत्येक ठिकाणी कोणत्याही कामाला प्यूनपासून वरच्या पोस्टवर असणारी माणसेसुद्धा आपल्या कडून पैसे मिळण्याची अपेक्षा करतात आणि आपण तसे केले तरच आपले काम लवकर होते.म्हणजे लाच देवून काम करून घेणे आपल्या तत्वामधे
बसत नाही तरी तसे करावे लागल्यास चीड येते.
अनेक वेळा पेपरमधे वाचतो लहान मुलींवर होणारे अत्याचार ,वडिलांनी दारू पिवून बायकोमुलांना मारणे,शिवीगाळ करणे,पैशासाठी सूनेला विविध प्रकारे त्रास देणे असे domestic violence चे प्रकार !अशा लोकांचा राग येतोच पण आपण काही करू शकत नाही याचे वाईट वाटते.
अनेकदा आपण पाहतो गरीब बिचारे मजूर ऊनपावसात राबतात,जीवाची पर्वा न करता पोटाला काही मिळवण्यासाठी,बायको मुलांसाठी दिवसभर कष्ट करतात पण संध्याकाळ झाल्यावर
त्यांचा मुकादम मात्र त्यांना क्षुल्लक पैसे देवून आपले खिसे भरत राहतो.लाचार असतात ही गरीब माणसे! दुस-यांना लुबाडणे,निष्कारण त्रास देणे,जागोजागी अन्याय होताना बघणे
याचा खूप राग येतो पण आपण हात चाेळत बसतो.देशामधे करप्ट लोक मंत्री होताना बघणे आणि तुलनेने चांगल्या लोकांना विरोधात बसायला लागणे हे सुद्धा सहन न होणारे राजकारण आहे.म्हणजे चोराला तिजोरिची किल्ली द्यायची आणि तो काय काय घेवून जातो ते बघत बसायचे हे सर्व रागाचे कारण होते आणि समाजापासून विरक्ती येवू लागते,पण ही वीरक्तीची भावना जास्त काळ टिकू शकत नाही.शेवटी आपण आपल्या संसारात गुरफटतो.
राग हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.कित्येक वेळा मनुष्य रागामधे स्वत:चे नुकसान करून घेतो आणि मग उरतो फक्त पश्चात्ताप .आपल्याच लोकात आपण दुरावा निर्माण करतो.राग ही मनाची एक अवस्था आहे जी प्रत्येक व्यक्तीमधे असते.रागामुळे समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे,त्याला मुद्दाम मदत न करणे,अबोला धरणे,अपशब्द बोलणे अशा गोष्टी केल्या जातात.यातून समोरची व्यक्तीपण रागावतेआणि भांडणे,वादविवाद होवू लागतात.कधी बाहेरचा राग घरात काढला जातो.अशा गोष्टींचा घरातल्या मुलांवर विपरीत परिणाम होतो.रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात म्हणून प्रत्येकाने रागावर नियंत्रण ठेवले पाहीजे.आपलेच खरे न समजतां दुस-याचे सुद्धा मत ऐकून त्यावर विचार करणे आपली चूक झाली असेल तर ती कबूल करणे,दुस-याला माफ करणे,सोडून देणे या गोष्टींचे अवलंबन केले पाहीजे.अविचारापासून विचारापर्यंत गेल्याने जीवनात आनंदच निर्माण होईल!
कल्याणी पाध्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा