माझा सफरनामा - पश्चिमी युरोप - एक संस्कृती सफर



एखाद्या देशाची ट्रीप प्लॅन करायची म्हटले, कि परिवारातल्या सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहायला लागतो. आपण फिरायला जाणार तिथे बघण्यासारखे काय काय आहे, याची माहिती विविध मार्गांनी गोळा करण्यात चढाओढच लागते जणु. आणि प्रत्येकाच्या रुचीही भिन्न. त्यामुळे यावेळीही पश्चिमी युरोपची ट्रीप करायची म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांची तिथे जाऊन काय काय करायचे आहे, बघायचे आहे, याची जोरात चर्चा सुरु झाली. तिथल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची यादी तयार झाली. ट्रीपच्या कालावधीत ती सगळी ठिकाणे बसवण्याची तारेवरची कसरत ही सुरु झाली. ट्रीपची योजनाबद्ध रूपरेखा बघून एकीकडे मला कौतुक नक्कीच वाटले, पण रोजचा सकाळी ७ ते रात्री ९ असा भरगच्च कार्यक्रम पाहून, आणि त्यापेक्षाही त्यातल्या ठिकाणांची यादी बघून, मी काहीशी अंतर्मुख झाले. आपण देश बघायला चाललो आहोत, कि तिथली पर्यटक स्थळे? या ट्रीपनंतर आपल्याला त्या देशाची संस्कृती, राहणीमान, जीवनपद्धती या गोष्टींचे ज्ञान होईल, कि आपण फक्त तिथल्या पर्यटक मंडळाला आपल्याला जे दाखवायचे तेवढेच बघून परत येणार? हे विचार मला स्वस्थ बसू देईनात. मी काहीशी गप्प झाल्याचे आणि चर्चेत फारशी सहभागी न झाल्याचे घरातल्यांच्या चाणाक्ष नजरेने टिपले. विचारताक्षणी, ती संधी न दवडता, मी माझ्या मनातले विचार त्यांना बोलून दाखवले. माझ्या विचारांशी जरी त्यांची सहमती असली, तरी प्रत्येकाच्या सुट्टीवर जाण्याच्या आपापल्या ज्या कल्पना होत्या, त्यांचा आदर करणेही तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे मधला मार्ग शोधून सुवर्णमध्य साधायचे ठरले. निवडक पर्यटक स्थळे बघण्याव्यतिरिक्त, रिसॉर्ट हॉटेल च्या ऐवजी रहायला रेंटल सर्विस्ड स्थानिक घरे, गाईडेड पॅकेज टूर किंवा टॅक्सी च्या ऐवजी स्थानीय परिवाहन, रोजच्या सवयींतले खाद्यपदार्थ बरोबर नेण्याऐवजी जाऊ तिथल्या पदार्थांचे आस्वाद घ्यावेत असे काही पश्चिमी युरोपच्या संस्कृतीचा थोडा फार जवळून परिचय करून घेण्याचा प्रयत्न करण्याचे विचार मांडले गेले. सर्वसंमतीने फ्रान्स मधील पॅरिस, स्वित्झर्लंड मधील झुरिक आणि ऑस्ट्रिया मधील इंन्सब्रूक ही ठिकाणे ठरली. 

पॅरिस च्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागूनच स्थानीय ट्रेनचे स्टेशन होते. आधी तिथे जाऊन, आपण पॅरिस मध्ये ज्या अपार्टमेंट मध्ये रहाणार आहोत तिथे जायला आपल्याला कुठली ट्रेन घ्यावी लागेल, कुठल्या स्टेशनला उतरायला लागेल इत्यादी माहिती काढली. जगातील एका प्रगत देशाचे रहिवासी आम्ही प्रगत देशांमध्येच प्रवासाला जात असल्याने, सगळीकडे एस्केलेटर्स असतील या अपेक्षेत होतो. आणि बऱ्याच दिवसांचा प्रवास असल्याने आमचे सामानही तसे बरेच होते. पहिला सांस्कृतिक धक्का तिथेच बसला. काही मोठी स्टेशन्स सोडली, तर बऱ्याच स्टेशन्सवर जिनेच होते. लिफ्ट ही मोजक्याच स्टेशन्स वर होती. त्यामुळे प्रवास कितीही असो, पण सामान आपल्याला उचलता येईल तेवढेच न्यावे, या पाठाची प्रथम उजळणी झाली. ट्रेन अन बसने जाणे हा रिवाज युरोप मध्ये अधिक असल्याने सामान चढवणे, उतरवणे, आणि त्यापेक्षा म्हणजे ते ठेवण्याच्या सोयी बस ट्रेन मध्ये सहज उपलब्ध होत्या. "एवढे सामान आहे, तर आलात कशाला ट्रेन मध्ये?" असा भाव कुणाच्याही चेहऱ्यावर नव्हता. उलट, एकमेकांना मदत करण्याची, आपली सीट उठून गरजूंना देण्याची सवय तिथे बाळकडूतूनच सगळ्यांना मिळाली होती. अपार्टमेंट एका स्टेशन जवळच असल्याने स्टेशनवर उतरून चालत जाणे शक्य होते. पण स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकले, आणि उष्ण प्रदेशातून आलेल्या आम्हाला दुसरा झटका बसला. संध्याकाळी आयफेल टॉवर बघायला जाताना तो झटका लक्षात ठेवून, गरम कपड्यांचे अंगावर ३-४ थर, शिवाय हातमोजे, पायमोजे, कानटोपी, मफलर, असा एखाद्या युद्धावर चालल्याप्रमाणे नखशिखांत जामानिमा करून आम्ही पश्चिमी यूरोपच्या शिशिर ऋतुचा सामना करायला निघालो. आम्हाला पॅरिस मधल्या उंच ठिकाणी जाऊन संपूर्ण पॅरिस रात्री कसे दिसते ते बघण्यामध्ये रस होता. त्यामुळे 'आर्क द ट्रायम्फ' ला जाऊन, तिथल्या सलग अडीचशे वर्तुळाकार पायऱ्या एका दमात चढून गेल्यावर झालेल्या ३६० अंशांच्या पॅरिसच्या देखाव्याने मन मोहून घेतले. लांबच्या प्रवासाचा, जड सामाने उचलण्याचा, तसेच 'आर्क' च्या पायऱ्या चढून लागलेल्या धापेचा शीण एका क्षणात निघून गेला. दुतर्फा लावलेल्या दिव्यांनी आखीव वाटणारे रुंद रस्ते पॅरिसचा नकाशाच जणू दाखवत होते. रात्रीच्या वेळी विविधरंगी प्रकाशझोतांनी झगमगलेला आयफेल टॉवर दिमाखात ताठ मानेने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आपण या शहरात सर्वोच्च असल्याचा दावा करत होता. ८ पेक्षा जास्त वर्ग किलोमीटर पसरलेल्या व्हर्साय पॅलेसने १७व्या शतकातल्या गतवैभवाचे दर्शन घडवले. 

पॅरिसचे मनमोहक दर्शन झाल्यानंतर स्वित्झर्लंडकडे आम्ही मोर्चा वळवला. झुरिकच्या स्टेशनबाहेर पडताच पसरलेले ट्रॅमचे जाळे प्रथम नजरेत भरले. शिवाय बस, ट्रेन ही होत्याच. एकच तिकीट बस ट्रेन दोन्हीला चालणारी पद्धत अनेक ठिकाणी बघितली होती. पण झुरिक ची पद्धत निराळीच होती. गम्मत म्हणजे, झुरिक मध्ये तिकीट तासावर होते. तिकीट काढले, कि ते ठराविक वेळासाठी मिळायचे. तेवढ्या वेळात हव्या त्या मार्गाने, हव्या त्या वाहनाने हवा तेवढा प्रवास करावा. तिकीट पंच करण्याची पद्धत ही दिसली नाही कुठे. तसेच, आम्ही जेवढे फिरलो, तेवढ्या कालावधीत एकदाही तिकीट चेकर ही आला नाही. विश्वासावरच असावा बराचसा कारभार. आश्चर्य म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये त्यांची स्वतःची अशी भाषा नव्हती. जर्मनी, फ्रान्स, इटली अश्या तीनही देशांच्या सीमा असलेल्या या देशात, ज्या देशाच्या जवळचे शहर त्या देशातील भाषा, म्हणजे जर्मन, फ्रेंच किंवा इटालियन बोलली जात होती. झुरिक मध्ये सगळीकडे जर्मन भाषा. त्यांचे शब्द एवढे लांबलचक, कि एक शब्द म्हणजे जणु एक वाक्य वाटावे. स्टेशनांची नावे लक्षात ठेवता ठेवता नाकी नऊ आले. आणि शब्दांमध्ये स्वरांपेक्षा व्यंजनेच अधिक. इतकी, कि उच्चार करताना बोबडी वळावी. इंग्रजी मात्र बहुतेकांना कळत होते आणि नव्या पिढीला तर अस्खलित बोलता येत होते. माणसे वृत्तीने मृदू आणि मदतशील. त्यामुळे शहरात फिरताना नवखे असलो तरी काही अडचण आली नाही. एका तळ्यापासून सुरु झालेली आणि शहराच्या मधोमध वाहणारी लिम्मत नदी दिमाखात वळणे घेत ३५ किलोमीटरच्या प्रवासानंतर आरे नदीला मिळत होती. यूरोपमधला सर्वात मोठा धबधबा आपल्याकडे असण्याचे भाग्य झुरिकला लाभले आहे. १५००० वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेला १५० मीटर रुंद ऱ्हाईन फॉल दर सेकंदाला २३ मीटर या वेगात ऱ्हाईन नदीत कोसळत होता. धबधब्याच्या चहूबाजूंनी मोकळे असल्याने वेगवेगळ्या दिशेने त्याचे नयनरम्य दर्शन घेता आले. उटलीबर्ग नावाच्या डोंगरावर घाटात डौलदार नागमोडी जाणारी ट्रेन घेऊन डोंगराच्या कड्यावरून शहराचे निसर्गरम्य दर्शन घेताना दूरवर ढगांआड लपाछपी खेळत आल्प्स पर्वत खुणावत होता. 

स्वित्झर्लंडचीच एक सीमा असलेला देश म्हणजे ऑस्ट्रिया. ऑस्ट्रियातील इंन्सब्रूकचे वैशिष्ट्य म्हणजे आल्प्स पर्वत. तो बघण्यासाठी खास म्हणून झुरिक ते इंन्सब्रूक हा प्रवास ट्रेनच्या पॅनोरमा बोगीने करायचे ठरवले होते. खिडक्या किंवा भिंतींऐवजी सगळ्या बाजूंनी पारदर्शक काचा लावलेली ही बोगी खरेच प्रवासाचे वैशिष्ट्य ठरली. ट्रेनने झुरिक सोडताच, आल्प्स पर्वताने हजेरी लावली. बर्फाळ नजारा जिथे दृष्टी जाईल तिथे दिसत होता. झाडे, घरे, रस्ते, जे दिसेल त्यावर बर्फाने संगमरवरी नक्षीकाम केलेले दिसत होते. रस्ते म्हणजे जणु ब्राउनी केक वर वॅनिला आईस्क्रीम आणि कौलारू घरे म्हणजे जणु चॉकलेटच्या वड्यांवर सफेद आईसिंग. आल्प्स पर्वताचे शिशिर ऋतूतील वर्णन करणे म्हणजे तर शब्दच तोकडे पडावेत. जणु गुळाच्या खमंग गडदरंगी प्रचंड खड्यावर ठेवलेले ताजे खोवलेले शुभ्र खोबरे. इंन्सब्रूक तर आल्प्सच्या मिठीत वसलेले शहर. केबल कार ने आल्प्सच्या उंच कड्यावर जाऊन बघितलेले दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. हिमपर्वताच्या रांगा कुठपर्यंत पसरल्या असतील याचा अंदाज येणे कठीण. पर्वताच्या खाली असतानाचे दृश्य उंचावर गेल्यावर मात्र बदलले. आता तो पर्वत म्हणजे चंदेरी वर्खाखाली दडलेला कोकोची बर्फी वाटू लागला. शहरात तापमान १ ते २ डिग्री असल्याने कुडकुडणारे आम्ही, पर्वताच्या टोकावर भर माध्यान्ही गेल्याने सूर्यप्रकाशामुळे त्याच तापमानात जाणवणारी उबदार हवा अनुभवून संभ्रमात पडलो. गिर्यारोहकांसाठी पर्वणी असलेले हे ठिकाण. त्यांची पदचिन्हे, चढताना उमटलेल्या काठ्यांच्या खुणा आणि त्यांनी रोवलेले झेंडे त्यांच्या यशाच्या कहाण्या सांगत होते. नेटाने बर्फात पाय रोवत चढणारे असे अनेक पर्वतारोहक केबल कार मधून जाताना वाटेत दिसले. इतर पर्यटक मात्र थोड्याशा बर्फावरही निसरडे असेल म्हणून जपून पाय टाकत होते. ८ देशांवर आपली छाया पसरवणारा हा आल्प्स पर्वत विमानातून परत जाताना आपला पसारा किती मोठा आहे याची हलकीशी जाणीव करून देत गेला. 

रिसॉर्ट हॉटेल ऐवजी रेंटल सर्विस्ड स्थानिक घरांमध्ये राहण्याची कल्पना तिथल्या संस्कृती आणि जीवनपद्धतीचा परिचय करून घेण्यासाठीच नाही, तर एकंदरच प्रशस्त जागा आणि हव्या त्याच सुखसुविधांमुळे अतिशय समाधानकारक ठरली. प्रत्येक ठिकाणी जाताच, ज्यांच्या मालकीचे घर होते ते स्वतःच स्वागतासाठी आल्याने स्थानिक लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधता आला आणि समक्ष वार्तालापही करता आला. टूर गाईड नव्हे, तर प्रत्यक्ष तिथल्या रहिवाश्यांकडून शहराची माहिती मिळाल्याने ती अधिक उपयुक्त सिद्ध झाली. घराजवळ सुपरमार्केट दर वेळी होतेच. तिथे स्थानिक पदार्थ घेता तर आलेच, पण त्या निमित्ताने थोडी फार संभाषणाची संधीही मिळाली. कुठल्याही देशाच्या संस्कृतीचा उल्लेख तिथल्या खाद्यसंस्कृतीशिवाय पूर्ण होईल का? आजकाल सगळीकडे जरी सगळे पदार्थ मिळत असले, तरी जो पदार्थ ज्या देशातला मूळचा, तिथे जाऊन तो खाण्यात जी मजा आहे, ती एअरफ्लोन पदार्थांमध्ये येणे कठीण. फ्रान्स मध्ये जाऊन खाल्लेले फ्रेंच क्रेप आणि मॅकरून, स्वित्झर्लंड मध्ये जाऊन चाखलेले स्विस चीज फॉण्ड्यूचे विविध प्रकार आणि लिंड्ट च्या चॉकोलेट शॉपमधले स्विस लिंडोर चॉकोलेट, तसेच ऑस्ट्रिया मध्ये जाऊन चवीने अनुभवलेले ताजे प्रेट्झेल, आणि अश्या अनेक स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतल्याने या संस्कृतीसफरीचे सार्थक होण्यात नक्कीच हातभार लागला.

डॉ अर्चना कुसुरकर 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा