आजोबांची ओसरी भाग सहा


आजोबांच्या  ओसरीवरील गोष्ट ऑडिओ स्वरूपात ऐका येथे

मनाविरुद्ध काही झाले, आपले म्हणणे समोरच्याने ऐकले नाही, किंवा अशीच काही कारणे.अशावेळीस कोण जाणे कुठून, राग नावाचा राक्षस आपल्यामध्ये घुसतो. मग आपण इतरांचे काय, स्वत:चे देखील ऐकत नाही. इतरांनी आपले ऐकावे म्हणून काय मनाला येईल ते बोलत सुटतो. इतरांना मात्र हा काय बोलतोय ते समजत नाही. कारण आपल्या आतून राग बोलत असतो, आपण नव्हे! त्याची भाषा कोणालाच समजत नसते. त्यामुळे तो आणखीनच न समजणाऱ्या भाषेत ओरडायला लागतो. आपला काय प्रॉब्लेम होता ते कोणालाच कळत नाही. 

आपले बोलणे समोरच्या माणसाला समजत नाहीये हे आपल्या आतल्या रागाला बरोबर समजते. मग तो राग नावाचा राक्षस समोरच्या माणसामध्ये प्रवेश करतो. आता ते दोन्हीकडचे राक्षस एकमेकांशी त्यांच्या रागीट भाषेत बोलून आपापले प्रॉब्लेम सांगू लागतात. त्यांचे किंचाळणे आपल्याला ऐकू येते, पण त्यात आपला मूळ प्रॉब्लेम बाजूलाच ठेवलेला असतो. त्यामुळे आपण आणखीनच निराश होतो. 

कुठल्या का कारणाने असो, पण राग आला, की माणसे राग नावाच्या राक्षसाच्या ताब्यात जातात आणि असे काही तरी करून बसतात की ज्यामुळे त्यांचे स्वत:चेच जास्त नुकसान होते. राग फक्त माणसांनांच येतो असे नाही. कुठल्याही प्राण्याला हा राक्षस झपाटू शकतो.

आज आपण या राक्षसाच्या काही गोष्टी ऐकणार आहोत. जेव्हा हा राक्षस तुमचा ताबा घेईल, तेव्हा या गोष्टी आठवून पहा. कोणी सांगावे, राक्षस पळून जाईल आणि तुमची सुटका होईल! 

१ ) एक साधू झाडाखाली ध्यान करीत बसला होता. तेवढ्यात तिथे एक माणूस आला आणि खूप रागाने त्याला वाईट बोलू लागला. "तुझ्या उपदेशाप्रमाणे मी वागलो, पण माझा काहीच फायदा झाला नाही. तू एक थोतांड आहे . खोटारडा आहे . मी संन्यासी झालो. मला खायला देखील काही मिळत नाही. तू मला फसविले." असे काहीबाही रागाने बोलत होता. त्याचा काहीही परिणाम साधूवर झाला नाही. तो शांतपणे जप करीत राहिला. 

साधूचे वागणे बघून माणसाला आणखीनच राग आला. त्याने आता साधूला शिव्या द्यायला सुरवात केली. तरीही साधू काही न बोलता जप करीत राहिला. शेवटी तो माणूस थकून गेला. त्याने साधूला विचारले, "मी गेले तासभर तुझा अपमान करीत आहे, शिव्या देत आहे तरीही तुला मुळीच राग आला नाही. तू शांतपणे सगळे कसे काय सहन करू शकतोस?"

साधूने एकवार त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला -"तुझे शब्द मी ऐकले, पण स्वीकारले नाही."

तो माणूस गोंधळून गेला. "स्वीकारले नाही म्हणजे काय? तू मला प्रत्युत्तर दिले नाहीस म्हणजे तुला सगळे कबूल आहे! जर माझ्या विरुद्ध काही सांगण्यासारखे असते तर तू सांगितलेच असते."

साधू म्हणाला- "मी तू केलेला अपमान आणि शिव्या घेतल्याच नाहीत. म्हणजे आता तो सगळा अपमान तुझ्याकडेच आहे."

"हे कसे काय? मी बोललो, ते तुझ्या मनात शिरले."

"अरे बाबा, माझे मन तुझ्या ताब्यात आहे की माझ्या? मी मनाला सांगितले आहे की अपमान मुळीच स्वीकारू नकोस. जर मी अपमान ऐकला असता तर तुलाही तसेच रागाने बोललो असतो."

"तरीही, तू शिव्या ऐकल्यास ना?" माणसाने विचारले. 

"ऐकल्या, पण घेतल्या नाहीत. म्हणजे आता त्या शिव्या तुझ्याच कडे आहेत."

"असे कधी असते काय?"

"का नाही? मला सांग, जर तू कोणाला काही पैसे दिले आणि त्याने ते घेतले नाहीत तर ते कोणाकडे राहतील?"

"माझ्याचकडे" माणूस उत्तरला. 

"मग तशाच त्या शिव्या मी न घेतल्यामुळे तुला परत मिळाल्या आहेत. आता तो अपमान आणि शिव्या तुझ्याच मनात सतत घोळत राहतील. म्हणजे त्रास आणि दु :ख तुलाच सहन करावे लागणार!

बोध- राग हा तुम्ही स्वत: निर्माण केलेला राक्षस असतो, समोरच्याने नव्हे! रागाने तुमचे स्वत:चेच नुकसान होऊ शकते. 

३) एका श्रीमंत माणसाला एक तरुण मुलगा होता. पदवी परीक्षांचे निकाल लागण्याआधी मुलगा वडिलांना कारच्या शोरूम मध्ये घेऊन गेला आणि एक महागडी कार दाखविली. मी परीक्षा पास झालो की मला हीच कार बक्षीस म्हणून हवी असे त्याने वडिलांना सांगितले. वडील नक्कीच ही कार घेऊन देतील अशी त्याला खात्री होती. 

तो मुलगा लवकरच चांगल्या गुणांनी पदवी परीक्षा पास झाला. वडिलांनी त्याला आकर्षक कागदात बांधलेले एक पार्सल भेट म्हणून दिले. त्याने ते मोठ्या आतुरतेने उघडले. आत नवीन कारची किल्ली असणार याची त्याला खात्री होती. पण पार्सलमध्ये फक्त एक पुस्तक होते. "यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली" असे त्या पुस्तकाचे नाव होते. कार न मिळता फक्त पुस्तक मिळाले म्हणून तो मुलगा खूप रागावला. तो वडिलांना म्हणाला "एवढे श्रीमंत असून देखील तुम्ही मला कार भेट दिली नाही. मला आता तुमचे काहीच नको. मी घर सोडून जातो आहे." त्या रागात तो खरंच घर सोडून निघून गेला. त्यानंतर त्याने खूप कष्टात दिवस काढले. पण कष्ट आणि बुद्धीच्या जोरावर तो एक मोठा उद्योगपती बनला. खूप धनवान झाला. तरी तो समाधानी नव्हता. इतके सगळे असून आपण समाधानी का नाही याचे कारण त्याला समजत नव्हते. त्याचा वडीलांवरचा राग देखील काही कमी झाला नाही. कित्येक वर्षे त्याने वडिलांशी काहीच संबंध ठेवला नाही. 

एक दिवस त्याला वकिलांचे पत्र मिळाले की त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांनी सगळी संपत्ती मुलाच्या म्हणजे त्याच्या नावावर केली आहे. इतके वर्षांनी तो वडिलांच्या घरी गेला. तिथे सगळे व्यवहार पार पडल्यावर वकिलांनी त्याला वडिलांचे पत्र दिले. त्याने मोठ्या उत्सुकतेने ते वाचले. त्यात लिहीले होते.. 

"तुझा माझ्यावरील राग अजूनही गेला नाही हे मला माहीत आहे. तुला हवी असेलली कार बक्षीस न देता मी "यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली" हे पुस्तक दिले होते म्हणून तू रागावून निघून गेला होतास. तू माझ्याशी काहीच संबंध ठेवला नव्हता. मी मात्र तुझ्या सगळ्या करीयरवर पूर्ण लक्ष ठेवून होतो. मला माहीत आहे, की आज तू स्वकष्टाने एक धनवान उद्योगपती झालाय. माझ्यावरील रागाचा दुरुपयोग न करता, तो राग सकारात्मकपणे वापरुन तू उद्योगपती बनलास. त्याबद्दल मला तुझे कौतुकच वाटते. आज तू विचार कर .. तू धनवान आहेस. पण एक यशस्वी माणूस आहेस का? किंबहुना यशस्वी माणूस कोणाला म्हणावे हे तरी तुला उमगले आहे का?"

पत्र वाचता वाचता तो थबकला. मी खूप धनवान आणि प्रसिद्ध उद्योगपती आहे. तरीही मी यशस्वी माणूस नाही असे बाबांना म्हणायचे आहे का? मी कुठे कमी पडलो आहे? त्याचा वडिलांवरचा राग आणखीनच वाढला. पत्रात पुढे लिहीले होते.. 

"तुला प्रश्न पडला असेल, की मी माणूस म्हणून कुठे कमी पडलो? त्यावेळेस दिलेले पुस्तक अजूनही मी कपाटात जपून ठेवले आहे. ते तू पूर्ण वाच. मगच ठरव की तुझा माझ्यावरचा राग बरोबर होता की चूक." त्याने पुस्तक शोधून पूर्ण वाचले. त्यात त्याला समजले की धन संपत्ती असणे हे यशाचे केवळ एक अंग आहे. चांगला आणि यशस्वी माणूस होण्यासाठी गरिबांचा, दीनदुबळ्यांचा कळवळा असणे, अडल्या नडल्याना मदत करणे, विविध क्षेत्रातले अनेक मित्र असणे, भरपूर वाचन आणि पर्यटन असणे, गायन, नृत्य, नाट्य, साहित्य, विनोद, विविध कला आणि शास्त्रामधील सखोल ज्ञान नसले तरी अभिरुची, निदान समज तरी असणे. अशी विविध आवड असलेला माणुस स्वत:ला पूर्ण यशस्वी म्हणवू शकतो. 

पुस्तक पूर्ण वाचल्यावर त्याला आपला अभिमान किती पोकळ होता याची जाणीव झाली. हे सगळे ज्ञान वडील मला सांगू पहात होते! त्याचा वडिलांवरचा राग कुठल्या कुठे नाहीसा झाला. पुस्तकाच्या मागल्या कव्हरवर एक लिफाफा चिकटवला होता. तो उघडताच त्याला हव्या असेलया कारची किल्ली त्यात मिळाली. त्याच्यासाठी केवळ कारचीच नाही, तर यशस्वी मानवी जीवनाचा उद्देश उलगडून सांगणारी किल्ली वडील त्या
ला देऊ पहात होते. तोच करंटा, म्हणून रागावून त्याने सगळे ठोकरले होते. 

वडिलांनी पत्रात शेवटी लिहीले होते, "माझ्यावर रागावू नकोस. अजूनही वेळ गेलेली नाही. संपत्ती तर तू कमावली आहेच. आता उरलेले आयुष्य राहिलेली बाकी मिळविण्यात खर्च केलेस, तर ती कमी देखील भरून काढू शकशील याचा मला विश्वास आहे. तुला पूर्ण यश मिळो असा माझा तुला आशीर्वाद आहे."

पत्र पूर्ण वाचताच त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहू लागले. इतके वर्षांच्या चुकीच्या रागाचा तो निचरा होता!

बोध.. रागाने कुठलाही निर्णय घेण्याआधी सगळ्या गोष्टी तपासून शंभरदा सर्वांगीण विचार करावा. राग ही एक शक्ती आहे. ती विनाशकारी अथवा सकारात्मक दोन्ही पद्धतीने वापरली जाऊ शकते. निर्णय केवळ तुमचा असतो. 

- अरुण मनोहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा