औरंगजेबाचा राग

औरंगजेब हा मोगल बादशाह शाहजहानच्या पोटी जन्माला आलेला एक राजपुत्र. जन्माला आला २४ ऑकटोबर १६१८ रोजी गुजरातमधील दाहोद येथे. औरंगझेबाला तीन भाऊ होते. सर्वात मोठा दारा शुकोह, दुसरा शहा शूजा तिसरा औरंगझेब आणि सर्वात धाकटा मुरादबक्ष. 

औरंगजेब हा लहानपणापासून आपल्या भावंडांपेक्षा वेगळा होता. शाहजहान ने आपला बाप जिवंत असताना बापाविरुद्ध बंड केले. त्या बंडाची परिणीती ही पराभवात झाली आणि शाहजहानच्या बाप बादशाह जहांगीर शहा याने शूजा आणि औरंगझेब यांना ओलीस म्हणून आपल्या कैदेत ठेवले. या कैदेत राहिल्यामुळे औरंगझेब आणखीन संशयी आणि कारस्थानी बनला. 

१६२७ साली जहांगीर वारल्यानंतर शाहजहान हा बादशाह बनला.. शाहजहानने आपल्या चारही राजपुत्राच्या शिक्षणाची व्यवस्था योग्य व मोगल परंपरेला अनुसरून केली. सर्व राजपुत्रांना सैनिकी, धार्मिक तसेच राज्यकारभाराचे शिक्षण दिले. लहान असताना दोन गोष्टी औरंगजेबाने अंगी बाणल्या. एक, अतिशय शिस्तबद्ध जीवनपद्धत. मोगल राजपुत्रांना अनेक व्यसने असत मात्र औरंगजेब कायम त्यापासून दूर राहिला होता. दुसरी, आपल्याला बादशाह बनायचे असेल तर आपला बाप आणि भाऊ हे आपले शत्रू आहेत. एकदा आग्रा शहरात दारा शुकोहने एक उत्तम इमारत बांधली आणि ती पूर्ण झाल्यावर दाराने आपल्या बापाला आणि भावंडाना बघायला बोलावले. तेव्हा औरंगजेब इमारत न बघता फक्त इमारतीच्या दरवाज्या जवळ घुटमळत उभा राहिला आणि इमारतीच्या आत मध्ये बिलकुल आला नाही. शहाजहानला या चमत्कारिक वागण्याचे आश्चर्य वाटले आणि दुसऱ्या दिवशी शाहजहानने औरंगजेबाला विचित्र वागण्याचे कारण विचारले. तेव्हा औरंगजेबाने सांगितले की आपण सगळे एक इमारतीमध्ये असताना दारा शुकोह हा दगाफटका करून आपल्या सगळ्यांना मारून राज्य बळकावू शकला असता ते होऊ नये म्हणून मी दरवाज्याशी उभा होतो. या उत्तराने शाहजहान अतिशय संतापला आणि त्याला दरबार काही महिने बंद केला. 

१६३८ साली औरंगजेबाची राजकीय कारकीर्द सुरु झाली. सुरुवातील तो दक्षिणेत सुभेदार म्हणून आला न नंतर तो हिंदुस्थानात अनेक ठिकाणी सुभेदार म्हणून गेला. मध्यपूर्व आशियायत बल्ख (हा प्रांत उत्तर अफगाणिस्तानात आहे) प्रांतातही त्याने लढाईत भाग घेतला आणि लढाई तसेच राज्य कारभारात तरबेज झाला. जर सामान्य माणसांना आणि सैनिकांना आपल्याजवळ करायचे असेल तर आपण धर्मवेडाचा बुरखा धारण केला पाहिजे असे त्याला वाटले आणि त्याप्रमाणे औरंगजेबाने तसे केले. भर युद्धात नमाज पढणे वगैरे गोष्टी त्याने केल्या आणि त्याला प्रसिद्धी मिळाली.

१६५५ साली औरंगजेब हा दक्षिणेत सुभेदार महाराष्ट्रात होता आणि आदिलशाही सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात होता. त्याच सुमारास बादशाह शहाजहान हा प्रचंड आजारी पडला आणि सगळी सूत्रे शाहजादा दारा शुकोहच्या ताब्यात गेली. बंड करून मोगलसत्ता आपल्या ताब्यात घेण्याची संधी त्याच्या कपटी मनाला योग्य वाटली त्यामुळे आदिलशाहबरोबरचे युद्ध बंद करून आपले सैन्य मजबूत करण्याचे काम त्याने केले. उत्तरेत कूच करण्याआधी त्यांनी शाहजादा मुरादला आपल्या गोटात सामील केले. तुलाच बादशाह करतो असे सांगितले. आणि त्या खोट्या आवाहनाला मुराद फसला. उत्तरेत कूच करण्या अगोदर औरंगझेबाने आपला मामा शाहिस्ताखान आणि इतर काही उमराव यांच्या मदतीने अनेक सरदार आपल्या बाजूला ओढले. 

जेव्हा औरंगजेब आणि मुराद यांच्या संयुक्त सैन्याने उत्तरेकडे कूच केले तेव्हा शहाजहानला बंडाची बातमी लागली आणि त्याने महाराणा जसवंतसिंघ (जोधपूर संस्थानाचा मोगली मनसबदार) आणि कासीमखान याना औरंगजेबला रोखण्यासाठी पाठवले. या सैन्याची गाठ उज्जैनजवळ १५ एप्रिल १६५८ रोजी गाठ पडली आणि दरम्यान औरंगजेबाने कासिमखानाला फितवले आणि जसवंतसिंग एकटा पडला. आणि या लढाईत त्याचा धुव्वा उडाला आणि त्याने जोधपूरच्या दिशेने पलायन केले. जसवंतसिंघ हा बादशाह शाहजहानच्या आज्ञेने औरंझेबाशी लढला. . 

आतापर्यंत बेसावध असलेला दारा शुकोह जागा झाला आणि तातडीने सैन्यभरती केली आणि औरंगजेबाला रोखण्यासाठी चंबळ नदीच्या काठी धोलपूरला आपली पन्नास हजार फौज पाठवली आणि खंदक खणून सर्व उतार सुरक्षित केले. औरंगझेबाच्या हेरांकरवी दाराच्या चंबळेच्या काठी मोर्चे बांधणीची 

इथ्यमभूत माहिती मिळाली. तसेच औरंगजेबाच्या धोलपूरच्या पूर्वेस चाळीस मैलावर एका दुर्लक्षित उताराची माहिती मिळाली आणि औरंगजेबाचे सैन्याने त्या नदीउतारावरून चंबळ नदी ओलांडली आणि दाराची मोर्चेबांधणी निरुपयोगी ठरली. हे ऐकून दारा मनाने खचला आणि न लढता त्याने आग्र्याकडे माघार घेतली. औरंगजेबाने दाराचा पाठलाग केला आणि आग्र्याजवळ दाराचे सैन्य आणि औरंगजेबाचे सैन्य यांची आग्र्याजवळ सामूगढ येथे गाठ पडली आणि भीषण युद्ध झाले आणि त्यात औरंगजेबाच्या सरशी झाली. दाराने पळ काढला आणि औरंगजेबा आग्र्याला पोहोचला आणि मुरादला शिकारीवर पाठवले. शहाजहानला कैद केले आणि सगळी सल्तनत आपल्या ताब्यात घेतली. मुराद शिकारीहून आपल्यावर त्याला दग्याने कैद केले. दाराच्या मागे सैन्य घेऊन गेला. दारा प्रथम लाहोर आणि नंतर मुल्तानकडे गेला. तेव्हा शुजा शाह जो बंगालमध्ये सुभेदार होता त्याने आपले सैन्य घेऊन आग्र्याकडे कूच केले. औरंगजेबाने शुजा बरोबर लढण्यासाठी सैन्य जमवले आणि बादशहा म्हणून जसवंतसिंघ याला पण सैन्य आपल्या बाजूने लढण्याची आज्ञा केली.

येथे जसवंतसिंगाने औरंगजेबाशी दगा केला. काही सरदार आणि स्वतः फितूर झाला आणि ऐन लढाईच्यावेळी पळ काढला आणि औरंगजेबाच्या सैन्यात मोठा गोधळ उडाला. जसवंत मैदानातून पळाला आणि शुजाला लगेच आक्रमण करण्यासाठी निरोप पाठवला. पण शुजाला जसवंतवर विश्वास बसला नाही आणि त्याने २४ तास उशिरा हल्ला केला. पण ते २४ तास औरंगजेबाला परिस्थिती सावरण्यासाठी वरदान ठरले आणि युद्धात शूजचा धुव्वा उडाला आणि तो परत बंगालकडे पळाला आणि औरंगजेबाने त्याच्यामागे सैन्य पाठवले आणि शूजाला रानोमाळ भटकायची पाळी आली आणि त्यातच त्याचा अंतझाला. दारा पण मुलतानहून पुढे पर्शियाला जात असताना पकडला गेला आणि त्याला दिल्लीला आणून त्याचा शिरच्छेद केला गेला. 

या वारसयुद्धाच्या कहाणीत औरंगजेबाच्या दृष्टीने फितूर महाराणा जसवंतवर मोठा राग होता आणि तो योग्य होता. पण औरंगजेबाने आपल्या रागाचे परिवर्तन सूडात केले नाही आणि त्याने तसे केले असते तर इतर रजपूत राजे बिथरले असते. त्यामुळे जसवंतला माफी दिल्याचे नाटक केले

साधारण मोगली सैन्यात सगळे मनसबदार ५०% युद्धभूमीवर असत. २०% दिल्लीत/आग्रा येथे दरबारात हजर असत आणि उरलेला वेळ आपल्या जहागिरीत असत. पण औरंगजेबाच्या राग जसवंतवर असल्याने त्याला बराच काळ युद्धभूमीवर राहवे लागले. एकदा तर पाच वर्ष तो जोधपूरला जाऊ शकला नाही. 

औरंगजेबाला सूड उगवायची संधी १६७८ साली मिळाली जेव्हा जसवंत वारला आणि त्याचा मुलगा ५ वर्षाचा बालक होता. तेव्हा औरंगझेबाने जाहीर केले हा मुलगा जसवंतला रखेलीपासून झाला आहे त्यामुळे तो वारसदार होउ शकत नाही. जोधपूरचे संस्थान त्याने खालसा केले आणि अश्या पद्धतीने त्याने जसवंतवर मरणोत्तर सूड उगवला. एखादा बादशाह इतका दीर्धद्वेषी असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका.लेखक: रवींद्र गोडबोले 
जिंदादिल दारा शुकोहचे चरित्र. लेखक: काका विधाते
शैलेश दामले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा