कहाणी खुलभर आनंदाची

आटपाट नगर होतं. तिथं मानव नावाचा राजा राज्य करित होता.त्या राजाला पाच सुना होत्या.रागिनी,क्रोधीती,क्षोभता,कोपना व माया.माया होती एकदम शांत,सरळ स्वभावाची.तर रागिनी,क्रोधीती,क्षोभना व कोपना होत्या तेजतर्रार,भीडभाड नसणाऱ्या ,पटकन चिडणाऱ्या,राजसभेत सगळ्यांची बोलती बंद करणाऱ्या ,भयंकर मनमानी करणाऱ्या,खूप भांडणाऱ्या.त्यामुळे जनतेचा राजावर रोष होता.जणू ह्या चौघीजणींनी मानव राजा व राज्याचा ताबा घेतला होता.त्यामुळे राजाला खूप काळजी वाटायला लागली."समजबुद्धी" म्हणजे परिस्थिती समजून घेणे.किंवा त्या एखाद्या गोष्टींच्या मुळाशी जाण्याच्या वृत्तीमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल ह्या मायाच्या विचारांची कोणीच दखल घेत नव्हते.त्यामुळे माया दुःखी होती. 

आपणच निर्माण केलेल्या मी पणाच्या वर्तुळाभोवती फिरणाऱ्या ह्या चारही जणींमुळे मानव राजाचं व रयतेच नुकसान होत आहे.ह्या चौघीजणींना ह्यापासून परावृत्त कसं करावं ह्या विचारांच्या नादात रानात फिरत असतांना मायाला आनंदी व ऊर्जिता ह्या नागकन्या-देवकन्या भेटल्या.निराशेच कारण विचारता मायानी सगळी हकिकत सांगितली.मायाने त्यांना विचारलं"बाई बाई ,तुम्ही कुठं जाता?" "आम्ही आनंदाचं झाडं असलेल्या शंकराच्या देवळात जातो.शिवामूठ वहातो.एक वसा घेतला आहे." "हा वसा नक्की आहे तरी काय?" आनंदी म्हणाली,"दर सोमवारी थोडी थोडी वेगवेगळी धान्य,कडधान्यः,डाळी शंकरावर वहायच्या.म्हणजे त्याचं पौष्टिक खाणं बनवायचं आणि तेच ग्रहण करायचं.म्हणजेच शरीराला पोषणमूल्य मिळतील असाच पौष्टिक आहार घ्यायचा,आठवड्यातून एक दिवस उपवास करायचा.देवळाच्या बाजूच्याच आनंदी झाडाला प्रदक्षिणा घालावी.मनामध्ये "घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींत काहीतरी चांगलेच घडणार आहे"असे म्हणावे.शरीर सृदृढ असेल तर मन पण निरोगी रहाते.हा वसा असाच चालू ठेवावा.त्यामुळे मनातल्या इच्छा पूर्ण होतील.तू उतणार नाही,मातणार नाही,घेतलेला वसा टाकणार नाही याचं वचन दे."मायाने वचन दिलं.देवकन्या नागकन्येने सांगितल्याप्रमाणे वागायला लागली.इकडे राजवाड्यात परत आल्यावर भिती,अस्वस्थता आणि दुबळेपणावर धैर्याने मात करता येऊ शकते असा विश्वास तिच्यात निर्माण झाला.एखाद्याची चांगुलपणावरची,माणसांना खऱ्या अर्थाने आपलीशी करुन घेणारी नि त्यांना दुसऱ्यांच्या बाबतीत हेच करायला प्रवृत्त करणारी अबोल श्रद्धा याने आपण राजा व रागिनी,क्रोधीती,क्षोभना,कोपना यांच्यामध्ये बदल घडवू अशी ठाम भावना आनंदी व ऊर्जिता यांच्या भेटीमुळे मायात निर्माण झाली.राजवाड्यात राजा व प्रजेच्या समस्यांमध्ये बोलतांना मायाचा मायाळू व समजूतदार स्वभाव दिसून येत होता. राजसभेत बोलतांना" घडणाऱ्या सगळ्यांच गोष्टींमध्ये आनंद शोधा .जीवनात 'समस्या' आशी नसतेच पण जीवन दुःखी होण्याचं तेच कारण ठरतं.अशावेळी जीवनात "संकटांचं येणं" हे "part of living " आहे.व त्या संकटांना हसत सामोरे जाऊन बाहेर पडणं हे "Art of living" आहे".अश्या सभेतल्या प्रभावशाली बोलण्यामुळे सगळी जनता मायाचा उदो उदो करायला लागली.मानव राजासुद्धा मायाच्या सुखी,आनंदी,समाधानी वागण्यामुळे व प्रभावी भाषणाने खूप खूष झाला.ते पाहून रागिनी,क्रोधीता,क्षोभना,कोपना यांचा फारच जळफळाट झाला.मायाच्या अश्या आनंदी ,समाधानी वागण्यामागे काय कारण असावे हे शोधण्यासाठी व राजासकट सगळी जनता तिला मानू लागल्यामुळे ,हा चमत्कार कशामुळे झाला याचं उत्तर शोधायला ह्या चौघींजणींनी मायाच्या मागे लपत छपत जायचं ठरवलः. 

दुसरा सोमवार आला.माया रानात जायला निघाली.तिच्यामागोमाग चौघीजणी निघाल्या.मायाला वाटेत आनंदी व ऊर्जिता भेटल्या.तिघी देवळात आल्या.शंकराची पूजा केली.मायाने प्रार्थना केली."हे महादेवा,नंदिकेश्वरा,माझ्या बहिणीसमान क्रोधीता,रागिनी,कोपना,क्षोभना यांची रागामुळे सारासार विचारबुद्धी संपुष्टात आली आहे.वारंवार संतापल्यामुळे त्यांच्या मनावर ,शरीरावर व कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होईल याची मला भिती वाटत आहे.काय करावे?मार्ग दाखव?" हे ऐकून तिथे असलेल्या नागकन्या-देवकन्येने काही उपाय सुचविले ."राग ही तुमचीच निर्मिती आहे.तुम्ही जे आहात तेच तुम्ही तुमच्या भोवती निर्माण करता.तुम्ही क्रोधात असाल तर सभोवतालच्या परिस्थितीचे पण क्रोधात रुपांतर होईल.पण जर शांततेने,प्रेमाने परिस्थिती हाताळली तर आपोआपच छान आणि प्रभावीपणे समस्येच निराकरण होईल. 

राग शांत करण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे शरीराला रिलॕक्स करावे.दीर्घ श्वास घ्यावा.वारंवार संतापल्याने शरीरातील एडनलिन नावाच्या रसायनांची संख्या वाढते.हे रसायन शरीराबाहेर काढण्याचा सोपा उपाय म्हणजे व्यायाम.यासाठी सायकल चालवणे,पोहोणे,चालणे अति उत्तम.राग आला तर मनातल्या मनात १०० अंक मोजावेत.कधीकधी जास्त कामामुळे आपण व्यवस्थित झोपू शकत नाही.त्यामुळे राग येणे,चिडचिड,डोकेदुखी,तणाव हे होऊ शकतं. अशावेळी मस्त ७/८ तास ताणून झोपावे.राग आला तरी स्वतःला त्रास करुन न घेणे.कधी कधी तर पाणी पिण्यामुळे सुद्धा राग काबूत येतो. कधी फिरण्यासाठी बाहेर निघून जावे.मोठ्यांदा गाणी म्हणावीत.वाटल्यास मस्तपैकी नाचसुद्धा करावा.आगदी हसल्यावर सुद्धा राग कुठल्या कुठं पळून जातो.रागावरच्या नियंत्रणाला अगदी खुलभर आनंद,समाधान पुरतो बर का ग माया! " 


रागिनी,क्रोधीता,कोपना,क्षोभना हे सगळं ऐकत होत्या.मानव राजाच्या व प्रजेच्या मनात आपली प्रतिमा चांगली व्हावी या विचारांनी चौघींनी आनंदी व ऊर्जेने मायाला सांगितलेल्या उपायांप्रमाणे वागून बघायचे ठरवले. झालं.सोमवारामागून सोमवार गेले.मानव राजाला व मायाला ह्या चौघीजणींच्या वागण्याबोलण्यातला बदल लक्षात येत होता.त्यांच्यातल्या सकारात्मक बदलामुळे जनता मानव राजा व माया यांच्या बरोबर ह्या चौघींचाही जयजयकार करु लागली.चौघींना आपली चूक कळून आली.रागावर नियंत्रण ठेवल्याने मिळणारी सकारात्मकता,जगण्यातला उत्साह,त्यातून मिळणारी ऊर्जा आणि त्या ऊर्जेतून निर्माण होणारा आनंद यांच महत्त्व चौघीजणींना कळलं. त्यांचा"मी पणा" गळून मायाळू झाला.आपला राज्यकारभार आता सुरळीत आणि छान होईल याचं खूप समाधान आणि भरपूर आनंद मानव राजाला झाला .त्याची काळजी मिटली. 

अशा रितीने रागावर नियंत्रण ठेवण्याच्या सगळ्यांच्या सवयीमुळे सगळीकडे आनंदी आनंद होऊन सगळे सुखात नांदू लागले. 

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण | 
तात्पर्य ; राग,नकारात्मक भावना लांब ठेवल्याने प्रसन्न ,आनंदी जीवनाची प्राप्ती होते.
हे आसं "आनंदाचं झाड" सदैव असावे सोबत. 
"लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु|"


संध्या ओका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा