काम, क्रोध, लोभ , मोह, मद आणि मत्सर हे सहा मानवी मनाचे विकार आहेत. या विकारांनाच षड्रिपु असे म्हणतात. षट् म्हणजे सहा आणि रिपु म्हणजे शत्रू. शत्रू ज्याप्रमाणे आपला विनाश करतो त्याप्रमाणेच हे सहा विकासही मनुष्याला विनाशाकडे नेणारे आहेत म्हणून ते षड्रिपु. या सहा विकारांपैकी एकाचाही अतिरेक झाला की तो अत्यंत घातक ठरतो.
भगवान श्रीकृष्णांनी या विकासाची कारणपरंपरा सांगितली आहे ती अशी-
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते| सङ्गात् सञ्जायते कामः कामात्क्रोधोs भिजायते|
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः|
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशाद् प्रणश्यति||
विषयांचा विचार करत असताना मनुष्याला त्यांच्या विषयी आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून काम निर्माण होतो, या कामवासनांच्या पूर्ततेमध्ये अडथळे निर्माण झाले,त्यांची पूर्तता झाली नाही की क्रोध उत्पन्न होतो, क्रोधामुळे सम्मोह, सम्मोहातून स्मृतीभ्रंश, स्मृतीभ्रंशातून बुद्धिनाश, आणि बुद्धीनाश झाला की मनुष्याचा विनाश होतो. अशी ही संकटपरंपरा आहे.
आजकाल तर लोकांचा राग अगदी नाकाच्या शेंड्यावरच असतो. एवढ्या-तेवढ्यावरून त्यांना राग येतो. रोजचं वर्तमानपत्र उघडलं किंवा दूरदर्शनवरील बातम्या पाहिल्या तर याची प्रचिती येते. कालपरवाच दूरदर्शनवर एक बातमी पाहिली की डीजेच्या तालावर नाचताना एकाचा दुसऱ्याला धक्का लागला तर लगेच त्याची हत्या केली!, अवघे दहा रूपये दिले नाहीत म्हणून मित्रानेच मित्राला ठार मारले!, उत्तरप्रदेशात एका कार्यक्रमात नृत्य सादर करताना ती नर्तकी एक क्षणभर थांबली तर लगेच तिला गोळ्या घालून ठार केले!
किती हा अनावर राग! काय म्हणावे या रागाला?
परवा प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकरांची एक मुलाखत वाचली. त्यात त्यांनी सांगितलं की ते येरवड्यातील ४५० अशा कैद्यांना भेटले, त्याच्याशी बोलले ज्यांनी खुनासारखा गंभीर अपराध केला होता.त्या सर्व कैद्यांनी हेच सांगितले की क्रोधाच्या अत्युच्च क्षणी त्यांच्या हातून असे भयंकर कृत्य घडले होते.
क्रोधाचा तो अत्युच्च क्षण टाळायला हवा. हे परवलीचे वाक्य तर सर्वांनाच माहित आहे की राग आला तर मनातल्या मनात १ ते १० अंक मोजा, म्हणजे तेवढ्या वेळात रागाचा जोर कमी होईल; कारण जेव्हा राग अनावर होतो तेव्हाच हातून गुन्हा घडतो आणि मनुष्य विनाशाच्या गर्तेत फेकला जातो. रागाला वेळीच आवर घालायला शिकले पाहिजे; कारण रागाची जेव्हा परमावधी होते तेव्हा मनुष्य सदसद्विवेकबुद्धी गमावून बसतो; पण म्हणून हे विकार अजिबातच नसावेत काय? आणि हे विकार मुळीच नसलेला मनुष्य आढळणेही अगदीच असंभव! अशक्य! मला असे वाटते की योग्य प्रमाणात हे विकार असायलाच पाहिजेत. मानवी जीवनात जर हे विकार योग्य प्रमाणात नसतील तर प्रगतीच होणार नाही. ज्याप्रमाणे सहा रसांनी युक्त असलेले भोजन रुचकर, स्वादिष्ट आणि शरीराला पोषक असते तसेच योग्य प्रमाणात या सहा विकारांचे अस्तित्व मानवी जीवन यशस्वी होण्यास आवश्यक आहे. जर धनानंदाने अपमान केल्यावर चाणक्याला राग आला नसता तर चंद्रगुप्त मौर्याचे विशाल साम्राज्य निर्माण झाले असते का?
जिने स्वतःच्या वडिलांची, दोन भावांची ते निःशस्त्र असताना झालेली हत्या पाहिली ती जिजाऊमाऊली दुःखात चूर होऊन गेली पण ती आयुष्यभर दुःखच करत बसली का? तर नाही! तिच्या आत्यंतिक दुःखानेच जन्म दिला एका अंगाराला! तिने ते क्रोधांगाराचे स्फुल्लिंग सतत चेतवत ठेवले आणि त्यातून उभे राहिले हिंदवी स्वराज्य! जिजाऊला जर राग आला नसता तर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे तोरण बांधू शकले असते का?
फार कशाला दरबान ते प्रिटोरिया या रेल्वेप्रवासात एका तरुण वकिलाला 'काला आदमी' म्हणून रेल्वेच्या डब्यातून बाहेर हाकलून दिले केव्हा त्या वकिलाला राग आला नसता तर बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा त्या वकिलाचा जीवनप्रवास झाला असता का?
हर्मिस्टन सर्कसचा मालक चर्नी विल्सनचं ''कोणीही भारतीय अशी सर्कस आणि अशा कसरती करू शकणार नाही" हे भारतीयांना हिणवणारे वाक्य ऐकून ते आव्हान स्वीकारून आशियातील पहिली सर्कस विष्णुपंत छत्र्यांनी काढली. विशेष म्हणजे छत्र्यांच्या सर्कशीपुढे हर्मिस्टन सर्कस ओस पडू लागली आणि अखेर ती छत्र्यांनीच विकत घेतली. छत्र्यांना जर तेव्हा गोऱ्या साहेबाच्या बोलण्याचा राग आला नसता, तर ते भारतीय सर्कशीचे जनक झाले असते का?
एवढेच कशाला प्रत्येकाने आपल्याच आयुष्यात डोकावून पाहिले तर कधी तरी राग येऊन "मी हे करूनच दाखवीन" असे म्हणून जिद्दीला पेटून प्रत्येकाने काहीतरी साध्य केले असेल!
म्हणून मला असे वाटते की हे षड्रिपु योग्य प्रमाणात असतील तर विधायक ठरतात आणि त्यांचा अतिरेक झाला तर आणि तरच विघातक ठरतात म्हणून "अति सर्वत्र वर्जयेत्|"
निर्मला नगरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा