रागावर नियंत्रण

राहुल ऑफिस मधून तावातावाने घरी आला, त्याचा पारा आधीच चढलेला होता, ऑफीसची बॅग फेकून चिमुकल्या चिंटू वर खेकसला. काय रे चिंटू, जेव्हा पहावे तेव्हा खेळत असतोस, काही अभ्यास वगैरे नाहीये का तुला? बिचारा चिंटू एकदम हिरमुसला. आणि आत निघून गेला. तेवढ्यात राधिका आतून आली आणि म्हणाली, उगाच का रे ओरडतोयस त्याच्या वर? त्याचा अभ्यास कधीच झालाय. आणि घड्याळ पाहीले आहेस का? किती उशीर झालाय ते. आज चिंटूला day care मधून आणायची तुझी टर्न होती. मला सॉरी म्हणायचे सोडून त्याला का रागावतो आहेस. राधिका पण बिचारी ऑफिस मधून दमून आली होती आणि स्वयंपाकाला लागली होती. सध्याच्या पिढीमध्ये घरोघरी दिसणारे हे चित्र. राहूलचे टार्गेट कंप्लीट झाले नसल्यामुळे बॉस कडून फायरिंग मिळाले होते. राहूल खूप काम करत होता, मनापासून प्रयत्न करत होता पण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतेच ना. म्हणून त्याचा राग अनावर झाला होता. आणि मग तिळाचे तेल वांग्यावर. म्हणजे कुठला राग कोणावर, आता बॉसला तर काही बोलू शकत नाही. चिंटू तर बिचारा बाबांची वाट बघत होता, बाबा आल्यावर त्यांच्याशी खेळीन म्हणून. ह्या सगळ्यामुळे तरुण पिढी मध्ये तणावाचे, रागाचे प्रमाण खूप वाढले आहे. एकतर आयुष्याकडून खूप जास्ती अपेक्षा आहेत, आणि मग त्या पूर्ण करण्या करता सगळा आटापिटा आहे.

आधी खूप अभ्यास करून competitive परीक्षा पास करा मग उच्च शिक्षण घ्या. त्या पुढे शिकायला परदेशी जा. तिथे एकटे राहून सगळे manage करा. आणि भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवा. पण कधी कधी हे सगळे करत असताना माणूस (म्हणजे मुलं आणि मुली दोघं) कधी चिडचिडा होतो हे त्याचे त्यालाच कळत नाही. कारण लहानपणा पासून सतत काहीतरी achieve करायचे ह्याचा ध्यास घेतल्यामुळे आपल्या आवडी, निवडी, छंद जोपासण्या करता वेळच मिळत नाही. जितके माणसाच्या आयुष्यात प्रेम, लोभ, माया, जिव्हाळा महत्वाचे आहेत तितका राग पण महत्वाचा आहे. कारण सगळ्या नवरसानी माणूस परिपूर्ण बनतो. पण त्या रागाला तुम्ही कसे व्यक्त करता हे खूप महत्वाचे आहे. कधी कधी आपल्याला स्वतःचा राग येतो कारण आपण वागताना काही चुका करतो, त्याचा उपयोग आपण स्वतःला सुधारण्या करता केला तर रागाचा आपण चांगला उपयोग केला असे म्हणता येईल. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे बोलायला, काम share करायला घरातच खूप जण असायचे. सध्या नवरा, बायको दोघे नोकरी करतात, दोघे थकून घरी येतात, मग एकमेकाचे ऐकून घेण्याचा patience उरत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात. एकमेकाचा खूप राग येतो, अर्थातच ह्या सर्व गोष्टींचा लहान मुलांवर फार वाईट परिणाम होतो. एकमेकांचा राग आला तरी, संवाद साधावा, व इगो बाजूला ठेवून शांतपणे दुसर्‍याचे बोलणे ऐकून घ्यावे, ह्याने बरेच प्रश्न सुटू शकतात. सध्या समाजात वाढत चाललेले आत्महत्या व घटस्फोटाचे प्रमाण डिस्टर्ब करणारे आहे.

अर्थात रागाचा वयाशी काही संबंध नसतो. बरेचदा मध्यम वयीन किंवा उतार वयातील व्यक्ति पण चिडचिड्या किंवा रागीट होतात. त्याची कारणे अर्थातच वेगळी असू शकतात. आजार, एकटेपणा किंवा अचानक आपले घरातील महत्व कमी झाल्याची जाणीव अशी कारणे असू शकतात. आपण रागाबद्दल बरीच चर्चा केली, पण त्याचा स्वत:ला व दुसर्‍याला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे. एकतर रागीट माणसामुळे घरातील वातावरण बिघडते. कुठली गोष्ट नाही आवडली तर जरूर सांगावे, पण गोड बोलले तर तेच काम समोरचा पटकन व हसत करतो. सगळ्यात उत्तम म्हणजे आपल्याला खरा आनंद कशात मिळतो, हे प्रत्येकानी पहावे, लिखाण, वाचन, गायन, वाद्य वाजवणे, पेंटिंग, एखादा खेळ, मैत्रिणीन बरोबर मजा करणे, गप्पा मारणे. काहीही असो, जेव्हा काही मनाविरुद्ध होते. तेव्हा छानसे पुस्तक वाचत बसले, किंवा मैत्रिणीशी फोन वर गप्पा मारल्या तरी मूड पटकन ठीक होतो. राग येणे हे गैर नाही, पण त्यावर कंट्रोल करणे मात्र साधले पाहीजे.


मेघना असेरकर.


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा