ट्रेकिंग पहावे करून - टूर द माऊंट ब्लांक - भाग ३

एका दिवसात इन्स्टा क्वालिटी फोटो काढायला शिकलो होतो, शाहरुख पोझ लोकांना शिकवली होती, आवडत्या कवितेचं रसग्रहण केलं होत, मुखवटे भिरकावून पोरकटपण करायला शिकलो होतो आणि लोकांनाही शिकवले होते. एका दिवसात इतक्या गोष्टी ऑफिसमधल्या सगळ्यात जास्त प्रोडक्टीव्ह दिवशी पण नाही होत. 

उन्हं कलली होती, डोंगर उतार चालू झाला होता, पाय थकू लागले होते. आणि स्वित्झर्लंड मधलं अजून एक चित्रासारखं खेडेगाव आमची वाट बघत होत. 

या टूर मधली प्रत्येक संध्याकाळ ही एका छोटेखानी पार्टी सारखी असायची. आमचा सामान वाहून न्यायला आणि प्रत्येक मुक्कामाला वेळच्या वेळी आणून द्यायला वॅन ची वेगळी सोय होती त्यामुळे किती वस्तू न्याव्यात यावर फार जास्त बंधनं नव्हती. आम्ही साधारण ४ ते ५ च्या दरम्यान हॉटेल मध्ये पोचत असू. मग छान गरम पाण्यानी अंघोळ करून फ्रेश होऊन डिनर च्या आधी भेटत असू. मग दिवसभराच्या गप्पा. कोणता चढ सर्वात अवघड वाटला. कुठे सर्वात जास्त दमछाक झाली. कुठे कोणता प्राणी-पक्षी दिसला. वगैरे वगैरे. मग एकमेकांचे फोटो दाखवणे. ते एकमेकांना एयर ड्रॉप करणे वगैरे वगैरे. अशा ट्रेक मध्ये अजून एक मजेदार गोष्ट होते ती अशी की ट्रेकचे २-४ दिवस उलटले की बराच मोकळेपणा येतो आणि मग बहुतेक वेळा आपले फोटो दुसऱ्याच्या कॅमेरात असतात आणि दुसऱ्यांचे आपल्या. मग संध्याकाळी एकमेकांशी गप्पा मारत हे फोटो गोळा करावेच लागतात. त्यातूनच मैत्री वाढते एकमेकांच्या स्वभावातल्या खाचा खोचा कळतात. 

या ट्रेक मध्ये अजून एक ऐश होती म्हणजे आम्ही चक्क युरोप मधल्या खेड्यांमध्ये राहत होतो. त्यामुळे लोकल वाईन, किंवा लोकल चीज यांची रेलचेल होती. किंबहुना संध्याकाळी भेटल्यावर आज जवळपास काय मिळेल किंवा कोणत्या गोष्टी संग्रही ठेवण्यासाठी विकत नेता येतील याचीही उत्सुकता असायची. दिवसभर खूप चालल्यावर आणि सृष्टी सौन्दर्य पाहिल्यावर असे सगळे करायला मिळणे म्हणजे सोने पे सुहागा असं वाटायचं. 

टूर द माऊंट ब्लांक च्या या ट्रेकचा मला अजून एक फायदा झाला तो म्हणजे माझ्या मनात वर्षानुवर्षे पक्के बसलेले काही पूर्वग्रह कसे बिनबुडाचे आहेत याचा मला प्रत्यय आला. आमच्या बरोबर एक अहमदाबादचं अस्सल गुजराथी चौकोनी कुटुंब होतं. त्यांचा वंशपरंपरागत चालत आलेला व्यवसाय होता जो उत्तम चालला असावा. त्य्नाच्या थोरल्या मुलीला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पाठवायचे होते त्या आधी एकमेकांच्या बरोबर क्वालिटी टाईम मिळावा म्हणून या टूर ला ते सर्व जण आले होते. त्यांचे कपडे बॅग्स इतर अक्सेसरीएस वरून त्यांच्या उत्तम सांपत्तिक परिस्थितीची झलक मिळत होती. तरीही हे गुजराथी कुटुंब म्हणजे ढोकळा-ठेपला-फाफडा घेऊन आले असणार आणि प्रत्येक जेवायच्या ठिकाणी शाकाहारी जेवण मागून मागून आयोजकांच्या नाकी नऊ आणणार असा पूर्वग्रह मी कौन घेतला होता. पण झालं उलटच. ते सर्वजण पुरोगामी निघाले. वहिनींनी वेळोवेळी कोणती बियर किंवा वाईन चांगली आहे याची माहिती आम्हाला पुरवली. १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुलीच्या समोर वाईन चा ग्लास ठेवला. 

मी मेनू कार्ड बघून ऑर्डर करत असताना दादांनी मला सल्ला दिला. 

“विवेक भाई, आप युरोप में आये हो. और कुछ मत सोचो. पोर्क ऑर्डर करो. युरोप चिकन नाही पोर्क या बीफ खाणे कि जगह है.”

त्यांचा सल्ला मी निमूटपणे ऐकला. आणि खरोखर जे स्टूड पोर्क आम्हाला मिळाले ते उत्तम होते. लहानपणी कोथरूड गावठाणात येणे जाणे असल्याने डूक्कर या प्राण्याकडे अन्न म्हणून पाहायला मला काही दशकं लागली होती. अजूनही पोर्क हा माझा नाईलाजाने घेतलेला निर्णय असतो परंतु त्या दिवशी स्वित्झरलँडच्या त्या खेडेगावात गुज्जू उद्योगपतींच्या शिफारशीवरून घेतलेले पोर्क हा अतिशय उत्तम निर्णय ठरला. 

त्या पोर्क खाणाऱ्या आणि वाईन पिणाऱ्या गुजराथी कुटुंबाबद्दल आम्ही गैरसमज करून घेतले नाहीत. त्यांचे हे वेगळे पण स्वीकारले. ट्रेकला गेल्याने निसर्गाचीच नव्हे तर आजूबाजूच्या माणसांची पण वेगळी बाजू आपल्याला सहज दिसते. आपला दृष्टिकोन बदलतो, कक्षा रुंदावतात. जीवन वेगवेगळ्या अंगानी समृद्ध होते. 

दुसऱ्यादिवशी आम्ही स्वित्झर्लंड मधून इटली मध्ये जाणार होतो. ल्युकच्या मते उद्याच्या दिवशी दिसणारे सृष्टीसौन्दर्य पूर्ण ट्रेकमध्ये सर्वोत्तम होते. त्या उत्सुकतेमुळे रात्री नीट झोप लागेना. 

इटली मध्ये पोचण्यासाठी आम्हाला एक खिंड पार करावी लागणार होती. खडी चढण होती. पावलापावलावर धाप लागत होती. आजूबाजूला बर्फ असून घाम येत होता. कानात थंडी जाऊ नये म्हणून कानटोपी आणि फार घाम येऊ नये म्हणून हाफ त टि शर्ट अशा विचित्र पोशाखात आम्ही खिंडीकडे जायची चढण चढत होतो. बर्फावरून पाय घसरत होते. कोणी आपटत होते पण निर्धार पक्का होता. कोणी आपटलं तर त्याला हात देऊन उभे करून लिमलेटच्या गोळ्यांची देवाणघेवाण करून पुढचा रस्ता पकडून सर्वजण जात होते. सुमारे २-३ तास चढण चढल्यावर आम्ही ती खिंड पार करून पलीकडे पोचलो. 

ल्युकचं म्हणणं अगदी खरं होतं. खिंडीपलीकडचा देखावा दैवी होता. ते विहंगम दृश्य आजही तसे च्या तसे डोळ्यासमोर आहे. कल्पना करा की चारही दिशांना बर्फाच्छादित डोंगर आहेत आणि आपण त्याच्या मध्यबिंदूला उभे आहोत. जिथे नजर जाईल तिकडे धवल रंगाचे डोंगर होते. ज्या दरीत आम्हाला उपायाचे होते ती अगदी समोर होती. आणि डोंगर उतारावर आधी पांढऱ्या रंगाचे पट्टे. तो जिथे संपत होता त्यापासून सूचिपर्णी झाडांचा गर्द हिरवा आणि तपकिरी रंग. आणि त्यातूनच खाली उतरत जाणारा पोपटी हिरवा रंग गवताचा, मेडोचा. दरीत वळण वळण घेत जाणारे रस्ते. दूर वर दिसणारी आणि इतक्या लांबूनही आपल्या सौन्दर्याची चुणूक देणारी ती टुमदार खेडेगाव. लांबवर दिसणाऱ्या पवनचक्क्या. स्वर्गीय देखावा होता. खूप दम लागल्याने आणि विस्मित करणाऱ्या देखाव्याने आम्हाला तिथं खिळवून ठेवलं. आम्ही बसलो होतो शेजारी शेजारीच पण कोणी कोणाशी बोलत नव्हतं. सर्वजण तो देखावा मनात डोळ्यात साठवून घेत होते. सुरुवातीला सगळ्यांनी खूप फोटो काढले खरे पण प्रत्यक्ष दिसणाऱ्या देखाव्याच्या नखांची सर ही एकही फोटो येत नाहीये यावर सगळ्यांचे एकमत झाले. म्हणून कॅमेरा मध्ये कैद होऊ शकत नाही अशा शब्दांच्या पलीकडच्या त्या देखाव्यात आम्ही सर्वजण रमून गेलो. 
शेवटी ल्युक ने आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव ठेवत सगळ्यांना पुढे निघायला लावले. मनात एक खूणगाठ बांधली कि निदान हा देखावा पाहायला परत तिथे यायचाच. बघू या कधी योग येतात ते. 

इटली मध्ये माऊंट ब्लांक ला मॉन्टी बियांको म्हणतात. आम्ही सरहद्द पार केली पण काही कळलंच नाही. पर्वतशिखरे तशीच होती, झाड तशी होती, गवतावर डोलणारी फुल तशीच होती, वाहणाऱ्या ओहोळांना आपण दुसऱ्या देशात जातोय याची जाणीवही नव्हती. देशाच्या सीमारेषा ही कशी अनैसर्गिक संकल्पना आहे याची जाणीव पावलागणिक होत होती. आणि या काल्पनिक सीमारेषांसाठी माणूस महायुद्धे लढतो आणि स्वतःला पृथ्वीवरच सर्वात बुद्धिमान जीव मानतो. कमाल आहे कि नाही आपली?

दरीत उतरून पुढे जाताना असे जाणवले कि डोंगर उतारावरची सर्व झाड एका विशिष्ठ कोनात तिरकी आहेत आणि मजा म्हणजे एकमेकांना समांतर आहेत. हा काय चमत्कार म्हणून आम्ही ल्युक कडे पहिले. त्याने तितक्याच सहजतेने समजावून सांगितले कि बर्फ पडत तेंव्हा त्याच्या ओझ्याने झाड वाकतात. तिरकी होतात. जितकं जास्त बर्फ पडेल तितकी जास्त वाकतात. मग उन्हाळा आल्यावर जस बर्फाचं ओझं कमी होत तसतशी ती थोडी फार सरळ होतात किंवा तशीच राहतात. झाड आपल्या अमर्याद सहनशक्तीच्या जोरावर २-३ महिने पाहून म्हणून येणाऱ्या बर्फाचे ओझे लीलया झेलतात. 

दरीत उतरल्यावर थोडे गरम वाटायला लागले. पायाखालचा बर्फ नाहीसा झाला. असंख्य छोटे मोठे झरे, धबधबे दिसायला लागले. अचानक एका डोंगर उतारावर खूप पडझड झाल्यासारखी वाटली. डोंगर उतारावर एकही झाड नव्हतं, फारशी हिरवळ नव्हती सगळी कडे फक्त माती माती दिसत होती. त्या उतारावरून वळण वळण घेत खाली पोचलो तिथे ल्युक आमच्यासाठी थांबला होता. एका मातीच्या ढिगाऱ्यासमोर विजयीमुद्रेने उभा होता. सगळे ट्रेकर्स जमा होई पर्यंत थांबला आणि मग त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली. 

त्यांनी आम्हाला मातीच्या ढिगाऱ्याकडे निरखून पाहायला सांगितलं आणि काही वेगळेपण दिसतंय का असा विचारलं. आमच्या काही लक्षात आलं नाही. मग त्याने त्या ढिगाऱ्यातला सर्वात खालचा थर पाहायला सांगितलं. तर तो खालचा ठार म्हणजे चक्क बर्फ होता. माती च्या ढिगाऱ्याखाली बर्फ आला कसा असा प्रश्न आम्हाला साहजिकच पडला. आम्हाला जो बोडका डोंगर दिसला तिथे हिमस्खलन झाले होते (avalanche) अमर्याद साठलेल्या बर्फाने घसरत खाली जाताना वाटेल आलेल्या सर्व वृक्षवल्लींचा नायनाट केला होता. आणि तोच बर्फ आता मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला होता. निसर्गाकडे न्यायबुद्धी असते. माती आणि बर्फाच्या त्या अबोल द्वंद्वाचा निर्णय झाला होता. या कुस्तीत आधीच्या फेरीत बर्फानी बाजी मारली असेल हि पण आता मातीच्या ढिगाऱ्याने त्याला चारी मुंड्या चीत केले होते. आता हळू हळू तापमान जसे वाढेल तसे हळू हळू वितळत त्या ढिगाऱ्याखालून स्वतःची सुटका बर्फाळ करून घ्यावी लागणार होती. निसर्गाचे असे वेगळेच रूप पाहून आम्ही स्तिमित झालो.

अजून एका सुंदर खेडेगावात एक रात्र काढून आणि अजून थोड्या डोंगर रांगा पार करून आम्ही आता परतीच्या वाटेल लागलो होतो. इटलीचा पाहुणचार घेऊन परत फ्रांस कडे निघालो होतो. 

अजून एक खाडी चढण आणि अजून एक खिंड पार करायची होती. निर्धार पक्का होता. आपापल्या वेगाने हळू हळू चादर आमची मार्गक्रमणा सुरु होती. अशी चढण चढताना एक खास तंत्र वापरावे लागते. ते म्हणजे आपल्या श्वासावर आणि हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण. तुम्ही फार जास्त वेगाने चढायला गेलात तर डोंगर उत्तर तुमचं गर्वहरण करतो. थोड्याच वेळात तुम्हाला इतकी धाप लागते कि एक पाऊल ही पुढे टाकता येत नाही. त्यामुळे अतिशय संयमित पद्धतीने श्वासोच्छवासाच्या गतीवर नियंत्रण ठेवत अतिशय संयमानी एक एक पाऊल पुढे टाकावे लागते. चिकाटीने जे असं करू शकतात ते कोणताही डोंगर पार करू शकतात. आणि निसर्ग या संयम ही चिकाटी आपल्याला आपसूकच शिकवतो. कारण तो डोंगर पार करायचा दुसरा कोणताही मार्ग नसतो. 

अशी चिकाटी दाखवत आम्ही सर्वानी तो डोंगर पार केला. त्या डोंगर माथ्यावर एक छोटे से दुकान होते. कॉफी टोस्ट, आईस क्रीम अशा फुटकळ गोष्टी विकणार. तिथे जितू ला एक गिटार दिसलं. ते दुकान होत हंगामी. त्याला २-३ विद्यार्थी चालवत होते. डोंगर चालून कोणी आले तर तेच काय ते गिर्हाईक. इतर वेळ काय करावं याचा त्यांना प्रश्नच पडत असणार म्हणून त्यांनी आपला गिटार आणलं असावं. जितूची नजर त्यावर पडली. त्याने त्या गिटारची मागणी केली. चालवणारे विद्यार्थी चलाख होते. काहीतरी विकत घ्या तरच आमचे गिटार देऊ असा म्हणाले. जितू नि ३ कप कॉफी घेतली आणि गिटार मिळवले. ती कॉफी आणि ते गिटार घेऊन आम्ही तिघे डोंगर उतारावर पोचलो. जितू हा कसलेला वादक होता. आमच्या पहिल्या भेटीत जितक्या सहजतेने पियानो वाजवत होता तितक्याच सहजतेने तो गिटारही वाजवत होता. त्याने गिटार वाजवली मी त्यावर गाणी म्हणाली, रिषी ने आमचे फोटो काढले . सहप्रवाश्यानी टाळ्या वाजवत आमचे कौतुक केले. त्या इटली आणि फ्रान्सच्या सीमारेषेवरच्या डोंगरावर आम्ही आयुष्यातले काही अविस्मरणीय क्षण कमावले.

शीण गेल्यावर आम्ही पुढे निघालो. आता आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करत परत फ्रांस मध्ये येऊन पोचलो. इतक्यात मला पाण्याची खळखळ ऐकू आली. इतके दिवस आम्हाला हदसत होते ते ओहोळ होते. आता छोटा धबधबा आणि पुढे वाहणारा ओहोळ दिसला. मनात विचार आला कि जगात Evian हा पिण्याच्या पाण्याचा ब्रँड “वॉटर फ्रॉम फ्रेंच आल्प्स” हेच पाणी अव्वाच्या सव्वा किमतीला विकतात. तेच पाणी आमच्या पायाशी होते. निमूटपणे बूट काढले आणि चक्क पाण्यात पाय बुडवून बसलो. Evian च्या पाण्याने पाय धुवत. पाणी खुप थंड होते. आणि तितकेच चवदार ही. पाण्याच्या बाटल्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुढे निघालो. आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गमती. 

असाच गप्पा मारत मारत चालता चालता, एकमेकांचे फोटो काढता काढता, एकमेकांना आपली जीवनकहाणी ऐकवता ऐकवता आमचा ट्रेक संपला. ज्यांच्या बरोबर उठण्या बसण्याची सवय झाली होती ते आता कदाचित परत कधीही भेटणार नव्हते. काही बंध जुळले होते काही जुळत जुळत राहिले होते. परत भेटण्याच्या आणि एखादा ट्रेक एकत्र करण्याच्या आणाभाका घेतल्या जात होत्या.फोन नंबर एकमेकांना दिले जात होते, फेसबुक वरच्या मित्रांची यादी वाढत होती. साश्रू नयनांनी निरोप घेतला असा म्हणाल तर अतिशोयक्ती ठरेल; पण मन भरून आलं होत हे नक्की. 

आणि १० दिवसाचा तो स्वर्गीय दृश्यांचा आनंद सोहळा संपवून मी भरधाव वेगाने जिनिव्हा एअरपोर्ट कडे जाणाऱ्या त्या वॅन मध्ये बसलो होतो. गेल्या दहा दिवसात बर्फ अजून वितळले होते. धवल दिसणारे डोंगरमाथे आता तपकिरी बोडके दिसू लागले होते. निसर्गाने ऋतूचे पुढचे पान उलटले होते. 

… आणि मी या ट्रेकच्या आठवणी मनात रुजवत मनातल्या मनात पुढच्या ट्रेकची तयारी करत होतो. 

विवेक वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा