स्वशोधाची धाव ही


आपल्याला काय जमू शकतं हे अनेकांना आयुष्यभर कळतच नाही. मलाही सहा वर्षांपूर्वी माहीत नव्हतं. माझा दुसरा मुलगा एक वर्षाचा झाल्यावर मी तब्ब्येतीकडे पुन्हा लक्ष द्यायचं ठरवलं. आणि रोज थोडं चालू लागले. हळू हळू काॅन्डोभोवती धावायला सुरूवात केली. सिंगापुरमध्ये रात्री अपरात्रीही स्त्रियांना धोका नाही. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा मी धावायला जात. ह्यामुळे माझं धावणं नियमित होऊ लागलं. 

७ सप्टेंबर २०१३ रोजी पाच कि.मी. ची 'फन रन' केली आणि काही महिन्यातच ११ किमीची रन पूर्ण केली.
गोडी वाढत गेली तसं धावण्यावर अभ्यासपूर्ण वाचन सुरू केलं. सराव नियमित करत राहिले. समतोल आहार व सरावाचं वेळापत्रक बनवलं. २८ सप्टेंबर २०१४ रोजी मी माझी पहिली हाफ मॅरेथाॅन २ तास २० मिनिटात पूर्ण केली.
धावण्याची एक नशा असते. जणू व्यसनच. घरकाम, अंगदुखी, मुलांचा अभ्यास, घरातील तंटे काही म्हणून तुम्हाला धावण्यापासून परावृत्त करत नाही. उलट, कित्येकदा, अंगातील कणकण वा डोकेदुखी धावण्याने दूर होतं. तजेला मिळतो.
२४ एप्रिल २०१६ रोजी मी माझी पहिली फुल मॅरेथाॅन (४२ कि.मी) लंडन मधे पूर्ण केली. खूप काही साध्य केल्याचं समाधान मिळालं.
पण मी सांगू इच्छिते की अनेक लोक मॅरेथाॅन धावतात म्हणून आपणही धावली पाहिजे हे गरजेचं नाही. नियमित ३-५ किमी धावत असाल तरी ते पुष्कळ आहे. कुठल्याही चढाओढीचा मोह टाळा. धावण्यातून तुम्हाला काय आनंद मिळतो त्याचा विचार करा. कदाचित तुम्हाला पळणंच आवडत नसेल. मग सायकल चालवा. पोहायला जा. ट्रेकिंग करा. जिम ला जा. कुठला तरी व्यायाम प्रकार निवडा व तो नियमित करा. आनंदाने केलेल्या व्यायामाने मनाला व शरीराला उभारी येते. विपरीत परिस्थितीस तोंड द्यायची हिम्मत येते. बिलं भरण्यापलीकडेही आयुष्य असतं ह्याची जाणीव होते.
मी धावायला लागले तेव्हा माझ्या मनात कुठलेही मापंदंड नव्हते. काय साध्य करायचय ते केवळ इतकंच होतं की धावून बरं वाटायचं आणि वरील गोष्टी उलगडत गेल्या.

ह्या सफरीत मी स्वत:ला अधिक ओळखू लागले. समजू लागले की धावण्यातून मला जे काही मिळत आहे ते इतरांशी वाटायला हवं. ह्याच उद्देशाने सिंगापुरात पिंकॅथाॅनचं काम सुरू केलं. स्त्रियांना धावण्याचं व सुदृढ राहण्याचं मोफत प्रशिक्षण देऊ लागले. आयुष्यात कधीही व्यायाम न केलेल्या स्त्रिया जेव्हा मला सांगत, “आता मला सलग २ किमी धावता येतं!” तेव्हा वेगळंच समाधान वाटे.

ह्या समाधानातूनच कदाचित मला फुल मॅरेथाॅन, व पुणे-मुंबई तीन दिवसाची १७० किमी ची दौड करण्याची उमेद मिळाली असेल. अशाच काहीशा भावनेतून सिंगापूरभोवती २४ तासात १०० कि.मी. ची दौड करायची कल्पना जन्माला आली. ह्या देशाबद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करायला म्हणून ही दौड मी केली. 

इतर मॅरेथाॅन्स किंवा अल्ट्रा रन्सपेक्षा ही दौड फार वेगळी होती. मुंबई-पुणे ला आम्हाला फिजियो थेरपी होती, दिमतीला टीम ची गाडी होती, अनेक प्रकारचा आधार होता. ह्या १०० कि.मी. रन ला फक्त मी व माझा नवरा. वैद्यक सपोर्ट नाही की काही नाही. काही विपरीत परिस्थिती ओढावली असती तर आम्ही काय केलं असतं ठाऊक नाही.
माझ्या इतर सरावांप्रमाणे माझ्या नवऱ्याने सायकल वर मला सोबत केली. त्याच्याबरोबर उल्लेख करावासा वाटतो तो माझ्या दोन मुलांचा. त्यांची साथ नसती तर आजवर मी इतकं धावूच शकले नसते.

बरं, मार्गं कुठला निवडावा? सिंगापुरचे सुंदर नॅशनल पार्क्स

वापरत ह्या देशाला प्रदक्षिणा घालावी असं ठरवलं. घरापासून ७ कि.मी. वर ‘श्री रामार टेंपल’ नावाचं रामाचं व हनुमानाचं देऊळ आहे. मी ठरवलं की इथूनच धाव सुरू करून दुसऱ्या दिवशी इथेच संपवावी.

रामार टेंपल ला दौड सुरू करत मी दक्षिणेकडील प्रसिद्ध ‘ईस्ट कोस्ट पार्क‘ किंवा ‘ई.सी.पी’ परिसराकडे गेले. हा प्रेक्षणीय समुद्रकिनारी रस्ता १५ कि.मी. लांब आहे. इथून मी ‘गार्डन्स बाय द बे’ ह्या आणखी एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाला पोहोचले. इथवर २६-२७ कि.मी. पूर्ण झाले होते. रात्री १०:३० पर्यंत मी ३० कि.मी. कापले व ‘लौ पा सात’ ह्या फूड कोर्टला जेवायला थांबले.
मार्गावर अनेक मैत्रिणी मला भेटायला, माझ्याबरोबर धावायला आल्या. खूप प्रोत्साहन देऊन गेल्या.

जेवणाबरोबर थोडा बर्फं विकत घेतला व हाता पायाला चांगलं शेकलं. पुन्हा हुशारी वाटली व मी वेस्ट कोस्ट पार्ककडे निघाले. वाटेत अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती मुळे लांबच्या वाटा घ्याव्या लागल्या.

वेस्ट कोस्ट पार्कच्या सार्वजनिक सुलभ शौचालयात कपडे बदलून, स्ट्रेचिंग करून फ्रेश झाले. ही गोष्ट नमूद केली कारण स्वच्छ सार्वजनिक शौचालये व रात्री-बेरात्री बाईला निर्भीडपणे वावरता येणं हे सिंगापुरातच शक्य आहे. ह्याबद्दल सिंगापुरास अनेक धन्यवाद.

इथून पुढचा टप्पा होता पश्चिमेकडील प्रसिद्ध जुराॅंग लेक. इथवर माझे ४८ कि.मी. पूर्ण झाले होते.
तिथून पुढे मी उत्तरेकडील चोआ चुकांग व क्रांजी ह्या परिसरांकडे निघाले. त्यानंतर वुडलॅंड्स परिसरातून जात सेंबावांग गाठलं. इथवर मी ७७-७८ कि.मी. पूर्ण केले. 

ऊन व्यवस्थित चढलं होतं व मी सेंबावांग कसं गाठलं माझ मलाच ठाऊक. जेवायला थांबले तशी पुन्हा बर्फ विकत घेऊन शेक घेतला. मुद्दाम कधी बर्फाळ पेय न पिणारी मी बर्फाने भरलेले लिंबू सरबताचे एकामागे एक तीन ग्लास फस्त केले!

सेंबावांगहून निघाले ते भर दुपारी दोनच्या रणरणत्या उन्हात. जायचं होतं उत्तर-पूर्वेकडील पुंगोल परिसराकडे. सेंबावांगपासूनचा रस्ता लांबलचक महामार्गालगत. वाटेत दुकान नाही की हाॅटेल नाही. वेंडिंग मशीनही नाही. हा पल्ला माझा अंत पाहणारा ठरला. पाण्याच्या बाटल्या फार लवकर संपल्या. पाणी पिऊन धावल्याने पोटात टोूचून दुखू लागलं. अंग पार भाजून निघालं. शंभर कि.मी. अधिकाधिक अशक्य वाटू लागले.

पुंगोल वसाहत जशी दृष्टीस पडली तसा मनाला धीर मिळायच्या ऐवजी दौड सोडून द्यायची इच्छा होऊ लागली. कसंबसं मनाला सावरलं आणि हळू हळू पुढे सरकत राहिले. पहिला फूड कोर्ट दिसताच पाण्याची बाटली व पुन्हा थंडगार लिंबू सरबत!

पुंगोल नंतर पासिर रिस कडे येत मी माझं घड्याळ पाहिलं तर ९४-९५ कि.मी इतके अंतर कापलं होतं. अचानक मनाला हुरूप आला व पायांनी पुन्हा थोडा वेग पकडला. शेवटचे २ कि.मी. मी काही वेळा तर अगदी जोरात धावत ‘स्प्रिंट’ केली !

घड्याळात १०० कि.मी दिसले तेव्हा सुटकेचा नि:श्वास सोडला !

रामार टेंपल पोहोचेपर्यंत १०४ कि.मी. पूर्ण झाले. दौड संपवली ह्याचं समाधान आहे. आणि आशा आहे की माझा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

शेवटचं हेच सांगावसं वाटतं की आपण सर्वच जण चांगलं आयुष्य घडवायला शिक्षणात व नोकरी धंद्यात शर्थीचे प्रयत्न करतो. पण ह्यातून जे काही मिळवतो त्याचा आनंद घेतो का? हीच शर्थ, हाच ध्यास थोडासा मन:स्वास्थ्य व शरीरस्वास्थ्याकडे वळवला तर आयुष्याचा आस्वाद घेता येईल.

धावत रहा, निरोगी रहा, आनंदी व्हा !!- प्रगती पाटणकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा