ऋतु राग मालिका – भाग सहावा

नमस्कार मंडळी, ऋतुराग मालिकामध्ये आता आपण सहाव्या आणि अखेरच्या भागाकडे आलेलो आहोत. गेले पाचही ऋतू मालिकेतले पाच भाग आपण वाचल्याबद्दल धन्यवाद. 

शास्त्रीय संगीतावर आधारित ह्या मालिकेच्या अखेरच्या भागाकडे वळण्याआधी एक छोटसं मनोगत. भारतीय उपखंडात मानल्या जाणाऱ्या सहा ऋतूंचा निसर्गचक्रावर पडणारा परिणाम आणि त्याचा मानवी मनावर होणारा सकारात्मक परिणाम ह्या दोहोंच्या मिलाफातून शास्त्रीय संगीतातल्या काही रागांचा आणि त्यातून उत्पन्न झालेल्या स्वर संगतीचा एक धावता आढावा ह्या लेखमालेतून मांडला. आज विविध माध्यमातून आपल्यापुढे विविध रूपातून संगीत येत असते. काळात नकळत त्याच्याशी आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टींची सांगड घातली जाते. त्यातून काही संकेत आपल्या मनात रुजवात घेतात. प्रश्न पडतात, की हे स्वर म्हणजे नक्की काय ? आणि त्याचा मागोवा घेत असता, अचानक काही संदर्भ ग्रंथ हाताशी लागतात, संगीततज्ञांचे काही लेख आंतरजालावर सापडतात. आणि मग त्यातून बारा स्वर, आणि त्यांची मानवी मनाशी, आणि निसर्गचक्राशी असलेली मांडणी समोर येते. निसर्ग आणि रागसंगीत ह्या दोहोमध्ये अमर्याद वैविध्य, अमर्याद विशालता हि प्रमुख समान गोष्ट आहे. आणि त्याचं विशालतेचा, वैविध्याची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न ह्या माध्यमातून केला. ह्या लेखाच्या अखेरीस संदर्भ सूची देत आहेचं.

वळूयात, अखेरच्या भागातल्या ऋतूकडे, शिशिर... सकाळची उन्हे वाढीस लागलेली आहेत.. पण झाडाच्या सावल्या पाने गळतीस लागल्याने पूर्वीसारख्या भरदार नाहीत. हवा कुंद धुंदी आहे. धुक्याचा रंग, पानांचे तपकिरी पिवळ्या छटांचे विशीर्ण रंग, तो भकास सुकेपणा.. थंडीच्या उत्तेजकपणाने वाढीस लागलेला शुष्कपणा आणि त्याची विशिर्णता पुढे येणाऱ्या वसंतवैभवाची पार्श्वभूमी तयार करते.. आणि विश्वाचे गंभीर रहस्य उलगडू येते. प्रत्येक झाड काही अपवाद वगळता, विरळ होत जात असतात. झाडांच्या विरळ माथ्यावरून उडत जाणारा पक्ष्यांचा थवा अचानक मोठा वाटू लागतो.. जमिनीवर पडणाऱ्या त्या सावल्या आता ह्या झाडांच्या माथ्यावर पडताना मनावर वेगळाच परिणाम करून जातात. पाखरांचा रंग कुठलाही असो, त्याची पडणारी सावली राखाडी, फिकट काळी .. आणि मग अनामिक स्तब्धता वातावरणात भरून राहते. तारुण्य हरपल्याने उतरला लागलेल्या स्त्री-पुरुषांच्या मुखावर येतात तसे काहीसे भाव ह्या वनस्पतींवर उमटल्याचा भास होतो. 

हिच धीर गंभीरता बाळगणारा राग तो भैरव... भारतीय संगीतात अति प्राचीन रागांपैकी एक राग. पुढे रागांचे वर्गीकरण करताना भैरव हा थाट झाला. आणि त्याच्या आजूबाजूचे राग त्यात समाविष्ट झाले. खऱ्या अर्थाने हा राग संपूर्ण – संपूर्ण जातीचा. रे, ध हे दोन स्वर कोमल सोडता बाकी पाचही स्वर शुद्ध. 

भैरव राग भक्तीभावासारखाच व्यक्त होणारा आहे, धीरगंभीर व परमेश्वराची आर्ततेने आळवणी करणारा! अगदी झुंजु-मुंजूची वेळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट नुकताच सुरू झाला आहे, मंदिरातून घंटानाद ऐकायला येतो आहे, उदयाचली अरूणागमनाचा दिव्य प्रकाशमय संदेश येऊन पोहोचला आहे, कोणी भाविक नदीच्या पात्रात उभे राहून उगवत्या भास्कराला अर्घ्य अर्पण करतो आहे- बस हीच वेळ आहे, ‘भैरव राग’ आळवून जगन्नियंत्याला साद घालण्याची !

कुसुमाग्रजांचे भगवान शंकराची आळवणी करणारे एक भक्तिगीत आहे. कदाचित ते आपल्या वाचण्यातही आले असेल. त्याचे बोल असे आहेत-

‘महन्मंगला परमसुंदरा, हे शिव गंगाधरा,

सदय होऊनी या भूमीचे आज शिवालय करा!’

भैरव राग ऐकताना हाच भाव मनात दाटून येतो.

भैरव रागाचे सगळयात प्रसिध्द भावंडं म्हणजे, राग ‘अहिर भैरव’. ह्या रागातून व्यक्त होणा-या भावनांचे वर्णन करायचे झाल्यास विरही जीवांची आर्त हाक किंवा प्रियतमेच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या प्रियकराला युगासमान भासणारा प्रत्येक क्षण म्हणजे, राग ‘अहिर भैरव’. संगीतकार, गायक मन्ना डे ह्यांनी गायिलेले, ‘पूछों ना कैसे मैने रैन बितायी’ हे डोळयांच्या (आणि मनाच्याही) पापण्या ओलावणारे विरहगीतसुध्दा ‘अहिर भैरव’ या रागावरच बेतलेले आहे.

बैरागी भैरव’ हा ‘भैरव’ थाटातूनच तयार झालेला आणखी एक वैशिष्टयपूर्ण राग! नावाप्रमाणेच वैराग्याची भावना ओतप्रोत भरलेला असा हा राग आहे. ‘ओंकार स्वरूपा’ हे सुरेश वाडकर ह्यांनी गायिलेले भक्तिगीत, श्रीधर फडके ह्यांनी राग ‘बैरागी भैरव’च्या सूरांच्या आधारेच संगीतबध्द केले आहे. शिवाय लताजींनी गायिलेल्या संत ज्ञानेश्वर रचित ‘पैलतोगे काऊ कोकताहे’ ह्या विरहिणीची चालसुध्दा राग ‘बैरागी भैरव’ चे सूर घेऊनच बांधण्यात आली आहे. ‘शिवमत भैरव’, ‘नटभैरव’ हे भैरव थाटातून निर्माण झालेले आणखी काही राग.

भारतीय शास्त्रीय संगीतात अढळ पद लाभलेल्या कुमार गंधर्वांनी १९७८ साली एके दिवशी पहाटे सहा वाजता रसिक मित्रांना बोलावून “भैरव के प्रकार” हि मैफिल केली.. आता बोला.. शिवमत बहिरव, अहिर भैरव, गुणकली, भवमत भैरव, बीहड भैरव अश्या रागामध्ये रचना गायल्याची नोंद आहे. 

अखेरीस ग दि माडगूळकरांच्या कवितेने हि लेखमालिका संपवतो.

“माझ्या हाते मी उजळाव्या घरात माझ्या मंगल ज्योती
सुखद असावी अशीच संध्या, स्वर उमटावे शुभंकरोती |
रात्री थकून निजण्यापूर्वी, ओठी यावी अभंग ओवी
भूपाळी ते आळवीत मी, जागे व्हावे पुन्हा प्रभाती ||”


नेहमीप्रमाणे यु ट्युबच्या लिंक्स देतो.. 

कुमार गंधर्व – भैरव के प्रकार


रशीद खान – भैरव 


किशोरी आमोणकर – अहिर भैरव


कुमार गंधर्व – भवमत भैरव


रशीद खान – अलबेला सजन 



वीणा सहस्रबुद्धे – अहिर भैरव 


संपूर्ण लेखमालिकेसाठी संदर्भ सूची 
ऋतू चक्र – दुर्गा भागवत 
शोधगंगा हाय आंतरजालवरील संगीतातीळ पी एच डी धारकांचे लेख. 
नाद वेध – अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर. 
नादयात्रा – अशोक रानडे. 
हिंदुस्थानी संगीत पद्धती, मुलतत्वे आणि सिद्धांत – प्रा. बाळ पुरोहित 
राग रंग – अनिल गोविलकर 
संगीत संगती – अशोक रानडे. 

- ओंकार गोखले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा