द्वाड की ग्वाड


आकाश ऑफिसमधून घरी येतो न येतो तोच डोअरबेल वाजली . 

“या ,या, अगं , दोन कप चहा टाक”

“ मी चहा घ्यायला नाही आलोय, तंबी द्यायला आलोय.”

“ऑ”

“तुमच्या कारट्याने माझ्या बाबांच्या धोतराच्या काष्टा सोडला. समज द्यायला आलोय. पुन्हा असं काही झालं तर बदडून काढीन, सांगून ठेवतोय .कसले संस्कार”....... 

“महे SSSS श ,बाहेर ये”. ...... आकाश

“ अहो, आमचे लेकरू तसं नाही हं. त्यांनी काही केले असेल आधी”... आजी उवाच .

“महे SSSS श, आता आजीच्या मागे लपू नकोस. सांग, हे म्हणतात ते खरे आहे?”

“ बा SSS बा ,ते आजोबा आम्हांला नेहमी त्रास देतात”

“ त्रास?” 

“ हो, आम्ही बाहेर खेळतो, तर येऊन पाठीत मारतात. आज त्यांनी मला आणि प्रकाशला काठीने मारले.”

“ का?’’

“ आम्ही अंगणात खेळतो तर आवाजाचा त्रास होतो त्यांना.खूप लागलं म्हणून आम्ही दोघांनी.... . रडवेला महेश. 

‘पण आम्हांला कां नाही सांगितले इतके दिवस? आणि तुम्ही हो, कासोटा सोडणे गुन्हा की काठीने मारणे हे ठरवा आधी. या आता.” 

“जातो, जातो. पण पुन्हां सापडला तर”....... 

“हात तर लावा, आधी घरचे बघा”

“ अहो हळू. केव्हढ्यांदा आपटलेत दार., आधीच जुनं झालंय घर”.

“ इथं काय ऐकतेस आणि दाराची पडलीय तुला”. 

“ नाही, मी म्हणते, महेशचं चुकलं असेल, पण त्या म्हाताऱ्या नेही…”

“आ SSS ई ,तू पण म्हातारीच आहेस. चालेल का तुला तसं म्हटलं तर? तुझ्याच लाडाने तो शेफारत चाललाय.”

“अरे, लहान मुलं , देवाची फुलं !!”

“हो तर, तुझ्या या फुलाने परवा आपल्या दरवाज्यात दोघींचे पदर बांधून ठेवले होते. हसतेस काय? भिंतीवर आपटल्या विरुद्ध दिशेने, नशीब एवढ्यावरच निभावले. पडल्या असत्या तर?”....... 

“ अरे, किती वर्ष केर आपल्या दारात सारतात. समजुतीने, चिडून, भांडून… साऱ्या प्रकारे सांगूनही निर्लज्जपणा काही गेला नाही त्यांचा . शेवटी नाईलाजाने मीच रोज साफ करायची. परवा याच्या अंगावर आला आणि तोंडावर पण उडाला. चिडला आणि ....... खुखु खु …. दोघी हसतात.. 

“ आई, तरीपण हे बरोबर आहे का?”

“अहो, तुम्ही म्हणता ते खरे, पण खरंच त्यांनी खूप वर्ष विनाकारण छळलं . एवढं मात्र खरं, की गेल्या दोन दिवसात त्यांनी केर टाकला नाही आपल्या दारात” …अनू म्हणाली . 

खुखु खु !!!!....... आई . 

“ वा, वा. मग बक्षिसच द्या त्याला काही !”

“ नाही, रागवू नका प्लीज, पण खरंच बऱ्याच वर्षांनी रिलीफ मिळाल्या सारखा वाटला . उगाच नाही हो तो खोड्या करत. बसा जरा. मी चहा टाकते.” 

पुन्हा डोअर बेल खणाणते .

“आता कोण? काय नवीन प्रताप असेल तर आज मीच बदडून काढीन त्याला, सांगून ठेवतो आई”

“ अरे, शिक्षेने मुले सुधारत नाहीत”... 

“हे तू मला सांगतेस??”

“ तुझ्याच वरून तर सांगत्येय”.... 

“आ SSSSSS ई”...... 

अनू आतून येत, “ अहो, दार उघडायचे सोडून भांडताय काय ?” दार उघडीत ,

“ अरे, घेलाशेठ, तुम्ही??”

“ आता काय केले महेश ने? महे SSSS श,बाहेर ये आधी ,बघतोच तुला आता !”

महेश अवाक् ! “आई, मी खरंच काही नाही केले”. 

“नाय कसा? तुमीच तर केला”... 

आकाश :एक सणसणीत रट्टा हाणीत “सांग आता , काय केलेस यांना?”

भोकाड पसरत, “ मी काहीच नाही केले. तुम्ही उगाचच… 

“अरे, मारते काय तेला ., कसला बाप रे तू”

“ बाप आहे, म्हणूनच मारतोय. तुमची काय तक्रार सांगा आधी . आल्या आल्या ताप # #”

“ छ्या छया तकरार नाय बा . ते कृष्णरावाचं धोतर नाय का सोडलं”..... 

“अहो, धोतर नाही, नुसता कासोटा !” 

“तेच ते की वो”

“ घेलाशेठ, लई फरक हाय तिमंधी”

“अहो, काय हे, तुम्ही त्याच्यासारखे अशुद्ध काय बोलताय?”

“ तू गप्प बस. मधी मधी # #. मी त्याच्या भाषेत समजावतोय त्याला.”

“अरे आकाशशेठ, भांडू नाका. ही मिठाई घे.”

“ऑ , धोतर सोडल्याबद्दल मिठाई?”......... आकाश अवाक् ! 

“ अहो, धोतर नाही, कासोटा , कासोटा !”

“ तेच ते”

“ऑ,तुम्हीसुद्धा?? मग त्याला कशाला मगाशी ओरडलात ?”

“आता तुम्ही दोघे भांडू नका. घेलाशेठ, काय प्रकार आहे? काय भांडण आहे काय?” … आई उवाच . 

“ छ्या छया,आमी कधी भांडते काय?”

“मग, तुम्हाला काय आनंद, मिठाई घेऊन आलात ते?”

“अरे, कपड्याची शुध नाय,तशाच आला माझ्या दुकांमधी .मी # # विडिओ काढला नि पाठवूनशान दिला त्याच्या मुलग्याला .हा हा”

“का SSSS य ?? तू हा कारभार केलास, आणि तो बोंबलत इथे आला,# #”........ आकाश भडकलाच . 

“नाय नाय, तो आला कोकलत माझ्या दुकांमधी . तवा सांगूनशान टाकलं, माझी उधारी टाक, नाहीतर हा विडिओ टाकतो फेसबुक वर. # # बापाला उपाशी ठेवतो की कपड्याची बी सुध नाय.”

“मग”

“ मग काय. दिलं ना सगळं पैसं थँक्यू हा. महेश बेटा”

“पण तुम्ही तरी इतकी उधारी देता कशी? आणि याने कासोटा सोडला नसता तर?”......डोळे मोठठे करीत आई उद्गारली . 

“ आई, तू पण ना....... 

मी पण ना काय..? दुकानात पाटी लावलीय ना यानेच.. “आज रोख , उद्या उधार”

“अगं, जरा चहा टाकच आता. घेलाशेठ पहिल्यांदाच आलेत . साखर चालते ना घेलाशेठ?”

“येस, येस. आपल्याला ते डायबिटीस फिटीस नाय बा”

“मला पण दे जरासा आज”..... 

“ आई, तुला साखर खायची नाहीये’”

“चहाच मागतेय ना ? ही मिठाई तर नाही.”

“ चहा नाही आणि घेलाशेठ ही मिठाई परत घेऊन जा”

“ अवं , खाऊ द्या हो आजीबायला. कधीतरी मरायचंच ना ?”

“ ऑ मेल्या, माझ्या का जीवावर उठलास?”

“ घेलाशेठ, तुम्ही..... 

“आता वय काय आजीबायचं ?असाच विच्छा मारून मारून घरात ठेवतात नि मग आमच्या दुकानमंधी येतात”. 

“ आई????

“अरे नाय नाय ,अजून ती आली नाही बगा पण तो म्हातारा येतो ना बसूनशान रावता,मग देतो काहीतरी आनि उपाशी असतो म्हणूनशान या पोरांवर राग काढतो. 

:तसे असेल तर त्याच्या मुलाकडून पैसे घेणे चूक.”

“हा रे,खरं बोललासा . मी फकस्त लिहून ठेवत होतो पण चार दिवसापूर्वी कळाला, तेला खायलाच देत नाय बराबर..

“डायबिटीस असेल रे”

“अरे, तुमी तेची तब्बेत बगा. हाडं वर आलेली. जवा तवा दुष्काळातून आल्यावानी दिसतो.तेला डायबिटीस हायेच नाय. जवतवा ‘भूक लागली,’ करत येतो. मग कलालं म्हाताऱ्या कडून सगळं पैसं घेऊनशान तेला काय बी बरं करत नाय हे दोगं”

“अरे देवा”..... 

“म्हणूनशान वसुली केली. बरंय वहिनीसाब, च्या लई झक्कास आन तुमचा महेश लई ग्वाड !”

“ ग्वाड नाही रे, द्वाड आहे”.... आकाश. 

“ नाय नाय रं, तसा नाय, बराय. महेश बेटा थँक्यू हा !”


“ आई तुझी शुगर वाढलीय . रिपोर्ट घेऊन आलोय.”

“ अग्गोबाई, ती कशी काय? मी तर काहीच खात नाही. कधीतरी जरा एवढस्स ...... 

“मग ती direct lab मध्ये जाऊन तुझ्या blood आणि urine च्या sample मध्ये गेली असणार”

“महेश, हसतोस काय वेड्यासारखा आत जा बघू. .अहोSS , आज सुद्धा शिरा खाऊन झालेला दिसतोय.”

“ आई,शि SSS रा ?एका दिवसात किती साखर पोटात गेली? चहासुद्धा साखरेचा घ्यायचा नाहीये तुला आणि चक्क शिरा? “

“उगाच शिरा ताणून ओरडू नकोस. अरे पोर भुकेने आलं होतं, म्हणून म्हटलं त्याला, चल तुझ्यासाठी शिरा करते, त्यातला जरा एवढासा खाल्ला हो !”

“महे SSSS श. बाहेर ये. तुला पोळी भाजी नरड्यात अडकते का?”

“ नाही, का”?

“ बघ कसा बोलतोय. मग शिरा कशाला करायला सांगितलास ?”

“मी ? मी जेवलो होतो बाबा. आजीच दुपारी म्हणाली, “ किती दिवसात शिरा नाही खाल्ला. मी करते हं आपल्या दोघांसाठी” मी सांगितले , मला भूक नाहीये , मला नको. तरी तिने केला तर मी काय करू?

“ पण राजा, केल्यावर खाल्लास की नाही आवडीने?”

“नाही, तू, घे घे करीत होतीस म्हणून शेवटी घेतला आणि ती वाटी फ्रिजमध्ये ठेवून दिलीये”

“आई , हे मात्र...... 

“ अहो, खाऊ दे त्यांना, इतकं राहवत नाही तर . आपण त्यांच्या काळजीने बोलायचे आणि त्यांनी समोरच्या आजोबांसारखे केलं तर?”

“अनू , काय बोलतेस? इतकी का मी..... ( हुंदके )

“नाही नाही, तुम्ही खूप चांगल्या आहात .आमच्यासाठी पण केला असेल शिरा, हो ना?”

“ कधी मेला तो शिरा केला तर इतकं रामायण ‘. देवा, तुला रे डोळे”. 

“अगं आई, काल तिने शिकरण पोळी खाल्ली होती.”

“महे SSSSSSS श ,मेल्या, चुगली करतोस माझी?”

“ अगं आई, तुझं देवाचं फूल !!”

“महेश तू......... 

“आत जा ..... असंच ना? आत गेलो की ओरडून बाहेर बोलवता आणि बाहेर आलो की आत जायला सांगता. नक्की काय ते ठरवा एकदा, तोपर्यंत मी प्रकाश कडे जातो. 

“ अरे थांब थांब.. गेलाच . अगदी ऐकेनासा झालाय . तर आई… 

“ अहो जाऊ दे म्हातार माणूस. म्हणजे ही एक लहान मूल . बसा जरा पेपर वाचत . मी पटकन स्वयंपाक करते. 

“व्वा , छान जेवण झाले. काय आई,?”

“ हो तर. अनूच्या हाताला चव आहे आणि कढी गोळे तर छानच झाले गो”

“महेश, तुझं काय चाललंय? घाईघाईत जेवून परत बाहेर कुठे जाऊन आलास?” 

“काही नाही, काही नाही ,कुठे नाही”

“ म्हणजे नक्की काहीतरी आहे, सांगतोस का, की.......

“ खरंच काही नाही”

“अगं ,प्रकाशला जरा हाक मार”

“ नको नको, त्याचे बाबा अजून रागीट आहेत”

“ अजून म्हणजे?”

“ म्हणजे, म्हणजे काही नाही”

“ आता सांगतोयस का सरळपणे?”

“ हो, पण उद्या सांगू का? आई मला खूप झोप आलीये”

“ नाटकं पुरे”

‘ खरंच उद्या नक्की सांगतो.”

“ तुमचं उद्याचं काय शिजलंय ते मला आत्ताच कळलं पाहिजे”’

‘आजी”... 

“ हात मेल्या., माझी चुगली करतोस , मी नाही तुला मदत करणार.”

“हा तसा ऐकणार नाही. अगं , प्रकाशला हाक मार.”

“नको, नको. सांगतो पण तुम्ही काही मध्ये येणार नाही तर….”

“ आता सांगतोस की”.....

“ म्हणजे आम्ही ना, सानियाला विचारले. ती म्हणाली, हो .तिच्या आजोबांना त्रास देतात आई बाबा.तिला अजिबात आवडत नाही. रडू येतं. तीच तिचा खाऊ त्यांना देते. दुष्ट आहेत तिचे आई-बाबा, म्हणून आम्ही ना…. 

“आम्ही ना… काय? बोल… 

“......... “

“ अरे, बोल,........ अगं ,प्रकाशला…. 

“ म्हणून आम्ही काहीतरी करणार रोज”.... 

“ काहीतरी म्हणजे?”

“ म्हणजे, आज तिच्याकडे च्युइंगम दिलाय. तो ती तिच्या बाबांच्या बुटात आणि कपड्याला लावणार. आणि माझ्याकडे काडेपेटीत झुरळे आहेत, त्यातली चार ती आईच्या साडीत टाकणार”

“ अरे गाढवा, कोणी सांगितले हे उपद्व्याप करायला”

“म्हणजे आम्हीच ठरवले”

“ तुम्ही म्हणजे ना, # # , आणि झुरळे वगैरे काय? काय काय ठेवले आहेस?”

“नाही , झुरळेच खूप आहेत. तसा एक विंचू आहे पण झुरळे सोपी पडतात. त्यांना न खूप दिवस खायला नाही मिळाले तरी ते मरत नाहीत”. 

“आणि साप नाही का सांभाळलाय ?”

“ नाही, प्रकाश म्हणाला, तो डेंजर असतो. आपल्याला पण चावू शकतो.”

“अरे अरे अरे! अगं ,हे सहा वर्षांचं कार्ट आपलंच आहे का ?”

“ हो, त्याला इलाज नाही”

“आई, तू हसतेस काय? लहानपणी जरा मस्ती केली तर फटके द्यायचीस. आणि आता..... त्याच्या अशा वागण्याला तुझीच फूस दिसतेय .कोणाच्या भरवशावर आम्ही ऑफिसला जायचे गं ?”

“अरे, बरं करताहेत , तू नको मध्ये पडू”

“काय? तुला कळतंय ना? काय सांगतेस? तूच शिकवितेस की काय त्याला असलं काही?”

“ नाही बाई’,मी फक्त हल्ली त्याला इसापनीतीतील गोष्टी वाचून दाखविते”

“ अरे देवा,अगं .अनू .... “

“अहो, तुम्ही दोघांकडेही लक्ष देऊ नका. मला कळतंय, अशा लहान गोष्टींनीच पुढे मोठ्या गोष्टी, गुन्हे होऊ शकतात. हे थांबायला हवे इथेच, पण रात्र झालीय . उद्या रविवार आहे. सकाळी जाऊ त्यांच्याकडे आणि बोलू सविस्तर. आता झोपा सगळ्यांनी. 

“चला, त्या दोघांना चुका मान्य झाल्या, हे फार बरं झालं”

“सहज मान्य केल्या का अनू ?आधी मारे, तुम्हाला काय माहिती, कसले घाणेरडे आरोप लावता ,म्हणून वतवतले . सानियाने सांगितल्यावर कसे गप झाले”. 

“हो ना. पोरीची मात्र कुचंबणा झाली असेल आणि गप्प झाले तरी काही मान्य करायला तयार होते का“ होSS . शेवटी सोसायटीची मिटिंग घेऊन यावर चर्चा करायचे तू म्हटल्यावर मात्र घाबरले. बाकी बायको, लई हुषार हं तू”

“अरे वा, मानलं का दोघांनी? वा !वा ! म्हाताऱ्याचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला”

“ आई, ..... “

“हं ,हं ,आजोबांचे !”

“ते राहू दे सगळं. आधी महेशची रूम साफ करायला पाहिजे. सगळं प्राणिसंग्रहालय बाहेर नेऊन टाकायला हवे. चल गं”

“ ते तुम्ही करा. मी तोपर्यंत झकास नाश्ता बनविते”

“आई, तू चल माझ्या मदतीला. तुझ्याच लाडाने पोरगं बिघडलं”

“बिघडलं कसलं? त्याच्याचमुळे म्हाता… नाही आजोबांना खायला मिळेल ना ? आणि ते साफ करणे तू आणि महेश च बघा. मी पूजा करते तोपर्यंत.”

“ बाबा, त्या दोघी झुरळांना घाबरतात . आणि राहू देत ना, माझ्या खोलीत, परत कधी लागली तर …. “

“आता कानाखाली आवाज काढीन परत असले उपद्याप केलेस तर.”

“आ SSS ई ...... 

“महेश, शहाणा ना तू ?” अनू समजावत म्हणाली. 

“आणि आई, मला तुझं पटतंय बरं का !”...... अचानक सौम्यपणे आकाश बोलला . 

“ काय ते?”

“म्हणजे पोरगं द्वाड आहे पण ग्वाडही आहे. त्याला एक भावंड आणूयाच लवकर. म्हणजे जरा जबाबदारीने ही वागू लागेल, हो ना अनू ?”

“ इश्श”

“ओ , परत म्हण. पहिल्यांदीच ऐकले तुझ्या तोंडी ! आई, पाहिलेस का, ही आधुनिक स्त्री चक्क लाजतेय”

“उगाच तिला चिडवू नकोस. माझी गुणाची सून आहे ती .आणि लाजली म्हणजे होकार !”

“तो लाडोबा, ती गुणाची आणि मी ?”

“तू तर पहिला लाडोबा..... “

“ बाबा, तुम्हीपण लहानपणी झुरळं ..... 

“नाही रे पण बेडूक मात्र घेऊन यायचा घरी आणि अचानक पायात आल्यावर मीही बेडकासारख्या उड्या मारायला लागले की खोखो हसायचा”

“ WOW ,बाबा सॉलीड. मी प्रकाश आणि सानियाला सांगून येतो.”

“ ए, गप. आई तू पण ना”...... 

“ते राहू दे सगळं. ही आनंदाची गोष्ट … तुमचा निर्णय रे…. साजरी करू या. अनू SS 

“हो हो. काय करू, बटाटवडे की पावभाजी?”

“ काही करू नकोस. तो घेलाशेठ ने आणलेला बॉक्स आहे ना, त्यात मस्त अंजिराची बर्फी आहे...... 

“ म्हणजे आई तूSSSSSS ,तुSSSS म्ही ......... दोघेही एकाच वेळी......... 

- नीला बर्वे



२ टिप्पण्या: