ऋतुगंध हेमंत - वर्ष १२ अंक ५
'नाका' हा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो ना ? पण नक्की काय अर्थ आहे या शब्दाचा ? मला आठवतंय, लहानपणापासून हा शब्द कानावर पडत आलाय आपल्या. "जरा नाक्यावर जाऊन येतो गं" असं सांगून घराबाहेर पडलेला माणूस, नक्की किती लांबपर्यंत जाऊन येईल हे त्याचं त्यालाच माहित नसतं.
भारतात, एका गावाच्या हद्दीतून दुसऱ्या गावाच्या हद्दीत शिरताना 'टोल नाका' लागतो हे आपणा सर्वांना माहितच आहे. तिथे आपण पुढच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी काही टोल भरतो. आता रस्ते इतके खराब असतात कि ‘हा टोल कशासाठी भरायचा ? तो चुकवता येईल का ?’ असे विचार प्रत्येकाच्या मनात आल्यावाचून राहत नाही ते वेगळेच.
खेडेगावात आपण एखाद्याला पत्ता विचारला कि तो उत्साहाने सांगतो "हा समोर नाका दिसतुया न्हवं, अस्से नाकासमोर जा, त्या नाक्यावर लेफ्टला वला आणि फुडं राईट घ्या म्हणजे आलाच बगा समोर पत्ता तुमचा.” आता, हा लेफ्ट आणि राईट म्हणताना नेमका राईटच्या ऐवजी लेफ्ट आणि लेफ्टच्या ऐवजी राईट हात दाखवला जातो हे आपल्या लक्षात येतं, पण समोरचा माणूस बिचारा आपल्याला मदत करायच्या उद्देशाने सांगत असतो त्यामुळे आपल्याला हसू दाबून धरावं लागतं आणि पुन्हा एकदा हे लेफ्ट / राईट बरोबर आहेना याची खात्री करून घ्यावी लागते. हा नाका म्हणजे एक डावीकडे आणि एक उजवीकडे रस्ता फुटलेला बोळ अगर चौक असतो.
आणखी एक प्रसिद्ध नाका म्हणजे 'वासुनाका'. एखाद्या कोपऱ्यावर बसलेली दोनचार टारगट पोरं, जेव्हा पोरींकडे पाहून वासुगिरी करतात ना तो हा नाका.
आपण सर्वांनी पाहिलेली एक सिरीयल आठवा बघु जरा. नाव होतं 'कॉमेडी सर्कस'. काही वर्षांपूर्वीच बंद झाली ती, पण त्यातले दोन विनोदी नट आठवतात अजून. कृष्णा आणि सुदेश नावाचे. हे दोघेही सारखा 'साकीनाक्याचा' उल्लेख करून त्यावर काहीतरी विनोद करायचे आणि लोक खूप हसायचे. साकीनाका ह्या शब्दात हसण्यासारखे काय आहे हो ? मला तरी खरंच कधी समजलं नाही. पण ही काहीतरी छान वेगळी जागा आहे, जी लोकांना आवडते असा माझा पक्का समज झाला होता.
बरेच वेळा मराठी बातम्यातही हा शब्द कानावर पडायचा. त्यामुळे हा नाका नक्की कुठे आहे आणि त्यात काय विशेष आहे आणि तो एवढा का प्रसिद्ध आहे याबद्दल माझ्या मनात उगीच कुतूहल निर्माण झालं. मला मुंबईची फारशी माहिती नाही, पण माझा नवरा मुंबईलाच लहानाचा मोठा झाला होता. त्याला विचारले साकीनाक्याबद्दल, तर त्याने हात झटकून टाकले, म्हणाला ‘मुंबईत आहे गं कुठेतरी, पण मी नाही गेलो तिकडे कधी’. झाले. असं उत्तर दिल्यावर प्रश्नच मिटला. मग आता कोणाला विचारणार ? ह्या नाक्यावर किंवा आसपास आपले कोणी नातेवाईक रहातात का याचाही शोध घेतला. त्यांच्याकडे भेटायला गेलो म्हणजे आपोआप साकीनाका पहाता येईल. पण बॅड लक. साकीनाक्याला आणि जवळपास राहणारे आमचे कोणीच नातेवाईक नव्हते. त्यामुळे तोही मार्ग बंद झाला.
अश्या प्रकारे साकीनाका पहाण्याची फारच उत्सुकता होती. त्यानंतर कॉमेडी सर्कस ही सिरीयलही बंद झाली, त्यामुळे 'साकीनाका' हा शब्दही कानावर पडेनासा झाला. पण मी मात्र विसरले नव्हते हं. माझ्या मनात अजूनही 'साकीनाका' पहायचे विचार घर करून होते. त्यानंतर ३/४ वर्ष अशीच गेली. दरम्यान मधल्या ३/४ वर्षात कुलू -मनाली, राजस्थान, कोंकण हे प्रदेश पालथे घातले आम्ही, पण साकीनाका पहायचा योग काही जुळून येईना. विमानतळावर उतरले कि घरी जायची नेहमी घाई असायची, सुट्टी थोडीच असल्याने कामे खोळंबलेली असायची, मग माझ्या साकीनाका पहाण्यासारख्या फालतू गोष्टीला कोण महत्व देणार ?
दोन वर्षांपूर्वी सुट्टीसाठी भारतात जाण्याचा आमचा प्लॅन ठरत होता तेव्हा श्रीरंगला हळूच म्हटले कि ह्यावेळी मात्र आपण साकीनाका पहायचा प्लॅन करूया हं नक्की. जणू काही साकीनाका म्हणजे काहीतरी सुंदर आणि प्रेक्षणीय अशी जागा होती जिथे साईट-सिईंग करायला मला जायचं होतं. श्रीरंग म्हणाले, "चल गं काहीतरीच काय ? आपल्याला किती कामं असतात तिथे गेल्यावर. वेळ तरी असतो का असं काही करायला ? काहीतरीच डोक्यात येतं तुझ्या". झालं. मी गप्प बसले. मनातल्या मनात म्हटले कि ह्यावेळीही साकीनाका पहायचा योग काही दिसत नाही.
निघायची तारीख ठरली की आम्ही कोकणात असलेल्या माझ्या भावाला सांगतो, नंतर तो, कोकणात त्याच्याकडे ठेवलेली आमची कार, ड्रायव्हरबरोबर एअरपोर्टवर, आमच्या फ्लाईट पोहोचायच्या वेळेला पाठवतो, म्हणजे आम्हाला ती तिथे असताना वापरायला, पुण्याला न्यायला छान उपयोगी पडते. सिंगापूरला परत येऊ, तेंव्हा ड्रायव्हर कोकणातून येऊन कार परत कोकणात नेतो. असा प्रकार कित्येक वर्षे सुरळीतपणे चालू आहे. घराच्या अंगणात पार्किंगची छान जागा आहे आणि कार तेवढीच वापरात राहते हा यामागचा उद्देश.
ह्यावेळीही ३ वाजता विमान उतरलं की ४ वाजता त्याने आम्हाला भेटायचे असे ठरले होते. बाहेर आल्यावर नेहमीप्रमाणे ड्रायव्हर आमची वाट पहात असणार म्हणून आम्ही निश्चिन्त होतो. पण बाहेर येऊन पहातो तर तो आलाच नव्हता. आता कोकणातून १५० कि.मी. प्रवास करून तो येणार, त्यामुळे लागला असेल कुठेतरी वेळ, थोडी वाट पाहू असे म्हणून आम्ही शांत राहिलो. आणखी अर्धा तास होऊन गेला तरी त्याचा पत्ता नाही. फोनही लागेना. काय करावे प्रश्नच पडला होता. आत्तापर्यंत असे कधीच घडले नव्हते. म्हटले, कोकणात भावाला फोन करून विचारावे. त्याचा फोन मात्र नशिबाने पटकन लागला तर भाऊ म्हणाला "अग सुनीता, तो तर वेळेवर निघालाय. अजून कसा आला नाही ?"
श्रीरंग फोन लावायच्या प्रयत्नात आणि माझी मात्र चिडचिड सुरु होती. "काही जरूर होती का ड्रायव्हरला डायरेक्ट एअरपोर्टवर बोलवायची ? त्यापेक्षा टॅक्सी केली असती तर एव्हाना घरी पोहोचून आराम तरी करता आला असता. आधीच एअरपोर्टवर चालून आणि ५ तासांच्या प्रवासाने कंटाळा आलाय. त्यात इतका वेळ वाट पाहायला लागली. तरी मी म्हणतच होते कि त्याला एअरपोर्टवर नको, घरी येऊन गाडी द्यायला सांगू म्हणून, तर ऐकलं नाही माझं तुम्ही, आता भोगा तुम्ही आणि मीही भोगते तुमच्याबरोबर" वगैरे वगैरे. माझा पारा कधी नव्हे तो एवढा चढला होता.
तितक्यात ड्रायव्हरचा फोन लागला. मी ओरडलेच एकदम फोनवर, "अरे चंद्रकांत, आहेस कुठे तू इतका वेळ ? दीड तास झाला तुझी वाट पहातोय आम्ही आणि फोनपण का नाही उचललास?" माझी प्रश्नांची सरबत्ती. तर तो शांतपणे म्हणतो "अहो ताई, थांबा जरा. ऐकून तर घ्या माझं. नेटवर्क नव्हतं वाटेत म्हणून फोन करता नाही आला. मी वेळेत निघालो पण बराच प्रवास झाल्यावर गाडी गरम होऊ लागली. मग स्पीड थोडा कमी करावा लागला. मुंबईत शिरलो आणि मग मात्र फारच गरम झाली तेव्हा लक्षात आले कि काहीतरी मोठी गडबड आहे. एका सिग्नलला तर गाडी बंदच पडली की. आजुबाजूच्या लोकांनी मदत केली म्हणून रस्त्याच्या बाजूला तरी घेता आली. पोलीसमामाही जाम चिडले माझ्यावर, ट्रॅफिक जाम झाला म्हणून. नशिबाने समोरच एक गॅरेज दिसलं तिथे लावली आहे आता. मेकॅनिक गाडी पाहून सांगेल किती वेळ लागेल ते. मी १५ मिनिटात परत फोन करून सांगतो तो काय म्हणतोय ते".
"अहो, चला टॅक्सी घेऊन जाऊया घरी. तुम्हाला नसेल यायचं तर मी तरी जाते एकटी " इति मी. "अगं, १५ मिनिटात दुरुस्तीला किती वेळ लागेल ते ड्रायव्हर सांगतोय ना ? तोवर वाट पाहूया आणि नंतर ठरवूया की टॅक्सी करून गॅरेजपर्यंत जायचे कि घरी जायचे ते. इतका वेळ वाट पाहिलीये आपण, आता आणखी थोडा वेळ पाहूया. ठीक आहे ?" श्रीरंग नेहमीप्रमाणे शांतपणे म्हणाले. नाईलाजास्तव मी हो म्हटले.
१५ मिनिटात ड्रायव्हरचा फोन आला "रिपेअरला दीड तास लागेल." बापरे, अजून दीड तास ? शक्यच नाही! ड्रायव्हरने विचारले की "तुम्ही घरी जाताय की गॅरेजमध्ये येताय टॅक्सी करून ? गॅरेज जास्त लांब नाहीये एअरपोर्ट पासून." “लांब नाहीये पण नक्की आहे कुठे आहे ते तरी सांगशील" मी म्हटले. “अहो ताई, विमानतळापासून फक्त २० मिनिटाच्या अंतरावर तो साकीनाका आहे ना, त्या साकीनाक्यावरच गॅरेज आहे हे” "का...य साकीनाक्यावर ?" मी खुश होऊन एकदम ओरडलेच. श्रीरंगला म्हटले "चला चला घरी नको ! टॅक्सी करून साकीनाक्यावर जाऊया, तुम्ही लक्ष दिलं नाहीत कधी पण माझी कधीपासून इच्छा होती तुम्हाला माहित आहे. ती आज आपोआप पूर्ण होणार असं दिसतंय."
आधी इतकी वाट पहावी लागली म्हणून वैतागलेली मी, साकीनाक्याचं नाव काढताच अजून दीड तास थांबायलाही तयार झाले होते. साकीनाका पहायची माझी ईच्छा किती जबरदस्त होती पहा. मी श्रीरंगकडे हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिले तर गालातल्या गालात हसताहेत हे लक्षात आले माझ्या.
साकीनाक्याच्या कोपऱ्यावर टॅक्सी थांबली. मी कुतूहलाने काही विशेष दिसतंय का म्हणून आजूबाजूला पाहू लागले. समोरच गॅरेज होतं. आमची गाडी गॅरेजमध्ये उभी होती. पण काहीच विशेष दिसत नव्हतं हो तिथे! भरपूर गर्दी असलेला एक चौक. वाहनं वेडीवाकडी उलट्यासुलट्या दिशेने धावत होती. भरपूर खड्डे होते रस्त्यावर. मनातल्या मनात निराशा दाटून आली. एवढी वर्षं हाच साकीनाका पाहायची स्वप्न आपण पहात होतो ? साकीनाक्याने पुरती वाट लावली होती सर्व स्वप्नांची.. मी धक्क्यातून जरा बाहेर आले तर, श्रीरंग खडूसपणे विचारत होते. "जाऊया का साकीनाक्यावर फिरायला व पहायला? आपल्याकडे खूप वेळ आहे. नाहीतर आयुष्यभर मला बोलून दाखवशील कि एवढ्या वेळा मुंबईला जातो पण जवळ असलेला साकीनाका सुद्धा दाखवला नाही अजून मला.” त्यांच्या बोलण्यातील खोच मला समजली.
आता कार रिपेअर होईपर्यंत दीड तास कसातरी काढायचा होता. आमच्याकडे ३/४ बॅग्सही होत्या. समोरच एक वातानुकूलित मालवणी सी-फूड रेस्टॉरंट दिसलं. आम्ही सरळ तिथे घुसलो. "आमची गाडी समोर गॅरेजमध्ये आहे, दुरुस्त व्हायला वेळ लागेल, तोवर इथे बसू का ?" म्हणून मालकाला विचारले. ‘आम्ही विमानप्रवास करून आलोय, फिशबिश नक्कीच खाऊ’, अशी त्याची समजूत झाली असावी त्यामुळे तो आनंदाने "हो " म्हणाला. आम्हाला मात्र फक्त गरम चहाची खूप गरज होती तेव्हा. पण एवढा वेळ नुसता चहा घेऊन तिथे बसायचं ? आम्हाला काही बरं वाटेना, म्हणून मेनुकार्ड मागवले. "आमच्याकडे फिश-करी, फिश-फ्राय, लॉबस्टर खूप छान मिळतं ताई. आमचे सीफूड खूप प्रसिद्ध आहे ह्या भागात. टेस्ट तर करून पहा." मालक आम्हाला पटवत होता. मी शाकाहारी असल्याने, आम्ही सीफूड रेस्टॉरंटमध्ये काय खावे हा प्रश्न होताच! मग आम्ही कांद्याची भजी व चहा मागवला. म्हणजे कमीत कमी 'सी फूड' रेस्टॉरंटमधे खेकडा भजी खाल्ली असे तरी सांगता येईल कोणी विचारलं तर! कधी एकदा गाडी रिपेअर होतीये आणि आपण ह्या साकीनाक्यावरून बाहेर पडतोय असं झालं होतं अगदी. इतकं दमायला झालं होतं की भजी आणि चहा पोटात गेल्यावर, बसल्या बसल्या झोपही येऊ लागली होती. मालकाच्या जर हे लक्षात आलं असतं ना तर हाकलूनच दिलं असतं आम्हाला हॉटेलबाहेर.
तेवढ्यात गाडी रिपेअर झाली म्हणून फोन आला. हॉटेल मालकाचे आभार मानून तिथून बाहेर पडलो, रस्ता क्रॉस करून गॅरेजमध्ये गेलो. मेकॅनिकने बील हातात दिले. ५,००० रुपये. बापरे एवढे बील ? काय प्रॉब्लेम तरी काय होता नक्की ? असे विचारल्यावर चंद्रकांतने मोबाईल समोर ठेवला. त्यावर एक वाळून चपट्या झालेल्या बेडकाचा फोटो होता. मी जरा रागानेच विचारले "बरा आहेस ना चंद्रकांत, हा बेडकाचा फोटो कशाला दाखवतो आहेस आत्ता आम्हाला ? गम्मत करतोयस कि काय आमची?" तो म्हणाला "अहो ताई, हेच तर खरं कारण आहे गाडी रिपेअर करावी लागली त्याचं. तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही म्हणून फोटो काढून ठेवला मी. अहो ताई, आपली गाडी अंगणात उभी असते ना ? तुम्हाला माहीतच आहे की, पावसाळ्यात गावाला खूप बेडूक बाहेर येतात. त्यातलाच एक, कधितरी गाडीच्या कूलिंग फॅनमधे जाऊन बसला असेल, बाहेर यायला जागा न मिळाल्याने तिथेच तो मेला असावा." अरेरे ! बिच्चारा बेडूक. आम्हाला साकीनाक्याचं दर्शन व्हावं म्हणून त्याला त्याची नाकेबंदी करून घ्यावी लागली आणि स्वतःचा जीवही गमवावा लागला होता.
साकीनाका पाहायची माझी हौस पूर्णपणे भागली होती. आता मुंबईला आम्ही उतरलो कि चंद्रकांत दरवेळी विचारतो "ताई, घरी जायचं की जाऊया 'बेडूक नाक्याला'?" श्रीरंगही म्हणतात "चल चल, वळव बेडूक नाक्याकडे" मग आम्ही तिघेही खळखळून हसतो...
- स्नेहल केळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा