आनंद-भरारी


“माझ्या मुलाला इथे काय सल्ले मिळतात?” राहुलच्या आईचा प्रश्न

राहुल एक अतिशय हुशार विद्यार्थी...तल्लख बुद्धी, उत्कृष्ट वक्ता, अफाट वाचन आणि उमदे व्यक्तिमत्व. पहिल्याच सेमिस्टरला पहिला आला होता तो. जेव्हा त्याच्या आईला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्या खूप खुश होत्या, मग त्याच्या प्रगतीवर आज ही कोणती शंका? त्याची आई एका मोठ्या महाविद्यालयाची मुख्यध्यापिका होती, त्यामुळे ह्या प्रश्नावर मी थोडी अचंबित झाले. हळुहळू कोडे उलगडले, राहुलला कमेंटेटर बनायचे होते. त्याला कुठचाही खेळ, त्याचे नियम लगेच अवगत होत असत. त्याला कित्येक खेळ, असंख्य खेळाडू, त्यांचे पराक्रम,आकडे आणि त्या खेळातील बारकावे मुखोद्गत होते. तासंतास तो त्या विश्वात रममाण व्हायचा,

स्वतःची मते खूप छान मांडायचा. शिक्षणात निपुणही होता परंतु त्याचे जग वेगळे होते, त्याची आवड आणि शिक्षण यात काहीही साम्य नव्हते. जेव्हा त्याच्याशी पहिल्यांदा बोलले तेव्हा लक्षात आले की तो खूप वेगळा आहे. तो तसाही एक सफल व्यक्ती बनेल परंतु त्याच्या आवडीच्या क्षेत्रांत की त्याच्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार? माझ्या पाहण्यात आलेले अनेक पालक हे त्यांच्या इच्छा मुलांवर लादत होते, कारण काहीही असेल; स्कोप, नोकरी, पैसा किंवा त्यांनी पाहिलेले जग. आणि त्यातून ते त्या कोवळ्या खांद्यांवर ते ओझे टाकत होते जे पुढची ४० वर्ष त्या मुलाला मानसिक यातनांमधून जायला भाग पाडेल. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेची कुवत आणि आवड वेगळी

असते आणि ती ओळखून आपल्या मुलाच्या आवडीचा व योग्य मार्ग काढणे हे प्रथम पालकांच्या ध्यानी आले पाहिजे. मार्कांवर मुलांचा वैचारिक आलेख ठरत नाही. फक्त त्याच्या विषयांच्या आवडी निवडी कळू शकतात. त्या मुलाचा अपरिपक्वपणा, आर्थिक व भावनिक अवलंबन याचा फायदा न घेता जर शांतपणे एकदा आपल्या पाल्याचा भविष्याचा विचार केला तरी पुरेसे आहे. जग कठीण आहे हे सर्वमान्य आहे. पण तुमच्या मुलाला फक्त तुमचा आधार हवा असतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या बरोबर उभी आहे इतकीच हमी हवी असते. आणि जर त्याचा निर्णय चुकला तर तो जगाचा शेवट नक्कीच नसतो, प्रत्येक माणूस चुकतो मग १८ वर्षांच्या ‘कायद्याने सज्ञान’ मुलांनी चुकायचे नाही हे बंधन का? मूल यशस्वी झाले तर घरच्यांचे प्रयत्न व पाठिंबा परंतु अयशस्वी ठरले तर सर्वस्वी त्याची चूक हा कुठचा न्याय? साधारणतः शिक्षणेतर क्षेत्रात सहसा मुलांनी जाऊ नये अशी पालकांची

इच्छा असते पण तिथेच सचिन तेंडुलकरची इतक्या लहान वयातील कीर्ती, त्याची जिद्द याचे धडे ते गिरवत असतात, मग स्वतःच्या मुलाच्या जिद्दीचा विचार करायला मागे का वळतात? सर्व मालिका,चित्रपट पाहतात परंतु मुलाला जर अभिनेता बनायचे असेल तर ते क्षेत्र कसे वाईट आहे यावर घरातील सर्वांचे एकमत होते. सचिन 'सचिन' झाला याला एक कारण त्याचे पालक सुद्धा आहेत, हा विचार कसा मनात येत नाही? राहुल साठी आम्ही महाविद्यालयात प्रयत्न करू लागलो होतो. त्याला आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांची कॉमेंटरी तसेच क्रिडा लिखाण करायला प्रोत्साहन देत होतो, विद्यापीठाच्या भाषण स्पर्धांसाठी पाठवत होतो, जेणेकरून ३ वर्षांनी त्याला

योग्य मार्ग सापडेल. त्यात वावगे असे काहीच नव्हते. अनेक मुले होती ज्यांना वेगळ्या क्षेत्रात जायचे होते पण घरच्या दबावामुळे वेगळेच काहीतरी करत होती, ती कशी यशस्वी होतील? आणि जेव्हा ती अपयशी ठरतात तेव्हा घरची मंडळी त्यांनी कसा अभ्यास नाही केला याचे पाठ देतात. त्यांच्या अपयशाच्या मागे कोण आहे? जर त्यांच्या यशाचे भागीदार व्हायचे असेल तर त्यांच्या अपयशाचे भागीदारही व्हावे लागेल, घेता त्यांच्या अपयशाची जबाबदारी? प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहण्याचा हक्क आहे, मुलं तुमचीच आहेत, घेऊ द्या त्यांना त्यांचे निर्णय, ती आनंद-भरारी…काय आहे खरा आनंद? पैसा कमविणे की हे अनमोल आयुष्य

मनाप्रमाणे जगणे? जे मनात आहे ते कृतीत घडवणे...यालाच जगण्याचा आनंद म्हणतात नाही का? असे अनेक राहुल झाले, नुपूर हि उत्कृष्ट नृत्यांगना झाली, गार्गी शेफ झाली, प्रिया पटकथाकार, कृती अभिनेत्री, पंकज चित्रकार तर अभिजित पत्रकार…आणि असे अनेक घेतील, आनंद-भरारी….

तेजश्री दाते






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा