ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४
फोटो सौजन्य: भाग्यश्री गुप्ते
अनारसे
दसऱ्याच्या आसपासच रात्री छान गार वाटायला लागायचं आणि मग दिवाळी येईपर्यंत मस्त धुकट थंडी पडायची. शाळेच्या मागे वाडियापार्कातल्या मैदानावर फटाक्याची दुकानं लागायला सुरुवात झाली की सुट्टीचे वेध लागायचे; आणि त्याच सुमारास घरी आई फराळाचं करायला घ्यायची. जास्तीचे पोहे, शेंगदाणे, बेसन, साखर, मनुके, चारोळी, भाजणीचं पीठ वगैरे तिने कधी भरून ठेवलेलं असायचं त्याचा पत्ताही लागायचा नाही. डबे वगैरे लख्ख घासून त्यात हे सगळं सामान भरलेलं असायचं आणि मग दिवाळीच्या आधी चार दिवस बाहेर यायचं.
सगळ्यात पहिला असे चिवडा. पातळ पोह्यांचा चिवडा आईच्या आवडीचा. तो झटकन दुपारीच एक-दीड तासात करून टाकला की मग पुढचे वेळखाऊ पदार्थ यायचे. चिवड्यानंतर क्रमाने शेव, चकली, कडबोळी वगैरे तिखट मंडळी झटपट तयार होऊन बसायची. त्यांच्यामागून मग गोडाची स्वारी येणार. बेसनाचे किंवा राघवदास लाडू, शंकरपाळे किंवा कापण्या, चिरोटे किंवा करंज्या वगैरे राजेशाही पदार्थ एकामागे एक परातीत येऊन पडायला लागायचे आणि बाहेर खेळता खेळता दर थोड्या वेळाने येऊन त्यातलं काही खायला मिळतंय का हे पाहाणं निकडीचं व्हायचं. पण ह्या सगळ्या धबडग्यात एखाद्या विक्षिप्त राजकुमारासारखा असलेला पदार्थ म्हणजे अनारसे. त्याचं पीठ भिजवून आंबवायला ठेवावं लागे आणि त्या पिठाच्या वासाने वैताग येई. अशा वासाचा पदार्थ आपण कसं काय खातो असा प्रश्न पडे. पण आईने अनारसे तळायला घेतलं की मी स्वयंपाकघरात ठिय्या मारत असे. आंबलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटायच्या, त्यावर खसखस पेरायची आणि मग तापलेल्या तुपात अलगद सोडायचं; की मस्त फुलून येऊन एक जाळीदार गोल चकती तयार होणार. चांगली लाल होईपर्यंत खरपूस तळून मग ते अनारसं बाहेर काढायचं आणि तूप निथळण्यासाठी स्टीलच्या चाळणीत टाकलं की कधी खाऊ न् कधी नाही असं व्हायचं. कुरकुरीत जाळीदार न होता एखादं अनारसं तेलात पसरलं तर आई म्हणायचं अनारसं हसलं. असं न हसलेलं, जाळीदार, कुरकुरीत पण तरीही थोडंसं चिवट असं अनारसं खाताना मात्र खाणारा हसणार ह्याची खात्री.
दिवाळीच्या सुट्टीत असंच एकदा मृत्युंजय वाचत होतो. त्याच्या नायकाला, म्हणजे कर्णाला, अपूप-नवनीत आवडतं असं लिहिलेलं वाचलं. अपूप म्हणजे काय बघायला शब्दसूचि पाहिली तर अनारसं. एकदम भारीच वाटलं. त्या कादंबरीतल्या कर्णासारखं अजून अनारशाबरोबर लोणी खाण्याची अजून हिंमत झाली नाहीय; पण अनारशाला माझा प्रिय पदार्थ म्हणून हम जीभ दे चुके सनम!
-निरंजन नगरकर
----------------------------------------------------------------------
चिवडा
तुम्ही कधी चिवड्याची भेळ करून खाल्ली आहे?
चिवडा हा असा पदार्थ आहे जो कशाबरोबर हि खाल्ला जाऊ शकतो असं मला वाटतं. अगदीच सांगायचं झालं तर चिवडा हा “स्पेस होल्डर” पदार्थ आहे! घरी अचानक पाहुणे आले तर पटकन काय देऊया म्हणून आपल्यापैकी अनेकांनी चिवडा कधीतरी ऑफर केलेलाच असतो. तसं नसेल आणि कुणी आल्यावर भयानक कंटाळा आला आणि पोहे किंवा उपमा करायचा नसेल तरी आजही छोट्या गावात चिवडा आणि घरात करून ठेवलेले असतील तर लाडू दिले जातात. चिवड्याला खायला क्लास किंवा चॉईस असं कधी काही लागतच नाही. हा असा पदार्थ आहे जो भल्या भल्या महारथींच्याही घरीही आवडीने खाल्ला जातो आणि साध्या लोकांकडे देखील तितक्याच सहजपणे वाढला जातो.
चिवडा हा असा पदार्थ आहे जो कशाबरोबर हि खाल्ला जाऊ शकतो असं मला वाटतं. अगदीच सांगायचं झालं तर चिवडा हा “स्पेस होल्डर” पदार्थ आहे! घरी अचानक पाहुणे आले तर पटकन काय देऊया म्हणून आपल्यापैकी अनेकांनी चिवडा कधीतरी ऑफर केलेलाच असतो. तसं नसेल आणि कुणी आल्यावर भयानक कंटाळा आला आणि पोहे किंवा उपमा करायचा नसेल तरी आजही छोट्या गावात चिवडा आणि घरात करून ठेवलेले असतील तर लाडू दिले जातात. चिवड्याला खायला क्लास किंवा चॉईस असं कधी काही लागतच नाही. हा असा पदार्थ आहे जो भल्या भल्या महारथींच्याही घरीही आवडीने खाल्ला जातो आणि साध्या लोकांकडे देखील तितक्याच सहजपणे वाढला जातो.
मी अगदी लहान असताना मला चिवड्याचे विशेष कुतुहूल वाटायचे कारण माझ्या शाळेत येणारी सरपंचाची मुलगी आणि गावातल्या न्हाव्याची मुलगी दोन्ही अधून मधून डब्यात चिवडा आणायच्या आणि आम्ही सगळ्याच तितक्याच आवडीने तो चिवडा हादडायचो. हा चिवड्याचा समभाव मला तारुण्याचं सळसळत रक्त असताना फार विशेष आवडू लागला कारण तो कोणताही भेदभाव करत नव्हता आणि तो हॉस्टेलच्या कठीण काळातला जिवाभावाचा साथीदार होता. मध्यरात्री अभ्यास करताना हॉस्टेलवर जेव्हा आमचा खाऊचा साठा संपत यायचा तेव्हा महिनाभर हाच चिवडा मला साथ द्यायचा. कुर्रम कूर्म आवाज करत मध्यरात्री चिवडा खाऊन झोपलेल्या किंवा अर्धवट पेंगत असलेल्या माझ्या मैत्रिणींना उठवायची गम्मत करायलाही फार मजा यायची.
नवोदय विद्यालयात माझं माध्यमिक शिक्षण झालं. इथे वेगवेगळ्या गावच्या मुली असायच्या. दिवाळीची सुटी संपवून सगळ्या परत शाळेला यायच्या तेव्हा प्रत्येकीच्या बॅगेत सगळा फराळ किंवा खाऊ नसायचा पण चिवडा असायचा अगदी भरपूर. आणि प्रत्येक चिवड्याची वेगळी चव..कुणाचा साधा आणि कमी तिखट तर कुणाचा कांदा लसूण वाळवून फोडणी केलेला..प्रत्येकाची चव तितकीच भन्नाट असायची. आम्ही सगळ्या हा चिवडा एकत्र बसून खायचो, दिवाळीच्या गप्पाटप्पा एकमेकींना सांगायचो. धम्माल होती ती सगळी. ती चवदार धमाल आजही तितकीच आठवते कारण ताटलीत अगदी काजू वगैरे घातलेला अमुक तमुक यांचा चिवडा आला कि तरी घरगुती भन्नाट चव हरवली आहे असे मनात वाटत राहते.
पश्चिम महाराष्ट्रात चिरमुर्यांच्या चिवड्याला भडंग म्हणतात आणि उत्तर महाराष्ट्रात पोहे, चिरमुरे, भाजके पोहे यापैकी कसलाही चिवडा असो त्याला चिवडाच म्हणतात. मी उत्तर महाराष्ट्रातली. माझं नवीनच लग्न झालं होत. आम्ही तेव्हा पुण्याला होतो आणि सासूबाई येणार होत्या. मी सहज म्हणाले आई येणारेत, मी जरा चिवडा लाडू करून ठेवते. सासरची मंडळी कोल्हापूरची.. मी सवयीने सोपा आणि पटकन होणार चिरमुऱ्याचा चिवडा केला.दुपारी सगळ्यांना हा घ्या चिवडा लाडू असं म्हणाले आणि मग काय ताटली पुढे केल्यावर सगळेच खो- खो हसले. त्या दिवशी मला कळले पश्चिम महाराष्ट्रात चिरमुऱ्याचा चिवडा हा चिवडा प्रकारात मोडत नाही. त्याचा विशेष वर्ग आहे भडंग म्हणून!!!
असो पण मला भडंग हा सुद्धा चिवड्याचाच प्रकार वाटतो. वजन कमी करणाऱ्यांना अमुक तमुक यांचा प्रसिद्ध बिसिद्ध चिवडा खाता येत नसला तरी भडंग ते खाऊ शकतात. बघा इथेही चिवडा सगळ्यांना आपलंस करून ठेवतो. मी तर बरेचदा खूप कंटाळा आला असेल आणि चाट खावंस वाटत असेल तर चिवड्याची भेळ करते. चिवड्याचा भेळीच्या खूप छान आणि खास आठवणी आहेत आजही माझ्या मनात.
आम्ही दहावीत होतो. परीक्षेचे दिवस होते सुरु होते. आम्हा सगळ्यांनाच इतिहासाची भीती वाटायची. ती भीती होती सनावळ्या असल्यामुळे. कितव्या साली काय झालं हे महत्वाचं कि नेमकं काय झालं आणि पुढे त्याचे काय झालं हे महत्वाचं हे मला आजही इतिहास विषय समोर आला कि डोक्यात येतंच. तर आम्ही सगळ्यांनी भरपूर रट्टा मारून या सनावळ्या पाठ केल्या होत्या. तरी व्हायचा तो गोंधळ होतच होता. आम्ही सगळ्याच दमलो होतो. रात्रीची कुणाला नीट झोपही येत नव्हती आणि अभ्यासही इसवी सनाच्या गोंधळ गडबडीमुळे फारसा होत नव्हता. अचानक चला आपण ग्रुप स्टडी करूया असं एकीने सुचवलं. आम्ही सगळ्या जमलो आणि प्रत्येकीने आपली पुस्तक आणि सोबत उरलेला सुरलेला चिवडा आणला. आम्ही तो एकत्र केला. मेस मधून लपवून आणलेला कांदा चिरला, टोमॅटो घातला आणि जरा तिखट मीठ. झाली आमची चिवड्याची भेळ. आणि मग भेळीच्या त्या घासाबरोबर सुरु झाले इतिहासातल्या गोष्टींचे चर्चासत्र. रात्रीतून आम्ही बऱ्यापैकी सगळी उजळणी केली. बऱ्यापैकी सनावळ्या लक्षात राहिल्या. दुसऱ्या दिवशी पेपर अगदी छान गेला. आणि बोर्डातेही इतिहासाला छान गुण मिळाले ! चिवड्याचा भेळीनेच आम्हाला तारलं..हो कि नाही..
असे हे माझं इति चिवडा पुराण !! आता दिवाळी संपत आली. फराळाचे इतर पदार्थ संपले कि करून पहा तुम्हीपण चिवड्याची भेळ.. कदाचित चटक मटक आठवणींचा खजिना तुमच्याकडेही जमा होईल.
- दीपिका कुलकर्णी
-----------------------------------------------------------------------
लाडू
लाडवांशिवाय दिवाळी कशी शक्य असेल. लाडू हा दिवाळी सणाचा आत्मा असावा असं मला वाटत. प्रत्येकाच्या फराळाच्या पदार्थांशी आठवणी जोडलेल्या असतात तशा माझ्या आठवणी लाडूशी जोडलेल्या आहेत. लाडू समोर आला कि मला माझं बालपण आठवत. मी जरी स्वतः उत्तम फराळ करत असले तरी आईच्या हाताचे बेसन लाडू कधी मिळतील असे वाटते आज देखील. बेसनाच्या लाडू म्हणजे फक्त तूप, बेसन आणि साखर. तीन पदार्थ असतात पण ते तितकेच प्रमाणाने आणि प्रेमाने एकमेकात मिसळायला हवेत नाहीतर मग लाडू फसतात.
माझ्या बाबांना बेसनाचा लाडू फार आवडायचा आणि बाबाना आवडतो म्हणून मग मलाही तो आवडू लागला. निरागस बालपण दुसरं काय! आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ आपल्याही आवडू लागतात तसाच माझाही काही होत. आज बाबा नाही आहेत. पण आईच्या हाताचा लाडू मात्र त्यांची सतत आठवण करून देतो.
दिवाळी आली घेऊन आठवणीं च्या माळा
फराळ करताना आठवे सगळं मला
बेसन लाडू आणि दिवाळी हे समीकरण आहे मनात करुन घर
लाडवाचा वासाने मनात दरवळतो आठवणींचा मोहोर
बाबांचा हात आज सुटलाय जरी
पण प्रत्येक वेळी लाडू केला की वाटत ,
बाबा प्रेमाने आशीर्वाद देत असतील आजही..
- भाग्यश्री गुप्ते
----------------------------------------------------------------------
सण आला दिवाळीचा !!!
आला सण मोठा
आनंदाला नाही तोटा,
क्षण सुखाचे वाटा
अहंकार गाळा खोटा...
लोभ-मोह-माया विसरा
सर्वांमध्ये मिसळा जरा,
शेव-चिवडा-चकली फस्त
रोषणाईचा करा उत्सव साजरा...
फुलझडी लावा, लवंगी फोडा
घर सजवा फुलं-हाराने,
शंकरपाळे, करंजी लाडू खा
स्वागत करा आप्तांचे मनाने...
दिवे-उदबत्ती लावा घरी
पूजा-आरती करा देवांची,
क्रोध-मद-मत्सर दूर सारा
कवाडे खोला मनाची...
- प्रफुल्ल मुक्कावार
------------------------------------------------------------------------
चकली
कृती - सर्वप्रथम एका पातेल्यात थोडे पाणी घेऊन त्यात अर्धी वाटी तेल, तिखट, मीठ घालावे. पाण्याला उकळी येऊ द्यावी. लगेच गॅस बंद करून त्यात ....
काही सुचत नाही बुवा.. काय लिहू फराळाबद्दल. आधी वाटलं कविता करावी पण काहीच यमक जुळेना. सारखं आपलं लाडू ला जाडू, चकली ला टकली, करंजी ला सतरंजी हे असलंच काहीतरी डोक्यात ! मग बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणत लहानपणी मी कसा आईला चकल्या पाडायला मदत करायचो असं लिहावं का काय असं म्हणलं, पण बायकोला 'हा ऋतुगंधच्या नावाखाली कामं टाळतोय' हे कळलं कि कंबख्ती ! तश्या दिवाळीच्या गोष्टी म्हणजे पर्वतीचा धनत्रयोदशीच्या पहाटेचा दीपोत्सव (वर्षातील अगदी मोजक्या दिवसांपैकी एक कि जेव्हा मी पहाटे उठतो), लहानपणीचे किल्ले, घराची वाळूच्या ट्रक्सची पूजा, फटाके अश्या गोष्टी आहेतच. आवडत्या पदार्थांबद्दल लिहायचं तर काय.. आई आणि मावश्यांच्या हातचे लाडू, चिवडा, ओल्या नारळाच्या करंज्या, चकल्या वगैरे आहेच की.. मग जाऊ दे आपण आपली एखादा पदार्थ कसा करतात ह्याची रेसिपीच लिहू.. पण आमची कृती ती काय .. आईला फोन करून सगळं सामान विचारून घ्यायचं, ते आणायचं, आणि फोनवरच विचारून 'स्वयं'पाक करायचा ! असो. इतकं सगळं लिहायच्या ऐवजी मी आता फराळाचं खातो, तुम्ही पण खा !आणि ह्या दिवाळी अंकाचा आस्वाद घ्या, हा साहित्य-फराळ खास तुमच्यासाठी !
- सुमेध ढबू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा