ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
किसी ने गालिब से पूछा,
“कैसे हो?”
गालिब ने हंसकर कहा,
“जिंदगी में गम हैं”
“गम में दर्द हैं”
“दर्द में मजा हैं’
और मजे में “हम” हैं”
मला तर वाटतं या चार ओळीत गालिब आनंदात जगण्याचे गुपितच सांगून गेला. माणसाला शेवटी काय हवं असतं आयुष्यात? सुख ...समाधान … आनंद. सृष्टिकर्त्याने माणूस जन्माला येताना काही मखमली पायघड्या घालून नाही ठेवल्यात. एकदा आयुष्याचा स्वीकार केला की मग त्यासोबत येणाऱ्या सगळ्या रसांचा स्वीकार हा करावाच लागणार. मग त्यातील एकाच रसाला आपल्या सगळ्या आयुष्यावर राज्य करु द्यायचं का नाही हे आपण ठरवायचे, आपला आनंद आपण शोधायचा.
हे असं लिहिणे , बोलणे सोपे असते पण प्रत्यक्षात असा आनंद प्राप्त करणे कदाचित दुरापास्त. खरा आनंद होणे म्हणजे काय? आपण नेहमी म्हणतो मजा आली, मस्त, छान वाटले, आनंद झाला. पण हा आनंद चिरकाल टिकणारा असतो का? का हा फक्त काही काळासाठी मन:पटलावर उमटलेला तरंग असतो? हे मन हाच खरा प्रश्न असतो बाकी सगळे त्याचे उपप्रश्न. आता जिथे भिन्नता, द्वैत, विचार, भय, क्लेश, वासना जन्म घेतात ते मनच अस्तित्वहीन झाले तर? तत्त्वज्ञान सांगते अशी मन गळून जाण्याची, मनाचा लय म्हणजे मनोलय झालेली स्थिती म्हणजे “केवल आनंद”
परंतू या अशा स्थितीला पोहोचणे काही सोपे नाही. माझ्या सारख्या सामान्य स्त्रीला तर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट.
आयुष्याच्या माध्यान्हीला पोहोचता पोहोचता अनेक भ्रमाचे भोपळे फुटलेले असतात. रोजच्या जगण्यातील तडजोडीला आपण सरावलेले असतो. आहे त्यात सुख मानायला आपण शिकलेले असतो. आणि सगळं सुरळीत चाललेले असतांना अचानक एक पोकळी जाणवायला लागते. काहीतरी राहून गेले याची रुखरुख लागू लागते. काडी काडी वेचून बांधलेलं घरटं एखाद्या वादळात कोलमडणार तर नाही ना अशी काहीतरी अनामिक भीती वाटायला लागते. चार क्षण गणगोतांबरोबर आनंदात घालावून आलो तरी एकटं असताना सुनेसुने वाटायला लागतं. आपण काहीही कामाचे नाही, अजून पर्यंत काहीही भरीव काम केले नाही ही भावना जन्म घेते आणि आयुष्य हे हेतूहीन वाटू लागते. मला तर वाटते प्रत्येकजण कमीअधिक प्रमाणात, कदाचित वेगवेगळ्या वयात यातून जात असतो.
मग त्यावर सुरु होते ते औषधपाणी. पण हे औषध म्हणजे बहुतांशी वेळा हे तात्पुरते वेदनाशामक असते. जे एक प्रकारची गुंगी निर्माण करते आणि कदाचित त्याची सवय लावते, एखाद्या अंमली पदार्थासारखी. याचे एक छोटेसे उदाहरण द्यायचे झाले तर फेसबूकवर आपल्या पोस्टला किती लाईक्स आले यात आनंद शोधणे, कारण त्यातून काही वेळासाठी आपण कोणीतरी आहोत ही भावना येते. किंवा सतत youtube, social media, netflix अशी आणि इतरही अनेक माध्यमे चाळत राहणे म्हणजे काही करून विचार करायला डोकं मोकळे राहणार नाही. पण ही गुंगी जेव्हा उतरते, तेव्हाच्या वेदना या असह्य असतात. म्हणून या रोगाच्या मुळावरच उपचार केला पाहिजे. म्हणजेच प्रत्येकाने आपल्या पद्धतीचा “केवल आनंद” शोधला पाहिजे.
अशाच आनंदाच्या शोधात दोन एक वर्ष “वॉल्डन” नावाच्या तळ्याकाठी आदिम अवस्थेत रहायला गेलेला प्रख्यात अमेरिकन लेखक आणि विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो म्हणतो ‘‘मी रानांत राहायला गेलो ते अशासाठी की जीवन हेतुपुरस्सर जगावे, जीवनाच्या मूलभूत तथ्यांना सामोरे जावे, जे इतरांना शिकवायचे ते आपल्या स्वत:ला शिकता येते कि नाही ते पाहावे आणि मरतेवेळीच आपण जगलो नाही हे उमगू नये म्हणून.” त्यातून त्याने “वॉल्डन” नावाचा ग्रंथ लिहून त्याचा “केवल आनंद” मिळवला.
आपल्यासारख्या सामान्यांना जरी आपल्या जबाबदाऱ्या सोडून असे काही करणे सहजशक्य नसले तरी दिवसभरात एखादीतरी अशी गोष्ट करावी की जी करताना त्यात मन विरघळून जाईल. काही लोकांसाठी ती गोष्ट म्हणजे एखादं वाद्य वाजवणे असेल, एखादी पाककृती करून बघणे असेल, समाजोपयोगी काम असेल, व्यायाम असेल किंवा काहीही. माझ्यासाठी सर्जनशीलता ही ती गोष्ट आहे. वेगवेगळ्या वेळी ही सर्जनशीलता अनेक माध्यमांचे रूप घेते. एखादी कविता करतांना किंवा लेख लिहितांना, जरी विषय अगदी हलका फुलका असेल तरी माझे डोळे पाझरू लागतात. बागकाम करतांना आपण मशागत केलेल्या झाडाला आलेली पालवी किंवा कळी पाहिली की मन एका अनोख्या आनंदाने नाचू लागते, किंवा नाटकातली एखादी भूमिका करून घरी आल्यावर अतिशय शांत वाटतं. का? कारण यात मला सृजनाचा आनंद मिळतो. मग त्यात आपण निर्मिलेली गोष्ट दुसऱ्याला आवडली का नाही यावर माझा आनंद अवलंबून रहात नाही कारण तिने मला तो “केवल आनंद” दिलेला असतो. तो आनंद जरी क्षणिक असला, तरी त्याचा गंध कायम माझ्यापाशी राहतो आणि माझ्यातल्या सृजनाला सतत हाक मारत राहतो. माझ्या जगण्याला माझ्यापुरते महत्त्व देतो.
ह्या मन सतत विरघळून गेल्याच्या स्थितीपर्यंत पोहोचणे जरी अशक्यप्राय वाटत असले तरी अशी आनंदाची बेटे शोधत जगणं नक्कीच सुखकारक होते. त्यातून मिळणारी क्षणिक उर्जा दिवसभर मन स्वस्थ, शांत ठेवते. आपल्या प्रश्नांचा वेगळ्या दृृृष्टीकोनातून विचार करायला, मन ताजेतवाने करते. म्हणा तशी मी काही इथे फार नवीन गोष्ट सांगितली नाही पण माझ्या आनंदाचं मूळ मला मिळाल्यावरचा आनंद सगळ्यांबरोबर वाटण्यासाठी केलेला हा प्रयत्न. गालिबने म्हटल्याप्रमाणे आयुष्यातील सुखं-दुःखं मुक्तहस्ते कवटाळून, आनंदी राहायचा प्रयत्न! काही क्षणांसाठी चमकलेल्या त्या केवल आनंदाच्या काजव्यांचा प्रकाश पकडून आयुष्याची वाट उजळायचा हा प्रयत्न!
प्राजक्ता नरवणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा