आनंदकंद

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे यावर्षी रौप्य महोत्सवी सांगता वर्ष आहे. त्यानिमित्त ऋतुगंध ह्या ई द्वैमासिकाचा हा विशेष अंक, "ऋतुगंध वर्षा" सिंगापूरसारख्या परक्या देशात या ऋतुगंधने मराठी भाषेचा दीप गेली तेरा वर्ष तेवत ठेवला. सांगता म्हणजे साफल्य. यानंतरही ऋतुगंध नवीन रुपात, नवीन उन्मेषांसह येईलच, याचा विश्वास गेल्या तेरा वर्षांनी दिला आहे. या विशेषांकासाठी चार शब्द देताना आनंद होतो. या अंकाचे यावर्षीचे संकल्पना सूत्रही आनंद हेच आहे. 

ऋतुगंध. इतके विविध रंग तर मनाचेच असू शकतात आणि त्याच मनाचा खरंतर स्थिर मनाचा विलक्षण एकजिनसी एकतानतेचा अनुभव म्हणजे आनंद आणि त्याच आनंदाचा उत्सव सोहळा ऋतुगंध आज साजरा करतेय. कालिदासाच्या 'ऋतुसंहार' या काव्यात सृष्टीचे अपार सृजन वैभव येते ते अंतर्बाह्य आनंद रूपच आहे. 'संहार' म्हणजे येथे विनाश नाही तर ऋतुगंधाचे सार आणि ते संपूर्ण निरपेक्ष निरुपाधिक आनंदमयच आहे. संहाराचा दुसरा अर्थ संक्षेप आहे. संक्षेप देखील त्या संपूर्ण विखुरलेल्या आनंदाचा सारांशच असतो. जे विखुरले आहे तेच अर्करुपात द्यावयाचे. काय असतो हा आनंद! तो कशावर निर्भर असतो! शरीर व मनाची एकतानता म्हणजे तरी काय तर तो मूलभूत असा काव्यानंदच असेल. तो नसतोच कशावर अवलंबून. विंदा करंदीकर म्हणतात'काव्यानंदरसप्रसंग मग हा नि:संग संभोगणे'. या संभोगातील निःसंगता ही इथे मर्माची. केशवसुत म्हणाले की 'प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे'.

हाच आनंद. हेच काव्य. आणि कवी म्हणजे ज्ञानी व काव्य म्हणजे तत्त्वज्ञानच. ते कोरड्या निरस तत्त्व चर्चेने सिद्ध होत नाही तर निखळ आनंद रूपानेच रसपूर्ण होते. या दोन्ही कवींना आनंदाची एक अवस्था अभिप्रेत आहे. एक विशिष्ट पायरी यात गर्भित आहे. विंदांच्या कवितेतील 'मग' या एकाच शब्दात आणि केशवसुतांच्या कवितेत प्रौढत्व आल्यावरही या जाणिवेच्या 'प्रौढत्वी' या एकाच शब्दात या अवस्थेत स्थित अव्यक्त आनंदाचा शोध हीच आपले खरंतर वाटचाल आहे. 

हा आनंद कशावर तोलून धरलेला नाही. तो दुःखाच्या अभावात तर मुळी नाहीच. त्याला अभावाचे अस्तर लागू पडतच नाही. चंद्राला कळा असतात असे म्हटले जाते पण चंद्र हा पूर्ण सोळा कळांचाच असतो, पृथ्वीच्या उपाधीने तो तसा भासतो. ती उपाधी काढली तरी चंद्र परिपूर्ण असतो. ही चंद्राची परिपूर्णता ही सतरावी कला म्हणजे 'अमृतकला' असेच ज्ञानेश्वर म्हणतात ही कला परिपूर्ण आनंदाची असते. ती काही मिळणे न मिळणे यावर अवलंबून नसते, उपलब्धी,अनुपलब्धी यात अडकलेली नसते. 'सूर्याचे घरी प्रकाश काय वातीवेह्री ' असेही ज्ञानेश्वर म्हणतात. वात उजळली की दिसेल नाहीतर दिसणार नाही असा प्रकाश सूर्याचा आहे काय! आणि तोच तर मूलभूत आनंद. त्या आनंदाच्या परी अनेक आहेत. आजन्म कलासाधना करणारे साधक. साधना हेच येथे ध्येय. महर्षी कर्वें सारखे समाजचिंतक, मोठ-मोठे संशोधक, अंतर्गत सत्वासाठी लढणारे लोक असे कितीतरी.

नागपूरला कै. श्री. जनार्दन स्वामींनी स्थापन केलेले योगाभ्यासी मंडळ आहे. तेथे योगाभ्यासाने गरजूंच्या व्याधी निवारण होतात. हा साक्षात अनुभव आहे,आणि शारीरिक मानसिक व्याधी ही तर आपलीच शेती आहे, आपणच खत-पाणी दिलेली. श्री जनार्दन स्वामींनी स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल नी मूल नेमून बांधलेल्या पूर्वीच्या काळी स्त्रियांनाही मोकळ्या हवेत योगासनं करण्याची आवश्यकता मांडली आणि स्त्रियांसाठीही वर्ग सुरू केलेत. डोळे, मणका, कंबर,मासिक पाळी, पोटऱ्या, सांधेदुखी यावर ही योजना रामबाण ठरली. योग म्हणजे तर शरीर व मनाचे संतुलनच व त्याचे पर्यवसन आनंद समाधान हेच असते. हे सर्व वर्ग नि:शुल्क आहेत. बस, सेवा हाच तेथला परमधर्म आहे. 'समाधानाय च सौख्याय निरोगत्वाय च जीवने' हेच त्यांचे ब्रीदवाक्य आहे.

एका अध्यात्मिक आनंद संकल्पनेला येथे पुन्हा थोडे व्यावहारिक रूप प्राप्त झालेले आहे ते लोकांना व्यवहारा खेरीज समाधान होत नाही म्हणून आणि खरा आनंद हा कर्तृत्वाचा अहंकार सोडून व फलाशा सोडून केलेल्या स्वकर्मातच आहे आणि हाच व्यवहार आणि अध्यात्म यांचा मिलाप आहे. यासंदर्भात एक सुंदर प्रतीक कथा आहे ती देऊन थांबते. चार शेतकरी पावसाची वाट पाहत असतात पाऊस पडत नाही पण पेरणीची वेळ होते म्हणून पेरणी करून टाकतात स्वकर्म म्हणून. मोरांना वाटतं की आपण ओरडलो नाही मेघ ओथंबले नाहीत मग पेरणी कशी केली? तर ते ओरडतात शेतकऱ्यांना मदत म्हणून. मेघांना वाटते अरे मोरही केका देतात, मग आपणही भरुनी यावे ना मदत करावी मग तर तेही भरून येतात तर इंद्राला वाटते मी ही आज्ञा दिली नाही मेघांचे हे काय सुरू आहे? त्यालाही कळतं मग तो मेघांना सांगतो आणि पाऊस पडतो . स्वतःच्या इच्छेलाच आनंद मानण्यापेक्षा दुसऱ्यांच्या इच्छेला आनंद मांनणे हीही एक परीच आहे. हाच संतांचा आनंदडोह व हाच यातील आनंद तरंग. शेवटी हा शोध आपला आपणच तर घ्यायचा असतो!

गेले तेरा वर्ष ऋतुगंध तो शोध घेत आहे व ऋतुगंधने परक्या मातीत आपल्या सृजनाचे बी रुजवले, त्याच सृजनाचा शोध घेतला व तोच आनंदशोधही झाला. महाराष्ट्रात अनेक चांगली चांगली नियतकालिकं, अनियतकालिकं बंद पडत गेली पण ऋतुगंध मात्र आपले अक्षय आनंदाचे झरे घेऊन दरवळतोच आहे.


सौ. आशा बगे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा